अपघात म्हटलं की अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांचं काहूर मनात उठतं. ‘कुणाला?’, ‘कुठे?’, ‘कसा?’ असे अनेक प्रश्न. अपघात म्हटलं की मला दोन, नाही तीन अपघात आठवतात. दोन गिरीभ्रमण आणि गिर्यारोहणातील तर एक रस्त्यावरील. २००९ साल असेल, मी पहाटे मोटरसायकलवर मुळशी तालुक्यातील गरुडमाचीला निघालो होतो. पौडच्या अलीकडे एक छोटा घाट लागतो. पहाटेची वेळ, त्यामुळे रस्त्यावर रहदारी अजिबात नव्हती. मी मजेत निघालो होतो. घाट चढून वर येताच अचानक एक विचित्र संकट समोर उभं ठाकलं. ट्रकवाले गाडी बंद पडल्यामुळे तिच्यामागे दगडांची एक गौर मांडून ठेवतात. ट्रक दुरुस्त झाल्यावर, दगड बाजूला करण्याची तसदी न घेता ट्रक निघून जातो. पण रस्त्यात मांडलेली दगडांची रांग तशीच असते! अशीच एक दगडांची गौर अचानक समोर आल्यावर मी गडबडलो, गाडीवरील नियंत्रण सुटलं. नशीब, वेग अतिशय संथ होता! मी धडपडलो, गाडी आडवी आणि मी रस्त्याच्या कडेला फेकला गेलो. आई गं!, असं म्हणत हात डोक्यावर घेतला. भळभळा रक्त वाहत होतं, चांगलीच खोक पडली होती. मी तसाच भाजीच्या टेम्पोमध्ये लिफ्ट घेऊन कसाबसा गरुडमाचीला पोचलो. टाटा पॉवरमधील डॉक्टरनं तपासलं आणि वेगळीच भानगड लक्षात आली, ती म्हणजे माझं डावीकडील कॉलरबोन तुटलं होतं! मी थोडक्यात बचावलो होतो! यानंतर रेवतीनं म्हणजे माझ्या मुलीनं अकांड तांडव करून, दुसऱ्याच दिवशी मोटर सायकल विकून टाकायला लावली!w
याआधी घडलेले दोन मोठे अपघात म्हणजे १९८७ साली ‘पाँवाली काँटा’ ट्रेकवर नदीत वाहून गेलेले डॉ. हिलरी नझारेथ आणि भार्गव शाह, तर १९८८ साली कांचनजुंगा मोहिमेत झालेलं संजय बोरोले याचं निधन. १९८७ साली ८ ते १४ वयोगटातील सुमारे ऐंशी सहभागी मुलं-मुली आणि १६ ते ३५ या वयोगटातील पंधरा आयोजक असा ट्रेक गढवालमधील भिलंगना नदीच्या खोऱ्यातील पाँवाली धार येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हेंचर स्पोर्ट्स’ (IAS) तर्फे आयोजित करण्यात आला होता. आधी ठरलेला लीडर आयत्या वेळेस गायब झाल्यानं ट्रेकचं नेतृत्व माझ्याकडे आलं. भिलंगना नदीच्या किनारी असलेल्या घुत्तू या गावापासून ट्रेक सुरू होऊन त्याच खोऱ्यातील उत्तरेला गंगी गावापर्यंत जाणार होता. उजव्या हाताला, म्हणजेच पूर्वेला भिलंगना नदी पलीकडे दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगरधारेला ‘पाँवाली धार’ म्हणतात. गंगीपाशी नदीकडे खाली उतरल्यावर ‘झाला’ या ठिकाणी भिलंगना नदीवर बांधलेला ओबडधोबड लाकडी पूल आहे. पाचव्या दिवशी आम्ही झाला या ठिकाणी पोचलो. झालाहून सुमारे साडेतीन/चार हजार फुट खडी चढाई चढून आमचा पुढला मुक्काम असणार होता ‘ताली टॉप’ येथे. ट्रेक सोपा असला तरी सुमारे १०० माणसांच्या खाण्यापिण्याची आणि वस्तीची सोय करणं हे नियोजनातील एक फार मोठं आव्हान होतं. आमच्यातलेच दोन तरुण लीडर, अमित आणि राजू हे घुत्तू येथे ट्रेकच्या उत्तरार्धातील खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी मागे थांबले. १०-१५ खेचरं आणि ४-५ खेचरवाले यांच्यासोबत सामानासह ही दोघं आम्हाला सातव्या दिवशी ताली टॉप येथे भेटणार होती. मुख्य ग्रुपनं झाला येथेच सहाव्या दिवशी ‘रेस्ट डे’ घेतला. सहाव्या दिवशी सकाळी आमच्या सर्व व्यवस्था पाहणारा स्थानिक सरदार, जयपाल सिंग हा ताली टॉपची कॅम्पसाईट चेक करण्यासाठी वर निघाला. त्याच्यासोबत आमचा उत्साही डॉक्टर हिलरी नझारेथ औषधांचा साठा घेऊन ‘मी पण वर जाऊन येतो!’ असं म्हणून निघाला. संध्याकाळी डॉक्टर ताली टॉपला मेंढपाळांसोबत मुक्कामाला थांबला आणि एकटाच जयपाल सिंग खाली, झाला येथे परत आला. इथूनच एका भीषण नाट्याची नांदी झाली होती.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सातव्या दिवशी सकाळी लवकरच झाला येथील सारेच जणं कॅम्प आवरून चढाच्या वाटेला लागले. सकाळी सातचा सुमार असेल. एकंदर ९५ जणं, त्यामुळे १०-१५ जणांचे ७-८ ग्रुप झाले आणि सारेच जणं मजेत ताली टॉपची चढाई चढू लागले. ताली टॉप येथे आदल्या दिवशी दुपारी पाच-सहाशे मेंढ्यांचा कळप राखणारे मेंढपाळ डॉ. हिलरीला भेटले. या मेंढपाळांची ‘गद्दी’ म्हणजेच तंबू गेले तीन चार आठवडे तेथे असावा. या गद्दीवरील एक घोडा काही कारणानं आजारी होता. मेंढपाळाच्या घोड्याला डॉ. हिलरीनं तपासलं, इंजेक्शन आणि काही औषधं दिली. साहजिकच डॉ. हिलरीची मेंढपाळाशी छान गट्टी झाली. ताली टॉप कॅम्पसाईटची पाहणी करून सकाळी दहाच्या सुमारास जयपाल सिंग खाली झालाकडे परतण्यासाठी निघाला. मेंढपाळांनी डॉक्टरला तिथेच राहण्याचा आग्रह केला. ‘डॉक्टरसाब, आज मीट बनाया है, आप रूक जाईये!’ असा आग्रह डॉक्टरला मोडवेना. डॉक्टर मेंढपाळांसोबत राहणार असल्यानं, जयपालनं हरकत न घेता तो एकटाच खाली निघाला. सातव्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास भार्गव, राजू आणि खेचरवाले ताली टॉपच्या माथ्यावर पोचले. ताली टॉप कॅम्पसाईट ही माथ्यापासून सुमारे ४०० फुट खाली असलेल्या भल्याथोरल्या गवताळ मैदानात आहे. आदल्या हिवाळ्यातील रेंगाळलेलं हिम अजूनही ताली टॉप माथ्यावर होतं. हे हिम भुसभुशीत असल्यानं खेचरांना सामानासह त्या हिमाच्छादित उतारावरून उतरणं अवघड जाऊ लागलं. या सर्व मंडळींना पाहून डॉ. हिलरी खालून हाका मारत होता. खेचरांसाठी सोपी वाट काढण्याच्या प्रयत्नात खेचरवाले गुंतले आणि राजू त्यांच्या बरोबरच थांबला. डॉक्टरच्या हाकांना प्रतिसाद देऊन भार्गव झरझर उतरून डॉक्टरपाशी पोचला. खालचा ग्रुप त्या वेळेस खालून चढून वर येत असणार, हे डॉक्टरला ठाऊक होतं. मेंढपाळाच्या गद्दीवर चहा पिता पिता, वर येणाऱ्या ग्रुपला थोडं अंतर उतरून भेटायला जाऊया, असं डॉ. हिलरी आणि भार्गव यांचं ठरलं. एकास दोघं असल्यानं मेंढपाळानंही आडकाठी केली नाही. त्यातून डॉ. हिलरीला रस्ता ठाऊक होता. दोघंही मजेत खाली जायला निघाले. ते लगेचच वर येणार असल्यानं सोबत काहीही सामान नव्हतं, अगदी काड्यापेटी देखील. इथून पुढे काय घडलं असावं, याचा केवळ कयास करता येतो!
ताली टॉपपासून झालाकडे जाणारी वाट सुरवातीस पाईनच्या गर्द जंगलातून एका धारेवरून खाली उतरते. सुमारे हजार फुट खाली उतरल्यावर तीच वाट डावीकडे म्हणजेच दक्षिणेकडील उतारावरून झालाकडे उतरते. या भागात अनेक ढोरवाटांचं जाळं दिसून येतं. याच ठिकाणी डॉ. हिलरी आणि भार्गव उजवीकडच्या उतारावर चुकीच्या वाटेला लागले असावेत. खाली उतरणं सोपं असतं, याउलट ‘आता मागे फिरुया’ असं म्हणून चढून वर येणं जरा अवघड! ‘आणखी थोडं पुढे जाऊया’ अशा मोहात ती दोघं खाली उतरत गेली असावीत. तसं पाहिलं तर डावीकडील उतारावरून येणाऱ्या ९५ जणांच्या समूहाचा गडबड गोंधळ सहजपणे कानावर पडण्यासारखा होता. पण उजवीकडच्या उतारावरून उतरतांना आकर्षित करणारा आवाज म्हणजे पाण्याचा खळाळ! डॉ. हिलरी आणि भार्गव आपल्याच नादात या खळाळणाऱ्या आवाजाच्या दिशेनं दरीत एका मोठ्या प्रवाहापाशी पोचले असावेत. दोघांची समजूत ‘आपण झालापाशी पोचलो आहोत!’. तेव्हा दोघंही भिलंगना नदीवरील पूल शोधत असणार. प्रवाह मोठा असला तरी त्यातील दगडधोंड्यांवरून उड्या मारत पार करण्याजोगा होता. दोघंही प्रवाह पार करून पलीकडे पोचले असावेत. प्रवाहाच्या कडेनं डावीकडे वळून खालच्या दिशेने जातांना अचानक धीरगंभीर आवाज करत वाहणारी भिलंगना समोर ठाकली असणार. या ठिकाणी नदी किनाऱ्याला एक छोटा बीच आहे. हे घडत असतांना खालून वर येणारा पहिला ग्रुप दुपारी सुमारे एक वाजता ताली टॉपला पोचला. शेवटच्या ग्रुपसह मी सुमारे पाच वाजता ताली टॉपला पोचलो. सर्वांप्रमाणेच आमच्याकडे पोटात खड्डा पडणारी विचारणा झाली, ‘तुम्हाला डॉ. हिलरी आणि भार्गव भेटले?’. मानेनंच नकार देतांना माझ्या मनात पाल चुकचुकली.
यानंतर आठ-एक जणांनी मध्यरात्रीपर्यंत डॉ. हिलरी आणि भार्गव यांच्या नावानं हाका मारत, झालाच्या दिशेनं दोन्ही उतारांवर शोध घेतला. त्या मध्यरात्री एका एकाक्ष म्हाताऱ्यासोबत सुमारे ३० किलोमीटरची तंगडतोड करत मी पहाटे घुत्तूला पोचलो आणि एका जीपनं प्रवास करून मी टिहरी गाठलं. तिथून सकाळी दिल्लीतील आमच्या अशोक जैन या माननीय ज्येष्ठ पत्रकार मित्राला फोन केला. अशोकच्या ओळखीमुळे त्याच दिवशी दुपारी जोशीमठ येथील आर्मी कॅम्पवरून निघालेल्या हेलिकॉप्टर्सनी दोनदा भिलंगना खोऱ्यात डॉ. हिलरी आणि भार्गव यांचा शोध घेतला. पुढील आठ दिवस आम्ही आठ जणं भिलंगनाच्या काठानं शोध प्रयत्न जारी ठेवले. या शोध प्रयत्नाच्या पहिल्याच संध्याकाळी भिलंगना काठच्या त्या छोट्याश्या बीचवर डॉ. हिलरी आणि भार्गव यांच्या बुटांचे ठसे मिळाले होते! डॉ. हिलरी आणि भार्गव यांचा त्यानंतर काहीच पत्ता लागला नाही. दोघांचाही अंत भिलंगनेच्या जीवघेण्या प्रवाहात झाला असावा! डॉ. हिलरी ताली टॉपला रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणं, दुसऱ्या दिवशी तरुण अमित भार्गव त्याला ताली टॉप येथे भेटणं, दोघंच ग्रुपला भेटण्यासाठी खालच्या वाटेवर निघून, चुकून उजव्या उताराला लागणं, सोबत काड्यापेटीदेखील नसणं आणि अखेर भिलंगनेच्या काठी सापडलेले त्यांच्या बुटांचे ठसे – छोट्या छोट्या चुकांची एक जीवघेणी शृंखला! या शृंखलेमुळेच एक भीषण अपघात घडला होता.

१९८८ साली गिरीविहार, मुंबई या संस्थेमार्फत पहिली भारतीय नागरी मोहीम कांचनजुंगा या अष्टहजारी शिखरावर आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत २४ सदस्य, दिलीप लागू आणि संजय बोरोले असे दोन उपनेते होते. या मोहिमेचं नेतृत्व माझ्याकडे होतं. ती सुमारे ९५ दिवसांची मोहीम असणार होती, तर ८८ साली या मोहिमेचं बजेट होतं २५ लाख! १३ मार्च १९८८ रोजी या मोहिमेनं मुंबईहून नेपाळकडे प्रयाण केले. कांचनजुंगा शिखराच्या नैऋत्येला यालुंग हिमनदीवर सुमारे १८,००० फुटावर बेस कॅम्प लावण्यात आला. यापुढे एकेक करत कॅम्प १ ते कॅम्प ६ असे कॅम्प्स शिखर मार्गावर प्रस्थापित करण्यात आले. यावरील शिखर प्रयत्नासाठी शेवटचा कॅम्प म्हणजेच कॅम्प ६ लागला होता २६,००० फुटांवर. या खाली दोन महत्त्वाचे कॅम्प्स म्हणजे कॅम्प ४ (२४,००० फुट) आणि कॅम्प २ (२१,८०० फुट). मोहिमेच्या नियोजनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मी कॅम्प २ ला तर संजय बोरोले, आरोहण उपनेता यांनी कॅम्प ४ ला मुक्काम ठोकायचा असे ठरले. यामुळे मोहिमेतील सामानाची ने-आण आणि हालचाली नियोजनाप्रमाणे करता आल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच हवामान थोडे खराब होऊ लागले. तरीही १२ मे रोजी चारुहास जोशी आणि १६ मे रोजी उदय कोलवणकर यांनी शर्थीने शिखर प्रयत्न केला. वाईट हवामानामुळे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले परंतु उदय कोलवणकर शिखरापासून जेमतेम ५०० फुटापर्यंत पोचला होता. पहिल्याच नागरी मोहिमेला मिळालेलं हे खूप मोठं यश होतं. दुर्दैवाने या यशालाही गालबोट लागलं!

मोहिमेदरम्यान संजय बोरोले सुमारे ४ आठवडे कॅम्प ४ येथे राहिला. दुसऱ्या आठवड्यानंतर त्याचं पोट बिघडलं आणि साहजिकच त्याचं खाणं कमी झालं होतं. त्याचाच परिणाम त्याच्या तब्बेतीवर झाला. त्यानं खालच्या कॅम्पला जावं असं दोन-तीनदा सुचवण्यातही आलं. परंतु संजय चिकाटीने तिथेच राहिला. बिघडलेल्या हवामानामुळे १४, १५ तारखेस खूप हिमवर्षाव झाला होता. कॅम्प २ वरून आमचा मार्ग सुमारे ७०० फुट उतरून एका मैदानात पोचत असे. त्यापुढे सुमारे ९०० मीटर लांब पसरलेलं मैदान होतं आणि त्यानंतर पुन्हा खड्या चढाईस सुरवात होत असे. याच खड्या चढाईवर कॅम्प ३ आणि कॅम्प ४ लागले होते. कॅम्प ५ व ६ हे मुख्यत्वेकरून शिखर प्रयत्नासाठी लावलेले पुढील कॅम्प्स होते. ८ मे नंतर वाईट हवामानामुळे बरेच दिवस कॅम्पमधे बसून काढावे लागले. कॅम्प २ खालील मैदान पार करायला एरवी ३०-४० मिनिटे पुरत असत. परंतु १४, १५ तारखेच्या हिमवर्षावानंतर भुसभुशीत बर्फामुळे हे मैदान नकळत धोकादायक झालं होतं. ढासळत्या तब्येतीमुळे, अनिलकुमार १६ तारखेस संजयला घेऊन कॅम्प ३ला पोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर चौघांसोबत संजय कॅम्प २ला येण्यास निघाला. कॅम्प २ला डॉ. चितळे, ऑक्सिजन आणि इतर सर्व उपचाराची व्यवस्था हजर होती. संजय आणि पार्टी मैदानापर्यंत व्यवस्थितपणे पोचली. मैदानात कमरेपर्यंत पाय बुडेल इतकं भुसभुशीत बर्फ होतं.


अर्थातच त्यातून मार्ग काढणं अतिशय जिकिरीचं होतं आणि ही सारी वाटचाल संजयला अतिशय थकवणारी ठरली. त्या सर्वांना मैदान पार करण्यास सुमारे ८ तास लागले! कॅम्प २ कडे येणारा मार्ग खड्या चढाईचा होता. या मार्गावर संपूर्णपणे दोर लावलेला होता. त्यामुळे दोराच्या आधारानं चढाई सुकर झाली होती. परंतु त्याच सुमारास म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हिमवर्षावास सुरवात झाली. जोरदार वारे, काकडवून टाकणारी थंडी आणि मार्गावरील गोठलेलं बर्फ यामुळे कॅम्प २ची चढाई हे एक फार मोठं आव्हान होतं. अनिलकुमारनी पुढे जाऊन डॉक्टरला पूर्ण कल्पना दिली. साथीदारांच्या मदतीनं संजय बोरोले मुंगीच्या पावलांनी कॅम्प २ कडे सरकत होता. कॅम्प २ पासून तो जेमतेम १५/२० मिनिटांच्या अंतरावर पोचला होता. या क्षणापर्यंत खूप थकलेला असूनही संजय इतरांशी व्यवस्थित बोलत होता. आणि अचानक संजयनी बसकण मारली, हायपोथर्मियामुळे म्हणजेच शीताघातामुळे तिथेच संजयचा अंत झाला.
दीर्घकाळ अतिउंचीवरील वास्तव्य, पोटाच्या तक्रारीमुळे बिघडलेली तब्बेत, त्यामुळे आलेला क्षीणपणा आणि क्षीण झालेलं अक्लमटायझेशन, अतोनात हिमवर्षावामुळे मैदानाचं पालटलेलं स्वरूप, मैदानातील आठ तासांच्या खडतर चालीमुळे आलेला थकवा आणि हायपोथर्मियाचं म्हणजेच शीताघाताचं मर्यादित ज्ञान अशा घटकांची शृंखला आणि तिचं झालेलं भयानक अपघातात पर्यवसान हे दुर्दैव!
माझ्या मते अपघातांचे तीन गट पडू शकतात –
- मूर्खपणा २. चुका आणि 3. अस्मानी संकट.
‘मूर्खपणा’, गिरीभ्रमणाच्या संदर्भात पहिला गट म्हणजे आजकाल, गेल्या ५/१० वर्षात जे बोकाळलेले दिसते ते! पूर्वी कुठला तरी क्लब, अनुभवी सदस्य अथवा एखादी उत्साही शाळा यांच्या सोबत गिरीभ्रमणास जात असत. आज गिरीभ्रमण आणि पर्यटन यातील फरकच अस्पष्ट झाला आहे. गेल्या ५/१० वर्षात महाराष्ट्रात, सह्याद्रीत अनेक अपघातांचं पेव फुटलं आहे. याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली उदंड आकर्षक माहिती, फोटो आणि व्हिडीओज. हे प्रसारित करणार्यांना आपल्या माहितीचा समाजमनावर काय परिणाम होईल याचं भान नसतं. अनेकदा प्रसिध्दी आणि फुशारकी मारणं याला कारणीभूत ठरतं! यातील बेजबाबदारपणाला आळा घालण्याची नितांत गरज आहे. दुसरं म्हणजे अनेकपटीनं वाढलेली क्रयशक्ती. लालपरीचा विसर पडून आता मोटारसायकल आणि गाड्या सहज उपलब्ध झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी चांगले रस्ते आणि स्थानिक दळणवळणाच्या उत्तम सोयी उपलब्ध आहेत. यामुळे गडकोट, देवालये, धबधबे, नयनरम्य ठिकाणं जवळ आली आहेत. पूर्वी गिरीभ्रमण करणारे आणि स्थानिक यात एक संतुलन होतं. आता स्थानिक रोजगार किंवा उद्योग यामुळे वर उल्लेखिलेल्या सर्वच ठिकाणी राहणं आणि जेवणाखाणाची सोय होऊ शकते. साहजिकच भटकायला निघतांना पूर्वतयारीची आता गरजच नाही असा ‘गोड’ गैरसमज रूढ झाला आहे. याशिवाय साहसी उपक्रमांची वाढती लोकप्रियता ध्यानात घेऊन अनेक उद्योजक साहसी उपक्रम व्यावसायिक तत्त्वावर आयोजित करू लागले आहेत.
वरील पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुटपुंजी माहिती मिळवून, ट्रेकिंगचा कुठलाही अनुभव नसतांना लोकप्रिय ट्रेकिंग मार्गांवर अनेक पर्यटक गर्दी करतात. यातच ‘वेन्जॉय’ अशा चंगळवादी परिवारातील सदस्य या ठिकाणी मद्यपान आणि नॉनव्हेज पार्टी करून ‘मज्जा’ करण्यासाठी जातात. अशा मंडळींचा छत्रपतींच्या इतिहासाचं पावित्र्य, पर्यावरणाचं संवर्धन आणि निकोप सौंदर्यदृष्टी ह्या गोष्टींशी सुतराम संबंध नसतो. हवामानाचा अंदाज, पावसाळ्यात ओढे कुठे पार करावेत, वेगवान प्रवाह आणि धबधबे, त्यातील मस्तीच्या मर्यादा, अवघड वाटा, सुरक्षिततेसाठी लागणारी साधनसामग्री असे सारे विषय निर्बुद्धपणे ऑप्शनला टाकले जातात. यातच ‘सेल्फी’ नावाच्या मेनकेनं घातलेली भुरळ! डोंगरवाटा, निसर्ग सौंदर्य आणि इतिहास यांच्या निखळ अनुभवापेक्षा ‘मी तिथे होतो!’ हे समाज माध्यमावर जाहीर करण्याची चढाओढ करतांना सुरक्षिततेचं भान निसटलेलं दिसतं. वरील सर्व कारणांमुळे घडणारे अपघात ‘मूर्खपणा’ या गटात मोडतात. वर उल्लेखिलेली सर्व कारणं थोड्या विचारानं आणि समंजसपणानं टाळता येतील आणि असे ‘मूर्ख’ अपघात घडणार नाहीत अशी काळजी घेणं गरजेचं आहे.
अपघातांचा दुसरा गट म्हणजे आपल्याच चुकांमुळे घडणारे अपघात! पर्यटन म्हणजे सहजपणे एखादा निसर्गरम्य अनुभव विकत घेणं! हे शब्द कदाचित कठोर भासतील, परंतु थोडा विचार करता ते योग्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. गिरीभ्रमण, रॉक क्लायंबिंग, रॅपेलिंग असे जमिनीवरील, तर पॅराग्लायडिंग सारखे हवेतील आणि राफ्टिंग, सेलिंग यासारखे पाण्यावरील विविध साहसी उपक्रम आणि निसर्गरम्य ठिकाणी केलेलं पर्यटन यातील मूलभूत फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझा पर्यटनाला अजिबात विरोध नाही, परंतु पर्यटनासोबत तुम्ही कुठल्याही साहसी उपक्रमात भाग घेणार असाल तर सुरक्षिततेचं भान असणं अत्यंत आवश्यक. कुठल्याही साहसी उपक्रमासाठी भाग घेण्यासाठी पूर्वतयारी करणं आवश्यक असतं. जात असलेल्या ठिकाणाची आणि ज्या साहसी उपक्रमात भाग घेणार त्याची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. साहसी उपक्रमात भाग घेतांना पूर्वानुभव, योग्य साधनसामुग्री आणि प्रशिक्षित, अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन गरजेचं असतं. सोशल मिडिया किवा इंटरनेटच्या माध्यमातून ही सारी माहिती उपलब्ध होऊ शकते. गेल्याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयानं ‘साहसी उपक्रमातील सुरक्षितते’साठी उपक्रम आयोजकांसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये अध्यादेश जारी केला आहे. विविध कारणांमुळे या अध्यादेशाची व्यवस्थित अंमलबजावणी अजूनही रेंगाळलेली आहे. असं असलं तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं शासनानी उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. वर उल्लेखिलेल्या अनेक घटकांपैकी निष्काळजीपणे एखाद्याही घटकाची काळजी न घेतल्यास जीवघेणा अपघात घडू शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सुरवातीस वर्णन केलेले हिमालयातील अनुभव हे या गटात मोडतात.
तिसरा अपघातांचा गट म्हणजे अस्मानी संकट. कुठल्याही साहसी उपक्रमात धोका हा असतोच! अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून पूर्वतयारी करणं अत्यावश्यक. निसर्गात, डोंगरात असतांना अचानक हवामान बदलू शकतं. यामुळे नदी नाल्यांचे प्रवाह फुगू शकतात किवा भयानक वेगवान होऊ शकतात, दरडी कोसळू शकतात. हिमालयात हिमस्खलनाचा (Avalanche) धोका वाढतो. अशा कारणांमुळे घडणाऱ्या अपघातांना अस्मानी संकट कारणीभूत असतं आणि बहुतेक वेळेस हे अपघात टाळता येत नाही, हे दुर्दैव!
सदर लेखाची व्याप्ती लक्षात घेता, पुढील विवेचन प्रामुख्याने सह्याद्रीतील गिरिभ्रमणासंदर्भातील आहे. सह्याद्रीतील साहसी उपक्रमांचा विचार करता उपक्रम आयोजक आणि सहभागी असे दोन गट पडतात. यातील साहसी उपक्रम आयोजकांनी प्रामुख्याने सुरक्षिततेची काळजी घेणं अपेक्षित असतं. गिरीभ्रमण करायला जायच्या ठिकाणाची व मार्गाची संपूर्ण माहिती आणि तिथे होणारी संभाव्य गर्दी याचा सुरवातीसच नियोजनात विचार करावा. शक्यतोवर उपक्रमाच्या एखाद आठवडा आधी प्रत्यक्ष मार्गावर आयोजकांपैकी एक दोघांनी जाऊन यावे. मार्ग अवघड असल्यास स्थानिक गाईडची न लाजता मदत घ्यावी. ग्रुपची संख्या १५ ते २० पेक्षा जास्त असू नये. येणाऱ्या सहभाग्यांची संख्या २० पेक्षा जास्त असल्यास सुरवातीपासूनच स्वतंत्र छोटे गट करावे. ६ ते ८ सहभाग्यांमागे एक आयोजक/नेता असणे गरजेचे. प्रत्यक्ष मार्गावर एक नेता पुढे तर एक नेता सर्वात मागे (Rear Guard) असावा. मार्गात कुठेही अडचणीची चढाई असल्यास सुरक्षा दोर वापरणे गरजेचे. अशा उपक्रमातील नेत्यांसोबत ट्रेकच्या गरजेनुसार योग्य साधनसामुग्री, अद्ययावत प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) असणे गरजेचे. ट्रेकची संपूर्ण माहिती, त्यातील संभाव्य धोके याची पूर्वकल्पना सहभागींना देणे गरजेचे असते. सहभागींच्या विम्याची व्यवस्था ही आयोजकांची जबाबदारी आहे. ट्रेकवर सहभागींनी मजा करावी, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि तरीही त्यात एक किमान शिस्त असावी. साहसी उपक्रमातील सुरक्षितता ही जरी प्रामुख्याने आयोजकांची जबाबदारी असली तरी सहभागींनी सर्व व्यवस्था नीटपणाने केली असल्याची खात्री करून घ्यावी. त्याचबरोबर उपक्रमाची शिस्त काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी सहभागींचीच असते. या संदर्भातील शासनाच्या संकेतस्थळावरील अध्यादेशात, तसेच महा अॅडव्हेंचर काऊन्सिलच्या संकेतस्थळावर हवा, पाणी आणि जमिनीवरील साहसी उपक्रमांसाठी असलेल्या मार्गदर्शक सुरक्षितता सूचना संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील गडकोट, देवालये, धबधबे ही सारीच ठिकाणं गेल्या १५/२० वर्षांत अफाट लोकप्रिय झाली आहेत. या ठिकाणांना भेट देणाऱ्यांची संख्या कमीत कमी १५ ते २० पटीनं वाढली आहे. यात गिरीभ्रमण करणारे आणि पर्यटक अशा दोघांचाही समावेश आहे. पर्यटक हा अशा स्थळाला बहुदा आपल्या वाहनानी जातो. फारसे कष्ट न घेता अशा ठिकाणाला भेट देऊन परत येतो. गिरिभ्रमणातही पायथ्याच्या ठिकाणापर्यंत वाहनानी पोचता येतं. परंतु त्यापलीकडे काही अंतर चालतच पार करावे लागते. या वाटचालीत काही साहसी, अवघड टप्पे देखील असू शकतात. याशिवाय ट्रेकसारख्या प्रकारात अशा किल्ल्यांवर, डोंगरांवर कॅम्पिंग, मुक्काम करून तीन-चार दिवसात एकाच डोंगररांगेतील किल्ल्यांना, डोंगरांना भेटी देता येतात. दुर्दैवानं आजकाल सर्वच लोकप्रिय ठिकाणांवर भरमसाट गर्दी होत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षातील करोना सावटामुळे ‘Revenge Tourism’ नावाचं प्रकरण उदयास आलं आहे. यामुळे एकीकडे स्थानिक रोजगारास नवीन संधी उपलब्ध होत आहेत, परंतु स्थानिक गावकरी, वनविभाग, पुरातत्त्व खाते आणि पोलीस यांच्याकडून अशा उपक्रमास आडकाठी देखीलं केली जाते. काही ठिकाणी सारासार विचार न करता बंदी हुकूम जारी केले जातात. या सोबतच साधनसामुग्री जप्त करणे, पैशाची मागणी करणे यासारखे अनिष्ट प्रकार घडत असल्याचं कानावर येतं. या संपूर्ण विषयात पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेऊन, MAC सारख्या अनुभवी संस्थांची मदत घेऊन नियमनाचं नियोजन करण्याची आत्यंतिक गरज आहे. एकीकडे स्थानिक रोजगार, साहसी पर्यटन याला प्रोत्साहन देण्याच्या अनेक घोषणा होत आहेत, परंतु यासाठी सुयोग्य व सशक्त शासकीय नियमन यंत्रणेची तातडीची गरज आहे. तरच अपघातांना पायबंद बसून जीवितहानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. पर्यटन मंत्रालय आणि MAC सारख्या संस्थांनी पर्यटक आणि गिरीभ्रमण करणारे, साहसी उपक्रम आयोजक यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. गिरीमित्र-लोणावळा, यशवंती हायकर्स-खोपोली यासारख्या सेवाभावी संस्था, अपघात झाल्यास वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यूचे म्हणजेच बचावाचे कार्य मोठ्या उत्साहाने करत आहेत. अशा प्रयत्नांचा केवळ सत्कार करण्या पलीकडे शासनाने महाराष्ट्रात प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम अशा इतर राज्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे.

साहस क्षेत्रातील उदंड अनुभव, विविध व्यक्ती आणि संस्था यांच्याकडे महाराष्ट्रात उपलब्ध आहे. महाराष्ट्राला सुमारे ७०० किलोमीटरचा समुद्रकिनारा, ३५०हून अधिक किल्ले असलेली सह्याद्रीसारखी पर्वतराजी, अनेक खळाळणाऱ्या नद्या व तलाव असल्यानं साहसी पर्यटनाची निकोप वाढ निश्चितच होऊ शकते. यासाठी या क्षेत्रातील सर्वच भागधारकांनी म्हणजेच पर्यटक, गिरीभ्रमण करणारे, साहसी उपक्रम आयोजक अशा सर्वांनी एकत्र येणे आणि शासनानं सुजाणपणे या प्रयत्नांना पाठबळ दिल्यास हे सहज शक्य होईल. विविध निरर्थक वाद, शासकीय अनास्था आणि निष्क्रियता बाजूला सारून प्रयत्न केल्यास महाराष्ट्र जागतिक पर्यटन नकाशावर सहजपणे येऊ शकतो. या साऱ्याच प्रयत्नांना मन:पूर्वक शुभेच्छा!
- वसंत वसंत लिमये