दोन हिमालय

तसा मी हिमालयाच्या सावलीत अनेकदा वावरलेला माणूस! १९७६ साली हिमालयात गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी प्रथमच गेलो आणि हिमालयाच्या मी प्रेमात पडलो. त्याच सुमारास आणखी एका हिमालयाची ओळख झाली आणि लवकरच त्या ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. अभिनय क्षेत्रातील त्या महान कलाकाराचं, हिमालयाचं दुसरं नाव म्हणजे डॉ. श्रीराम लागू! १७ डिसेंबर २०१९ रोजी ते कालवश झाले. काही ओळखी, मैत्र का घडतं हे मला नेहमीच पडणारं कोडं! ४०/४५ वर्षात डॉक्टरांचा अकृत्रिम स्नेह मला मिळाला हे माझं थोर भाग्य.

आमची उंची साधारणपणे सारखीच,पण त्यांच्या सोबत असतांना, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे सुरवातीस एक दडपण येत असे. पेशानं डॉक्टर पण एका आंतरिक उर्मीनं आयुष्याच्या उत्तरार्धात ते अभिनयाकडे वळले आणि त्यांनी उपजत गुण आणि अथक परिश्रमांच्या सहाय्याने अभिनयाचा एक मानदंड उभा केला. स्वच्छ गोरा वर्ण, सुस्पष्ट वाणी, आवाजाची उत्तम फेक, काळजाचा ठाव घेणारी भेदक घारी नजर आणि थक्क करणारी देहबोली. साहजिकच त्यांच्या सोबत असताना हिमालयाच्या सावलीत असल्याचा भास होत असे.
डॉक्टरांचं वाचन अफाट होतं. विचारांची सुस्पष्टता असलेला कठोर बुध्दीप्रामाण्यवादी, पण तरीही अतिशय संवेदनशील माणूस! त्यांच्याकडे अभिनयातील कमावलेली शिस्त होती, अनेकदा त्यांचे सहकलाकार त्यामुळे वचकून असत. आवाजाच्या रियाजासाठी रोज दोन तास काढणारे डॉक्टर मला आठवतात. उध्वस्त धर्मशाळा,हिमालयाची सावली, नटसम्राट, सामना, सिंहासन, दुभंग, आत्मकथा असं काय काय तरी आठवतं. त्यांचा अभिनय पाहणं ही एक पर्वणी असे.

ते मुंबईहून पुण्याला स्थलांतरित झाल्यावर अनेकदा गाठीभेटी होत असत. एवढा मोठा माणूस पण कुठेही गर्व किंवा दंभ याचा लवलेश नसे. कधी अस्वस्थ असतांना मी सहज उठून डॉक्टरांकडे जात असे. ‘ये बाळ्या, ये!’ असं अगत्यपूर्वक स्वागत होत असे. प्रेमळ बापाच्या छायेत असल्याचा भास होत असे. मनातली जळमटं दूर होऊन मी नव्या उत्साहाने बाहेर पडे. त्यांच्या सहवासात मला गंगास्नान घडल्याचा अनुभव येत असे.
. ‘लमाण’ हे त्यांचं आत्मचरित्र वाचत असतांना, काही ओळी उन्मेखून लक्षात राहिल्या. डॉक्टरांनी टांझानियातील ‘किलिमांजारो’ शिखर सर केल्यावर त्या उत्तुंग ठिकाणी त्यांच्या मनातले भाव –
“आणि आत एक आवाज उमटला. निःशब्द गाभार्‍यातल्या घंटानादासारखा स्वच्छ, नितळ, खणखणीत, आत्मविश्वासाने भारलेला.
डिसेंबर १९६८ अखेर मी भारतात परतेन तो व्यावसायिक डॉक्टर आणि हौशी नट म्हणून नव्हे तर व्यावसायिक नट आणि हौशी डॉक्टर म्हणून!”
गेल्या अनेक वर्षात डॉक्टरांच्या रूपाने ‘नटसम्राट’, हिमालय आणि उत्तुंग व्यक्तिमत्व अशी मनात ठसलेली प्रतीकं मला नतमस्तक करतात. शेवटाकडे त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत गेली. आधी फिरायला, मग नुसतेच बसायला ते ARAIच्या टेकडीवर जात असत, त्यांच्या आवडत्या बाकावर! शांत तेवणारी ज्योत मंद होत आली होती पण माझं मन ते मान्य करायला कचरत होतं. १७ डिसेंबर २०१९ रोजी डॉक्टर गेले. धक्का नसला तरी भयानक पोकळी जाणवत होती. “Dust thou art, and unto dust shalt thou return!” म्हणजेच ‘मातीतून मातीकडे’ असा भावार्थ असलेल्या या बायबल मधील ओळी डोक्यात रेंगाळत होत्या.


डॉक्टरांना अंधश्रध्दा अमान्य होती, तर अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामात ते अग्रेसर होते. मी त्यांच्या अस्थींचा अंश मिळवला. त्यांच्या अस्थी, त्यांचे विचार, मी काहीसा अडखळलो. मला खात्री आहे की त्यांना अंधश्रध्दा अमान्य असली तरी श्रध्देला त्यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नव्हतं. संस्कृतीच्या कालप्रवाहात मागचे पुढच्यांशी जोडले जातात. पूर्वसुरींचे विचार निश्चितच महत्त्वाचे परंतु या शृंखलेत दोन कड्या एकमेकांशी जुळतात आणि यात भावना, श्रद्धा यांचा अतूट ऋणानुबंध असतो. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक वृक्ष त्यांच्या आवडत्या जागी, म्हणजेच ARAI च्या टेकडीवरील बाकाशेजारी लावावा अशी कल्पना मनात आली. पर्यावरण तज्ञ श्री. द. महाजन यांच्या सल्ल्यानं शिरीषाचा वृक्ष लावावा असं ठरलं. त्यांचे नातेवाईक, अनेक चाहत्यांच्या प्रयत्नातून १९ जानेवारी २०२० रोजी ती कल्पना प्रत्यक्षात आली आणि त्यांच्या अस्थींचा एक अंश त्या स्मृतिवृक्षाच्या मुळाशी मातीत मिसळला. अर्थातच भावी पिढ्यांसाठी एका महान कलाकाराचे, डॉक्टरांचे हे एक जिवंत स्मारक ठरेल अशी मला खात्री आहे.

मी, हिमालय आणि डॉ. श्रीराम लागू असं प्रतीकात्मक नातं माझ्या मनात ठामपणे होतं. म्हणूनच अस्थींचा उर्वरित अंश हिमालयात गंगोत्री येथे विसर्जित करावा अशी प्रबळ इच्छा होती. जानेवारी महिन्यात गंगोत्री परिसर पूर्णपणे हिमाच्छादित असतो. अक्षय्य तृतीयेला हिम पूर्णपणे वितळल्यावर, गंगोत्रीसह इतर मंदिरांचे ‘पट खुलतात’ आणि चार धाम यात्रेचा मौसम सुरू होतो. या वर्षी २६ एप्रिलला अक्षय्य तृतीया होती, म्हणून मी प्रवासाची जय्यत तयारी केली. दुर्दैवाने करोनाच्या महासंकटामुळे त्या बेतावर पाणी फिरलं. मग मात्र मी उत्तराखंड पुन्हा कधी ‘खुलं’ होतंय याची वाट पहात होतो!
१०/१२ मोहिमा, ४०/५० ट्रेक या निमित्ताने हिमालयात अनेक वाऱ्या झाल्या. साहजिकच गढवाल/उत्तराखंड या भागात अनेक मित्रमंडळी आहेत. ‘साब, अब आप आ सकते हो!’ असा हर्शिलहून माधवेंद्र रावतचा निरोप आला आणि मी लगेच विमानाची तिकीटं, ऋषिकेशहून भाड्याची गाडी अशी सर्व तयारी तातडीनी केली. एकीकडे डॉक्टरांना आदरांजली आणि दुसरीकडे हिमालयाचं निकट दर्शन होणार यामुळे मी उत्साहात होतो. निघण्यापूर्वी, चारच दिवस अलीकडे दिलीप लागूचा फोन आला, ‘बाळ्या, मी येऊ का तुझ्या बरोबर?’ दिलीप हा डॉक्टरांचा पुतण्या, माझी हरकत असण्याचं काहीच कारण नव्हतं. मी लगेच रुकार दिला. मीही विज्ञानवादी, बुध्दीप्रामाण्यावर विश्वास ठेवणारा त्यामुळेच कुठलीही धार्मिक कारणं मा‍झ्या मनात नव्हती. हिमालय आणि डॉक्टर ही आम्हा दोघांसाठी प्रिय श्रध्दास्थानं! मुंबईहून थेट फ्लाईटने डेहराडून येथे पोचून १० ऑक्टोबरला आम्ही गंगोत्रीकडे मार्गस्थ झालो देखील!

आमच्या चक्रधर महाराजांनी, ‘हमे रास्ता बिलकुल पता है, आप चिंता मत करो!’ असा गुटक्याचा तोबरा भरलेल्या तोंडानं हवाला दिला आणि आमच्या नकळत चुकीच्या रस्त्यानं आम्ही यमुनाकिनारी पोचलो! मागे फिरण्यात आणखी वेळ गेला असता म्हणून मग यमुना दर्शन करत बडकोट मार्गे खूप उशिरा उत्तरकाशीच्या अलीकडे मुक्काम केला. आमच्या वेळापत्रकाची पूर्ण काशी झाली होती! मात्र चिडचिड शांत करणारा गारवा आणि भागीरथीचा अखंड खळाळ रात्री सोबतीला होता. पहाटे लवकरच आम्ही हर्शिलकडे निघालो. उत्तरकाशीत ‘भंडारी’ हॉटेल जागं व्हायचं होतं म्हणून बसस्टँड समोरील टपरीत फॅन बिस्कीट आणि बंद आमलेट असा नाश्ता केला. अॅडव्हान्स कोर्स, अनेक मोहिमा, ‘भंडारी’ आणि बंद आमलेट अश्या अनेक स्मृती जागवत आम्ही मार्गस्थ झालो. वाटेत मनेरीपाशी ‘खेडी’येथे जल विद्युत केंद्रातून बाहेर पडणारा दमदार जल स्त्रोत वाऱ्यासोबत उडणाऱ्या तुषारांनी साऱ्या रस्त्याला अभ्यंग स्नान घडवत होता! हर्शिलमध्ये माधवेंद्र आणि जुना कुक ग्यान यांच्या सोबत चहा घेतला. उगमानंतर भागीरथी प्रथमच एका विस्तृत खोऱ्यातून वाहू लागते. हर्शिलच्या ‘पहाडी राजा विल्सन’ची आठवण झाली.

समोर श्रीकंठ पर्वतरांग, टेकडीआड दडलेला आर्मी कँप आणि दूरवर दिसणार्‍या मुखबा गावातील गंगा मंदिर दिसत होतं. हिवाळ्यात गंगोत्रीची ‘गंगा’ मूर्ती माहेरपणाला याच मंदिरात येते आणि अक्षय्य तृतीयेला पुन्हा गंगोत्रीला परत जाते. त्या अद्भुत शीतल वातावरणात ‘करोना’, घरचे व्याप, कामं आणि कटकटी कधीच विरून गेल्या होत्या. सभोवार पसरलेलं देवदाराचं घनदाट जंगल,त्यामागून डोकावणारी स्वर्गीय चमकदार हिमशिखरं, मंदिरातून ऐकू येणारा अस्पष्ट घंटानाद, अंतर्बाह्य सचैल स्नान घडून शुचिर्भूत झाल्यागत वाटत होतं.
लंका भैरवघाटीपाशी खोल दरीतून वाहणाऱ्या जडगंगेवरील पूल लागून गेला. या रस्त्यावरून दिमाखदार श्रीकैलास आणि सुदर्शन या हिमशिखरांचं मनोहारी दर्शन घडतं. यात्रा सुरू होऊनदेखील गंगोत्रीत आश्चर्य वाटण्या जोगी फक्त तुरळक गर्दी होती. मंदिरापाशी उजवीकडील पायऱ्या उतरून आम्ही भागीरथीच्या प्रचंड खळाळ असलेल्या पत्रापाशी पोचलो. मनात असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या. डॉक्टरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे आणि गाढ अकृत्रिम स्नेहामुळे मी निश्चितच समृध्द झालो आहे. सरस्वती लुप्त झाल्या नंतर, उत्तर भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या, सारस्वत संस्कृतीचं, पावित्र्याचं प्रतीक असलेल्या गंगेच्या उगमापाशी आम्ही होतो.

डॉक्टरांच्या स्मृतीचा अंश मी त्या खळाळत्या प्रवाहात विसर्जित केला. प्रखर विचारी धवल हिमशिखरा प्रमाणे अचल व्यक्तित्व,प्रेमळ कोमल हात आणि आश्वासक स्वर, डॉक्टरांची स्मृती नेहमीच माझ्या मनात नेहमीच जिवंत राहील. नकळत माझ्या डोळ्यात पाणी होतं, मी ते पुसण्याचा प्रयत्नही केला नाही. आज मी दोन हिमालायांच्या सावलीत केवळ नतमस्तक होतो.


-वसंत वसंत लिमये

Standard

अपघात

अपघात म्हटलं की अनेक भेडसावणाऱ्या प्रश्नांचं काहूर मनात उठतं. ‘कुणाला?’, ‘कुठे?’, ‘कसा?’ असे अनेक प्रश्न. अपघात म्हटलं की मला दोन, नाही तीन अपघात आठवतात. दोन गिरीभ्रमण आणि गिर्यारोहणातील तर एक रस्त्यावरील. २००९ साल असेल, मी पहाटे मोटरसायकलवर मुळशी तालुक्यातील गरुडमाचीला निघालो होतो. पौडच्या अलीकडे एक छोटा घाट लागतो. पहाटेची वेळ, त्यामुळे रस्त्यावर रहदारी अजिबात नव्हती. मी मजेत निघालो होतो. घाट चढून वर येताच अचानक एक विचित्र संकट समोर उभं ठाकलं. ट्रकवाले गाडी बंद पडल्यामुळे तिच्यामागे दगडांची एक गौर मांडून ठेवतात. ट्रक दुरुस्त झाल्यावर, दगड बाजूला करण्याची तसदी न घेता ट्रक निघून जातो. पण रस्त्यात मांडलेली दगडांची रांग तशीच असते! अशीच एक दगडांची गौर अचानक समोर आल्यावर मी गडबडलो, गाडीवरील नियंत्रण सुटलं. नशीब, वेग अतिशय संथ होता! मी धडपडलो, गाडी आडवी आणि मी रस्त्याच्या कडेला फेकला गेलो. आई गं!, असं म्हणत हात डोक्यावर घेतला. भळभळा रक्त वाहत होतं, चांगलीच खोक पडली होती. मी तसाच भाजीच्या टेम्पोमध्ये लिफ्ट घेऊन कसाबसा गरुडमाचीला पोचलो. टाटा पॉवरमधील डॉक्टरनं तपासलं आणि वेगळीच भानगड लक्षात आली, ती म्हणजे माझं डावीकडील कॉलरबोन तुटलं होतं! मी थोडक्यात बचावलो होतो! यानंतर रेवतीनं म्हणजे माझ्या मुलीनं अकांड तांडव करून, दुसऱ्याच दिवशी मोटर सायकल विकून टाकायला लावली!w

याआधी घडलेले दोन मोठे अपघात म्हणजे १९८७ साली ‘पाँवाली काँटा’ ट्रेकवर नदीत वाहून गेलेले डॉ. हिलरी नझारेथ आणि भार्गव शाह, तर १९८८ साली कांचनजुंगा मोहिमेत झालेलं संजय बोरोले याचं निधन. १९८७ साली ८ ते १४ वयोगटातील सुमारे ऐंशी सहभागी मुलं-मुली आणि १६ ते ३५ या वयोगटातील पंधरा आयोजक असा ट्रेक गढवालमधील भिलंगना नदीच्या खोऱ्यातील पाँवाली धार येथे ‘इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हेंचर स्पोर्ट्स’ (IAS) तर्फे आयोजित करण्यात आला होता. आधी ठरलेला लीडर आयत्या वेळेस गायब झाल्यानं ट्रेकचं नेतृत्व माझ्याकडे आलं. भिलंगना नदीच्या किनारी असलेल्या घुत्तू या गावापासून ट्रेक सुरू होऊन त्याच खोऱ्यातील उत्तरेला गंगी गावापर्यंत जाणार होता. उजव्या हाताला, म्हणजेच पूर्वेला भिलंगना नदी पलीकडे दक्षिणोत्तर पसरलेल्या डोंगरधारेला ‘पाँवाली धार’ म्हणतात. गंगीपाशी नदीकडे खाली उतरल्यावर ‘झाला’ या ठिकाणी भिलंगना नदीवर बांधलेला ओबडधोबड लाकडी पूल आहे. पाचव्या दिवशी आम्ही झाला या ठिकाणी पोचलो. झालाहून सुमारे साडेतीन/चार हजार फुट खडी चढाई चढून आमचा पुढला मुक्काम असणार होता ‘ताली टॉप’ येथे. ट्रेक सोपा असला तरी सुमारे १०० माणसांच्या खाण्यापिण्याची आणि वस्तीची सोय करणं हे नियोजनातील एक फार मोठं आव्हान होतं. आमच्यातलेच दोन तरुण लीडर, अमित आणि राजू हे घुत्तू येथे ट्रेकच्या उत्तरार्धातील खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यासाठी मागे थांबले. १०-१५ खेचरं आणि ४-५ खेचरवाले यांच्यासोबत सामानासह ही दोघं आम्हाला सातव्या दिवशी ताली टॉप येथे भेटणार होती. मुख्य ग्रुपनं झाला येथेच सहाव्या दिवशी ‘रेस्ट डे’ घेतला. सहाव्या दिवशी सकाळी आमच्या सर्व व्यवस्था पाहणारा स्थानिक सरदार, जयपाल सिंग हा ताली टॉपची कॅम्पसाईट चेक करण्यासाठी वर निघाला. त्याच्यासोबत आमचा उत्साही डॉक्टर हिलरी नझारेथ औषधांचा साठा घेऊन ‘मी पण वर जाऊन येतो!’ असं म्हणून निघाला. संध्याकाळी डॉक्टर ताली टॉपला मेंढपाळांसोबत मुक्कामाला थांबला आणि एकटाच जयपाल सिंग खाली, झाला येथे परत आला. इथूनच एका भीषण नाट्याची नांदी झाली होती.

दुसऱ्या दिवशी, म्हणजेच सातव्या दिवशी सकाळी लवकरच झाला येथील सारेच जणं कॅम्प आवरून चढाच्या वाटेला लागले. सकाळी सातचा सुमार असेल. एकंदर ९५ जणं, त्यामुळे १०-१५ जणांचे ७-८ ग्रुप झाले आणि सारेच जणं मजेत ताली टॉपची चढाई चढू लागले. ताली टॉप येथे आदल्या दिवशी दुपारी पाच-सहाशे मेंढ्यांचा कळप राखणारे मेंढपाळ डॉ. हिलरीला भेटले. या मेंढपाळांची ‘गद्दी’ म्हणजेच तंबू गेले तीन चार आठवडे तेथे असावा. या गद्दीवरील एक घोडा काही कारणानं आजारी होता. मेंढपाळाच्या घोड्याला डॉ. हिलरीनं तपासलं, इंजेक्शन आणि काही औषधं दिली. साहजिकच डॉ. हिलरीची मेंढपाळाशी छान गट्टी झाली. ताली टॉप कॅम्पसाईटची पाहणी करून सकाळी दहाच्या सुमारास जयपाल सिंग खाली झालाकडे परतण्यासाठी निघाला. मेंढपाळांनी डॉक्टरला तिथेच राहण्याचा आग्रह केला. ‘डॉक्टरसाब, आज मीट बनाया है, आप रूक जाईये!’ असा आग्रह डॉक्टरला मोडवेना. डॉक्टर मेंढपाळांसोबत राहणार असल्यानं, जयपालनं हरकत न घेता तो एकटाच खाली निघाला. सातव्या दिवशी सकाळी दहाच्या सुमारास भार्गव, राजू आणि खेचरवाले ताली टॉपच्या माथ्यावर पोचले. ताली टॉप कॅम्पसाईट ही माथ्यापासून सुमारे ४०० फुट खाली असलेल्या भल्याथोरल्या गवताळ मैदानात आहे. आदल्या हिवाळ्यातील रेंगाळलेलं हिम अजूनही ताली टॉप माथ्यावर होतं. हे हिम भुसभुशीत असल्यानं खेचरांना सामानासह त्या हिमाच्छादित उतारावरून उतरणं अवघड जाऊ लागलं. या सर्व मंडळींना पाहून डॉ. हिलरी खालून हाका मारत होता. खेचरांसाठी सोपी वाट काढण्याच्या प्रयत्नात खेचरवाले गुंतले आणि राजू त्यांच्या बरोबरच थांबला. डॉक्टरच्या हाकांना प्रतिसाद देऊन भार्गव झरझर उतरून डॉक्टरपाशी पोचला. खालचा ग्रुप त्या वेळेस खालून चढून वर येत असणार, हे डॉक्टरला ठाऊक होतं. मेंढपाळाच्या गद्दीवर चहा पिता पिता, वर येणाऱ्या ग्रुपला थोडं अंतर उतरून भेटायला जाऊया, असं डॉ. हिलरी आणि भार्गव यांचं ठरलं. एकास दोघं असल्यानं मेंढपाळानंही आडकाठी केली नाही. त्यातून डॉ. हिलरीला रस्ता ठाऊक होता. दोघंही मजेत खाली जायला निघाले. ते लगेचच वर येणार असल्यानं सोबत काहीही सामान नव्हतं, अगदी काड्यापेटी देखील. इथून पुढे काय घडलं असावं, याचा केवळ कयास करता येतो!
ताली टॉपपासून झालाकडे जाणारी वाट सुरवातीस पाईनच्या गर्द जंगलातून एका धारेवरून खाली उतरते. सुमारे हजार फुट खाली उतरल्यावर तीच वाट डावीकडे म्हणजेच दक्षिणेकडील उतारावरून झालाकडे उतरते. या भागात अनेक ढोरवाटांचं जाळं दिसून येतं. याच ठिकाणी डॉ. हिलरी आणि भार्गव उजवीकडच्या उतारावर चुकीच्या वाटेला लागले असावेत. खाली उतरणं सोपं असतं, याउलट ‘आता मागे फिरुया’ असं म्हणून चढून वर येणं जरा अवघड! ‘आणखी थोडं पुढे जाऊया’ अशा मोहात ती दोघं खाली उतरत गेली असावीत. तसं पाहिलं तर डावीकडील उतारावरून येणाऱ्या ९५ जणांच्या समूहाचा गडबड गोंधळ सहजपणे कानावर पडण्यासारखा होता. पण उजवीकडच्या उतारावरून उतरतांना आकर्षित करणारा आवाज म्हणजे पाण्याचा खळाळ! डॉ. हिलरी आणि भार्गव आपल्याच नादात या खळाळणाऱ्या आवाजाच्या दिशेनं दरीत एका मोठ्या प्रवाहापाशी पोचले असावेत. दोघांची समजूत ‘आपण झालापाशी पोचलो आहोत!’. तेव्हा दोघंही भिलंगना नदीवरील पूल शोधत असणार. प्रवाह मोठा असला तरी त्यातील दगडधोंड्यांवरून उड्या मारत पार करण्याजोगा होता. दोघंही प्रवाह पार करून पलीकडे पोचले असावेत. प्रवाहाच्या कडेनं डावीकडे वळून खालच्या दिशेने जातांना अचानक धीरगंभीर आवाज करत वाहणारी भिलंगना समोर ठाकली असणार. या ठिकाणी नदी किनाऱ्याला एक छोटा बीच आहे. हे घडत असतांना खालून वर येणारा पहिला ग्रुप दुपारी सुमारे एक वाजता ताली टॉपला पोचला. शेवटच्या ग्रुपसह मी सुमारे पाच वाजता ताली टॉपला पोचलो. सर्वांप्रमाणेच आमच्याकडे पोटात खड्डा पडणारी विचारणा झाली, ‘तुम्हाला डॉ. हिलरी आणि भार्गव भेटले?’. मानेनंच नकार देतांना माझ्या मनात पाल चुकचुकली.
यानंतर आठ-एक जणांनी मध्यरात्रीपर्यंत डॉ. हिलरी आणि भार्गव यांच्या नावानं हाका मारत, झालाच्या दिशेनं दोन्ही उतारांवर शोध घेतला. त्या मध्यरात्री एका एकाक्ष म्हाताऱ्यासोबत सुमारे ३० किलोमीटरची तंगडतोड करत मी पहाटे घुत्तूला पोचलो आणि एका जीपनं प्रवास करून मी टिहरी गाठलं. तिथून सकाळी दिल्लीतील आमच्या अशोक जैन या माननीय ज्येष्ठ पत्रकार मित्राला फोन केला. अशोकच्या ओळखीमुळे त्याच दिवशी दुपारी जोशीमठ येथील आर्मी कॅम्पवरून निघालेल्या हेलिकॉप्टर्सनी दोनदा भिलंगना खोऱ्यात डॉ. हिलरी आणि भार्गव यांचा शोध घेतला. पुढील आठ दिवस आम्ही आठ जणं भिलंगनाच्या काठानं शोध प्रयत्न जारी ठेवले. या शोध प्रयत्नाच्या पहिल्याच संध्याकाळी भिलंगना काठच्या त्या छोट्याश्या बीचवर डॉ. हिलरी आणि भार्गव यांच्या बुटांचे ठसे मिळाले होते! डॉ. हिलरी आणि भार्गव यांचा त्यानंतर काहीच पत्ता लागला नाही. दोघांचाही अंत भिलंगनेच्या जीवघेण्या प्रवाहात झाला असावा! डॉ. हिलरी ताली टॉपला रात्रीच्या मुक्कामासाठी थांबणं, दुसऱ्या दिवशी तरुण अमित भार्गव त्याला ताली टॉप येथे भेटणं, दोघंच ग्रुपला भेटण्यासाठी खालच्या वाटेवर निघून, चुकून उजव्या उताराला लागणं, सोबत काड्यापेटीदेखील नसणं आणि अखेर भिलंगनेच्या काठी सापडलेले त्यांच्या बुटांचे ठसे – छोट्या छोट्या चुकांची एक जीवघेणी शृंखला! या शृंखलेमुळेच एक भीषण अपघात घडला होता.

१९८८ साली गिरीविहार, मुंबई या संस्थेमार्फत पहिली भारतीय नागरी मोहीम कांचनजुंगा या अष्टहजारी शिखरावर आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत २४ सदस्य, दिलीप लागू आणि संजय बोरोले असे दोन उपनेते होते. या मोहिमेचं नेतृत्व माझ्याकडे होतं. ती सुमारे ९५ दिवसांची मोहीम असणार होती, तर ८८ साली या मोहिमेचं बजेट होतं २५ लाख! १३ मार्च १९८८ रोजी या मोहिमेनं मुंबईहून नेपाळकडे प्रयाण केले. कांचनजुंगा शिखराच्या नैऋत्येला यालुंग हिमनदीवर सुमारे १८,००० फुटावर बेस कॅम्प लावण्यात आला. यापुढे एकेक करत कॅम्प १ ते कॅम्प ६ असे कॅम्प्स शिखर मार्गावर प्रस्थापित करण्यात आले. यावरील शिखर प्रयत्नासाठी शेवटचा कॅम्प म्हणजेच कॅम्प ६ लागला होता २६,००० फुटांवर. या खाली दोन महत्त्वाचे कॅम्प्स म्हणजे कॅम्प ४ (२४,००० फुट) आणि कॅम्प २ (२१,८०० फुट). मोहिमेच्या नियोजनातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे मी कॅम्प २ ला तर संजय बोरोले, आरोहण उपनेता यांनी कॅम्प ४ ला मुक्काम ठोकायचा असे ठरले. यामुळे मोहिमेतील सामानाची ने-आण आणि हालचाली नियोजनाप्रमाणे करता आल्या. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच हवामान थोडे खराब होऊ लागले. तरीही १२ मे रोजी चारुहास जोशी आणि १६ मे रोजी उदय कोलवणकर यांनी शर्थीने शिखर प्रयत्न केला. वाईट हवामानामुळे दोन्ही प्रयत्न अयशस्वी झाले परंतु उदय कोलवणकर शिखरापासून जेमतेम ५०० फुटापर्यंत पोचला होता. पहिल्याच नागरी मोहिमेला मिळालेलं हे खूप मोठं यश होतं. दुर्दैवाने या यशालाही गालबोट लागलं!

मोहिमेदरम्यान संजय बोरोले सुमारे ४ आठवडे कॅम्प ४ येथे राहिला. दुसऱ्या आठवड्यानंतर त्याचं पोट बिघडलं आणि साहजिकच त्याचं खाणं कमी झालं होतं. त्याचाच परिणाम त्याच्या तब्बेतीवर झाला. त्यानं खालच्या कॅम्पला जावं असं दोन-तीनदा सुचवण्यातही आलं. परंतु संजय चिकाटीने तिथेच राहिला. बिघडलेल्या हवामानामुळे १४, १५ तारखेस खूप हिमवर्षाव झाला होता. कॅम्प २ वरून आमचा मार्ग सुमारे ७०० फुट उतरून एका मैदानात पोचत असे. त्यापुढे सुमारे ९०० मीटर लांब पसरलेलं मैदान होतं आणि त्यानंतर पुन्हा खड्या चढाईस सुरवात होत असे. याच खड्या चढाईवर कॅम्प ३ आणि कॅम्प ४ लागले होते. कॅम्प ५ व ६ हे मुख्यत्वेकरून शिखर प्रयत्नासाठी लावलेले पुढील कॅम्प्स होते. ८ मे नंतर वाईट हवामानामुळे बरेच दिवस कॅम्पमधे बसून काढावे लागले. कॅम्प २ खालील मैदान पार करायला एरवी ३०-४० मिनिटे पुरत असत. परंतु १४, १५ तारखेच्या हिमवर्षावानंतर भुसभुशीत बर्फामुळे हे मैदान नकळत धोकादायक झालं होतं. ढासळत्या तब्येतीमुळे, अनिलकुमार १६ तारखेस संजयला घेऊन कॅम्प ३ला पोचला. दुसऱ्या दिवशी सकाळी इतर चौघांसोबत संजय कॅम्प २ला येण्यास निघाला. कॅम्प २ला डॉ. चितळे, ऑक्सिजन आणि इतर सर्व उपचाराची व्यवस्था हजर होती. संजय आणि पार्टी मैदानापर्यंत व्यवस्थितपणे पोचली. मैदानात कमरेपर्यंत पाय बुडेल इतकं भुसभुशीत बर्फ होतं.

अर्थातच त्यातून मार्ग काढणं अतिशय जिकिरीचं होतं आणि ही सारी वाटचाल संजयला अतिशय थकवणारी ठरली. त्या सर्वांना मैदान पार करण्यास सुमारे ८ तास लागले! कॅम्प २ कडे येणारा मार्ग खड्या चढाईचा होता. या मार्गावर संपूर्णपणे दोर लावलेला होता. त्यामुळे दोराच्या आधारानं चढाई सुकर झाली होती. परंतु त्याच सुमारास म्हणजे संध्याकाळी ६ वाजता हिमवर्षावास सुरवात झाली. जोरदार वारे, काकडवून टाकणारी थंडी आणि मार्गावरील गोठलेलं बर्फ यामुळे कॅम्प २ची चढाई हे एक फार मोठं आव्हान होतं. अनिलकुमारनी पुढे जाऊन डॉक्टरला पूर्ण कल्पना दिली. साथीदारांच्या मदतीनं संजय बोरोले मुंगीच्या पावलांनी कॅम्प २ कडे सरकत होता. कॅम्प २ पासून तो जेमतेम १५/२० मिनिटांच्या अंतरावर पोचला होता. या क्षणापर्यंत खूप थकलेला असूनही संजय इतरांशी व्यवस्थित बोलत होता. आणि अचानक संजयनी बसकण मारली, हायपोथर्मियामुळे म्हणजेच शीताघातामुळे तिथेच संजयचा अंत झाला.
दीर्घकाळ अतिउंचीवरील वास्तव्य, पोटाच्या तक्रारीमुळे बिघडलेली तब्बेत, त्यामुळे आलेला क्षीणपणा आणि क्षीण झालेलं अक्लमटायझेशन, अतोनात हिमवर्षावामुळे मैदानाचं पालटलेलं स्वरूप, मैदानातील आठ तासांच्या खडतर चालीमुळे आलेला थकवा आणि हायपोथर्मियाचं म्हणजेच शीताघाताचं मर्यादित ज्ञान अशा घटकांची शृंखला आणि तिचं झालेलं भयानक अपघातात पर्यवसान हे दुर्दैव!

माझ्या मते अपघातांचे तीन गट पडू शकतात –

  1. मूर्खपणा २. चुका आणि 3. अस्मानी संकट.
    ‘मूर्खपणा’, गिरीभ्रमणाच्या संदर्भात पहिला गट म्हणजे आजकाल, गेल्या ५/१० वर्षात जे बोकाळलेले दिसते ते! पूर्वी कुठला तरी क्लब, अनुभवी सदस्य अथवा एखादी उत्साही शाळा यांच्या सोबत गिरीभ्रमणास जात असत. आज गिरीभ्रमण आणि पर्यटन यातील फरकच अस्पष्ट झाला आहे. गेल्या ५/१० वर्षात महाराष्ट्रात, सह्याद्रीत अनेक अपघातांचं पेव फुटलं आहे. याची कारणं अनेक आहेत. एक म्हणजे सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून उपलब्ध झालेली उदंड आकर्षक माहिती, फोटो आणि व्हिडीओज. हे प्रसारित करणार्‍यांना आपल्या माहितीचा समाजमनावर काय परिणाम होईल याचं भान नसतं. अनेकदा प्रसिध्दी आणि फुशारकी मारणं याला कारणीभूत ठरतं! यातील बेजबाबदारपणाला आळा घालण्याची नितांत गरज आहे. दुसरं म्हणजे अनेकपटीनं वाढलेली क्रयशक्ती. लालपरीचा विसर पडून आता मोटारसायकल आणि गाड्या सहज उपलब्ध झाल्या आहेत. बहुतेक ठिकाणी चांगले रस्ते आणि स्थानिक दळणवळणाच्या उत्तम सोयी उपलब्ध आहेत. यामुळे गडकोट, देवालये, धबधबे, नयनरम्य ठिकाणं जवळ आली आहेत. पूर्वी गिरीभ्रमण करणारे आणि स्थानिक यात एक संतुलन होतं. आता स्थानिक रोजगार किंवा उद्योग यामुळे वर उल्लेखिलेल्या सर्वच ठिकाणी राहणं आणि जेवणाखाणाची सोय होऊ शकते. साहजिकच भटकायला निघतांना पूर्वतयारीची आता गरजच नाही असा ‘गोड’ गैरसमज रूढ झाला आहे. याशिवाय साहसी उपक्रमांची वाढती लोकप्रियता ध्यानात घेऊन अनेक उद्योजक साहसी उपक्रम व्यावसायिक तत्त्वावर आयोजित करू लागले आहेत.
    वरील पार्श्वभूमी लक्षात घेता सोशल मिडिया आणि इंटरनेटच्या माध्यमातून तुटपुंजी माहिती मिळवून, ट्रेकिंगचा कुठलाही अनुभव नसतांना लोकप्रिय ट्रेकिंग मार्गांवर अनेक पर्यटक गर्दी करतात. यातच ‘वेन्जॉय’ अशा चंगळवादी परिवारातील सदस्य या ठिकाणी मद्यपान आणि नॉनव्हेज पार्टी करून ‘मज्जा’ करण्यासाठी जातात. अशा मंडळींचा छत्रपतींच्या इतिहासाचं पावित्र्य, पर्यावरणाचं संवर्धन आणि निकोप सौंदर्यदृष्टी ह्या गोष्टींशी सुतराम संबंध नसतो. हवामानाचा अंदाज, पावसाळ्यात ओढे कुठे पार करावेत, वेगवान प्रवाह आणि धबधबे, त्यातील मस्तीच्या मर्यादा, अवघड वाटा, सुरक्षिततेसाठी लागणारी साधनसामग्री असे सारे विषय निर्बुद्धपणे ऑप्शनला टाकले जातात. यातच ‘सेल्फी’ नावाच्या मेनकेनं घातलेली भुरळ! डोंगरवाटा, निसर्ग सौंदर्य आणि इतिहास यांच्या निखळ अनुभवापेक्षा ‘मी तिथे होतो!’ हे समाज माध्यमावर जाहीर करण्याची चढाओढ करतांना सुरक्षिततेचं भान निसटलेलं दिसतं. वरील सर्व कारणांमुळे घडणारे अपघात ‘मूर्खपणा’ या गटात मोडतात. वर उल्लेखिलेली सर्व कारणं थोड्या विचारानं आणि समंजसपणानं टाळता येतील आणि असे ‘मूर्ख’ अपघात घडणार नाहीत अशी काळजी घेणं गरजेचं आहे.

अपघातांचा दुसरा गट म्हणजे आपल्याच चुकांमुळे घडणारे अपघात! पर्यटन म्हणजे सहजपणे एखादा निसर्गरम्य अनुभव विकत घेणं! हे शब्द कदाचित कठोर भासतील, परंतु थोडा विचार करता ते योग्य असल्याचं आपल्या लक्षात येईल. गिरीभ्रमण, रॉक क्लायंबिंग, रॅपेलिंग असे जमिनीवरील, तर पॅराग्लायडिंग सारखे हवेतील आणि राफ्टिंग, सेलिंग यासारखे पाण्यावरील विविध साहसी उपक्रम आणि निसर्गरम्य ठिकाणी केलेलं पर्यटन यातील मूलभूत फरक जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. माझा पर्यटनाला अजिबात विरोध नाही, परंतु पर्यटनासोबत तुम्ही कुठल्याही साहसी उपक्रमात भाग घेणार असाल तर सुरक्षिततेचं भान असणं अत्यंत आवश्यक. कुठल्याही साहसी उपक्रमासाठी भाग घेण्यासाठी पूर्वतयारी करणं आवश्यक असतं. जात असलेल्या ठिकाणाची आणि ज्या साहसी उपक्रमात भाग घेणार त्याची संपूर्ण माहिती असणं आवश्यक आहे. साहसी उपक्रमात भाग घेतांना पूर्वानुभव, योग्य साधनसामुग्री आणि प्रशिक्षित, अनुभवी नेत्यांचं मार्गदर्शन गरजेचं असतं. सोशल मिडिया किवा इंटरनेटच्या माध्यमातून ही सारी माहिती उपलब्ध होऊ शकते. गेल्याच वर्षी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयानं ‘साहसी उपक्रमातील सुरक्षितते’साठी उपक्रम आयोजकांसाठी ऑगस्ट २०२१ मध्ये अध्यादेश जारी केला आहे. विविध कारणांमुळे या अध्यादेशाची व्यवस्थित अंमलबजावणी अजूनही रेंगाळलेली आहे. असं असलं तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीनं शासनानी उचललेलं हे पाऊल निश्चितच स्वागतार्ह आहे. वर उल्लेखिलेल्या अनेक घटकांपैकी निष्काळजीपणे एखाद्याही घटकाची काळजी न घेतल्यास जीवघेणा अपघात घडू शकतो हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. सुरवातीस वर्णन केलेले हिमालयातील अनुभव हे या गटात मोडतात.

तिसरा अपघातांचा गट म्हणजे अस्मानी संकट. कुठल्याही साहसी उपक्रमात धोका हा असतोच! अपघात होण्याची शक्यता गृहीत धरून पूर्वतयारी करणं अत्यावश्यक. निसर्गात, डोंगरात असतांना अचानक हवामान बदलू शकतं. यामुळे नदी नाल्यांचे प्रवाह फुगू शकतात किवा भयानक वेगवान होऊ शकतात, दरडी कोसळू शकतात. हिमालयात हिमस्खलनाचा (Avalanche) धोका वाढतो. अशा कारणांमुळे घडणाऱ्या अपघातांना अस्मानी संकट कारणीभूत असतं आणि बहुतेक वेळेस हे अपघात टाळता येत नाही, हे दुर्दैव!

सदर लेखाची व्याप्ती लक्षात घेता, पुढील विवेचन प्रामुख्याने सह्याद्रीतील गिरिभ्रमणासंदर्भातील आहे. सह्याद्रीतील साहसी उपक्रमांचा विचार करता उपक्रम आयोजक आणि सहभागी असे दोन गट पडतात. यातील साहसी उपक्रम आयोजकांनी प्रामुख्याने सुरक्षिततेची काळजी घेणं अपेक्षित असतं. गिरीभ्रमण करायला जायच्या ठिकाणाची व मार्गाची संपूर्ण माहिती आणि तिथे होणारी संभाव्य गर्दी याचा सुरवातीसच नियोजनात विचार करावा. शक्यतोवर उपक्रमाच्या एखाद आठवडा आधी प्रत्यक्ष मार्गावर आयोजकांपैकी एक दोघांनी जाऊन यावे. मार्ग अवघड असल्यास स्थानिक गाईडची न लाजता मदत घ्यावी. ग्रुपची संख्या १५ ते २० पेक्षा जास्त असू नये. येणाऱ्या सहभाग्यांची संख्या २० पेक्षा जास्त असल्यास सुरवातीपासूनच स्वतंत्र छोटे गट करावे. ६ ते ८ सहभाग्यांमागे एक आयोजक/नेता असणे गरजेचे. प्रत्यक्ष मार्गावर एक नेता पुढे तर एक नेता सर्वात मागे (Rear Guard) असावा. मार्गात कुठेही अडचणीची चढाई असल्यास सुरक्षा दोर वापरणे गरजेचे. अशा उपक्रमातील नेत्यांसोबत ट्रेकच्या गरजेनुसार योग्य साधनसामुग्री, अद्ययावत प्रथमोपचार पेटी (First Aid Kit) असणे गरजेचे. ट्रेकची संपूर्ण माहिती, त्यातील संभाव्य धोके याची पूर्वकल्पना सहभागींना देणे गरजेचे असते. सहभागींच्या विम्याची व्यवस्था ही आयोजकांची जबाबदारी आहे. ट्रेकवर सहभागींनी मजा करावी, निसर्गाचा आनंद घ्यावा आणि तरीही त्यात एक किमान शिस्त असावी. साहसी उपक्रमातील सुरक्षितता ही जरी प्रामुख्याने आयोजकांची जबाबदारी असली तरी सहभागींनी सर्व व्यवस्था नीटपणाने केली असल्याची खात्री करून घ्यावी. त्याचबरोबर उपक्रमाची शिस्त काटेकोरपणे पाळण्याची जबाबदारी सहभागींचीच असते. या संदर्भातील शासनाच्या संकेतस्थळावरील अध्यादेशात, तसेच महा अॅडव्हेंचर काऊन्सिलच्या संकेतस्थळावर हवा, पाणी आणि जमिनीवरील साहसी उपक्रमांसाठी असलेल्या मार्गदर्शक सुरक्षितता सूचना संदर्भासाठी उपलब्ध आहेत.

महाराष्ट्रातील गडकोट, देवालये, धबधबे ही सारीच ठिकाणं गेल्या १५/२० वर्षांत अफाट लोकप्रिय झाली आहेत. या ठिकाणांना भेट देणाऱ्यांची संख्या कमीत कमी १५ ते २० पटीनं वाढली आहे. यात गिरीभ्रमण करणारे आणि पर्यटक अशा दोघांचाही समावेश आहे. पर्यटक हा अशा स्थळाला बहुदा आपल्या वाहनानी जातो. फारसे कष्ट न घेता अशा ठिकाणाला भेट देऊन परत येतो. गिरिभ्रमणातही पायथ्याच्या ठिकाणापर्यंत वाहनानी पोचता येतं. परंतु त्यापलीकडे काही अंतर चालतच पार करावे लागते. या वाटचालीत काही साहसी, अवघड टप्पे देखील असू शकतात. याशिवाय ट्रेकसारख्या प्रकारात अशा किल्ल्यांवर, डोंगरांवर कॅम्पिंग, मुक्काम करून तीन-चार दिवसात एकाच डोंगररांगेतील किल्ल्यांना, डोंगरांना भेटी देता येतात. दुर्दैवानं आजकाल सर्वच लोकप्रिय ठिकाणांवर भरमसाट गर्दी होत आहे. त्यातच गेल्या दोन वर्षातील करोना सावटामुळे ‘Revenge Tourism’ नावाचं प्रकरण उदयास आलं आहे. यामुळे एकीकडे स्थानिक रोजगारास नवीन संधी उपलब्ध होत आहेत, परंतु स्थानिक गावकरी, वनविभाग, पुरातत्त्व खाते आणि पोलीस यांच्याकडून अशा उपक्रमास आडकाठी देखीलं केली जाते. काही ठिकाणी सारासार विचार न करता बंदी हुकूम जारी केले जातात. या सोबतच साधनसामुग्री जप्त करणे, पैशाची मागणी करणे यासारखे अनिष्ट प्रकार घडत असल्याचं कानावर येतं. या संपूर्ण विषयात पर्यटन मंत्रालयाने पुढाकार घेऊन, MAC सारख्या अनुभवी संस्थांची मदत घेऊन नियमनाचं नियोजन करण्याची आत्यंतिक गरज आहे. एकीकडे स्थानिक रोजगार, साहसी पर्यटन याला प्रोत्साहन देण्याच्या अनेक घोषणा होत आहेत, परंतु यासाठी सुयोग्य व सशक्त शासकीय नियमन यंत्रणेची तातडीची गरज आहे. तरच अपघातांना पायबंद बसून जीवितहानी आणि पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही. पर्यटन मंत्रालय आणि MAC सारख्या संस्थांनी पर्यटक आणि गिरीभ्रमण करणारे, साहसी उपक्रम आयोजक यांचं प्रबोधन करणं गरजेचं आहे. गिरीमित्र-लोणावळा, यशवंती हायकर्स-खोपोली यासारख्या सेवाभावी संस्था, अपघात झाल्यास वेळप्रसंगी आपला जीव धोक्यात घालून रेस्क्यूचे म्हणजेच बचावाचे कार्य मोठ्या उत्साहाने करत आहेत. अशा प्रयत्नांचा केवळ सत्कार करण्या पलीकडे शासनाने महाराष्ट्रात प्रशिक्षणाच्या सोयी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. कर्नाटक, उत्तराखंड आणि सिक्कीम अशा इतर राज्यांनी या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलं आहे.

साहस क्षेत्रातील उदंड अनुभव, विविध व्यक्ती आणि संस्था यांच्याकडे महाराष्ट्रात उपलब्ध आहे. महाराष्ट्राला सुमारे ७०० किलोमीटरचा समुद्रकिनारा, ३५०हून अधिक किल्ले असलेली सह्याद्रीसारखी पर्वतराजी, अनेक खळाळणाऱ्या नद्या व तलाव असल्यानं साहसी पर्यटनाची निकोप वाढ निश्चितच होऊ शकते. यासाठी या क्षेत्रातील सर्वच भागधारकांनी म्हणजेच पर्यटक, गिरीभ्रमण करणारे, साहसी उपक्रम आयोजक अशा सर्वांनी एकत्र येणे आणि शासनानं सुजाणपणे या प्रयत्नांना पाठबळ दिल्यास हे सहज शक्य होईल. विविध निरर्थक वाद, शासकीय अनास्था आणि निष्क्रियता बाजूला सारून प्रयत्न केल्यास महाराष्ट्र जागतिक पर्यटन नकाशावर सहजपणे येऊ शकतो. या साऱ्याच प्रयत्नांना मन:पूर्वक शुभेच्छा!

  • वसंत वसंत लिमये
Standard

‘बारा मोटेची विहीर’

‘बारा मोटेची विहीर’

गेल्या दोन वर्षातील करोनाचे सावट दूर झाले आणि हळूहळू जीवन पूर्वस्थितीला येऊ लागले. आमच्या उद्योगालाही मार्च महिन्यात विशेष बरकत आली. लगेच सारे हाय प्लेसेसचे सहकारी मिळून महाबळेश्वरला जाण्याचे ठरले. गेल्या दोन वर्षात आनंद असा नव्हताच त्यामुळे आनंद साजरा करण्याच्या संधीचे साऱ्यांनाच अप्रूप होते. मीही अनेक वर्षांनी असा बाहेर पडत होतो. त्या दिवशी पहाटे लवकर निघून टिवल्या बावल्या करत महाबळेश्वरी जाण्याचे ठरले. सोबत राहुल आणि निर्मल होता. वाटेतूनच मी साताऱ्या जवळच्या लिंब गावातील श्री. रवि वर्णेकर यांना फोन लावला. ‘अहो या की, वाट पाहतो!’ असा आगत्यपूर्वक प्रतिसाद मिळाला आणि आम्ही खंबाटकी घाटाअलीकडे एक मिसळ हाणून तडक लिंब गावाकडे निघालो.

महाराष्ट्रात विशेषतः घाटावर अशी अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणं विखुरलेली आहेत. बहुदा ती किंचित आडवाटेवर असतात आणि बऱ्याच वेळेस ठाऊक नसतात. साताऱ्या जवळील कृष्णेच्या काठी असलेल्या लिंब गावातील ‘बारा मोटेची विहीर’ हे असंच एक ठिकाण.

मी आधी दोन तीन वेळा तिथे गेलेलो, तेव्हाच रवि वर्णेकर यांचा परिचय झालेला. हा साठीच्या आसपास असलेला माणूस पण उत्साह दांडगा! स्थानिक इतिहासात विशेष रस आणि अभिमान. ‘बारा मोटेची विहीर’ ही संपूर्ण काळ्या दगडात बांधलेली सुबक Step Well आहे. हिचा इतिहास मोठा रंजक आहे.

संभाजी महाराजांच्या भीषण मृत्यूनंतरचा कालखंड, येसूबाई आणि लहानगा शाहू यांना औरंगजेबानी केलेली कैद, कैदेतच शाहू महाराजांचा झालेला विवाह हा रसभरीत इतिहास वर्णेकरांकडून खास ऐकण्यासारखा. औरंगजेबाला म्हणे सूनमुख पहायचं असतं, मग प्रत्यक्ष सूनेऐवजी तिची करवली विरुबाई सजून धजून भेटायला जाते. पुढे कालांतराने शाहू महाराजांनी विरुबाईशी विवाह केल्याचे या विहिरीतील शिलालेखात नमूद केलेले आहे. ही विरुबाई मोठी कर्तबगार, तिने ही विहीर बांधून घेतली. ईशान्येला चंदन, वंदन, पूर्वेला कल्याणगड तर दक्षिणेला अजिंक्यतारा असा किल्य्यांचा गराडा. विहिरीच्या पाण्यावर सुमारे चार हजार विविध आंब्यांची झाडे तिने लाऊन आमराई तयार केली. पेशावाईच्या सुरवातीस अनेकदा सैन्याचे तळ लिंब गावाजवळ पडत, विहिरीच्या आत बांधलेल्या दालनात शाहू महाराज आणि अनेक मान्यवर यांच्यासोबत अनेक खलबते होत असत.

‘बारा मोटेची विहीर’ हा मराठा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. सुबक बांधकाम, खलबतखाना आणि दगडात कोरलेल्या प्रतिमा सुरेख आहेत. अधि, काय सांगू, ही विहीर प्रत्यक्ष पाहणे याला पर्याय नाही!

पहिल्या शाहू महाराजांचा इतिहास खूपसा दुर्लक्षित आहे याची वर्णेकरांना विशेष खंत आहे. त्यांनी आम्हाला आसाराम सैंदाणे यांनी लिहिलेले शाहू चरित्र आवर्जून दाखवले. लिंब गावातील हळद विशेष लोकप्रिय आहे असा बाबासाहेबांनी सांगितलेला संदर्भ माझ्या लक्षात होता म्हणून मग मी मुद्दाम तिथली हळद विकत घेतली.

बारा मोटेची विहिरीविषयी माहिती सांगताना श्री. वर्णेकर.

वर्णेकरांकडे राहण्याची, जेवणा खाण्याची सोय आहे आणि ते दोन तीन दिवसांच्या सहली साठी पर्यटकांबरोबर गाईड म्हणून उत्साहाने जातात. औंध, कल्याणगड, मेरुलिंग पठार अशी ठिकाणं त्यांच्यासोबत पाहणं ही पर्वणी असणार. पाहू कधी जमतं!

वसंत वसंत लिमये.

Standard

साहसे श्री: प्रतिवसति

It was a great pleasure to listen to you. We were amazed listening to your experiences.

  • Rahul Narute, Director, AMTCPL. 3rd October 2021

It was pleasure sharing the dais with you on Sunday evening at the Foundation Day function of my distributor. I was very much impressed with your presentation and the journey of High Places and the various unique experiences that you shared. We are planning to arrange a Outdoor Training program again at Garudmaachi sometime during early January 2022. Warm Regards, 

  • Dhiren Gupte, CMD, Marks Technosystems Pvt Ltd.

आठ/दहा दिवसांपूर्वी एका कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून जाण्याची वेळ आली. सुरवातीस खूप अवघडल्या सारखं होत असे, आजकाल जरा अंगवळणी पडून भीड चेपली आहे. हे सगळं ठरलंही अचानक, मानधनासह सन्मानपूर्वक निमंत्रण होतं. पिरंगुट येथील एका कंपनीचा नवव्वा Foundation Day, वर्धापन दिन होता. अॅम्ब्रोझिया, ठिकाण जवळच होतं आणि मला फक्त प्रेरणादायी चार शब्द सांगायचे होते, त्यामुळे फारशी तयारीही करायची नव्हती. कार्यक्रमाच्या ठिकाणी उत्साहाचं वातावरण होतं. पुरुष डार्क निळी पँट आणि पांढरा शर्ट तर रंगीबेरंगी साड्या नेसून सजलेल्या बायका आणि काही धमाल करत खेळणारी मुलं. पन्नासच्या पुढे समुदाय जमला होता. सगळे पिरंगुटच्या ऑफिसात पूजा आटोपून सारे तिथे पोचले होते. आयोजकांपैकी सूट घातलेल्या सूत्रधाराने माझ्या हाती कार्यक्रम पत्रिका दिली. माझं भाषण पहिलं तर इतर सारे त्यानंतर बोलणार होते. हा सर्व कार्यक्रमच तसा अनपेक्षितपणे ठरला होता आणि मला त्या कंपनी बद्दल फारच जुजबी माहिती होती. मनावर आलेलं दडपण आणि सोयीसाठी मी सुचवलं की मी शेवटी बोलतो! पाहुणा असल्यानं ते लगेच मान्य झालं आणि कार्यक्रमाला सुरवात झाली.

कंपनीच्या प्रमुखांनी, राहुल नरुटे यांनी स्वागतपर प्रास्ताविक केलं. मी थोडा निवांत होऊन सारं ऐकू लागलो. एकेक करत चार तरुण, पण गेल्या वर्षात यशस्वी कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांनी काहीशी भीत भीत भाषणं केली. प्रमुखांनी मुद्दाम त्यांना आग्रह केला होता हे जाणवत होतं. नमनालाच शंकर नावाच्या तरुणानी बिनधास मराठीत बोलायला सुरवात केली. हळूहळू साऱ्यांचाच उत्साह, आत्मविश्वास खुलत गेला. एक मुलगी काहीशी घाबरून अडखळत होती पण पठ्ठीनं नेटानं तिचं इंग्रजी भाषण संपवलं! ती बहुदा प्रथमच आणि ते सुध्दा इंग्रजीतून भाषण करत होती. नंतर तिच्या चेहऱ्यावरील समाधान अवर्णनीय होतं! गेल्या नऊ वर्षातील प्रगतीची चढती भाजणी त्या साऱ्यांच्या भाषणातून उलगडत गेली. आत्ता पर्यंतच्या वाटचालीचा अभिमान, कंपनीतील एखाद्या कुटुंबासारखा जिव्हाळा प्रकर्षानं जाणवत होता. माझं मन नकळत एकवीस वर्षं मागे गेलं! माझी संस्था व्यवस्थापकीय प्रशिक्षण उपक्रम करते. त्या अकराव्व्या वर्षी, एकाच महिन्यात आम्ही अकरा उपक्रम केले होते. वर्धापन दिनाच्या पार्टी निमित्तानं सारे जमले होते. ’11 Up and Going Strong!’ अश्या अर्थाचं काहीतरी लिहिलेला काळा Tee शर्ट साऱ्यांनी मोठ्या अभिमानानं परिधान केला होता आणि हसत खेळत सारेच धमाल मूडमध्ये होते. तोच कौटुंबिक जिव्हाळा मला समोर दिसत होता. ही कंपनी आता एका नव्या उंबरठ्यापाशी होती!

कुठल्याही उद्योगाच्या, संस्थेच्या आयुष्यात असा टप्पा येतोच. तुमचं उत्पादन, तुम्ही देत असलेली सेवा आणि या क्षेत्रातील ज्ञान महत्त्वाचं असतंच! परंतु तुमचा उद्योग, संस्था वाढवणे ही देखील एक प्रक्रिया असते आणि यातील ज्ञान बहुदा नसतं. पण त्या प्रवासात आपण चुकत माकत शिकत जातो. एक जोश, उदंड ऊर्जा आणि आत्मविश्वास असतो, विशेषतः त्या उद्योगाच्या प्रवर्तकाकडे, लिडरकडे. सुरवातीस दोन/चार मग दहा, तदनंतर पंचवीस असा प्रवास सुरू राहतो. खूप कष्ट, धडपड आणि मग टप्प्या टप्प्यानं येणारं यश. ती एक धुंदी, नशा असते. सुरवातीची भीती, अपरिपक्वता, येणारं दडपण त्यातून घडणारे विनोद आणि यातूनच सारे जवळ येत जातात. याच काळात कंपनीतील साऱ्यांचं जणू एक कुटुंब बनतं. एकमेकांचा आधार वाटतो, एकमेकांच्या सुखदुःखात सारे सहभागी असतात, फार आनंदाचे दिवस असतात. पण इथून पुढे एक सपाटीचा प्रदेश सुरू होतो! खूपशा गोष्टी सवयीनं घडत जातात. अनुभव गाठीशी असतो, अडचणी येत राहतात पण यशाची सम पातळी राखण्याइतके सारेच वाकबगार झालेले असतात. अश्या वेळेस निष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा हे मोठे गुण ठरतात. मैत्री, नाती खूप महत्त्वाची असतात. नकळत किरकोळ हेवेदावे, कुरबुरी सुरू होतात. सारेच ‘आल इज वेल’ असं एकमेकांना सांगत असतात. त्या दिवशी स्टेजवर बसलो असता हे सारं मला प्रकर्षानं जाणवत होतं, हीच वेळ धोक्याची असते!

सोबती तेच असतात, तावून सुलाखून निघालेले मित्र आता सहकारी असतात. पण प्रगती, नाविन्याची आस मंदावते, नकळत एक सुस्तपणा येऊ लागतो. सर्जनशीलता लयाला जाऊ लागते. कामगिरी/Performance दुय्यम भासू लागतो. नवी आव्हानं नकोशी वाटू लागतात, ‘चाललंय ते ठीक आहे’ असं वाटण्याचा हा काळ! हे भयानक नाही पण अपरिहार्य निश्चित आहे. मला अश्या वेळेस कात टाकणारा साप आठवतो. वयात आलेला साप वाढत असतो, ते स्वाभाविक आहे. परंतु वाढणारं शरीर जुन्या कातडीत सामावू शकत नाही म्हणून जुनी कातडी गळून पडणं गरजेचं असतं. पण सापाला हे कळतं कसं? सापाच्या डोळ्यांवर पापण्या नसतात, वाढणाऱ्या शरीरामुळे कातडी डोळ्यावर सरकू लागते. सापाला कमी दिसू लागतं. थोडक्यात जुनी कातडी/कात टाकण्याची वेळ आलेली असते. निसर्गानी दिलेला हा इशारा असतो. मग साप तोंड दगडावर, कठीण पृष्ठभागावर आपटून जुनी कातडी विलग करतो. तोंडापाशी तीच कातडी अणकुचीदार काट्यावर अडकवून, जुन्या कातडीच्या खोळीतून टूथपेस्टप्रमाणे नवा साप बाहेर पडतो. ही सारी प्रक्रिया अतोनात क्लेशदायक असते. कात टाकलेला साप अत्यंत चपळ, तजेलदार दिसतो! कुठल्याही उद्योगाच्या, संस्थेच्या संदर्भात हेच घडतं आणि त्याचं आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. निष्ठा, सचोटी, प्रामाणिकपणा हे अजूनही गुणच असतात, पण आणखी काही गुण, प्रक्रिया सोबत असणं आता गरजेचं असतं. संस्थात्मक वाढीतील हा एक महत्त्वाचा पुढचा टप्पा आहे!

स्थिरतेचं आपल्याला आकर्षण असतं परंतु या जगात ‘स्थिर’ असं काहीच नसतं! जगरहाटी ही नेहमीच ‘गतिशील (Dynamic)’ असते. कुठलीही गोष्ट विकसन पावते किंवा तिचा ऱ्हास होतो, ती लयाला जाते. एकाच ठिकाणी थांबणं हे अशक्य आहे. स्थिरता, परिपूर्णता याचा ध्यास असावा, परंतु या गोष्टी अशक्यप्राय आहेत हेही लक्षात ठेवलं पाहिजे. संस्थात्मक वाढीतील पुढच्या टप्प्यावर संस्थेची पुनर्रचना अपेक्षित असते. आधीच्या टप्प्यावर एका अर्थाने सारेच जणं पडेल ती जबाबदारी स्वीकारून कामं करत राहतात. नव्या रचनेत पुढील पाच ते दहा वर्षातील उद्दिष्टे ठरवून उद्योगातील कामांची शास्त्रशुध्द विभागणी करावी लागते. या विभागणीला अनुसरून विविध संघ (Teams) तयार करावे लागतात. प्रत्येक संघाची उद्दिष्टे, संसाधने आणि मार्गदर्शक सूचना सुस्पष्ट असाव्या लागतात. प्रत्येक संघातील एकजूट आणि संघभावना गरजेची असते. उद्योगातील सर्व संघात एक निकोप, निरोगी स्पर्धा स्वाभाविकपणे असते. परंतु उद्योगाच्या एकूण उद्दिष्टाला बाधा येणार नाही याची काळजी घेणं गरजेचं असतं. एका अर्थानं उद्योगातील/संस्थेतील प्रत्येक सदस्याने उद्योगाच्या ध्येयासाठी (Vision) आणि संघाच्या मर्यादित उद्दिष्टासाठी प्रामाणिक प्रयत्न करणं गरजेच असतं. सकृतदर्शनी हे विरोधाभासी वाटलं तरी ती कुठल्याही प्रगतीशील उद्योगातील वस्तुस्थिती असते. अशा वेळी यातील संतुलन राखणं ही उद्योगातील नेतृत्वाची कसोटी असते.

माझ्या भाषणाची सुरुवात मी ‘11 Up’ पासून केली. माझ्या आयुष्यातील विविध टप्प्यांवरील संभ्रम, यशापयश यांच्या आठवणी सांगताना त्या प्रत्येक वेळी मला शिकता आलेले धडे मी श्रोत्यांसमोर मांडत गेलो. मी मांडत असलेल्या गोष्टींमुळे श्रोत्यांच्या मनात अनेक संदर्भांची उजळणी होत असल्याचं मला जाणवत होतं. संस्थेच्या वर्धापनदिनी एका नव्या उंबरठ्यावर उभं असताना, समोर असलेली आव्हानं, संकटं आणि संधी मी सविस्तरपणे विशद करून सांगत होतो. भाषणापेक्षा श्रोत्यांशी घडत असलेला संवाद माझ्यासाठी उत्साहवर्धक होता. मी सुमारे तासापेक्षा जास्त वेळ बोलत होतो. मग आवरतं घेतांना मी सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा देऊन माझे ‘प्रेरणादायी चार शब्द’ (?) संपवले!

या भाषणाच्या निमित्तानं मला देखील सिंहावलोकन करण्याची एक अप्रतिम संधी मिळाली. माझ्या संस्थात्मक प्रवासातील चुका, निसटलेल्या संधी आणि अनेक वेळा मिळालेले यश प्रकर्षाने जाणवत होतं. याच प्रवासात जोडलेले मित्र, सहकारी आणि त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत केलेलं योगदान याचं सुस्पष्ट चित्र माझ्या डोळ्यासमोर होतं. एकाच आठवड्यानंतर आमच्या संस्थेचा ३२वा वर्धापनदिन आम्ही साजरा करणार होतो. त्यामुळेच मोठ्या भावाने धाकट्याला ‘चार शब्द’ सांगण्यासारखा हा प्रकार होता. मला वाटतं कुठल्याही संस्थेच्या जन्मापासून असे वेगवेगळे टप्पे येत जातात. सभोवतालची परिस्थिती, त्यातील आव्हानं बदलत जातात. उद्योगाची/संस्थेची उद्दिष्टं बदलतात. संस्थेतील काही सहकारी सोडून जातात, अनेक नवीन सहकारी जोडले जातात. संस्थेचा विकास अव्याहतपणे सुरु असतो. या साऱ्या प्रवासात प्रामाणिक प्रयत्न, सर्जनशीलता, कल्पकता आणि परिस्थितीनुरूप बदलण्याची क्षमता असणं खूप महत्त्वाचं. कात टाकणं कितीही क्लेशदायक असलं तरी होणाऱ्या वाढीची, विकासाची जाणीव ठेवून त्याला सामोरं जाण्याचं साहस असणं महत्वाचं! ‘साहसे श्री: प्रतिवसति!’ या उक्तीची आठवण अश्या वेळी साहजिकच होते. 

  • वसंत वसंत लिमये

Standard

मित्रा, असाच हसतमुख रहा!

तसा मी ठाण्याचा. ‘कांचनजंगा’ मोहीम आटपल्यावर, म्हणजे १९८८ साली माझं पुण्याला येणं वाढलं. शालेय मुला मुलींसाठी साहस शिबिरांचं आयोजन करणारी ‘रानफूल’ ही संस्था नुकतीच जन्माला आली होती. माझा मित्र मिलिंद याची आई, श्रीमती ज्योतीबाई कीर्तने यांच्या सौजन्यानं पौड रस्त्यावरील गुरुराज सोसायटी, येथे त्यांच्या इमारतीतील आउट हाउस आम्हाला ऑफिस म्हणून लाभलं. तो STD/ISD कॉलचा जमाना, आणि माझ्या लवकरच लक्षात आलं की STD बिलाच्या रकमेत मला पुण्यात फ्लॅट भाड्यानं घेता येईल. झालं, लगेच मी पौड रस्त्यावर किनारा हॉटेलच्या गल्लीत एक फ्लॅट भाड्यानं घेतला देखील. आता मी पुणेकर झालो होतो!

अन्न, वस्त्र, निवारा यापैकी महत्त्वाची गरज अन्नाची आणि त्यासाठी लवकरच मला पौड रस्त्यावरील ‘श्रीमान’चा शोध लागला. खाण्या ‘पिण्या’ची मस्त सोय झाली. काही वर्षांपूर्वी हॉटेल श्रीमान हे रेस्टॉरंट जणू गावाबाहेर होतं आणि म्हणूनच बिल्डर, प्रेमी युगुलं, ऑफिसनंतर जमणारे यांचं हे आवडतं ठिकाण. चवदार खाणं आणि अगत्यशील सेवा यामुळे लवकरच माझा आणि माझ्या डोंगरी मित्रांचा तो आवडता अड्डा झाला. नकळत आमच्या मित्रमंडळीत ‘खानावळ’ हे नाव रूढ झालं! विरळ होत जाणाऱ्या केसांमुळे उंच भासणारं कपाळ, चष्मा आणि नेहमीच जाड मिशांखाली दडलेलं मनमोकळं, मैत्रीपूर्ण हसू. स्थूल शरीरयष्टी, पोटावर येणाऱ्या पँटमध्ये खोचलेला बुशशर्ट अशी व्यक्ती शरीराला शोभणार नाही अश्या चपळतेनं, सर्वांना काय हवं नको याची प्रेमळ दखल घेत हॉटेलभर अखंड फिरत असे. ते होते मालक म्हणजेच ‘राजनशेठ उडाणे!’ साहजिकच ओळख झाली आणि काही कळायच्या आत घट्ट मैत्रीदेखील. नव्या शहरात एक सख्ख्या भावासारखा मित्र मिळाला आणि मी खऱ्या अर्थानं कोथरूडवासीय झालो!

राजन आणि मोहन या भावात राजन मोठा. शेजारीच असलेलं शाकाहारी ‘रत्नप्रभा’ हॉटेल मोहन सांभाळत असे. आमची ओळख वाढत गेली आणि हळूहळू राजनच्या परिवाराची माहिती होत गेली. मला धंदेवाईक पंजाब्यांच्या ‘गोडबोले’पणाचा अनुभव होता, परंतु राजनकडे एक सुसंस्कृत, प्रेमळ गोडवा होता. कडूसच्या अलीकडील राजगुरुनगर जवळील ‘दोंदे’ हे उडाण्यांचं गाव. राजनचे वडील विठ्ठलराव उडाणे तरुणपणी पुण्यात येऊन मंगळवार पेठेत स्थायिक झाले. बारणे वाड्यात त्यांचं छोटंसं बिऱ्हाड होतं. आई, रत्नप्रभा ही वडगाव मावळची. विठ्ठलरावांचं लाडकं नाव होतं ‘नाना’ तर आईंना सारे ‘अक्का’ म्हणत असत. विठ्ठलराव फक्त चौथी पास तर त्याकाळी तळेगावच्या शाळेत फायनल (म्हणजेच सातवी) पास झालेली अक्का. नाना सुरुवातीस पेपर वाटप करत असत, १९६२ सालापासून त्यांची रिक्षा होती. कष्टांची तमा न बाळगता विशेष धडपड करून ‘धंदा, व्यवसाय’ वाढवत नेणे हा नानांचा ध्यास असे. पुढे एकीच्या पाच/सहा रिक्षा झाल्या, मग ७४ साली त्यांनी मंगळवार पेठेत दारूचं दुकान सुरु केलं. ८० साली नानांनी पौड रस्त्यावर आधी एक दुकान बुक केलं. ते कमी पडेल असं वाटल्यामुळे त्यांनी बेधडक शेजारचं दुसरं दुकान घेतलं. व्यावहारिकतेचं भान ठेवून धाडसी स्वप्नं पाहण्याची जिद्द त्यांच्याकडे होती आणि या साऱ्या प्रवासात अक्का त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.

कालांतरानं मला कळलं की मोहननं जमशेदपूरहून इंजिनियरिंग केलेलं आहे. मंगळवार पेठेतलं बालपण, वडिलांचं दारूचं दुकान असं सारं असूनही राजन आणि मोहन इतके सुसंकृत, सुस्वभावी कसे, हे माझ्या मध्यमवर्गीय मनाला पडलेलं कोडं होतं. अक्का आणि नाना यांच्या आग्रहामुळे, त्याकाळी इंग्रजी माध्यम असलेल्या, सेंट मिराज या मान्यवर शाळेत जाणारी राजन आणि मोहन ही दोनच पेठेतली मुलं होती. ७३/७४ साली राजन आणि मोहन रिक्षा धुवत असत. एका रिक्षाचे पाच पैसे मिळत. या बहाद्दरांनी ते पैसे गोळा करून २६ रुपयांची भाऊबीज ताईला दिली होती. त्याकाळी अक्का पापड करायची, दाणे-चणे याची पाकिटं दुकानाला पुरवायची. अक्कानं या कर्तबगारीवर २०-३० तोळे सोनं जमवलं होतं. कष्ट, सचोटी आणि शिक्षणाचं महत्व हे बाळकडू राजन आणि मोहनला अक्कांकडून मिळालं होतं. राजन ११वीत असतांना ‘प्रशांत ट्रेडर्स’ ही कंट्री लिकर एजन्सी त्यानी संभाळली. तो स्वतः ट्रक घेऊन, फलटणला जाऊन माल भरून घेऊन येत असे. ८३ साली ‘श्रीमान’ सुरु झालं आणि कॉलेजला असतांना श्रीमानची सर्व जबाबदारी राजननी उचलली. हॉटेलची जबाबदारी असल्यानं ८३ साली राजनला क्रिकेटची प्रचंड आवड असून वर्ल्ड कपची मॅच पाहता आली नाही. एवढंच कशाला सुरुवातीच्या काळात रात्रीची उशिरापर्यंतची आवाराआवर संपल्यावर राजन कित्येकदा हॉटेलातील बाकावरच झोपत असे. तोपर्यंत उडाणे कुटुंब मंगळवार पेठ सोडून पौड रस्त्यावरील ईशदान सोसायटीत राहायला आलं होतं. नाना रोज संध्याकाळी चालत, सोबत त्यांचा आवडता कुत्रा ‘गब्बर’ याला घेऊन श्रीमानवर येऊन बसत असत. ‘गब्बर’चा हॉटेलच्या खांबावर लावलेला फोटो माझ्या अजूनही स्मरणात आहे. आजूबाजूचं वातावरण कसंही असलं, सांपत्तिक स्थिती अगदी बेताची असली आणि कुठलाही उद्योग असला तरी प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या बळावर एखादं कुटुंब नेकीनं किती समृद्ध होऊ शकतं आणि सुसंस्कृत राहू शकतं याचं उडाणे परिवार हे एक उत्तम उदाहरण आहे. मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरात वाढलो, त्यासोबत मिळालेल्या आणि सहसा गृहीत धरलेल्या संस्कारांचं महत्त्व उडाणे कुटुंबाकडे पाहिलं की खऱ्या अर्थानं कळतं.

नाना पुण्यात आले तेंव्हा सुरुवातीला त्यांना एका खाणावळीत ‘पाव सॅम्पल’चंच जेवण परवडत असे. पण म्हणूनच कधीतरी ‘खाणावळ’ सुरु करायची असं नानांच्या डोक्यात पक्कं होतं. प्रमोद पुरोहित नावाच्या आर्किटेक्ट मित्राच्या सल्ल्यानं ‘खाणावळी’चं स्वप्न श्रीमानच्या रूपांनं प्रत्यक्षात आलं. श्रीमानच्या उद्घाटन समारंभानंतर सारी मंडळी ‘गौरव’मधे जेवायला गेली होती. राजन आणि मोहन यांनी आयुष्यात पहिल्यांदा पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेतला. पण कालांतरानं तेच पदार्थ श्रीमानमधे मिळू लागले. नव्या गोष्टी, तंत्रज्ञान आत्मसात करणं हे राजनला सहज जमतं. आत्ताच्या काळात २०१३ च्या बॉम्ब स्फोटानंतर ‘जर्मन बेकरी’ची उध्वस्त जागा विकत घेऊन, ‘जर्मन बेकरी’ हा ब्रँड नावारूपाला आणून आता पाच नवीन उपाहारगृहं अस्तित्वात आली आहेत. या प्रयत्नात राजनच्या सोबत त्याच्या मुलानं, कुणालनं हिरीरीनं पुढाकार घेतला आहे. नाना, अक्का यांच्यापासून सुरु झालेली परंपरा त्यांच्या मुलांच्यातही आलेली पाहून खूप आनंद होतो. ही सारी मुलं मी लहानाची मोठी होतांना पहिली आहेत. चटकन वाकून मोठ्यांना नमस्कार करायला ती आजही लाजत नाहीत. आजकाल आदरभावना असणं हेही विरळाच आणि त्याचा सन्मान राखणं हेही दुर्मिळ! अनेक संकटं आली, तरीही न डगमगता त्यांना तोंड देत प्रगतीपथावर राहण्याचा वसा राजन, मोहन आणि त्यांची मुलं यांनी कसोशीनं पुढे चालवला आहे. २३ मे १९८३ रोजी श्रीमान सुरु झालं. त्याआधी पाचच दिवसांपूर्वी १७ मे रोजी राजनची बहिण सौ. नूतन सुधाकर पाचर्णे ही इंडियन ऑईलची ‘श्री डिस्ट्रीब्युटर्स’ या नावानं भारतातील पहिली महिला वितरक झाली. आजही राजन, मोहन पंढरीच्या वारीला दोन/तीन दिवस तरी जातात आणि वारकर्‍यांना खाऊ घालतात. राजनच्या कुटुंबाचा हा सारा इतिहास पाहिला की आपण थक्क होतो!

सुरवातीच्या काळात राजनच्या सोबत जिवलग मित्र अरविंद चव्हाण असे तर अभय भोसले यांच्यासारखा थोरल्या भावासारखा मित्र त्याला लाभला. श्रीमानमधील शशी वस्ताद, विजय मेहता, भरत, रवि आणि विजय घडशी अशी भक्कम टीम राजननी उभी केली. ‘चिकन हंडी’सारखा प्रकार सर्वप्रथम पुण्यात राजननी सुरू केला. किचन, बार आणि सर्व्हिस यावर बारीक लक्ष ठेवणारा राजन कधीही कातावलेला, रागावलेला किंवा चिडलेला मला दिसलेला नाही. यशस्वी नेतृत्वाचं हे एक मोठं लक्षण आहे. पूर्वी आठवड्यात दोन-तीनदा आम्ही खाणावळीत हजेरी लावत असू. मला आठवतंय, माझी मुलगी रेवती आणि मिलिदची ऋचा या दोघीही खूप लहान होत्या. आमच्या गप्पा, मेहफिली रंगत असत. या दोघी मोठ्या शहाजोगपणे स्वतंत्र टेबलावर बसून आवडतं बटर चिकन मागवत. थोड्या वेळानं झोप अनावर होऊ लागल्यावर, भरत सारखा प्रेमळ वेटर दोन खुर्च्या जोडून, त्यावर लाल चौकडीच्या टेबलक्लॉथची गादी करून त्यांची झोपायची व्यवस्था करून देत असे. साहजिकच आमच्या मेहफिलीत कुठलाच खंड पडत नसे. खरंच, अतिशय बहारदार काळ होता तो आणि ही सारी ‘राजनकृपा’ होती!

राजन तसा अबोल, पुढे पुढे न करणारा पण लाघवी स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा. ‘श्रीमान’मधे हिंदी फिल्म कलाकार रझा मुराद, मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, दिग्दर्शक प्रवीण तरडे, तबलावादक पंडित विजय घाटे, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि अनेक कलाकार अशी मंडळी सहज दिसतात. बहुतेक सर्व बिल्डर, अनेक नामांकित डॉक्टर आणि वकील इथे आवर्जून भेट देतात. जुन्या काळी शरद तळवलकर, विक्रम गोखले, निळू फुले, रवींद्र महाजनी, मोहन जोशी असे थोर कलाकार, तर मान्यवर राजकीय नेते बॅरीस्टर गाडगीळ, विजयसिंह मोहिते पाटील, पतंगराव कदम आणि रामकृष्ण मोरे हे देखील ‘श्रीमान’चे चाहते होते. आपण आवडत्या हॉटेलमधे अनेकदा तिथल्या खास खाद्यपदार्थांच्या आस्वादासाठी जातो पण हॉटेल मालकाच्या मैत्रीमुळे येणारा खास चाहतावर्ग ही राजनची खासीयत. अव्हानकारक परिस्थितीतून वर आलेला आणि तरीही ते यश डोक्यात न गेलेला आदर्श उद्योजक म्हणजे राजन! प्रचंड धडपड्या, निगर्वी, हसतमुख आणि आमचा प्रेमळ मित्र राजन उद्या साठीचा उंबरठा पार करतो आहे, त्या निमित्त त्याला उदंड शुभेच्छा! मित्रा, असाच हसतमुख रहा!

  • वसंत वसंत लिमये , २४ जून २०२१
Standard

प्रथम तुज पाहता… (लेख ३)

किशोर वयात मी ठाण्याच्या समर्थ व्यायाम मंडळाच्या विहिरीत पोहायला शिकलो. तेव्हा आम्ही शिकाऊ मंडळी सील केलेला रिकामा डालडाचा डबा ‘Life Jacket’ प्रमाणे कमरेला बांधत असू. मला इतिहासाची आवड आहे, परंतु मी इतिहास संशोधक नाही. मध्य आशियातील उझ्बेकिस्तान म्हणजे गेल्या अडीच हजार वर्षांतील असंख्य घटना, राजवटी आणि व्यक्ती यांनी खच्चून भरलेला मनोरंजक इतिहास. माझी उझ्बेकिस्तान भेट फक्त एक आठवड्याची होती. मला डालडाचा डबा बांधून अथांग सागराच्या मध्यभागी पृष्ठभागावर तरंगत असल्यासारखं वाटत होतं! ११ एप्रिलच्या सकाळी अकबर, म्हणजे माझा गाईड मला ताश्कंद स्टेशनवर सोडायला आला होता.

उत्तम रेल्वे ही भूतकाळातील सोव्हिएत राजवटीची देणगी आहे. उझ्बेगी भाषेत रेल्वे स्टेशनला ‘Vokzal’ म्हणतात, हा रशियन शब्द असावा. स्टेशन कसलं, मला तर एयरपोर्टवर शिरत असल्याचा भास झाला. प्रशस्त देखणी आधुनिक इमारत. सामानाची X-Ray तपासणी, QR कोडवालं तिकीट आणि पासपोर्ट तपासणी असे सारे सोपस्कार झाले. स्टेशन, प्लॅटफॉर्म यावरील स्वच्छता दृष्ट लागण्यासारखी होती.

सकाळी साडे आठच्या गाडीनं ५६० कि.मी. अंतरावर असलेल्या बुखाराला मी निघालो होतो. ‘Talgo’ या स्पॅनिश कंपनीनं बनवलेली ‘Afrosiyob’ नावाच्या बुलेट ट्रेननी मी प्रवास करणार होतो. या गाडीचा कमाल वेग ताशी २२० कि.मी. असू शकतो आणि केवळ साडे तीन तासात ही गाडी मला बुखाराला घेऊन जाणार होती.

या साऱ्याच प्रदेशात कोरडं, अतिशीत आणि अतिउष्ण असं हवामान. गाडीत शिरतांना रुबाबदार टीसी आणि हवाई सुंदरी प्रमाणे दिसणाऱ्या परिचारिकेने स्वागत केलं. साऱ्या देशात दोनच प्रमुख नद्या आणि बहुतांश वाळवंटी प्रदेश. इथे बेताचाच पाऊस आणि यामुळेच पाण्याला खूप महत्त्व. गेल्या अडीच हजार वर्षांपूर्वीपासून शेतीसाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी कालवे काढण्याची योजना अस्तित्वात आली.

पाण्याचे साठे, ओअॅसिस यांच्या भरवश्यावरच ‘सिल्क रूट’चा व्यापारी मार्ग अस्तित्वात आला. यालाच पूर्वीच्या कहाण्यातील सुप्रसिद्ध ‘खुष्कीचा मार्ग’ म्हणत असत. ताश्कंदमधून बाहेर पडल्यावर सुमारे १०० कि.मी. पर्यंत कालवे आणि आखीव रेखीव शेतीचे पट्टे दिसत होते. त्यानंतर मात्र बराचसा भाग वाळवंटी प्रदेश आहे. गहू आणि कापूस ही इथली महत्वाची पिकं, परंतु रशियन राजवटीतील अतिलोभामुळे रासायनिक खतांचा वारेमाप वापर करण्यात आला. आज त्याचेच दुष्परिणाम म्हणून शेतं, शेतांचे बांध यावर पांढुरका मिठाचा थर पसरलेला दुरूनही नजरेस पडत होता. गोड लागलं म्हणून मुळापासून खाण्याची प्रवृत्तीच आपल्या मुळावर येणार आहे! प्रवासापूर्वीच्या तयारीत ‘Cynthia Bil’ या बेल्जियन भटक्या मुलीचा ब्लॉग माझ्या वाचनात आला होता. तिच्या शिफारसीनुसार मला शौकत बोल्तायेव या प्रसिद्ध फोटोग्राफरचा आणि त्याच्या ‘आर्ट गेस्ट हाऊस’चा पत्ता सापडला. इंटरनेट, व्हॉट्सअॅप या आजच्या काळातील ही सारी जादू आहे. प्रवासाला निघण्यापूर्वीच माझा शौकतशी संपर्क झाला होता. बाराच्या सुमारास बुखारा स्टेशनवर उतरताच मी टॅक्सी शोधत होतो. अली नावाचा बडबड्या, चतुर टॅक्सी ड्रायव्हर सापडला. मी गेस्ट हाऊसचं नाव सांगताच त्यानी साठ हजार ‘सोम’ मागितले! सोम म्हणजे उझ्बेगी चलन. या चलनाचा विनिमयाचा दर मोठा गमतीशीर आहे. आपला एक रुपया म्हणजे १४० सोम, थोडक्यात एका सोमची किंमत एक पैशाहूनही कमी आहे. ह्यामुळेच साध्या किमतीसुद्धा ऐकताना मनावर दडपण येतं. शौकतनी अंदाज दिल्याप्रमाणे मी तीस हजार सोमसाठी हटून बसलो. (घासाघीस करण्यासाठी अनेकदा वापरलेली चोरबाजारातील सवय!) अली बेट्यानं आणखी दोन ‘पाशिंदर’ उचलले आणि गडी तयार झाला. स्टेशनवरून निघून मी तडक गेस्ट हाऊसला निघालो. वाटेत बुखारातील प्राचीन ‘आर्क’ किल्ल्याचं दर्शन झालं.

दूरवर मिनार आणि निळे घुमट डोकावत होते. बुखाराच्या ऐतिहासिक खुणा जागोजागी दिसू लागल्या. मी मोठ्या आनंदात होतो. एका कच्च्या रस्त्याच्या तोंडाशी अलीनं मला सोडलं. आपण कुठल्या भलत्या ठिकाणी राहणार आहोत असा प्रश्न मला भेडसावत होता. कच्च्या रस्त्यावरून १०० मी. पुढे जाताच, एका चिंचोळ्या गल्लीच्या तोंडाशी शौकतचा मुलगा हफीज माझी वाट पाहत उभा होता. त्याला भेटताच माझा जीव भांड्यात पडला. एखाद्या छोट्या गावात, जुन्या वाईत किंवा शंभर वर्षांपूर्वीच्या मुंजाबाच्या बोळात शिरत असल्यासारखं मला वाटलं! मधे चौक असलेलं, सुमारे दीडशे वर्षं जुनं दुमजली घर. गल्लीत शिरताच नजरेत भरलेली गोष्ट म्हणजे बाहेरून प्लास्टर न केलेल्या भिंती आणि त्यातून उठून दिसणाऱ्या चपट्या विटा. इथे उन्हात वाळवलेल्या आणि भाजलेल्या अश्या दोन्ही विटा वापरतात आणि ही खूप जुनी परंपरा आहे.

माझ्या अंदाजानुसार अश्याच विटा पेशवाईत आपल्याकडे बनवत असावेत. असे अनेक सांस्कृतिक स्नेहसंबंध अनेक ठिकाणी जाणवत होते.

Art Guest House मधे शिरताच तिथे एका उझ्बेगी सिनेमाचं शुटींग चालू असल्याचं लक्षात आलं. दोनच मिनटात शौकत भेटला. सावळा वर्ण, हनुवटीवर करडी दाढी, भारतीय वाटावा असा चेहरा आणि तोकडं इंग्रजी. पण तो आणि त्याची पत्नी उम्मीदा खूप अगत्यशील.

शौकत गेली ४० वर्षं फोटोग्राफी करतो, परदेशातही त्याची प्रदर्शनं झाली आहेत, चित्रकार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे झकास माणूस आहे. आमची लगेच गट्टी जमली. संध्याकाळी शुटींग आटपल्यावर ‘व्होडका’संगे आमच्या गप्पा रंगल्या. उम्मीदानं प्रेमानं जेऊ घातलं. बुखारावर पर्शियन आणि ताजिक पगडा जास्त आणि शौकत त्याबद्दल खूप अभिमानी. तो खूप मोकळेपणानं इतिहासाबद्दल बोलत होता पण सध्याच्या राजकारणाबद्दल त्रोटक नाराजी व्यक्त करण्या पलिकडे कटाक्षानं मौन! गमतीचा भाग म्हणजे हे मला सर्वदूर आढळलं. रशियन राजवटीकडून भेट मिळालेल्या सरकारी वरवंट्याचा अदृश्य धाक सगळीकडे जाणवला! शौकतच्या रुपानं मला खराखुरा उझ्बेगी माणूस भेटला होता. हिंदी त्याला जवळपास येत नाही, पण किशोरदा, रफी, लता आणि आशा यांच्यावर त्याची विशेष भक्ती. उम्मीदाची नाराजी असतांनाही, चित्र काढतांना दणदणीत सिस्टीमवर हिंदी संगीत लावणारा हा गप्पिष्ट मित्र. खुद्द राज कपूर, धर्मेंद्र यांना भेटलेला, धर्मेंद्रचा नातू याच्याकडे राहून गेलेला. शौकत उझबेकिस्तानच्या संमिश्र सांस्कृतिक वाराश्याबद्दल भरभरून बोलत होता. भारतात कधीही ये, असं निमंत्रण मी त्याला लगेच देऊन टाकलं! सकाळी तो मला स्थानिक बाजारात घेऊन गेला. मला आठवडी बाजाराची आठवण झाली.

पूर्वी हा बझार यहुदी म्हणजेच ज्यू आणि मुस्लीम वस्तीच्या सीमेवर होता. दुसऱ्या महायुध्दानंतर बहुतेक ज्यू अमेरिकेत आणि इस्रायलमध्ये स्थलांतरित झाले. बाजारात त्यानी माझी त्याच्या अंडी विकणाऱ्या वर्गमित्र अहमदशी ओळख करून दिली.

इथला अद्मुऱ्या दह्याचा चक्का नाश्त्याबरोबर खातांना जिभेवर चक्क विरघळला. तारा जुळल्या, सूर जुळले की एका दिवसातही घट्ट मैत्र जमू शकतं हेच खरं!

मला आता बुखारातील दिमाखदार ऐतिहासिक ठिकाणांना भेटी द्यायचे वेध लागले होते!

वसंत वसंत लिमये.

Standard

आधुनिक मध्ययुगीन ताश्कंद! (लेख २)

‘तोश्कंद’, ‘तोश’ म्हणजे खडक आणि ‘कंद’ म्हणजे नगर. ताश्कंद म्हटलं की मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे लाल बहादूर आठवतात. गोल चेहरा, हसणारी जिवणी आणि चार चौघात सहज मिसळून जाईल अशी अबोल ठेंगणी मूर्ती. अफाट कर्तृत्वाचा हा खडकासारखा चारित्र्यसंपन्न माणूस, अजूनही ताश्कंदवासीयांच्या लख्खपणे स्मरणात आहे!

ताश्कंदमधील आपल्याच वकिलातीतील एका माणसाने मला या सफरीसाठी खूप मदत केली आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे मी ‘रमाडा’ हॉटेलात मुक्काम केला. माझ्या अनेक परदेश वाऱ्या झाल्या असल्या तरी उझ्बेकिस्तान हा असा पहिलाच देश जिथे माझ्या प्रत्यक्ष ओळखीचं कुणीच नव्हतं! आमचे व्याही आणि विहीणबाई प्रचंड भटके, त्यांनीच माझी सुमंत जाधवशी ओळख करून दिली. सुमंतनी सुचवलेला स्थानिक गाईड अकबर माझा सांगाती होता.

इथे येण्यापूर्वी मी जमेल तेवढं वाचन केलं होतं. अचानक दचकवणारी ताश्कंद संदर्भातील समोर आलेली माहिती म्हणजे तिथला ‘सेक्स टुरिझम’! काही नाठाळ मित्रांचं चावटपणे खीः खीः करूनही झालं. रशियन व इतर मध्य आशियातील मुली यात आढळतात असं म्हणे! एका रेस्टॉरंट मधील ‘बेली डान्सर’ वगळता मला हा प्रकार (!) बटबटीतपणे कुठेही आढळला नाही.

मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, दुबई आणि ओमान येथे प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे. मुस्लिम स्थापत्यशास्त्राची छाप असलेल्या आधुनिक इमारती, रुंद, प्रशस्त रस्ते आणि विविध प्रकारच्या अमेरिकन, जपानी आणि कोरियन गाड्यांची अनेक मॉडेल्स तिथे दिसतात. युरोपात खूप हिरवळ, झाडी आणि युरोपियन धाटणीच्या इमारती आढळतात.

उझ्बेकिस्तान हा चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला देश, नगररचनेसंदर्भात एक गमतीशीर सरमिसळ तुमच्या समोर घेऊन येतो. भलेथोरले रस्ते, इथे काही जुन्या ‘लाडा’ नावाच्या रशियन गाड्या तर Chevrolet कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्यांचा इथे सुळसुळाट आहे.

तपमानातील प्रचंड फरकामुळे पांढरा हा इथला आवडता सर्वमान्य रंग. चिरचिक नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यात ताश्कंद हे शहर वसलं आहे. ताश्कंद शहराचे ‘अंखॉर’ कालव्यामुळे वायव्य आणि आग्नेय असे दोन भाग पडले आहेत. वायव्य भागात जुनं शहर तर आग्नेय भागात १९व्या शतकात आलेल्या रशियन ‘झारिस्ट’ राजवटीनंतर नवीन शहराचा विकास होत गेला. जुन्या शहरात शयबानिद राजवटीतील १५व्या – १६व्या शतकातील अनेक स्मारके आढळून येतात.

चोर्सू बाजार, काफाल शशी मशीद आणि जामा मस्जिद अश्या देखण्या इमारतींचा यात समावेश होतो. १९६६ च्या भयानक भूकंपानंतर सुमारे ६० टक्के शहराचा पुनर्विकास करण्यात आला. याच काळात ताश्कंदमधील महत्वाकांक्षी मेट्रोची उभारणी करण्यात आली. साऱ्या शहरभर रशियन धर्तीचे फ्लॅटस् असलेल्या ठोकळेबाज इमारती आढळून येतात. याच रशियन शैलीतील १९७० साली बांधलेलं, अगडबंब, २५४ खोल्यांचं ‘फोर स्टार’ हॉटेल उझ्बेकिस्तान ताश्कंदच्या मध्यवर्ती भागात मोठ्या दिमाखात उभं आहे.

लाल बहादूर शास्त्रींचं वास्तव्य असलेलं ताश्कंद हॉटेल इथून जवळच आहे.

उझ्बेकिस्तानचा ज्ञात इतिहास ७० हजार वर्षांपूर्वी पासूनचा आहे. चीन, भारत यांना युरोपाशी जोडणारा सुप्रसिद्ध ‘सिल्क रूट’ या व्यापारी मार्गाचा इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे.

८व्या – ९व्या शतकात इथे पर्शियन समानिद साम्राज्य होतं. ट्रान्सएशियन संस्कृतीचा हा सुवर्णकाळ समजला जातो. ग्रीक सम्राट अलेक्झांडरनं त्याच्या आक्रमक मोहिमेत ख्रिस्तपूर्व ३२८ मधे हा भाग पादाक्रांत केला होता. याच काळातील एका संरक्षक भिंतीचे अवशेष आजही आपल्या नजरेस पडतात.

तुर्की, अरेबियन, पर्शियन अश्या विविध राजवटी इथे अस्तित्वात होत्या. काही काळ गझनीच्या साम्राज्याने इथे हात पाय पसरले होते. ६व्या शतकात बुद्ध धर्मदेखील इथे पोचला. सिर दर्या आणि आमु दर्या या दोन महत्वाच्या नद्या आणि त्यांच्यापासून काढलेले असंख्य कालवे गेली अडीच हजार वर्षं अस्तित्वात आहेत. १२२१ मधे मंगोलियन चेंगीझ खानाचे आक्रमण झाले आणि त्यात समरकंदचा विध्वंस झाला. चेंगीझ खानाच्या वंशजांची ही ‘चागताई’ राजवट सुमारे १३८० पर्यंत टिकली. इथूनच पुढे ‘अमीर तिमूर’चा समरकंद भागात उदय झाला आणि आजच्या उझबेकिस्तानच्या वैभवशाली इतिहासाची सुरवात झाली.


‘अमीर तिमूर’ म्हणजे आपल्यासाठी आक्रमक क्रूरकर्मा ‘तैमूरलंग’! त्याने दिल्लीपर्यंत रक्तरंजित मुसंडी मारली होती. तिथली ‘अमीर तिमूर’ची लोकमान्यता शिवाजी महाराजांसारखी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही! माझ्यासाठी हे नवलच होतं! साहित्य, संस्कृती आणि स्थापत्य कला यासाठी ‘तिमूर’नी पर्शिया, अरबस्तान आणि भारत येथून अनेकांना पाचारण करून आश्रय दिला. नवीन समरकंद वसवलं. ‘तिमूर’चा खापर पणतू म्हणजे बाबर, याला तिथे ‘बाबुर’ म्हणून ओळखतात. रशियावरील स्वारीत पराभव झाल्यामुळे ह्या महाशयांनी भारताकडे मोहरा वळवला आणि भारतातील ‘मुघल’ साम्राज्याचा पाया रचला. ताश्कंदमध्ये मध्यवर्ती ठिकाणी याच ‘अमीर तिमूर’चा घोड्यावर स्वार झालेला तीस फुटी पुतळा आहे, तर समरकंदमध्ये २५ फुटी सिंहासनावर बसलेला पुतळा आहे!

‘अमीर तिमूर’च्या कारकि‍र्दीत अनेक सुंदर देखण्या इमारती समरकंद येथे बांधण्यात आल्या. आपल्याकडील ‘मुघल’ इमारतींवर या शैलीचे प्रतिबिंब आढळून येते. ताश्कंद मधेही याच शैलीतील अनेक घुमट आणि मिनार दिसून येतात. विटांच्या बांधकामावर प्रामुख्याने निळ्या चमकदार टाईल्सचा साज चढवलेला दिसतो. प्रमाणबध्द अप्रतिम शैली स्तिमित करणारी आहे.

१८६० सालाच्या सुमारास उझ्बेकिस्तानवर रशियाच्या झारने आक्रमण सुरु केलं. झारनं हद्दपार केलेला राजपुत्र रोमानव्ह उझ्बेकिस्तानात स्थायिक झाला. ताश्कंद शहराच्या मध्यवर्ती भागात रोमानव्हचा देखणा प्रासाद पाहता येतो.

पहिल्या महायुद्धानंतर १९२५ साली उझ्बेकिस्तान हे सोव्हिएत युनियनमधील सहभागी राज्य झालं आणि पुढे १९९१ साली उझ्बेकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झालं.

ताश्कंदमधे खाण्याच्या अनेक जागा चवदार आहेत. त्यांच्या आहारात ताज्या भाज्यांची सलाड्स, दह्याचे प्रकार आणि भाजलेले मांस प्रमुक्याने असते. अनेकविध, छान शिजलेले कबाब, शाशलिक लज्जतदार असतात. इथले इंटरनॅशनल प्लॉव (पुलाव) सेंटर सुप्रसिध्द आहे. लाकडी रसरसलेल्या भट्टीवर असणाऱ्या राक्षसी कढया कमाल आहेत.

मला अजमेरच्या गरीब नवाज दर्ग्यातील अकबराने भेट दिलेली अवाढव्य कढई आठवली! आणखी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘सिल्क रूट’ जमान्याची आठवण करून देणारा इथला ‘चोर्सू बाझार’.

गोलाकार, भलाथोरला मधला घुमट आणि त्याच्या भोवती फेर धरून असलेले छोटे घुमट अशी या बाजाराची रचना. पुण्यातील मंडईच्या दहापट असणारा हा चोर्सू बाजार थक्क करणारा आहे. मुख्य घुमटाखाली समकेंद्री वर्तुळाकार पद्धतीने स्टॉल्स मांडलेले आहेत. इथे बहुतांश माल संस्कारित स्वरुपात मिळतो, म्हणजेच सलाडसाठी कापलेल्या भाज्या, दही, पनीर आणि चीजचे अनंत प्रकार, मसाल्याचे पदार्थ आणि विविध मांसाचे प्रकार.

घुमटाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीसारख्या ठिकाणी सुक्या मेव्याचा बाजार आहे. मुख्य बाजारात शिरल्यावर ताज्या विविध रंगांची लयलूट नजरेस पडते.

‘मांस’ या विभागात सुरेख पद्धतीनं मांडून ठेवलेले चिकनचे तुकडे, तसेच बीफ, मटण आणि ‘OT गोश्त’ म्हणजेच घोड्याचे मांस असे विविध प्रकार मांडून ठेवलेले दिसतात.

भारतीय नजरेला अवघड वाटणारा हा विभाग तरीही आपल्याला थक्क करतो. उन्मेखून उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे येथील अप्रतिम स्वच्छता. गमतीची गोष्ट म्हणजे इथेच नाही तर साऱ्या उझ्बेकिस्तानात मला ‘माशी’ नावाचा प्राणी दिसलाच नाही! सुमारे १५ फुट अंतरावरूनच जिरं, धने आणि अज्वैन यांचा घमघमाट जाणवणारा मसाल्याचा बाजार मोहात पाडतो. वेगवेगळ्या पोत्यांमध्ये मसाल्याच्या पदार्थांच्या राशी मांडलेल्या, मला मंडईबाहेरील अबीर, गुलालाच्या दुकानांची आठवण झाली.

मुख्य घुमटाच्या बाहेर रंगीबेरंगी रसरशीत भाज्यांचा बाजार भरलेला असतो. इथले टोमॅटो जास्त लाल तर काकड्या गर्द हिरव्या रंगानी तुम्हाला खुणावत असतात. अतिशयोक्ती वाटेल पण एक नक्की की इथल्या भाज्या, फळं जास्त रसरशीत आणि ताज्या असतात. उझ्बेकिस्तान हा शेतीप्रधान देश, त्याची भिस्त आहे कापूस, गहू, भाजीपाला आणि फळे यावर. शेतीमाला संदर्भात हा देश स्वयंपूर्ण असून अनेक गोष्टींची निर्यातदेखील करतो. चोर्सू बाझाराचा ताजेपणा, थक्क करणारी नैसर्गिक रंग समृद्धी आणि कलकलटाचा अभाव माझ्या नेहमीच स्मरणात राहील!

पहिल्या दोन दिवसातच माझ्या मनातील विविध जळमटं आणि किल्मिषं कापरासारखी उडून गेली. रस्त्यावरील टपरीवजा स्टॉलवर आग्रहानं ‘सोम्सा’ (सामोसा) खाऊ घालणारा हसरा दाढीवाला अब्दुल, भाषेची अडचण असूनही भरभरून बोलणारा माझा गाईड रहीम, रमाडा हॉटेलमधील हसऱ्या, प्रेमळ मुनाज्योत आणि बार्नो अश्या मॅनेजर्स आणि इतर सर्व ठिकाणी भेटणारे हसरे, बोलके, लालबुंद, गोरे उझ्बेगी चेहरे मी कधीच विसरणार नाही.

मंगोल, पर्शियन आणि कॉकेशियन वंशांची सरमिसळ उझ्बेगी चेहऱ्यात हमखास आढळते. मध्य आशियातील एका समृद्ध मनमोकळ्या देशाची ताश्कंदनं ओळख करून दिली होती. त्या साऱ्या आधुनिक वातावरणात माझी नजर इतिहास शोधत होती.

मध्ययुगीन स्थापत्य शैली आणि ऐतिहासिक इमारतींचे मला वेध लागले होते. चलो चलते है – Next stop, Bukhara!

वसंत वसंत लिमये.

Standard

रख्मात, बुखारा रख्मात! (लेख ४)

बुखाराच्या प्रथम दर्शनातच मी प्रेमात पडलो होतो. तसं छोटं गाव, काही मोठे रस्ते पण असंख्य छोट्या गल्ल्या. वसंत ऋतू असल्यानं दिवस चांगला लांबलचक, त्यामुळे नारायणराव सातच्या पुढे गाशा गुंडाळायला लागायचे. महत्त्वाची सारी ठिकाणं जवळच आहेत, त्यामुळे सहज चालत भटकून येता येईल असा सल्ला शौकतमियांनी दिला होता. मी आर्ट हाऊसच्या गल्लीतून बाहेर पडलो आणि तीन पोरांनी मला घेरलं. अमीन, फैज आणि अहमद असे तिघं, असतील दहा/बारा वर्षाचे. त्यांच्याशी बोलणं अवघडच. अचानक पन्नास वर्षांपूर्वी बाबांच्या धाकामुळे दिलेली रशियनची भाषेची सर्टिफिकेट परीक्षा दिल्याचं स्मरलं आणि मी विचारलं, ‘झ्नायेते आंग्लिस्की?’ ‘चुत, चुत! ओचिन निम्नोष्कं!’ असं उत्तर मिळालं. म्हणजे ‘आम्हाला अगदी थोडं इंग्रजी येतं!’ इतक्या वर्षांनंतर मला रशियन आठवत होतं याचाच मला कोण आनंद झाला होता! पोरं मला चिकटलीच. ‘चला, तुम्हाला छोटा मिनार दाखवतो’ असं म्हणत माझा हात धरून निघाले सुध्दा.

‘कलान मिनार’ माझ्या यादीत होताच आणि तो इतक्या जवळ असेल असं वाटलंच नव्हतं. लवकरच आम्ही जवळच्या एका फुटक्या, भग्न इमारतीत शिरलो. मधल्या एका मोठ्या मैदानात पोचल्यावर वसईच्या भग्न किल्ल्याची आठवण झाली. एका कमानीखाली एक ऐतिहासिक गाडा दिसला. पर्यटकांचं इतकं लोकप्रिय ठिकाण अश्या अवस्थेत कसं? असं आश्चर्य मी करत असता, त्यांच्यातील जरा मोठ्या अहमदनं ‘याला छोटा मिनार म्हणतात!’ असा खुलासा केला. सभोवार अवशेष पसरले होते. मिनार जेमतेम साठ फुटी असेल, वरून दूरवर असलेला ‘कलान मिनार’ दिसला. पहिल्या मजल्याच्या छतावर घुमटांच्या दोन रांगा होत्या. टम्म फुगलेल्या पुरीसारखे घुमट बांधायची इथे पध्दत आहे. ‘की स्टोन’ म्हणजेच कळीचा दगड वापरून उभारलेल्या कमानी आपल्याकडे अनेक ठिकाणी, विशेषतः मुघल इमारतीत दिसतात. तीच कमानीची रचना स्वतःच्या आसाभोवती गोल फिरवली तर असे घुमट तयार होतात. मी खालील दुर्लक्षित प्राकाराकडे पहात होतो. सगळीकडे धुळीचं साम्राज्य, दुरुस्तीच्या कामाच्या सामानाचे ढीग इतस्ततः पसरलेले. पण कुठेही घाण नव्हती, सासवडच्या एका बेवसाऊ वाड्यात नाक दाबून शिरल्याच्या आठवणीनी नकळत माझ्या मनात सल उमटला. महाराष्ट्रातील अनेक भग्न, दुर्लक्षित इमारती माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या. देवळं देखील याला अपवाद नाहीत. इथली स्वच्छतेची जाण खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.

पोरांना बाय बाय करून मी निघालो पश्चिमेकडे, ‘आर्क’ किल्ला पाहण्यासाठी. अंतर थोडंच होतं पण वाटेत एक मस्त ‘रोल्स’सारखी दिसणारी टॅक्सी दिसली आणि मोह आवरला नाही. मी तडक ‘आर्क’समोरील प्रांगणात पोचलो. ५०/७० फूट उंचीच्या जाडजूड विटांच्या भिंती घेऊन, दहा एकरावर सुमारे पाचव्या शतकात उभारलेला हा आयताकृती किल्ला. लांबून याच्या भिंतीवर असंख्य डोळे असल्याचा भास होतो. भिंतीला मजबुती देण्यासाठी लाकडी ओंडके वापरले आहेत, त्याची टोकं बाहेरून दिसतात. इथे अनेक राजवटींनी राज्य केलं. १९२० साली रशियन आक्रमणात याची बरीच नासधूस झाली. जवळच उभारलेल्या आधुनिक टॉवरवरून हा किल्ला अधिकच देखणा दिसतो.

खोजा नुरोबाबाद रस्त्यावरून मी ‘कलान मिनार’कडे निघालो. प्रशस्त रस्ता केवळ पादचारी मार्ग म्हणून राखलेला आहे. उजवीकडच्या सिद्दीकियाँ मशिदीच्या भिंतीला लागून रांगेत छोट्या छोट्या वस्तू विकणारे अनेक स्टॉल्स पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. यातच एक गोरीपान, लालबुंद गालांची देखणी म्हातारी मण्यांच्या माळा, चांदीचं नक्षीकाम असलेली कर्णभूषणे आणि हातातली वळी विकत बसली होती. भाराभर भेटवस्तू घ्यायच्या नाहीत असा निग्रह विसरून मी मोहात पडलो. उत्साहाच्या भरात रेवतीला, पोरीला फोटो पाठवताच, ‘बाळ्या काका, मला काहीतरी घे ना!’ असा लाडिक आग्रह झाला. तिच्यासाठी, मृणालसाठी पाच दहा गोष्टी घासाघीस करून खरेदी केल्या. ‘सिल्क रूट’च्या जमान्यापासून घासाघीस हा इथला स्थायीभाव असावा. म्हातारी बरोबर मी एक फोटोदेखील काढून घेतला.

इथून थोड्याच अंतरावर मशिदीला वळसा घालून मी उजवीकडे वळून एका प्रशस्त चौकात पोचलो. डावीकडे अब्दुल अझीझ खानचा मदरसा आणि उजवीकडे सिद्दीकियाँ मशीद, तर समोर देखणा ‘कलान मिनार’ उभा होता. चेंगीजखानाच्या तावडीतून सुटलेला, ११२१ साली बांधलेला हा १५० फुटी मिनार लक्षवेधी आहे. पायथ्याशी ३० फुट, तर निमुळता होत माथ्याकडे २० फुटाचा असणारा, पूर्णपणे नक्षीदार विटात बांधलेला हा मिनार उझ्बेगी स्थापत्यशैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. मिनार आणि मशीद या दोन्हीची भव्य प्रवेशद्वारं फतेहपुर सिक्री येथील बुलंद दरवाज्याची आठवण करून देत होती. कुराणातील अनेक सुवचनांनी सजवलेल्या, निळ्या चमकदार टाईल्सनी या प्रवेशद्वाराला विशेष शोभा आलेली आहे. या धर्तीची भव्य प्रवेशद्वारं मला पुढील सफरीत जागोजागी आढळली. दक्षिणात्य मंदिरांसमोरील गोपुराप्रमाणे हा प्रकार असावा. विविध देखण्या इमारती, अनेक वेगवेगळ्या राजवटी, घडत गेलेली स्थित्यंतरं अश्या इतिहासाच्या गुजगोष्टी सांगणारी ही स्थळं पाहायला पंधरवडा देखील पुरणार नाही!

याच रस्त्यावर, थोड्या पुढे पंधराव्या शतकातील उलुग बेग याचा मदरसा आहे. उलुग बेग हा अमीर तिमूरचा नातू. याला त्रिमिती, गोलाकार भूमिती, खगोलशास्त्र या विषयात विशेष रस होता. या संशोधनाला त्या काळात यानी राजाश्रय दिला. भटकत भटकत कुकलदाश मदरसा पाहून मी लब-इ-हौज कडे निघालो होतो. वाटेत सायकलवर भटकणारा, टुरिझमचा विद्यार्थी असणारा शहाजहान माझा सांगाती होता. त्याच्याकडून अनेक प्रकारचा रंजक इतिहास गवसला. हौज म्हणजे बांधीव पुष्करणी किंवा तलाव. एकेकाळी असे अनेक तलाव बुखारात होते. त्यातील पाण्यामुळे रोगराई पसरते अशा समजुतीमुळे रशियन राजवटीत बहुतेक सारे तलाव बुजवण्यात आले. त्यातील शिल्लक असलेला लब-इ-हौज हा एक देखणा तलाव. तलावाच्या सभोवार अनेक अनेक कॉफी शॉप्स आहेत. इथेच एका कॉफी शॉपच्या दारात, एका १४७७ साली लावलेल्या मलबेरी म्हणजेच एका प्रकारच्या तुतीच्या झाडाचं जरठ खोड स्मारकाच्या रुपात उभं आहे. याच ठिकाणी मध्ययुगीन काळापासून मुस्लिम साहित्यातील अफाट लोकप्रिय तुर्की व्यक्तिरेखा म्हणजे ‘मुल्ला नसिरुद्दीन’. याचाच गाढवावर बसलेला पुतळा आजही लहानांची करमणूक करतो! सावल्या लांब होत चालल्या होत्या, संध्याकाळची वेळ. मी त्या वातावरणात हरवून एका बाकावर विसावलो. समोरच एका नवपरिणीत ख्रिश्चन जोडप्याचं फोटोशूट चाललं होतं. काळ्या सुटाबुटातला नवरदेव आणि पांढऱ्याशुभ्र पायघोळ वेडिंग गाऊनमधील नववधू! बुखारात हे दृश्य पाहतांना इथल्या अनेकपदरी संस्कृतीसंकराची मनोमन खुण पटली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावाबाहेरील दोन ठिकाणं पाहायला गेलो. पश्चिमेकडील ठिकाण म्हणजे ‘चोर बाकर’, ही ९७० साली पैगंबरवासी झालेल्या अबू बकर सैदची समाधी. हा मुहम्मद पैगंबराचा चौथा वंशज. मुहम्मद शयबानीच्या काळात बांधलेली ही समाधी, हिचं महत्त्व १९९१ नंतर खूप वाढलं आहे. या ठिकाणी मोरासकट अनेक पक्षी पाळलेले आहेत. इथे भेटलेला, कबुतरांना दाणे घालणारा म्हातारबा खास होता. काबुतरंही मोठी धिटुकली, चक्क हातावर बसून दाणे टिपत होती. दुसऱ्या दिशेला हजरत पैगंबराच्या आणखी एका वंशजाचे समाधीस्थळ. बहाउद्दीन नक्शबंदी हा सुफी संप्रदायाचा सुरवातीच्या काळातील महत्त्वाचा संत. अतिशय शांत पण प्रसन्न अश्या ठिकाणी एक सुंदर पुष्करिणी आणि संगमरवरी दगडात बांधून काढलेली कबर आहे. येणारे भक्त अतिशय शांतपणे भक्तिभावाने प्रार्थना पुटपुटत बसलेले दिसतात. येथील खांब ‘सुरुदार खांबां’ची आठवण करून देतात. १९२५ ते १९९१ या काळात रशियन राजवटीत इस्लामवर बंदी होती. एका अर्थानं या काळात इस्लामचं कडवेपण वितळून गेल्यासारखं वाटतं. कर्मकांड, बुरखा वगैरे गोष्टी लोकं विसरून गेले आहेत. बुरख्यातील स्त्रिया दिसल्या तर त्या हमखास मध्य पूर्वेतील परदेशी असतात. रंगीबेरंगी कपड्यांची आवड असणाऱ्या इथल्या स्त्रिया बिनधास्त उजळ माथ्याने फिरतात. इस्लामपेक्षाही पूर्वीचा इतिहास असणारी उझ्बेगी संस्कृती खूपच मनमोकळी वाटली.

बुखारा मला खूपसं मस्कत मधील जुन्या ‘मत्राह’सारखं भासलं. खूप स्वच्छ आणि मुस्लिम बकालपणा पूर्णपणे गायब! देखण्या स्थापत्य शैलीतील असंख्य इमारती, प्रेमळ बोलकी माणसं, अद्मुऱ्या दह्याचं ‘कायमॉख’ आणि जिवाभावाचा नवा मित्र – शौकत बोल्तायेव. उझ्बेगी भाषेत ‘रख्मात’ म्हणजे धन्यवाद! बुखारा सोडतांना जीवावर आलं होतं. शौकतला घट्ट मिठी मारून निघतांना मनात एकच भाव होता, ‘रख्मात, बुखारा रख्मात!’    

Standard

एक अद्भुत सफर (लेख १)

सकाळी खिडकीतून बाहेर डोकावलो. प्रसन्न सकाळ, हवेत हलका गारठा. बाहेर पाहिलं तर उगवत्या सूर्याची जाग समोरच्या इमारतीवर सोनेरी प्रकाशात चमकत होती. मला का कुणास ठाऊक इंग्लंडमधील Milton Keynes या शहराची आठवण झाली. Milton Keynes हे पूर्णपणे नव्यानं वसवलेलं शहर, तर १९६६च्या भयानक भूकंपानंतर रशियन राजवटीत जवळ जवळ पुन्हा उभारलेलं ताश्कंद हे शहर. त्या पुनरोत्थानाची आठवण म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा चौकातील जोडशिल्पाची आठवण करून देणारं Courage Monument म्हणजेच धैर्यशिल्प उभं आहे.

उद्या व्हिसाचं काय होणार ही उरात काळजी घेऊनच मी दिल्लीला निघालो. दुपारीच पोचलो पण अस्वस्थ होतो. दिल्लीचे एजंट थोर असतात. मी माझा व्हिसासाठी अर्ज २२ मार्चला केला होता. सोळा दिवस होऊन गेले तरी ‘आप चिंता मत करो, हो जायेगा!’ हे एजंटचं पालुपद चालूच होतं. माझी चिडचीड आणि अस्वस्थता वाढण्याचं ते मूळ कारण होतं. ‘जर मिळाला नाही तर? हा बागुलबुवा भेडसावत होता. गेल्या दोन महिन्यातील सारे प्रयत्न, खटपटी आणि साधारणतः साठ हजार खर्च, हे सारं पाण्यात जाणार ही भिती अस्वस्थ करत होती. अधिक विचार न करता मी संध्याकाळी पाचपर्यंत चक्क झोप काढली! हे अजूनही जमतं हा नशीबाचा भाग! साडे पाच वाजून गेले तरी काही फोन नव्हता.

शेवटी एकदाचा एजंटचा माणूस गुरमीतसिंग साडे सात वाजता उगवला आणि मी अधाशाप्रमाणे पासपोर्ट उघडून व्हिसा पाहिला, तेव्हा जीव भांड्यात पडला. नंतर कळलं की हा सारा उशीर उझबेकिस्तान वकिलातीमुळे झाला होता! या करोना काळात सारंच अनिश्चित झालं आहे आणि काही काळ तरी याची सवय करून घेण्याशिवाय गत्यंतर नाही.

पहाटे साडे चार वाजताच मी एयरपोर्टकडे निघालो. दिल्लीतही कडक संचारबंदी जाणवत होती. दोन तीन ठिकाणी प्रयत्न करूनही सकाळचा पहिला चहा मिळाला नाही. व्हिसा, RT-PCR टेस्ट रिपोर्ट, पासपोर्ट आणि तिकीट असं संभाळत चेक-इन, इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक असे अडथळे पार करत मी हुश्श करत लाऊंजमध्ये स्थानापन्न झालो. एकीकडे गेल्या काही दिवसातील धडपड आणि अनिश्चितता यामुळे आलेला शीण जाणवत होता तर दुसरीकडे आता मी ताश्कंदला नक्की पोचणार याचा आनंद होता. आजूबाजूची गर्दी, हलक्या आवाजातील संभाषणं आणि कुण्या बाईच्या निर्विकार आवाजातील विमान तळावरील अनाऊन्समेंटस्, हे वितळत जाऊन मन हलकेच भूतकाळात शिरलं. डोळ्यासमोर दोन तीन हजार वर्षांपूर्वीच्या ‘सिल्क रूट’वरील व्यापारी काफिल्यांची चित्रं तरळू लागली.

उंट, घोडे आणि खेचरं यावर लादलेला माल, पायघोळ अंगरखे आणि डोक्यावर मंदिल मिरवणारे जाडजूड व्यापारी आणि अफाट पसरलेल्या पिवळसर, रेताड वाळवंटातील पाचूप्रमाणे तलाव असलेलं ओअॅसिस. संपर्काच्या साधनांचा पूर्ण अभाव, दळणवळणाची प्राचीन साधनं, पराकोटीच्या हवामानातील परस्परविरोधी बदल आणि हालअपेष्टा म्हणजेच त्या काळातील प्रवास असणार. चीन भारत इथून निघणारा माल पामीर, हिमालय अशा पर्वतराजी ओलांडून, अफाट लांबलचक वाळवंटी प्रदेशातील समरकंद, बुखारा असे टप्पे पार करून इस्तंबूलमार्गे युरोपात पोचत असे. परतीच्या प्रवासात युरोपातील माल चीन व भारतात येत असे. अश्या एखाद्या सफरीस दहा बारा महिने सहज लागत असणार. त्या काळातील देवाणघेवाण, परकीय भाषा, अनोळखी संस्कृती आणि रीती रिवाज, विनिमयासाठी लागणारे पैसे आणि घासाघीस या साऱ्या गोष्टींचा केवळ विचार करतांना देखील आज थकायला होतं. सतलज नदीच्या काठावरील बिलासपुर मधील व्यापाराची हुंडी म्हणे तिबेटमधील ल्हासा येथे चालत असे! प्राचीन काळापासून याच व्यापारामुळे खूप महत्वाची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असणार. व्यापारी, त्यांचे मुनीम, काफिल्यातील मजूर या साऱ्यांच्याच मनात अश्या सफरीवर निघतांना काय काय येत असेल? अनुभवी लोकांकडून ऐकलेल्या कहाण्या आणि भेडसावणारी वर्णनं, असं असूनही अश्या सफरीवर जाण्यासाठी लागणारी जिगर या लोकांकडे निश्चितच असणार. साध्या ताश्कंदच्या प्रवासासाठी निघताना आजच्या काळातील माझी घालमेल आठवून मला गंमत वाटली, खरं सांगायचं तर थोडीशी लाज देखील वाटली!

मानवाचा इतिहास मोठा रंजक आहे. सुरुवातीस गुहेत वास्तव्य करणारा माणूस शिकार आणि कंदमुळं यावर उदरनिर्वाह करत असे. यानंतर शेतीचा शोध लागला आणि हळूहळू जगात विविध ठिकाणी नागरी संस्कृतीचा विकास होत गेला. अनेकविध धर्मांचा उदय झाला. व्यापारामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होत ज्ञानसाधनेचा विकास झाला. त्यानंतर तलवारीच्या बळावर राज्यविस्तार, लुटालूट आणि धर्मप्रसार होत गेला. अनेक राजवटी, हत्याकांडे आणि स्थापत्यकलेचा विकास अश्या गोष्टींची मध्ययुगीन इतिहासात रेलचेल आहे. त्याच काळातील सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला उजबेकिस्तान हा मध्य आशियातील देश.

तैमुरलंगाच्या रक्तरंजित कहाण्या, प्रामुख्यानं मुसलमान देश आणि १९२५ ते १९९१ सोव्हियत रशियाचा भाग असलेला उजबेकिस्तान येवढी जुजबी माहिती आणि ‘सिल्क रूट’चं आकर्षण असं मनात घेऊन मी ताश्कंदला पोचलो. माझ्या मनातील असंख्य किल्मिषं दूर झाली! धर्माचा कुठलाही अतिरेक आढळला नाही, येवढंच कशाला या साऱ्या प्रवासात कुठेही झोपडी किंवा माश्या औषधाला देखील सापडल्या नाहीत! खेळीमेळीच्या वातावरणात पर्यटकांचं स्वागत करणारे लोक, इतिहासाचा सार्थ अभिमान असूनही नव्या जगाकडे उत्साहानं पाहणारा हा देश. भारतीय म्हणून माझं विशेष स्वागत झालं. इथल्या लहानथोरांना हिंदी संगीत, राज कपूर, ‘शाखरुख खान’ आणि मिथुन चक्रवर्ती यांचं अपार आकर्षण. गेल्या दोन महिन्यातील सारी जळमटं दूर सारून मी एका धमाल अनुभवासाठी सिद्ध होतो.

वसंत वसंत लिमये.

Standard

सुरस आणि चमत्कारिक – (लेख ५)

पामीर पर्वतशृंखलेच्या उत्तरेला ताश्कंद, पश्चिमेकडे समरकंद आणि त्याही पलीकडे बुखारा, ही ‘Afrosiyob’ या वेगवान रेल्वेनी जोडली आहेत. बुखाराहून मी समरकंदला निघालो. तेथे अकबरच्या ओळखीचा सुख्रॉब हा माझा गाईड असणार होता. वडील ताजिक वंशाचे तर आई तातार जमातीतील. एरवी युरोपियन आणि विशेषतः इटालियन पर्यटकांबरोबर काम करणाऱ्या सुख्रॉबचं इंग्रजी अस्खलित होतं. त्यालादेखील हिंदी सिनेमाचं वेड, सीता और गीता, बॉबी आणि बागबान हे याचे आवडते सिनेमे. ‘शाखरुख खान’ आणि अमिताभचा हा चाहता. ही उझ्बेगी मंडळी म्हणजे इकडचे बंगाली असावेत. रोशोगुल्ल्याप्रमाणे सुख्रॉब, अॅफ्रोसियॉब, सोम्सा आणि अल्कोगोल (अल्कोहोल) अश्याच बहुतेक शब्दांना गोलाकार देणं या मंडळींना सहज जमतं. बुखारा, समरकंद प्रवासात सुपरफास्ट गाडीनं एकदा चक्क ‘२०८’ कि.मी. दाखवलं. समरकंदमधे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘झरीना’ हॉटेलमध्ये मी मुक्काम केला. पर्शियन भाषेत झरीनाचा अर्थ काय असेल कुणास ठाऊक, परंतु इथे मात्र झरीना म्हणजे झारचे स्त्रीलिंगी रूप. रेल्वेतून प्रवास करतांना दक्षिणेकडे दूरवर असलेल्या पर्वतरांगांची चाहूल लागली. ही पर्वतरांग म्हणजेच पामीर पर्वतशृंखला. दुसऱ्याच दिवशी दोन दिवसांसाठी ‘रोड ट्रीप’साठी आम्ही पहाटेच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी निघालो. १३ मार्च म्हणजे गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदा आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी रमझानचे रोजे सुरु होत होते. यामुळेच बिचाऱ्या सुख्रॉबचा कडकडीत, निर्जळी उपवास होता.

पहाटे निघाल्याकारणानं दक्षिणेकडे जाणाऱ्या M39 वर आम्हाला फारसा ट्रॅफिक लागलाच नाही. अर्ध्या तासातच सुमारे ४० कि.मी. अंतर कापून ‘तख्त कराचा’ नावाच्या (5365 फुट) खिंडीत आम्ही पोचलो. इथून प्रथमच तुरळक हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झालं. १०˚C तापमानात, हलक्या वाऱ्यामुळेदेखील थंडीचं बोचरेपण जाणवत होतं. वाटेत गाजर मुळ्यासारखी दिसणारी ‘चिकुरे’ वनस्पती विकणारी उझ्बेगी बाई दिसली. त्या चिकुरेंचा रंग तिच्या गालावर चढला होता. सुक्या मेव्याचा छोटेखानी बाजार भरला होता. सुके अंजीर, पिस्ते, बदाम, किशमिश, अक्रोड यांच्यासोबत डांबरांच्या गोळ्याप्रमाणे भासणाऱ्या टोपलीभर पांढऱ्याशुभ्र गोळ्या. याला ‘कुरुट’ म्हणतात. दुधापासून बनवलेल्या चक्क्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून, त्याच्या गोळ्या बनवून कडकडीत उन्हात वाळवल्या जातात, यालाच कुरुट म्हणतात. वाळवंटी प्रदेश, दूरच्या सफरी यामुळे सुके, खारवलेले मांस, सुका मेवा आणि कुरुट हा सिल्क रूटवरील अत्यावश्यक शिधा असे. वाटेत गायी, गुरं, शेळ्या मेंढ्या आणि छोटी टुमदार खेडी लागत होती. मातीच्या, उन्हात वाळवलेल्या विटांपासून इथली घरं बांधलेली असतात. माझ्या डोक्यातील ‘खेडं’ या प्रतिमेला धक्का देणारी स्वच्छ, सुंदर ही खेडी होती. या खिंडीतून खाली उतरून, आम्ही किताब गाव मागे टाकताच ‘शाख्रीसब्ज’ नावाचं गाव लागलं. हे अमीर तिमुरचं जन्मगाव!

आदल्या रात्री मी ‘आमु दर्या’ नदीच्या काठी असलेलं ‘टिरमिझ’ आणि ताजिकीस्तानमधील दुशान्बेच्या वाटेवरील ‘बेसुन’ यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचा अभ्यास करत होतो. पामीर पर्वतशृंखलेचं आकर्षण जास्त असल्यानं मी बेसुनला जाण्याचा निर्णय पक्का केला. वाटेतील शाख्रीसब्ज, ‘कुल किशलाक’ तलाव आणि दरबांद येथील प्राचीन मशीद अश्या ठिकाणांच्या डायरीत अंतरासकट नोंदी करून ठेवल्या. प्रवासात लॅपटॉप, अर्थातच गुगल मॅप उघडणं अवघड होतं. शाख्री सब्ज नंतर गुजर येथे आम्ही डावीकडे वळलो. नंतर मात्र कुल किश्लाक आणि दरबांद यांच्यात माझी काहीतरी गल्लत झाली. माझ्या गाईडला सुख्रॉबसाठी हा साराच प्रकार नवलाईचा होता. तो या मार्गावर फारसा कधी आलाच नव्हता. दरबांदपाशी मातकट, लाल पाणी असलेली ‘थुरकोन दर्या’ नावाची नदी लागली. याच नदीच्या उगमाकडे कुल किशलाक आहे अशी माझी ठाम समजूत! दरबांद गावापाशी तलावाची आम्ही जुजबी चौकशीदेखील केली. याच भागातील डोंगरात ‘थेशिक तोष’ म्हणजेच खडकातील एक गुहा आहे. याच गुहेत १९३० सालाच्या सुमारास मानवाच्या उत्क्रांतीतील Neanderthal वंशाच्या एका लहान मुलीच्या हाडांचा सांगाडा सापडला होता. उझ्बेकिस्तानच्या अतिप्राचीन इतिहासाची ही एक महत्वाची खूण. मी त्या नदीचं ‘Red River’ असं नामकरण केलं. याच नदीच्या काठानं आम्ही कुल किशलाक सरोवराच्या शोधात मार्गक्रमणा करू लागलो. पुढील सुमारे १२ कि.मी.चा प्रवास एका अफलातून दरीतून झाला. बहुतेक ठिकाणी समोरासमोरच्या पहाडी भिंती जेमतेम २०० मी. अंतरावर होत्या. खडकातील विविध थर, अंगावर येणारे कडे आणि खळाळत वाहणारा लाल नदीचा प्रवाह हे सारं थक्कं करणार होतं. मला उन्मेखून लडाख, लाहौल, स्पितीची आठवण होऊन गेली. आजूबाजूच्या पर्वतराजीत लाल खडकाचे, मातीचे तिरके पट्टे दिसून येत होते. नदीच्या उगमाकडे असलेली लाल माती वाहून आणल्यामुळे ही नदी लाल झाली असावी. दरीचा प्रवास संपताच आम्ही एका पठारावर पोचलो. उजवीकडील दरीतून येणाऱ्या लाल नदीने आमच्याशी फारकत घेतली होती. इथेच आम्हाला एक छोटं खेडेगाव लागलं. कुल किशलाक किंवा एखादं सरोवर याची कुणालाच कल्पना नव्हती. आम्ही साफ चुकलो होतो! आल्या रस्त्यानं मुख्य रस्त्याकडे परत येण्यावाचून इलाज नव्हता. त्याच दरीचं उग्रभीषण, रौद्रभयंकर सौंदर्य पुनश्च अनुभवता आलं.

१४ एप्रिलला बेसुनहून पहाटेच निघून आम्ही समरकंदकडे निघालो. घाटरस्ता सुरु होऊन थोडे पुढे येताच दरबांदपाशी दोन रस्ते फुटले. एक निघाला होता टिरमिझ या अफगानिस्ताणच्या सीमेवरील गावाकडे, तर दुसरा समरकंदमार्गे ताश्कंदकडे. सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरवीगार कुरणं आणि शेळ्या मेंढ्यांचे कळप दिसत होते. वाटेतील एका छोट्या खेड्यापाशी ‘मुल्ला नसरुद्दिन’ भेटला! नाही, गंमत करतोय. गाढवावर बसलेला एक हसरा आनंदी म्हातारा भेटला. ‘फोटो काढू का?’ असं विचारताच आनंदानं तयार झाला आणि मोठ्या आग्रहानं, ‘चला घरी चहा पिऊया!’ म्हणून आम्हाला त्यानं खूप आग्रह केला. मला आता परतीचे वेध लागले होते आणि वेळेत करायच्या RT-PCR टेस्टची टांगती तलवारही होतीच. समरकंदला येताच वाटेतच एका क्लिनिकमधे टेस्ट करून मी झरीना हॉटेलमधे पोचलो. हॉटेल मालकानं मोठ्या आवडीनं, सजावट म्हणून उझ्बेगी ‘उखळा’सकट जुन्या आठवणी जपल्या आहेत.

या सगळ्या धावपळीत समरकंदमधील ‘रेगिस्तान’ हे महत्वाचं लोकप्रिय ठिकाण पाहायचं राहून गेलं होतं. संध्याकाळ होताच, अनेक रंगाच्या रोषणाईने झगमगणारा रेगिस्तान हा भलाथोरला चौक समरकंदच्या मध्यवर्ती ठिकाणी वसला आहे. त्या संध्याकाळी रेगिस्तान चौकात उझ्बेगी संगीताची मेहफिल चालू होती. चौकात डावीकडे उलुघबेग, मध्ये ‘तिलीया कोरी’ म्हणजेच सोन्यानं मढवलेलं नक्षीकाम असलेली, तर उजवीकडे ‘शेर-दोर’ अश्या तीन मान्यवर मदरसा आहेत. प्रत्येक मदरश्यासमोर भव्य महाद्वार आणि डावी उजवीकडे मिनार अशी रचना उझ्बेकिस्तानात सर्वत्र आढळते. या गोपुरासारखे दिसणाऱ्या महाद्वारांना ‘पेश्ताक’ म्हणतात. संध्याकाळच्या गार हवेत मी थक्क होऊन समोरचा नजारा न्याहाळत होतो. कानावर अरबी संगीताशी मिळतंजुळतं संगीत (?) कानावर पडत होतं. यात कधी खंजिरी, घुंगरू अश्या वाद्यांसह उडत्या आनंदी चालीचं संगीत असतं, तर अनेकदा विव्हळणाऱ्या आवाजात विरही आर्त स्वर कानावर पडतात. ८४ साली सौदी अरेबियात असल्यापासून, मला कधीही न उमजलेला हा संगीतप्रकार आहे. रेगिस्तान पाहून सुख्राबबरोबर मी अमीर तिमूरची समाधी पाहायला गेलो. येथील मिनारासोबतचा निळाभोर घुमट, अप्रतिम नक्षीकामानं सजवलेला आहे.

सुख्राबचं लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. साडे आठ वाजून गेले होते. त्यांनी उपास सोडायचा ७.१३ चा मुहूर्त कधीच टळून गेला होता. दिवसभराच्या कडकडीत निर्जळी उपवासानंतर सुख्राबला कडकडून भूक लागली असणार! आम्ही तडक ‘मन्सूर शाशलिक’ नावाच्या स्थानिक हॉटेलात जेवायला गेलो. अप्रतिम सलाड, तीन चार प्रकारचे कबाब आणि त्याबरोबर सढळहस्ते देण्यात येणारा पांचट चहा असं आमचं जेवण! एक नक्की की अतिशय कमी मसाले वापरून बनवलेले कबाब/शाशलिक जिभेवर विरघळतात.

समरकंद हे शहर ख्रिस्तपूर्व ८०० साली वसवलं असावं. इ.स. १२२१ मध्ये चेंगीजखानाचं आक्रमण झालं आणि त्याने सारं समरकंद शहर उध्वस्त केलं. १३३६ साली शाख्रीसब्ज इथे अमीर आणि तेकीना खातून यांच्या पोटी जन्माला आलेला ‘तिमूर’ म्हणजेच पोलादी पुरुष, याने एका भक्कम राजवटीची मुहूर्तमेढ रोवली. खेळतांना किवा कुठल्याश्या किरकोळ लढाईत तिमूरचा उजवा हात आणि उजवा पाय पंगू झाला होता आणि यावरूनच तैमुरलंग हे त्याचं नाव प्रसिध्द झालं. ‘अमीर तिमूर’ त्याच्या घोडेस्वारी आणि युद्धकौशल्यासाठी नावाजला गेला. विविध टोळ्या, आक्रमणं या पार्श्वभूमीवर प्रथमच, अमीर तिमूरनं उझ्बेकीस्तानमध्ये स्थिर सत्ता निर्माण केली. आपल्याला त्याची एक आक्रमक क्रूरकर्मा येव्हढीच ओळख आहे. याचाच खापरपणतू ‘बाबुर’ यानं मुंडक्यांच्या राशी रचत, खैबरखिंडमार्गे भारतात येऊन १५२६ साली मुघल साम्राज्याचा पाया रचला. असं असूनही अमीर तिमूरच्या काळात समरकंदचा सांस्कृतिक विकास झाला. अमीर तिमूरनं नवीन समरकंद वसवलं.

रेगिस्तान जवळच एक विस्तीर्ण चौकात ‘अमीर तिमुर’चा भव्य, सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. घुमटाकार शिरस्त्राण, जाड भुवया आणि दाढीमिशा असलेला करारी चेहरा, डाव्या हातातील सरळसोट पल्लेदार तलवारीवर उजवा हात स्थिरावलेला. अतिशय अंदाधुंद, रक्तरंजित काळात उझ्बेकीस्तानात स्थैर्य आणणाऱ्या कर्तबगार सेनापतीचा हा पुतळा, मी निरखून पाहत होतो. कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राला राजाश्रय देणारा राजा, त्या पराक्रमी, करारी योध्द्याच्या चेहऱ्यात हरवून गेला होता. इथे ‘अमीर तिमुर’ला महाराजांप्रमाणे मानतात. त्यानंतर झेराव्शान नदीच्या काठी असलेला ‘अफ्रासियाब कालवा’ आणि त्याकाठी असलेलं उध्वस्त समरकंद, अलेक्झांडरच्या काळी बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आणि शाही दफनभूमी ‘शाही झिंदा’ असं पाहून मी ताश्कंदकडे निघालो.

लहानपणापासून ऐकलेल्या ‘अरेबियन नाईट्स’ मधील सिंदबादच्या गोष्टी, अलिबाबा आणि चाळीस चोर आणि अल्लाउद्दिनचा जादुई दिवा अश्या कहाण्या वाचतांना डोक्यात येणारी विशेषणं म्हणजे ‘सुरस आणि चमत्कारिक’! बालमनाला ते सारंच अद्भुत आणि मनोरंजक वाटे. प्रेमळ माणसं, मुस्लिम कर्मठपणाचा पूर्ण अभाव, चवदार खाणं, ओळखीचं वाटणारं तरीही स्तिमित करणारं अप्रतिम स्थापत्य आणि इमारती, करोनाच्या भयाचा पूर्ण अभाव आणि आल्हाददायक हवामान, सारंच अद्भुत. खडतर ‘सिल्क रूट’च्या प्रतिमा, त्या प्रवाश्यांचं साहस माझ्या मनात रेंगाळत होतं. ‘पुन्हा नक्की यायचं’ असं मनाशी घोकत मी दिल्लीच्या विमानात पाऊल ठेवलं. अश्या तऱ्हेनं ही ‘उझ्बेकिस्तान’ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी सुफळ संपूर्ण झाली!

वसंत वसंत लिमये

Standard