रख्मात, बुखारा रख्मात!

बुखाराच्या प्रथम दर्शनातच मी प्रेमात पडलो होतो. तसं छोटं गाव, काही मोठे रस्ते पण असंख्य छोट्या गल्ल्या. वसंत ऋतू असल्यानं दिवस चांगला लांबलचक, त्यामुळे नारायणराव सातच्या पुढे गाशा गुंडाळायला लागायचे. महत्त्वाची सारी ठिकाणं जवळच आहेत, त्यामुळे सहज चालत भटकून येता येईल असा सल्ला शौकतमियांनी दिला होता. मी आर्ट हाऊसच्या गल्लीतून बाहेर पडलो आणि तीन पोरांनी मला घेरलं. अमीन, फैज आणि अहमद असे तिघं, असतील दहा/बारा वर्षाचे. त्यांच्याशी बोलणं अवघडच. अचानक पन्नास वर्षांपूर्वी बाबांच्या धाकामुळे दिलेली रशियनची भाषेची सर्टिफिकेट परीक्षा दिल्याचं स्मरलं आणि मी विचारलं, ‘झ्नायेते आंग्लिस्की?’ ‘चुत, चुत! ओचिन निम्नोष्कं!’ असं उत्तर मिळालं. म्हणजे ‘आम्हाला अगदी थोडं इंग्रजी येतं!’ इतक्या वर्षांनंतर मला रशियन आठवत होतं याचाच मला कोण आनंद झाला होता! पोरं मला चिकटलीच. ‘चला, तुम्हाला छोटा मिनार दाखवतो’ असं म्हणत माझा हात धरून निघाले सुध्दा.

‘कलान मिनार’ माझ्या यादीत होताच आणि तो इतक्या जवळ असेल असं वाटलंच नव्हतं. लवकरच आम्ही जवळच्या एका फुटक्या, भग्न इमारतीत शिरलो. मधल्या एका मोठ्या मैदानात पोचल्यावर वसईच्या भग्न किल्ल्याची आठवण झाली. एका कमानीखाली एक ऐतिहासिक गाडा दिसला. पर्यटकांचं इतकं लोकप्रिय ठिकाण अश्या अवस्थेत कसं? असं आश्चर्य मी करत असता, त्यांच्यातील जरा मोठ्या अहमदनं ‘याला छोटा मिनार म्हणतात!’ असा खुलासा केला. सभोवार अवशेष पसरले होते. मिनार जेमतेम साठ फुटी असेल, वरून दूरवर असलेला ‘कलान मिनार’ दिसला. पहिल्या मजल्याच्या छतावर घुमटांच्या दोन रांगा होत्या. टम्म फुगलेल्या पुरीसारखे घुमट बांधायची इथे पध्दत आहे. ‘की स्टोन’ म्हणजेच कळीचा दगड वापरून उभारलेल्या कमानी आपल्याकडे अनेक ठिकाणी, विशेषतः मुघल इमारतीत दिसतात. तीच कमानीची रचना स्वतःच्या आसाभोवती गोल फिरवली तर असे घुमट तयार होतात. मी खालील दुर्लक्षित प्राकाराकडे पहात होतो. सगळीकडे धुळीचं साम्राज्य, दुरुस्तीच्या कामाच्या सामानाचे ढीग इतस्ततः पसरलेले. पण कुठेही घाण नव्हती, सासवडच्या एका बेवसाऊ वाड्यात नाक दाबून शिरल्याच्या आठवणीनी नकळत माझ्या मनात सल उमटला. महाराष्ट्रातील अनेक भग्न, दुर्लक्षित इमारती माझ्या नजरेसमोर तरळून गेल्या. देवळं देखील याला अपवाद नाहीत. इथली स्वच्छतेची जाण खरोखरच वाखाणण्यासारखी आहे.

See the line of Domes on the left!

पोरांना बाय बाय करून मी निघालो पश्चिमेकडे, ‘आर्क’ किल्ला पाहण्यासाठी. अंतर थोडंच होतं पण वाटेत एक मस्त ‘रोल्स’सारखी दिसणारी टॅक्सी दिसली आणि मोह आवरला नाही. मी तडक ‘आर्क’समोरील प्रांगणात पोचलो. ५०/७० फूट उंचीच्या जाडजूड विटांच्या भिंती घेऊन, दहा एकरावर सुमारे पाचव्या शतकात उभारलेला हा आयताकृती किल्ला. लांबून याच्या भिंतीवर असंख्य डोळे असल्याचा भास होतो. भिंतीला मजबुती देण्यासाठी लाकडी ओंडके वापरले आहेत, त्याची टोकं बाहेरून दिसतात. इथे अनेक राजवटींनी राज्य केलं. १९२० साली रशियन आक्रमणात याची बरीच नासधूस झाली. जवळच उभारलेल्या आधुनिक टॉवरवरून हा किल्ला अधिकच देखणा दिसतो.

खोजा नुरोबाबाद रस्त्यावरून मी ‘कलान मिनार’कडे निघालो. प्रशस्त रस्ता केवळ पादचारी मार्ग म्हणून राखलेला आहे. उजवीकडच्या सिद्दीकियाँ मशिदीच्या भिंतीला लागून रांगेत छोट्या छोट्या वस्तू विकणारे अनेक स्टॉल्स पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. यातच एक गोरीपान, लालबुंद गालांची देखणी म्हातारी मण्यांच्या माळा, चांदीचं नक्षीकाम असलेली कर्णभूषणे आणि हातातली वळी विकत बसली होती. भाराभर भेटवस्तू घ्यायच्या नाहीत असा निग्रह विसरून मी मोहात पडलो. उत्साहाच्या भरात रेवतीला, पोरीला फोटो पाठवताच, ‘बाळ्या काका, मला काहीतरी घे ना!’ असा लाडिक आग्रह झाला. तिच्यासाठी, मृणालसाठी पाच दहा गोष्टी घासाघीस करून खरेदी केल्या. ‘सिल्क रूट’च्या जमान्यापासून घासाघीस हा इथला स्थायीभाव असावा. म्हातारी बरोबर मी एक फोटोदेखील काढून घेतला.

इथून थोड्याच अंतरावर मशिदीला वळसा घालून मी उजवीकडे वळून एका प्रशस्त चौकात पोचलो. डावीकडे अब्दुल अझीझ खानचा मदरसा आणि उजवीकडे सिद्दीकियाँ मशीद, तर समोर देखणा ‘कलान मिनार’ उभा होता. चेंगीजखानाच्या तावडीतून सुटलेला, ११२१ साली बांधलेला हा १५० फुटी मिनार लक्षवेधी आहे. पायथ्याशी ३० फुट, तर निमुळता होत माथ्याकडे २० फुटाचा असणारा, पूर्णपणे नक्षीदार विटात बांधलेला हा मिनार उझ्बेगी स्थापत्यशैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. मिनार आणि मशीद या दोन्हीची भव्य प्रवेशद्वारं फतेहपुर सिक्री येथील बुलंद दरवाज्याची आठवण करून देत होती. कुराणातील अनेक सुवचनांनी सजवलेल्या, निळ्या चमकदार टाईल्सनी या प्रवेशद्वाराला विशेष शोभा आलेली आहे. या धर्तीची भव्य प्रवेशद्वारं मला पुढील सफरीत जागोजागी आढळली. दक्षिणात्य मंदिरांसमोरील गोपुराप्रमाणे हा प्रकार असावा. विविध देखण्या इमारती, अनेक वेगवेगळ्या राजवटी, घडत गेलेली स्थित्यंतरं अश्या इतिहासाच्या गुजगोष्टी सांगणारी ही स्थळं पाहायला पंधरवडा देखील पुरणार नाही!

याच रस्त्यावर, थोड्या पुढे पंधराव्या शतकातील उलुग बेग याचा मदरसा आहे. उलुग बेग हा अमीर तिमूरचा नातू. याला त्रिमिती, गोलाकार भूमिती, खगोलशास्त्र या विषयात विशेष रस होता. या संशोधनाला त्या काळात यानी राजाश्रय दिला. भटकत भटकत कुकलदाश मदरसा पाहून मी लब-इ-हौज कडे निघालो होतो. वाटेत सायकलवर भटकणारा, टुरिझमचा विद्यार्थी असणारा शहाजहान माझा सांगाती होता. त्याच्याकडून अनेक प्रकारचा रंजक इतिहास गवसला. हौज म्हणजे बांधीव पुष्करणी किंवा तलाव. एकेकाळी असे अनेक तलाव बुखारात होते. त्यातील पाण्यामुळे रोगराई पसरते अशा समजुतीमुळे रशियन राजवटीत बहुतेक सारे तलाव बुजवण्यात आले. त्यातील शिल्लक असलेला लब-इ-हौज हा एक देखणा तलाव. तलावाच्या सभोवार अनेक अनेक कॉफी शॉप्स आहेत. इथेच एका कॉफी शॉपच्या दारात, एका १४७७ साली लावलेल्या मलबेरी म्हणजेच एका प्रकारच्या तुतीच्या झाडाचं जरठ खोड स्मारकाच्या रुपात उभं आहे. याच ठिकाणी मध्ययुगीन काळापासून मुस्लिम साहित्यातील अफाट लोकप्रिय तुर्की व्यक्तिरेखा म्हणजे ‘मुल्ला नसिरुद्दीन’. याचाच गाढवावर बसलेला पुतळा आजही लहानांची करमणूक करतो! सावल्या लांब होत चालल्या होत्या, संध्याकाळची वेळ. मी त्या वातावरणात हरवून एका बाकावर विसावलो. समोरच एका नवपरिणीत ख्रिश्चन जोडप्याचं फोटोशूट चाललं होतं. काळ्या सुटाबुटातला नवरदेव आणि पांढऱ्याशुभ्र पायघोळ वेडिंग गाऊनमधील नववधू! बुखारात हे दृश्य पाहतांना इथल्या अनेकपदरी संस्कृतीसंकराची मनोमन खुण पटली.

दुसऱ्या दिवशी सकाळी मी गावाबाहेरील दोन ठिकाणं पाहायला गेलो. पश्चिमेकडील ठिकाण म्हणजे ‘चोर बाकर’, ही ९७० साली पैगंबरवासी झालेल्या अबू बकर सैदची समाधी. हा मुहम्मद पैगंबराचा चौथा वंशज. मुहम्मद शयबानीच्या काळात बांधलेली ही समाधी, हिचं महत्त्व १९९१ नंतर खूप वाढलं आहे. या ठिकाणी मोरासकट अनेक पक्षी पाळलेले आहेत. इथे भेटलेला, कबुतरांना दाणे घालणारा म्हातारबा खास होता. काबुतरंही मोठी धिटुकली, चक्क हातावर बसून दाणे टिपत होती. दुसऱ्या दिशेला हजरत पैगंबराच्या आणखी एका वंशजाचे समाधीस्थळ. बहाउद्दीन नक्शबंदी हा सुफी संप्रदायाचा सुरवातीच्या काळातील महत्त्वाचा संत. अतिशय शांत पण प्रसन्न अश्या ठिकाणी एक सुंदर पुष्करिणी आणि संगमरवरी दगडात बांधून काढलेली कबर आहे. येणारे भक्त अतिशय शांतपणे भक्तिभावाने प्रार्थना पुटपुटत बसलेले दिसतात. येथील खांब ‘सुरुदार खांबां’ची आठवण करून देतात. १९२५ ते १९९१ या काळात रशियन राजवटीत इस्लामवर बंदी होती. एका अर्थानं या काळात इस्लामचं कडवेपण वितळून गेल्यासारखं वाटतं. कर्मकांड, बुरखा वगैरे गोष्टी लोकं विसरून गेले आहेत. बुरख्यातील स्त्रिया दिसल्या तर त्या हमखास मध्य पूर्वेतील परदेशी असतात. रंगीबेरंगी कपड्यांची आवड असणाऱ्या इथल्या स्त्रिया बिनधास्त उजळ माथ्याने फिरतात. इस्लामपेक्षाही पूर्वीचा इतिहास असणारी उझ्बेगी संस्कृती खूपच मनमोकळी वाटली.

बुखारा मला खूपसं मस्कत मधील जुन्या ‘मत्राह’सारखं भासलं. खूप स्वच्छ आणि मुस्लिम बकालपणा पूर्णपणे गायब! देखण्या स्थापत्य शैलीतील असंख्य इमारती, प्रेमळ बोलकी माणसं, अद्मुऱ्या दह्याचं ‘कायमॉख’ आणि जिवाभावाचा नवा मित्र – शौकत बोल्तायेव. उझ्बेगी भाषेत ‘रख्मात’ म्हणजे धन्यवाद! बुखारा सोडतांना जीवावर आलं होतं. शौकतला घट्ट मिठी मारून निघतांना मनात एकच भाव होता, ‘रख्मात, बुखारा रख्मात!’   

 

Standard

5 thoughts on “रख्मात, बुखारा रख्मात!

  1. अतिशय सुरेख! मस्त! खरं सांगायचे तर मी तिथेच आहे असे वाटायला लागले. It was as if I was teleported there. The credit must go your free flowing writing skill. Extremely enjoyed.

Leave a reply to Vasant Vasant Limaye Cancel reply