सुजलाम् सुफलाम् मलयज शीतलाम्!

final

सात हजार फुटांवर पोचलो आणि गार हवेच्या झुळुकेनं गालाशी गुद्गुल्या करायला सुरवात केली. डांबरी रस्ता संपून मातीचा रस्ता सुरु झाला होता. गाडीच्या हादऱ्यांच्या लयीची आता सवय झाली होती. तसं पहिलं तर आता ‘गिरीजा’लाही धुळीची सवय झाली होती. लांबचा पल्ला गाठायचा असल्यानं, दुपारच्या जेवणाला चाट दिली होती. बाजीरावाचा आदर्श आठवून, बिस्किटं आणि केळी असं चालत्या गाडीतच खाल्लं. दरीच्या माथ्यावर काळ्या ढगांचं सावट होतं. एव्हाना ते आमच्या सवयीचं झालं होतं. डावीकडच्या खोल दरीत खळाळत, फेसाळत वाहणारा स्वच्छ निर्झर आज आमची अखंड सोबत करत होता. उडत्या चालीवर किशोरदा ‘झुमरू’ झाले होते, आमचाही मूड मस्त होता. आम्ही निघालो होतो ‘सिंथन टॉप’कडे. उंची १२,००० फूट.

शुक्रवारी रात्री आम्ही भदरवाह इथे कँप केला होता. पाचव्या आठवड्यातील आमचे पुण्याहून आलेले नवे भिडू होते, प्रशांत जोशी आणि आनंद भावे. प्रशांत आय.टी. क्षेत्रातील तज्ञ. त्याच्या उत्साहामुळे सारी ‘हिमयात्रा’ डिजिटली रेकोर्ड होते आहे. आनंद म्हणजेच भावेअण्णा हा अडुसष्ट वर्षीय तरुण म्हणजे एक गमतीशीर अजब रसायन आहे. या वयातही अण्णा एकदम फिट! एकीकडे हा माणूस लेझर या विषयातील तज्ञ, त्यांची शास्त्रीय जिज्ञासा दांडगी. दुसरीकडे त्यांचा अध्यात्मिक कल, पौराणिक व्यासंग अफाट, तशीच ‘रामराया’वरील गाढ श्रद्धा. त्यांच्या अखत्यारी तील विषय नसेल तर ‘सब कुछ ठिक होगा!’ अशी निःशंक श्रद्धा. माझं नेमकं याच्या उलटं! ‘कसं होणार?’ ही पराणी शेवटपर्यंत प्रयत्न केले पाहिजेत अशी टोचणी माझ्या जबाबदार मनाला लावणार. कितीही प्रयत्न केला तरी अखेरपर्यंत अस्वस्थतेचा भुंगा एका कोपऱ्यात कुरतडत राहणार. खरंच श्रद्धा आणि प्रयत्नवाद यांचा समतोल साधता आला पाहिजे.

भदरवाह येथून रस्ता उतरत पूलडोडा या गावी उतरतो, इथे आम्हाला प्रथमच चिनाब नदी भेटली. तिचं खळाळतं जोमदार दर्शन उल्हसित करणारं होतं. ही पश्चिमेकडे पाकिस्तानात जाणारी नदी उगम पावते, खूप पूर्वेकडील  हिमाचल प्रदेशातील ‘चंद्र ताल’ येथे. तेव्हा तिचं नाव आहे चंद्रा नदी. आम्ही पूलडोडाहून उत्तरेला किश्तवार येथे चिनाबच्या काठाने भांडारकूटला पोचलो. येथे मारवा किंवा भागा नदी चिनाबला येऊन भेटते. संगमानंतर ती होते ‘चंद्रभागा’ म्हणजेच चिनाब! याच संगमावर, सोणी-महिवाल या लोकप्रिय प्रेमकहाणीतील जोडीने म्हणे जीव दिला होता! भांडारकूट हे ठिकाण आहे ३,००० फुटांवर. इथून आम्ही ९,००० फूट चढून ‘सिंथन टॉप’ येथे पोचणार होतो. गेल्या आठवड्यात आम्ही अनेक नद्या पार केल्या होत्या पण चिनाबचा जोश, फेसाळतं स्वच्छ पाणी पाहून मी तर तिच्या प्रेमात पडलो.

सात हजार फूटांपासूनच देवदार वृक्षांचं घनदाट जंगल विरळ होऊ लागलं होतं. पिवळसर, मातकट डोंगर उतारांवर ज्युनिपरची दाट झुडपं दिसू लागली. थंडगार वारा आता बोचरा होऊ लागला होता. पुढच्याच वळणावर गाडी थांबवून झटपट स्वेटर, जाकिटं चढवली गेली. हिमालयात तपमान झटझट बदलू शकतं, आणि म्हणूनच एक जाडजूड जाकिट घालण्याऐवजी दोन तीन आवरणं असणं गरजेचं असतं. ‘सिंथन टॉप’ पार करताच आम्ही जम्मू सोडून काश्मीरमधे प्रवेश करणार होतो. एकाच राज्याबद्दल बोलत असतांना असा उल्लेख विचित्र वाटेल पण स्वभावतः जम्मू, काश्मीर आणि लदाख अतिशय वेगळे आहेत. मुंबईहून आलेले काही फोन, स्थानिक वर्तमानपत्रातील उल्लेख आणि बहुतांश प्रसार माध्यमांची सवंग नकारात्मक वृत्ती यामुळे किश्तवार, अनंतनाग मार्गे श्रीनगरला जातांना एक अस्पष्ट, अस्वस्थ भीतीचा किडा डोक्यात वळवळत होता. मधेच जाडजूड नैसर्गिक दाट लोकरीची जाकिटं घातलेल्या गुबगुबीत शेळ्या मेंढ्यांचा कळप रस्त्यावर आडवा आला. रस्त्यात अडवणूक करण्यासाठी ‘आतंकवादी’ अशी ट्रिक वापरतात, अशी टिटवी मनात हळूच टिवटिवली! एक म्हातारा आणि दोन लहानगी पोरं ‘शीश्श्’ अशी शीळ घालत, शेळ्यांना हाकलत रस्ता मोकळा करण्यासाठी झटत होती. रस्ता मोकळा होताच, करडी भरघोस दाढी, डोक्याला मळकट मुंडासं आणि डोळ्यांभोवती असंख्य सुरकुत्यांचं जाळं असलेला म्हातारा मेंढपाळ हात हलवत म्हणाला, “खुदा हाफिज, अल्ला ताला आपकी रखवाली करे!” मनमोकळं हसणाऱ्या त्याच्या जीवणीतून पुढे आलेला एक दात लुकलुकला. त्याच्या अभिवादनाचा स्वीकार करतांना मी मनातल्या मनात खजील झालो होतो. ऐकीव बातम्यांमुळे संशयाचा ब्रह्मराक्षस किती सहज आपलं माकड करतो नाही!

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

दहा हजार फुटांनंतर झुडपंही गायब झाली. अजूनही पंधरा किमी बाकी होते. पिवळसर मातकट उतारावरून इंग्रजी झेड अक्षराप्रमाणे वळणं घेत अलगदपणे आमची गाडी ‘सिंथन’ खिंड जवळ करत होती. आमचे ‘चक्रधर’ अमित यांनी आज कमाल केली होती. संध्याकाळचे सहा वाजत आलेले, तब्बल अकरा तास अमितनं ड्रायव्हिंग केलं होतं. हिमालयात गाडी चालवणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नोहे! स्थानिक ड्रायव्हर वळणांवरदेखील हॉर्न वाजवत नाहीत. एकीकडे दरी तर दुसरीकडे अंगावर येणाऱ्या कपारी. आम्ही साडेसहाला ‘सिंथन टॉप’वर पोचलो. पलिकडे उतरणारा रस्ता आता डांबरी दिसत होता. गार वारा अंगाशी झोंबत होता. दूरवर ‘ब्रह्मा’ शिखर ढगांतून डोकं बाहेर काढत होतं. गडगडाटासह विजा लवत होत्या, काळ्या ढगांची गर्दी आता आक्रमक भासू लागली होती. गडबडीनं तंबूतल्या टपरीतला गरमागरम चहा घेऊन आम्ही दाकसुमच्या दिशेनं काश्मीरकडे निघालो.

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

या आठवड्यात सोमवारी भागीरथीच्या काठी असलेल्या उत्तरकाशीहून प्रवासास सुरवात केली. यम्नोत्रीच्या वाटेवर यमुना, मग कमल नदी पार केली. मोरी या गावापाशी आम्ही उत्तराखंडातून हिमाचलमध्ये प्रवेश केला. देवभूमी गढवालचा हिमालय मागे पडून लाल रंगाची किनार असलेली हिरव्या छपराची टुमदार घरं, हिरवळीनी सजलेले उतार, देवदार आणि पाईनचं मिश्र जंगल दिसू लागलं. सफरचंदासारखा रंग आणि कांती असलेल्या स्त्रिया आणि गुबगुबीत गोरे गाल असलेली मुलं दिसू लागली. पर्यटकांना आकर्षित करणारा हिमाचल सुरु झाला होता. हिमालयाची ही बदलती रुपं स्तिमित करणारी होती. वाटेतील टोन्स नदीवर राफ्टिंग करण्याची सोय आहे. संध्याकाळी आम्ही पोचलो पब्बर नदीच्या किनारी रोहडू या गावी. आमचा बराचसा अभ्यास ‘गुगला’चार्यांच्या मदतीनं झालेला. रस्त्याच्या टोकाला असलेलं ‘रोहडू’ हे छोटंसं गाव असेल अशी आमची अपेक्षा, पण ते निघालं चांगलं मोठ्ठं शहर. मुख्यमंत्री वीरभद्रसिंह यांचा हा मतदारसंघ आणि यामुळेच प्रघातानुसार ‘रोहडू’ हे छान विकसित झालेलं मॉडर्न शहर. ‘गुगला’चार्यांचे अनंत उपकार विसरून चालणार नाही, परंतु अश्या मोहिमेसाठी त्याच्या जोडीला इतर स्थानिक माहिती मिळवणं गरजेचं हा माझ्यासाठी महत्त्वाचा वस्तुपाठ होता. गावाच्या थोडं पुढे जाऊन पब्बर नदीच्या किनारी एका निवांत ‘लग्नी’ लॉनवर मस्त कँप केला.

Maker:0x4c,Date:2017-11-2,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

पुढील प्रवासात ‘तातापानी’पाशी सतलजचं दर्शन झालं. मंडीपाशी आम्हाला बियास नदी भेटली. याच नदीच्या काठी आय.आय.टी. मंडीच देखणे कँपस पाहायला मिळालं. मी मुंबई आय.आय.टी.चा, पण ते कँपस पाहून ‘अशीच आमुची आय.आय.टी. असती…’ अशी असूया मनात उमटून गेली. मंडीहून निघून आम्ही ‘पराशर’ सरोवरापाशी मुक्काम केला. इथेच पराशर ऋषींचा आश्रम होता. या सरोवरातील नैसर्गिक ‘तरंगते’ बेट मोठं आश्चर्यकारक आहे. रात्री लक्षावधी चांदण्यांनी चमचमणाऱ्या आकाशाखाली अण्णांच्या महाभारतकालीन रसभरीत कहाण्यांनी फारच मजा आणली. शिमल्याला बगल देऊन आम्ही कुफरी, धरमशाला मार्गे जोत नावाच्या ठिकाणी सुमारे दहा हजार फुटांवर राहिलो. वाटेत रावी नदीच्या काठाने चंबा गाठलं. नंतर बैरासूल नावाची देखणी नदी लागून गेली. अशी मजल दरमजल करत आम्ही भदरवाह येथे पोचलो. या साऱ्याच प्रवासात भागीरथी, कमल, टोन्स, पब्बर, सतलज, बियास, रावी आणि बैरासूल अश्या हिमालयातून येणाऱ्या अनेक खळाळत्या शीतल नद्या आम्ही पार केल्या. नंतर चिनाब आणि श्रीनगरच्या मार्गावर झेलम, एकाच आठवड्यात इतक्या मातब्बर नद्या भेटणं हा मस्त योग जुळून आला होता.

Maker:0x4c,Date:2018-2-26,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

रविवारी दाकसुमहून छोटा पल्ला पार करून आम्ही श्रीनगरला पोचलो. वाटेत अनेक चौक्या, बंदूकधारी पोलिस आणि जवान भेटत होते. हिरवे दांडगे ट्रक, वाजणाऱ्या शिट्या आणि सायरन. अनंतनाग मार्गे थोडी धाकधूक मनात घेऊन आम्ही सुखरूपपणे दाल लेकच्या काठी पोचलो. वाटेत आम्ही आणि भेटणारे काश्मिरी यांच्या नजरा एका अस्वस्थतेनं गढुळलेल्या होत्या. गोरेपान चेहरे, देखण्या भरघोस दाढ्या आणि विशेष उठून दिसणारी धारदार नाकं असलेले पुरुष, तर स्वच्छ नितळ गोरी कांती आणि रेखीव भुवयांखालून डोकावणारे गहिरे काळेशार डोळे असलेल्या सुरेख स्त्रिया. ही मंडळी बॉलीवूडमध्ये कशी नाहीत, असा चुकार विचार येऊन गेला. आजूबाजूला पसरलेलं नितांत रमणीय सौंदर्य जणू त्या माणसांत उतरलं आहे. आम्हाला वाटेत भेटलेली सारीच माणसं प्रेमळ होती. सत्तेचाळीसची फाळणी, नकाशावर ओढलेल्या राजकीय रेषा, अधूनमधून उमटणारे, भडकवलेले उद्रेक यांनी साऱ्या सामान्य जनजीवनालाच अशांत, अस्वस्थ केलं आहे. हिमालय अविचल आहे. त्यातून उद्भवणाऱ्या, साऱ्या भरतवर्षाला सुजलाम्, सुफलाम् करणाऱ्या असंख्य नद्यांच्या सोबत माणुसकीचा झरा जर पुन्हा वाहू लागला तर या शापित नंदनवनाला लागलेलं गालबोट पुसून टाकता येईल!

– वसंत वसंत लिमये

Standard

Leave a comment