‘बारा मोटेची विहीर’

‘बारा मोटेची विहीर’

गेल्या दोन वर्षातील करोनाचे सावट दूर झाले आणि हळूहळू जीवन पूर्वस्थितीला येऊ लागले. आमच्या उद्योगालाही मार्च महिन्यात विशेष बरकत आली. लगेच सारे हाय प्लेसेसचे सहकारी मिळून महाबळेश्वरला जाण्याचे ठरले. गेल्या दोन वर्षात आनंद असा नव्हताच त्यामुळे आनंद साजरा करण्याच्या संधीचे साऱ्यांनाच अप्रूप होते. मीही अनेक वर्षांनी असा बाहेर पडत होतो. त्या दिवशी पहाटे लवकर निघून टिवल्या बावल्या करत महाबळेश्वरी जाण्याचे ठरले. सोबत राहुल आणि निर्मल होता. वाटेतूनच मी साताऱ्या जवळच्या लिंब गावातील श्री. रवि वर्णेकर यांना फोन लावला. ‘अहो या की, वाट पाहतो!’ असा आगत्यपूर्वक प्रतिसाद मिळाला आणि आम्ही खंबाटकी घाटाअलीकडे एक मिसळ हाणून तडक लिंब गावाकडे निघालो.

महाराष्ट्रात विशेषतः घाटावर अशी अनेक सुंदर ऐतिहासिक ठिकाणं विखुरलेली आहेत. बहुदा ती किंचित आडवाटेवर असतात आणि बऱ्याच वेळेस ठाऊक नसतात. साताऱ्या जवळील कृष्णेच्या काठी असलेल्या लिंब गावातील ‘बारा मोटेची विहीर’ हे असंच एक ठिकाण.

मी आधी दोन तीन वेळा तिथे गेलेलो, तेव्हाच रवि वर्णेकर यांचा परिचय झालेला. हा साठीच्या आसपास असलेला माणूस पण उत्साह दांडगा! स्थानिक इतिहासात विशेष रस आणि अभिमान. ‘बारा मोटेची विहीर’ ही संपूर्ण काळ्या दगडात बांधलेली सुबक Step Well आहे. हिचा इतिहास मोठा रंजक आहे.

संभाजी महाराजांच्या भीषण मृत्यूनंतरचा कालखंड, येसूबाई आणि लहानगा शाहू यांना औरंगजेबानी केलेली कैद, कैदेतच शाहू महाराजांचा झालेला विवाह हा रसभरीत इतिहास वर्णेकरांकडून खास ऐकण्यासारखा. औरंगजेबाला म्हणे सूनमुख पहायचं असतं, मग प्रत्यक्ष सूनेऐवजी तिची करवली विरुबाई सजून धजून भेटायला जाते. पुढे कालांतराने शाहू महाराजांनी विरुबाईशी विवाह केल्याचे या विहिरीतील शिलालेखात नमूद केलेले आहे. ही विरुबाई मोठी कर्तबगार, तिने ही विहीर बांधून घेतली. ईशान्येला चंदन, वंदन, पूर्वेला कल्याणगड तर दक्षिणेला अजिंक्यतारा असा किल्य्यांचा गराडा. विहिरीच्या पाण्यावर सुमारे चार हजार विविध आंब्यांची झाडे तिने लाऊन आमराई तयार केली. पेशावाईच्या सुरवातीस अनेकदा सैन्याचे तळ लिंब गावाजवळ पडत, विहिरीच्या आत बांधलेल्या दालनात शाहू महाराज आणि अनेक मान्यवर यांच्यासोबत अनेक खलबते होत असत.

‘बारा मोटेची विहीर’ हा मराठा स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे. सुबक बांधकाम, खलबतखाना आणि दगडात कोरलेल्या प्रतिमा सुरेख आहेत. अधि, काय सांगू, ही विहीर प्रत्यक्ष पाहणे याला पर्याय नाही!

पहिल्या शाहू महाराजांचा इतिहास खूपसा दुर्लक्षित आहे याची वर्णेकरांना विशेष खंत आहे. त्यांनी आम्हाला आसाराम सैंदाणे यांनी लिहिलेले शाहू चरित्र आवर्जून दाखवले. लिंब गावातील हळद विशेष लोकप्रिय आहे असा बाबासाहेबांनी सांगितलेला संदर्भ माझ्या लक्षात होता म्हणून मग मी मुद्दाम तिथली हळद विकत घेतली.

बारा मोटेची विहिरीविषयी माहिती सांगताना श्री. वर्णेकर.

वर्णेकरांकडे राहण्याची, जेवणा खाण्याची सोय आहे आणि ते दोन तीन दिवसांच्या सहली साठी पर्यटकांबरोबर गाईड म्हणून उत्साहाने जातात. औंध, कल्याणगड, मेरुलिंग पठार अशी ठिकाणं त्यांच्यासोबत पाहणं ही पर्वणी असणार. पाहू कधी जमतं!

वसंत वसंत लिमये.

Standard