
निळसर प्रकाशाचे डोळे किलकिले करत मोबाईलचा आलार्म वाजला. सवयीनं बंद डोळ्यांनीच अनिलनी पहिल्या रिंगनंतरच तो बंद केला. पहाटेचे पाच वाजले होते. बाहेर पावसाची रिपरिप सुरू होती. गेले आठ-दहा दिवस अजिबात उसंत न घेता पाउस पडतच होता. सांगली, कोल्हापूरकडे तर सारंच जलमय होऊन भीषण परिस्थिती झाली होती. दुलई दूर सारताच त्याच्या अंगावर शहारा उमटला. हवेत छान गारठा होता. पांघरुणातून बाहेर पडताना, उजवीकडे कुशीवर वळून त्यानं पल्लवीकडे पाहिलं. ती संथपणे घोरत होती. अलार्मच्या आवाजानी तिची झोपमोड न झाल्याचं लक्षात येऊन, तो समाधानानं हलकेच बेडरूमच्या बाहेर पडला. पॅसेजमधील मंद प्रकाशात, थंडगार कोटा फरशीवर पावलं टाकत तो डावीकडील त्याच्या स्टडीमधे शिरला. झोप एव्हाना कुठच्या कुठे पळाली होती. खटाखट स्विचेस दाबत त्याने कॉम्प्युटर सुरु केला. ६ ऑगस्टची सकाळ. हलकेच गुरगुरणाऱ्या मांजरीप्रमाणे कॉम्प्युटर जागा होऊ लागला. मागच्याच टेबलवरील इलेक्ट्रिक केटलमधील पाणी कॉफीसाठी गरम करण्यास लावून तो टॉयलेटकडे निघाला. परत आल्यावर कॉफी बनवतांना, ‘डॅव्हिडॉफ’ कॉफीचा दरवळ त्याच्या मेंदूला जाग आणत होता. अनिलच्या इतर सवयी श्रीमंती नसल्या तरी काही बाबतीत त्याचा कटाक्ष असे. ‘डॅव्हिडॉफ’ ही अशीच एक चैन! सॅन होजेहून आलेली हर्षद मंत्रवादीची नवीन मेल कॉम्प्युटरच्या निळसर स्क्रीनवर झळकत होती.

‘Hi Anil, I have an interesting assignment for you! When can I call you? – Harshad, from California, USA.’ अनिलला अश्या मेलची सवय होती. बारा वर्षांपूर्वी ‘तत्पर’ सुरु केल्यापासून त्याला अनेक चित्रविचित्र अनुभव आले होते. ‘तत्पर’ची टॅगलाईन होती – ‘कमी तिथे आम्ही!’ अनेक परदेशस्थ भारतीयांसाठी सेवा पुरवणारी ही संस्था चांगलीच लोकप्रिय झाली होती. हर्षदच्या सहीखाली ‘सॅन होजे’ पाहताच तिकडे संध्याकाळ असणार हे अनिलच्या सहजपणे लक्षात आलं. कॉफीचा एक घोट घेऊन सवयीनं त्यानं मेलला उत्तर पाठवलं, ‘Let’s make it at 9.00 am IST. Please call me.’ ‘टिंग’ असा कॉम्प्युटर मधून आवाज आला. हर्षदनं लगेच मेलला उत्तर पाठवलं होतं. ‘It is urgent, I will call you at 9.00 am IST!’ अमेरिकन मंडळी नेहमीच घोड्यावर बसून येतात, हेही अनिलच्या सवयीचं होतं. सातासमुद्रापार असताना जिवलग, आप्तेष्टांची काळजी घेण्याची धडपड त्याच्या ओळखीची होती. जगाच्या पाठीवर, नाती कितीही गुंतागुंतीची असली तरी ती आपल्याला गुंतवून ठेवतात. अनिलच्या मनात सहजच त्याचा भूतकाळ रेंगाळू लागला.

अनिलचं बालपण तसं गरिबीतच गेलं. मल्हारराव मूळचे मिलिटरी अपशिंगे या साताऱ्याजवळच्या गावचे. अपशिंगे गावातील प्रत्येक घरातील एकतरी माणूस सैन्यात असतो. ही या गावची खासियत आहे आणि म्हणूनच ‘मिलिटरी अपशिंगे’ हे नाव! अनिलचा जन्म १९६८ सालचा. तेव्हा मल्हारराव जाधवांचं बिऱ्हाड साताऱ्याच्या शाहूपुरीत बहुलेश्वर मंदिरासमोर होतं. अनिलच्या वडलांना दुर्दैवाने एक्काहत्तरच्या युद्धात वीरगती मिळाली. शारदाआक्का म्हणजे अनिलच्या आईनी पुन्हा लग्न केलं नव्हतं. आक्का तशी खंबीर, मल्हारराव गेल्यानंतर त्यांनी डी.एड. केलं. व्यंकटपुऱ्यातील आबासाहेब चिरमुले विद्यालयाच्या प्राथमिक शाळेत नोकरी धरली. अनिल तसा तान्हाच होता, पण आक्का डगमगली नाही. सासरकडून फारशी मदत नव्हती आणि मानी आक्का माहेरी जाणं शक्यच नव्हतं. गरीबीतही अनिलच्या पालनपोषणात काहीही कमी पडू न देण्याचा आक्कांचा आटोकाट प्रयत्न चाले. शाळेतील नोकरीव्यतिरिक्त गणकेश्वर मंदिरासमोरील ‘मनोहर पूजा साहित्य’ या दुकानासाठी कुटलेली मसाला सुपारी, मेतकूट, वळलेल्या वाती अश्या घरगुती गोष्टी त्या बनवून देत असत. तेवढीच तुटपुंज्या पगाराला जोड! या साऱ्यात तिची होणारी आबाळ लहानग्या अनिलच्या मनावर कोरली गेली होती. अनिल इंजिनीयरिंगसाठी पुण्यात मामाकडे राहायला आला. त्याच्या शिक्षणासाठी आक्का धडपड करून पैसे पाठवत असे. दुर्दैवानं आक्काला पोटदुखीचा त्रास सुरु झाला. तसं पाहिलं तर त्या आता एकट्या पडल्या होत्या. तशात त्यांनी खूप दिवस दुखणं अंगावर काढलं. ८६च्या ऑगस्टमध्ये दुखणं बळावलं आणि पोटातच अॅपेंडिक्स बर्स्ट होऊन त्या तडकाफडकी गेल्या. अनिलसाठी तो भयानक आघात होता. अचानक वाजलेल्या फोनमुळे अनिल भानावर आला.
“Hey, I am Harshad from San Jose! मीच तुम्हाला मेल पाठवली होती. अहो माझ्या बहिणीचा, मोठ्या बहिणीचा मानसीचा उद्या वाढदिवस आहे. मी तसा दर वर्षी इंडियात येतो, पण या वर्षी जमत नाहीये. I have just been promoted!” काहीश्या खोलवरून येणाऱ्या आवाजात उत्साह ओसंडून जात होता.
“हं, सांगा काय करायचं आहे!”
“Anil, can I call you Anil, is that OK? This is a very special occasion for me! मानसी म्हणजे ताई, तशी माझ्या आईसारखी. आई गेल्यावर तिनी माझ्यासाठी खूप काही केलं. उद्या तुम्ही तिला पर्सनली जाऊन एक खास भेट द्यायची आहे. And your charges are no problem!”
“हो, हो. हरकत नाही. मी पाहतो कसं जमवता येईल ते! पण भेट काय द्यायची?”
“तुम्ही कदाचित हसाल, पण It is a simple thing! ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा!”
“काय, ‘Parle–G’चा पुडा! बस एवढंच?”
“Yes, it is a special thing between us. And please take some pictures. पण एक नक्की, तुम्ही स्वतः तिच्या शाळेत जाऊन ही भेट द्या! आणि तुम्हाला पैसे किती पाठवू?”
“ते पैशाचं नंतर पाहू. तुम्ही मला पत्ता आणि इतर डिटेल्स मेलवर पाठवा. तुमचं काम होईल, निश्चिंत असा!” अनिलनं फोन ठेवला.
अनिल काही क्षण फोनकडे पहात तसाच बसून होता. त्याचं कुतूहल चाळवलं होतं, हे निश्चित. नेहमीच्या सवयीनुसार त्यानी हर्षद आणि मानसीची माहिती नेटवर शोधायला सुरवात केली. हर्षदची माहिती मिळवणं सोपं होतं. हर्षदच्या कंपनीचं नाव होतं ‘बे अॅनालिटिका’, बिल्डींग १०, सिली अॅव्हेन्यू. सॅन होजे. त्यानी सुरु केलेली ही स्टार्ट-अप कंपनी ‘केडन्स डिझाईन सिस्टिम्स’च्या छत्रछायेत होती. सॅन फ्रान्सिस्कोच्या बे एरियात ऑफिस आणि जवळच क्युपरटीनो या श्रीमंती भागात घर, एकंदरीत हर्षदचं छान चाललं असावं. मानसी बद्दल फारशी माहिती मिळेना. हर्षदच्या मेलनुसार ती पौड फाट्याजवळच्या अभिनव विद्यालयात शिक्षिका, आडनाव मंत्रवादीच म्हणजे बहुदा लग्न झालेलं नसावं. तसं आजकाल खात्रीनं सांगता येत नाही म्हणा! ती ‘मैत्र’ नावाच्या सेवाभावी संस्थेत सहभागी होती. ‘मैत्र’ ही संस्था अनाथ आदिवासी मुलांसाठी काम करणारी संस्था. ‘मैत्र’मधे नक्कीच ओळख काढता येईल अशी अनिलला खात्री होती. दोघांच्या वयात पाच वर्षांचं अंतर पण परिस्थिती खूप वेगळी. आईवडिलांचा कुठेही उल्लेख नव्हता. दोघांची आई लवकर गेली असावी असा उल्लेख हर्षदच्या बोलण्यात आला होता. वडील किर्लोस्कर कमिन्स मध्ये असावेत. सारीच माहिती थोडी बुचकळ्यात टाकणारी. हर्षदचं वय ३३ म्हणजे वडील अंदाजे साठीच्या आसपास, नुकतेच निवृत्त झाले असावेत. अनिलला नाना दिंडोरकरांची आठवण झाली. नानांना कमिन्समधून निवृत्त होऊन पाचसहा वर्षं झाली असतील. नाना नक्कीच या मंत्रवादींना ओळखत असणार! ‘नानांना गाठलं पाहिजे’ असं ठरवून अनिल अंघोळीला निघाला.
हर्षद बेडरुमच्या व्हरांड्यात येऊन उभा राहिला. रात्रीची वेळ. समर असला तरी हवेत छान गारवा होता. स्टीवन्स कॅनियन रोडवरील त्याचं अलिशान घर ही कुणालाही हेवा वाटावा अशी जागा होती. पाच वर्षांपूर्वी डिस्ट्रेस सेलमधे हर्षदला चक्क लॉटरी लागली होती. पश्चिमेकडे मागच्याच डोंगरावर रँचो सॅन अंटोनिओ ट्रेल होता. खाली दिसणारा डीप क्लिफ गोल्फ कोर्स आणि दूरवर पूर्वेकडे माउंट हॅमिल्टनवरील लिक वेधशाळेचे लुकलुकणारे दिवे दिसत होते. हर्षदच्या डोक्यात ताईचे विचार घोळत होते. आईबाबा गेले तेव्हा हर्षद जेमतेम चौदा वर्षांचा होता. मानसीताई कॉलेजात शिकत होती. ताईने मोठ्या हिमतीने हर्षदच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. हर्षदला अचानक ओढवलेल्या संकटाची कल्पना होती पण गांभीर्य पूर्णपणे उमगलं नव्हतं. विमा कंपनीचे तेव्हा झालेले उपकार विसरणं केवळ अशक्य. एवढंच कशाला, ‘योगक्षेमं वहाम्यहम्’सह दोन हातातील पणती त्यांच्या देवघरात विराजमान झाली होती! त्यांच्या राहणीमानात अचानक फरक पडला, पण तरीही ताई त्याचे खूप लाड करीत असे. बाबांच्या कंपनीतील अनेक मित्रांनी मदत केली होती, विशेषतः नानाकाका. बाबा गेल्यावर वर्षभरातच ताईनं शाळेत नोकरी धरली होती. त्याचं कॉलेज, अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी जाणं हे केवळ ताईमुळे शक्य झालं होतं. अमेरिकेत बस्तान बसल्यावर त्यानं ताईला अमेरिकेत येण्याविषयी अनेकदा गळ घातली होती. पण तिचा नकार ठाम होता. त्याच्या आणि केटच्या लग्नानिमित्त ती एकदाच अमेरिकेत आली होती. शाळेतील नोकरीशिवाय ती ‘मैत्र’ या सेवाभावी संस्थेचं खूप काम करीत असे. त्याचा ‘मैत्र’ला विरोध नव्हता, दरवर्षी तोदेखील जमेल तेवढी घसघशीत आर्थिक मदत करीत असे. पण तिनं स्वतःला एवढं वाहून घेणं त्याला कधीच कळलं नव्हतं. वेळप्रसंगी स्वतःला नाकारून, इतरांसाठी सारं काही करणे त्याच्या अमेरिकन आकलनशक्ती पलीकडे होतं. या साऱ्यात अनेक वर्षं उलटून गेली. ती एकटी आहे, हा सल त्याला अधेमधे छळत असे. अचानक आलेल्या गार झुळकेनं तो शहारला आणि लगबगीनं बेडरूमचा दरवाजा उघडून तो आतल्या उबेत शिरला.
अनिलनं ७ ऑगस्टच्या सकाळी फुलवाल्याकडून एक लांब दांडीचं पिवळं गुलाबाचं फूल घेतलं. पौड फाट्यावरून वळून रिक्षा अभिनव विद्यालयाकडे निघाली. उजवीकडे पांढऱ्या निळ्या रंगात नुकतीच रंगवलेली शाळेची इमारत दिसली. ‘मानसी मॅडमला भेटायचंय’ असं सांगितल्यावर, वॉचमननी उजवीकडे जुन्या इमारतीत वर चढून जाणाऱ्या पायऱ्यांकडे बोट दाखवलं. ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर कळलं की मानसी मॅडम चौथ्या मजल्यावरील तिसरीच्या वर्गावर होत्या. तिथल्या क्लार्कनी, ‘दुपारी एकला शाळा सुटेपर्यंत मॅडमना भेटता येणार नाही!’ असं करड्या स्वरात सांगितलं. तेव्हा फक्त नऊ वाजले असल्यानं अनिल हिरमुसला. येवढ्यात फिकट निळ्या साडीतील एक मॉडर्न बाई ऑफिसात आल्या. ‘एक्स्क्यूज मी!’ असं म्हणत अनिलनं थोडक्यात आपलं काम त्या मॅडमना सांगितलं. ‘मला दुपारी एकपर्यंत थांबता येणार नाही, तर प्लीज मानसी मॅडमना बोलवाल का?’
“मी श्वेता आपटे, मानसीची मैत्रीण. तुमचं तिच्याकडे ‘खास काम’ काय आहे?” चेहऱ्यावर मिस्कील भाव.
“मला त्यांच्या अमेरिकेतल्या भावानं पाठवलं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे!”
“काय लबाड आहे मानसी! आम्हाला कुणालाच पत्ता नाही. तुम्ही असं करा, समोरच्या बेसमेंटमध्ये थांबा, मी मानसीला घेऊन येते. अहो शिंदे, या साहेबांना जरा बसायला एक चेअर द्या!”
वेगवेगळ्या मजल्यावरून लहान मुलांच्या हसण्या ओरडण्याचे आवाज ऐकू येत होते. कुठल्याश्या वर्गात सारी मुलं एकसुरात कविता म्हणत होती. मधेच गोंगाटाला वैतागून, ‘क्वायट प्लीज!’ अश्या खड्या आवाजातील बोल ऐकू आले. साताऱ्याच्या शाळेतील एकाच खोलीत भरणारे तीन वर्ग, आरडाओरडा करणारे जमदग्नी निकम मास्तर आणि या इंग्रजी शाळेतील प्रसन्न वातावरण अशी तुलना अनिलच्या डोक्यात चालू होती. ‘हे पहा, इकडे बसलेत.’ असं म्हणत हसतहसत श्वेताबरोबर ऑफव्हाईट रंगाच्या साध्या साडीतील एक बाई बेसमेंटमध्ये आल्या. डाव्या खांद्यावरून समोर घेतलेला लांबसडक जाडजूड शेपटा, कपाळावर छोटी टिकली आणि पुसटसा, हलका मेकअप, गोरा वर्ण, घट्ट मिटलेली नाजूक जिवणी. बॉबकट केलेली हसरी, खेळकर श्वेता आणि गंभीर मानसी, विरोधाभास सहजपणे जाणवत होता.
“मी अनिल जाधव. मला हर्षदनं पाठवलंय. हर्षदतर्फे तुमच्यासाठी छोटीशी गिफ्ट आणली आहे!” असं म्हणत अनिलनी पिवळा गुलाब आणि गिफ्ट मानसीच्या हाती ठेवली. श्वेतानी दिलेल्या खुर्चीत बसत मानसी रंगीबेरंगी कागदातील गिफ्टकडे पहात तशीच बसून होती.
“अगं, गिफ्ट उघड की! पाहू अमेरिकन बंधुरायांनी काय पाठवलंय!” श्वेता असं म्हणाल्यावर काहीश्या अनिच्छेनंच मानसीनं रॅपर उघडलं. आत एक ‘पार्ले-G’चा डबल पुडा होता! “हे काय गं?” श्वेता आश्चर्यानं जवळजवळ ओरडलीच. नकळत मानसीच्या डोळ्यातून गंगायमुना वाहू लागल्या होत्या. काही क्षण कुणीच काही बोललं नाही. कमरेला खोचलेल्या रुमालानं डोळे टिपत, काहीश्या अवघडलेल्या घोगऱ्या स्वरात मानसी म्हणाली,

“हा हर्षू किनई वेडा आहे! लहानपणी वाढदिवस साजरा करणं जमत नसे. आमचे बाबा अनेकवेळा फिरतीवर असत. पण ते नेहमी आठवणीनं, बाकी काही जमलं नाही तरी आमच्या वाढदिवसाला, ‘पार्ले-G’चा डबल पुडा न चुकता घेऊन येत असत!” मानसीचे डोळे पुन्हा भरून आले. श्वेता पटकन उठून मानसीच्या पाठीवरून हलकेच हात फिरवू लागली. थोडं सावरल्यावर मानसी संथपणे हलक्या आवाजात बोलू लागली.
“आमचं कुलदैवत’ म्हणजे मंगेशीला. २००० साली मंगेशीहून परत येतांना चोर्ला घाटात आईबाबांच्या गाडीचा भीषण अपघात झाला. दोघंही जागच्या जागीच दगावली. मी नुकतीच अॅडल्ट, म्हणजे १९ वर्षांची झाले होते. हर्षु जेमतेम १४ वर्षांचा. बाबांची चांगल्या भक्कम पगाराची कमिन्समधील नोकरी. आमच्यावर आभाळंच कोसळलं. बँकेतील थोडे पैसे, विम्याचे दहावीस लाख आणि आमचा दहा नंबर लेनमधील डहाणूकर कॉलनीतील गंधर्व सोसायटीतील दोन बेडरूमचा फ्लॅट येवढीच श्रीशिल्लक होती. जवळचे कोणी नातेवाईकही नव्हते. माझं B.Scचं शेवटचं वर्ष चालू होतं. बाबांचे कंपनीतील सहकारी, विशेषतः नानाकाका यांनी आम्हाला खूप मदत केली. लगेच लग्न कर, फ्लॅट विकून टाका, आमच्याकडे राहायला या, हर्षदला होस्टेलमध्ये ठेवा असे अनेक गोंधळात टाकणारे सल्ले मिळत होते. मी तर पार गोंधळून गेले होते. एका अर्थानं नानाकाकांच्या मदतीने आम्ही उभे राहिलो. हर्षुला मोठा करायचा हे माझं एकमेव स्वप्न होतं. माझं शिक्षण, मग नोकरी, हर्षुचं शिक्षण आणि त्याला अमेरिकेला पाठवणं या साऱ्या रगाड्यात मी पार गुरफटून गेले. टाचक्या बजेटमुळे माझी तारांबळ उडत असे. सुरुवातीला अनेक मदतीचे हात पुढे आले, पण कालांतरानं आम्ही एकटे पडत गेलो. त्या काळात वाढदिवसाला फक्त ‘पार्ले-G’चा डबल पुडाच परवडत असे!” मानसी भडभडून बोलत होती. अनिल आणि श्वेता मन लावून सारं ऐकत होते. तासभर कधी उलटून गेला ते कुणालाच कळलं नाही.
“मानसी मॅडम, मला एक मस्त कल्पना सुचली आहे!” वातावरणातला ताण दूर करत अनिल म्हणाला.
“अहो मॅडम काय, मला मानसी म्हणा!”
“आज मी आणि पल्लवीतर्फे तुम्हाला डिनर! आणि हो, श्वेतामॅडम तुम्हीही यायचं!” मानसीनं खूप आढेवेढे घेऊन शेवटी अनिलच्या आमंत्रणाचा स्वीकार केला. संध्याकाळी आठ वाजता सेनापती बापट रोडवरील, मॅरियट मधील ‘स्पाईस किचन’ या रेस्टॉरंटमध्ये भेटण्याचं ठरलं. श्वेताला सांगून अनिलनं ‘पार्ले-G’चा डबल पुडा स्वीकारतांना मानसीचा फोटो मोबाईलवर काढून घेतला.
“Anil, you are just wonderful! तुम्ही माझं फार मोठं, महत्त्वाचं काम केलंत. I will be always grateful to you! प्लीज तुमचं बिल पाठवून द्या. आणि हो, If I need anything in future, I will definitely contact you.” सॅन होजेहून हर्षद बोलत होता. तो बहुदा अनिलच्या निरोपाची वाटच पहात असावा. अनिलनं WhatsAppवर मानसीचा फोटो पाठवला होता. फोनवरील बिलाचा उल्लेख अनिलला खटकला होता. व्यवहार महत्वाचा असला तरी प्रत्येक गोष्ट विकत घेता येऊ शकते, ही अमेरिकन वृत्ती अनिलला अजिबात रुचत नसे.

उंच छत, मंद उजेड आणि मंद आवाजात चाललेली संभाषणं, रुबाबदार वेशातील वेटर्सची धावपळ आणि अधेमधे उमटणाऱ्या हास्याच्या लकेरी. रात्री नऊची वेळ, त्यामुळे मॅरियटच्या ‘स्पाईस किचन’ रेस्टॉरंटमध्ये अजून फारशी गर्दी नव्हती. लेमन अॅण्ड कॉरिअँडर सूप, इटालियन पास्ता विथ गार्लिक ब्रेड असं मस्त जेवण झालं होतं. अनिल पल्लवीसोबत मॅरियटवर साडेसात वाजताच पोचला होता. बरोबर आठ वाजता नाना दिंडोरकर, श्वेता आणि मानसी आले होते. आदल्या दिवशी दुपारी अनिल नानांना भेटायला शांतीवन सोसायटीत गेला होता. हर्षद मानसीसंदर्भात नानाकाकांची म्हणजेच नाना दिंडोरकर यांची ओळख निघणं हा केवळ योगायोग होता. सदाशिव मंत्रवादी हे कमिन्सच्या R&D डिपार्टमेंटमध्ये उच्च पदावर काम करणारे इंजिनीयर होते. त्यांचं मूळ गाव कोकणातील राजापूर. नानाकाकांनी त्यांच्या हाताखाली चारपाच वर्षं काम केलेलं. मंत्रवादी साहेब अतिशय हुशार पण मनमिळावू होते. नानाकाकांपेक्षा ते वयानं लहान असले तरी नानाकाकांच्या अनुभवाची त्यांना विशेष कदर होती. २००० सालचा अपघात भयानक होता आणि मानसी व हर्षद एकाएकी पोरके झाले.
अपघातानंतरची निरवानिरव, कंपनीतील कागदपत्रं, गंधर्व सोसायटीची कामं अश्या साऱ्या किचकट गोष्टींना मानसीला तोंड द्यावं लागलं होतं. मानसी मोठी धीराची. साहेबांचे इतर सहकारी आणि नानाकाका यांची तेव्हा खूप मदत झाली. एखाद्या पालकाप्रमाणे खंबीरपणे नानाकाकांनी मानसी आणि हर्षदला आधार दिला होता. हर्षद लहान असल्याकारणानं विम्याची अर्धीच रक्कम मिळाली. त्याच वर्षी डिग्री पदरात पडताच मानसीनं ‘डीएड्’चा अभ्यासक्रम पूर्ण करून अभिनव विद्यालयात शिक्षिकेची नोकरी पत्करली. आधी शिक्षण मग नोकरी, स्वयंपाकपाणी आणि हर्षदचं शिक्षण आणि पालकत्व अश्या विविध जबाबदाऱ्या पार पडतांना त्या बिचारीची तारांबळ उडत असे. हर्षदचं वय तसं अर्धवट होतं, पण मानसीताई म्हणजे त्याच्यासाठी सर्वस्व होतं. शालेयशिक्षण, नंतर परवडत नसूनसुद्धा फर्ग्युसन कॉलेज या साऱ्यात ताईची होणारी ओढाताण त्याला जाणवत असे. कधीकधी वयानुसार तो भलते हट्टही करीत असे. पण मानसीनं त्याला तळहातावरील फोडाप्रमाणे जपलं होतं. हर्षद ग्रॅजुएट होऊन, उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जायला २००८ साल उजाडलं. हे सारं सांभाळणं ही मानसीसाठी खडतर तपस्या होती. हर्षदचं सारं काही छान झालं पण यात पोरीचं तारुण्य मात्र करपून गेलं.
आयुष्यात ‘खूप मोठं व्हायचंय, खूपखूप पैसे मिळवायचेत’ या स्वप्नामागे झपाटल्याप्रमाणे हर्षद कधी धावू लागला हे त्याचं त्यालाच कळलं नाही. अमेरिकेत M.S. केल्यानंतर, एखाद वर्ष नोकरी करून त्यानं ‘आयटी’तील स्वतंत्र उद्योग सुरु केला. दरवर्षी तो ताईला भेटायला भारतात येत असे. अमेरिकेत येण्याचा, स्थायिक होण्याचा अनेकदा आग्रह करूनदेखील मानसी कधीच अमेरिकेस गेली नव्हती. ‘More means Happiness’ हे नकळत त्याच्या आयुष्याचं सूत्र बनून गेलं. सुरवातीस न मिळालेल्या गोष्टी, क्वचित पदरी आलेली अवहेलना यामुळे त्याचा वेगळाच पीळ तयार झाला होता. चारपाच वर्षांत भरभराटीला आलेला बिजनेस विकून, त्याने ‘बे अॅनालिटिका’ नावाची नवीन कंपनी स्थापन केली. त्याच वर्षी केट हॅरिसन या अमेरिकन मुलीशी त्याचं लग्न झालं. त्या वर्षी मात्र मानसी जेमतेम एक आठवड्यासाठी, हर्षदच्या लग्नाच्या निमित्तानं अमेरिकेस जाऊन आली. गेली पाचसहा वर्षं ती ‘मैत्र’ या सेवाभावी संस्थेसाठी मनोभावे काम करीत असे. आपली नोकरी आणि ‘मैत्र’ याशिवाय तिच्या आयुष्यात आणखी काहीही नव्हतं. स्वतःचं आयुष्य नाकारून समाजसेवा, हा मानसीचा पिंडच हर्षदला कळत नसे आणि त्यांचे यावरून अनेकदा वादही होत. आताशा त्यानं या विषयाचा नादच सोडून दिला होता.
‘हॅपी बर्थडे टू यू!’ सोबत टाळ्यांच्या गजरात मानसीनं केक कापला. आजूबाजूच्या चारपाच टेबलावरील बहुतेकांनी टाळ्या वाजवून मानसीला विश केलं. तिला हा सारा प्रकारच नवीन असल्यानं ती गांगरून गेली होती. तसे सगळेच पहिल्यांदा भेटत होते. पण सुरवातीच्या अनोळखी नवखेपणानंतर साऱ्यांच्याच मस्त गप्पा झाल्या होत्या.
“अनिलकाका, एक विचारू? तुम्ही नोकरी सोडून ‘तत्पर’ हा व्यवसाय कसा काय सुरु केलात?” मानसीचा प्रश्न.

“अगं, बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. अश्याच एका अमेरिकन मित्राचा फोन आला. त्याचे म्हातारे आईवडील प्रभात रोडवरील नवव्या गल्लीत एका बंगल्यात एकटेच रहात असत. काम किरकोळ होतं. मी त्यांना भेटायला गेलो. शेजारी वॉकर घेऊन खुर्चीत वाकून बसलेल्या वीणाताई आजही आठवतात. तपकिरी नक्षी असलेली पांढरी गबाळी साडी, गोऱ्या मनगटावर उमटलेले तांबूस चट्टे आणि थरथरणारी हाताची बोटं. कापऱ्या आवाजात मुलाचं अपार कौतुक होतं, पण त्याचबरोबर तो सातासमुद्रापलिकडे असल्याची खंत होती. अनंतराव अंथरुणाला खिळलेले. विजेचं बिल आणि गळकं टॉयलेट इतकं किरकोळ काम, पण हाताशी कुणीच नसल्यानं वीणाताई कावऱ्याबावऱ्या झाल्या होत्या. मी झट्कन दोन्ही कामं मार्गी लावली. वीणाताईंना कोण आनंद झाला होता, त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. माझ्या मनावर त्यांचं पोरकेपण आघात करून गेलं! पण ते जाऊ दे, मला एक सांग, तू एकटी कशी काय?” अनिलनं अचानक गुगली टाकला.
“सेन्सॉर, सेन्सॉर!” अचानक हसतहसत नानाकाका मोठ्यानं म्हणाले.
“करेक्ट, पोरकेपण भयानक असतं! खूप धडपडीनंतर त्याची सवय होते, पण एक भित्रेपण येतं. आईबाबा गेल्यावर मी गांगरून गेले होते. बरेवाईट अनुभव आले. नानाकाका होते म्हणून फार बरं झालं! मी स्वतःच्याच कोशात गुरफटून गेले! पण अनिलकाका, स्वार्थ आणि निरपेक्ष प्रेम एकत्र असू शकतं? मला तर नेहमीच या प्रश्नाची भीती वाटत आली आहे!” आपल्याच विचारात हरवलेली मानसी म्हणाली.
“मानसी, मला वाटतं या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी वाटल्या तरी त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. कुठल्याही नात्यात या दोन्हीतील बॅलन्स राखता आला पाहिजे. आता ‘तत्पर’चंच उदाहरण घे, म्हटलं तर परोपकार पण माझ्यासाठी तो पोटापाण्याचा उद्योगही आहे! या साऱ्यात मला माणुसकी जपता आली पाहिजे हा माझा कटाक्ष असतो!”
‘अनिलकाका, आज एक फार मोठा गुंता तू सोडवलास! थँक्यू!” उत्साही स्वरात मानसी म्हणाली.
दुसऱ्या दिवशी पहाटे निळसर कॉम्प्युटर स्क्रीनवर हर्षदची मेल झळकत होती. ‘Anil you are a magician! तुमचे पार्टीचे फोटो मी पहिले. श्वेतानी, मानसीच्या मैत्रिणीनी पाठवले आहेत. मानसीचा रात्री फोन आला होता. खूप आनंदात होती. मानसीचा आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे! सर, पोरकं असणं तुम्हाला कळणार नाही! When can I call you?’
अनिलच्या चेहऱ्यावर स्मित होतं. अनिलनं फोन लावला, “बोल मित्रा! सर्वप्रथम मानसीचं आणि तुझं अभिनंदन!”
“अनिलसर, मी तुमचे आभार कसे मानू? तुमच्या नेहेमीच्या बिलासोबत, Let me know the Party expenses!” अतिशय आनंदात हर्षदला शब्द सुचत नव्हते.
“अरे मित्रा, मानसीसाठी मीही खूप आनंदात आहे! बाय द वे, माझे वडील मी तीन वर्षांचा असतांना आणि आई मी अठरा वर्षाचा असतांना गेली! ते पैशांचं राहू दे! Consider it as a Gift from me for Manasi!” तिकडे हर्षद अवाक झाला होता. अनिलच्या फोनवर हिरव्या उजेडाची लुकलुक चालू झाली. “Listen, I am getting another call! अमेरिकेहून फोन येतोय! आपण नंतर बोलूया!” असं म्हणत अनिलनं हर्षदचा कॉल कट करून दुसरा कॉल घेतला.

“नमस्कार, मी अभिजीत देशपांडे. मागे तुम्ही माझं काम केलं होतंत! मी न्यूयॉर्कहून बोलतोय. There is an emergency! माझे आईबाबा कोल्हापुराला पुरात अडकले आहेत!” हातावरच्या घड्याळाकडे पहात अनिलच्या डोक्यातील चक्रे सुरु झाली.
पुढील दोन दिवस कसे गेले ते अनिलला कळलंच नाही. कोल्हापुरातील नागाळा पार्क भागातील ‘रो हाउस’मध्ये अभिजीतचे आईवडील अडकले होते. त्यांची सुटका करून आई वडिलांना अनिल पुण्यास घेऊन आला. त्या दोन दिवसात पुरानं केलेली वाताहत पाहवत नव्हती. चिखलात बरबटलेली ढासळलेली घरं आणि संसार, दावणीला बांधलेल्या तडफडून मेलेल्या गुरांचे फुगलेले देह, थिजलेल्या उध्वस्त नजरा! अस्वस्थ मनानं परत आल्यावर, पुण्यातील मित्रांच्या मदतीनं काही कपडे आणि खाण्याचे जिन्नस गोळा करून पुढच्याच आठवड्यात अनिलने ती मदत कोल्हापूरच्या एका दोस्ताकडे सुपूर्द केली.
तीन आठवड्यानंतरची सकाळ. पहाटे कॉम्प्युटर सुरु करून, नेहमीप्रमाणे इलेक्ट्रिक केटलमधील पाणी कॉफीसाठी गरम करण्यास लावून तो टॉयलेटकडे निघाला. परत आल्यावर अचानक त्याचं लक्ष टेबलावरील रंगीबेरंगी वेष्टणातील गिफ्टकडे गेलं. बहुदा पल्लवीनं ते तिथे ठेवलेलं असणार असा विचार करत त्याने ते उघडलं. अहो आश्चर्यम्! आत एक ‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा होता आणि सोबत एक घडी घातलेली निळसर कागदाची चिठ्ठी! ही नक्कीच मानसीनं पाठवली असणार असा विचार करत त्यानी चिठ्ठी उलगडली.
‘प्रिय अनिलकाका,
मी खूप आनंदात आहे! मला शब्द सुचत नाहीत, पण तुमचे आभार कसे मानू? गेल्या वर्षभरापासून आमच्या ‘मैत्र’ या संस्थेत नवीन दाखल झालेल्या अश्विनशी माझी ओळख झाली. माझ्याच वयाचा आहे. तो आहे IT प्रोफेशनल पण त्याची एक दुखःद कहाणी आहे. त्याच्या पत्नीच्या आधीच्या दोन बाळंतपणात Complications झाली. दोन्ही वेळेस मुलं दगावली. चार वर्षांपूर्वी तिसऱ्या खेपेस खूप रक्तस्राव होऊन पत्नी दगावली पण मुलगी जगली. तिचं नाव स्निग्धा, खूप गोड पोरगी आहे. कसं सांगू कळत नाही!’
एरवी गंभीर असलेला पण आत्ता लाजलेला मानसीचा चेहरा अनिलला दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.
‘कालच आम्ही दोघांनी लग्न करायचं ठरवलं आहे! मला तुमचे शब्द, ‘कुठल्याही नात्यात या दोन्हीतील बॅलन्स राखता आला पाहिजे!’ आठवत होते. मी पूर्ण विचारांती निर्णय घेतला आहे. स्निग्धाला माझा खूप लळा लागला आहे. मला पाहताच ‘पावशी’ म्हणून ती बिलगते! योगायोग म्हणजे तिच्या आईचं नाव होतं – मानसी! मला तुमचे आशीर्वाद हवेत. एका नव्या नात्याच्या जन्मदिनी मी तुम्हाला ‘पार्ले–G’ डबल पुडा पाठवते आहे. तुम्हाला आवडणार नाही, पण तरीही ‘Thank you!’
तुमची
एक नवी मानसी’
‘पार्ले–G’ बिस्किटाचा डबल पुडा हाताळत, नकळत अनिलच्या डोळ्यात आनंदाश्रू जमा झाले होते.