निसटती नाती

माझी एक डॉक्टर मैत्रीण परवा घरी आली होती. गेले बरेच दिवस ती गायबच होती, ‘म्हटलं, असेल कशात तरी गुंतलेली!’ तिचा नवरा एक प्रथितयश अर्किटेक्ट, तोही मित्रच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अचानक ती म्हणाली, ‘अरे, आम्ही दोघांनी सेपरेट व्हायचं ठरवलं आहे!’ मी चाट पडलो! काही क्षण अस्वस्थ शांततेचे गेले. ‘काय सांगतेस काय? असं झालं तरी काय?’ मला कंठ फुटला. मैत्रीण खूप शांत होती. तिनी सविस्तर सारी कहाणी सांगितली. दोघांचं हे दुसरं लग्न, दोघांचीही मुलं मोठी. या दोघांनी प्रेमात पडून, विचारपूर्वक सर्वांच्या संमतीनं लग्न केलं आणि दोघांचेही छान जमलं होतं. त्यामुळेच सारं अनपेक्षित, धक्कादायक होतं! दोघंही शहाणे आणि विचारी असल्यानं, त्यांचं विलग होणंही बहुदा शांतपणे घडलं होतं. मलाच हे सारं स्वीकारणं अवघड जात होतं.

मनुष्य समाजशील प्राणी आहे म्हणून नाती ही असणारच. निसर्ग नियमानुसार वंशवृध्दीसाठी स्त्री पुरुष एकत्र येणार हे स्वाभाविक आहे. समाज व्यवस्था या नात्याकडे एक परंपरा म्हणून पाहते आणि यात प्रजनन हाही संदर्भ होताच. पण यापलीकडे जाऊन नाती असणं ही माणसाची गरज आहे. नाती आणि त्यातूनही स्त्री-पुरुष नाती ही अकल्पनीय रित्या गुंतागुंतीची असतात. परस्परां बद्दल वाटणारं आकर्षण, प्रेम, मग ते मुरल्यावर जुळून येणारं नातं. विवाह ही लौकिक दृष्ट्या त्यावर होणारी शिक्कामोर्तब असते. अनेकदा सुरवातीचं गुलाबी आकर्षण संपलं तरी कालांतराने नाती सवयीची होऊन जातात आणि तरीही टिकून राहतात. ‘मला तुझ्या सोबत छान म्हातारं व्हायचं आहे!’ असं दीर्घायुषी प्रेमळ नातं हे अनेकांचं स्वप्नं एखाद्या बिल्डरच्या दूरस्थ होर्डिंगवरच राहतं! उष्ट्या जिलबीपासून सुरू झालेला प्रवास, समंजसपणे तुझी बिन साखरेची काळी कॉफी आणि माझा मस्त गोड चहा अश्या एकोप्यानं मजेत सुरू राहतो. सुरवातीस सारं काही ‘एकत्र’ करण्याचा हव्यास असतो. ‘हमारे खयाल कितने मिलते है!’ असा तो मयुरपंखी काळ. काही दिवसांनी आवडी बदलतात किंवा त्या भिन्न असल्याचा शोध लागतो! पण परस्परां बद्दल आदर असल्यानं त्याची काहीच अडचण होत नाही. परस्परां बद्दलच्या आदराला कधीतरी नकळत तडा जातो आणि मग तेच आवडतं नातं डोईजड होतं!

स्त्री पुरुष भिन्न आहेत म्हणूनच मजा आहे! दोघंही एकत्र येण्यात निश्चित परस्पर पूरक स्वार्थ असतात. फार पूर्वी प्राचीन आदिमानवाच्या काळी गुहेत रहात असतांना काय होतं कुणास ठाऊक, पण माणूस जसा सुसंस्कृत होऊ लागला तस तसं स्थैर्य त्याला प्रिय होऊ लागलं. स्थैर्याबरोबर दिलासा, सुरक्षितता आली पण त्याच बरोबर नीतीनियम, रीती रिवाज, रूढी, सुस्थापित व्यवस्था, रचना अस्तित्वात आल्या. कुठल्याही रचनेत एक सुसूत्रता असते, अधिकृतता असते. आणि म्हणूनच ते नातं शिष्टसंमत झालं, त्यात शरीरसंबंध असूनही कुठलंही चोरटेपण किंवा अपराधीपण नव्हतं. परंतु रचनेमुळे त्यात एक सामान्यत्व आलं, साऱ्यांना एकाच समान नियम! पण यात वैयक्तिक उत्कृष्टतेचा ध्यास बाजूला पडला, वगळला गेला. जोडीतील एक असामान्य असेल तर दुसर्‍याला शेपूट बनून अनुनय करण्या वाचून पर्याय उरला नाही. तसंच काही वेळेस या व्यवस्थांचा अतिरेक झाला किंवा त्या विकृत झाल्या. स्त्री पुरुषातील समानता लयास गेली आणि पुरुषप्रधान संस्कृती, बालविवाह, सती अश्या अनिष्ट प्रथा रूढ झाल्या.

हे नातं बिनसायला अनेक कारणं असू शकतात. सासू सासरे, दोन्ही घरची मंडळी आणि या दोघांना ते सारे कसे स्वीकारतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पूर्वी लक्षात न आलेल्या एकमेकातील त्रुटी, स्वभावातील कंगोरे. काही काळानंतर त्यात एक अपरिहार्य शिळेपण येऊ लागतं. नातं स्वीकारलं की ती एक पॅकेज डील आहे याचा विसर पडतो. दोघंही एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावतात, परस्परांना प्रोत्साहन देतात. नकळत कधीकधी दोघात स्पर्धा सुरू होते. एकाच व्यवसायिक क्षेत्रातील ही स्पर्धा असू शकते. ‘अभिमान’ आठवतोय? परंतु क्षेत्र एक नसलं तरी स्पर्धा असू शकते. अशी स्पर्धा असूनही, आणि इतर कितीही कौतुक करत असले तरी नात्यातील त्या ‘दुसऱ्या’कडून खरंखुरं कौतुक हवं असतं. ते मिळालं नाही की चिडचिड होते. संवेदनशीलता, सृजनशीलता यांचा संगम होण्याऐवजी समांतर प्रवाह वाहू लागतात. एकमेकांचे मित्र परिवार, आवडी निवडी हेही कारण असू शकतं. ह्या नात्यात दोघंही खूप पझेसिव्ह असतात आणि त्यात कुठलंही तिसरं माणूस शिरलं की भूकंप होऊ शकतो. ‘प्रतारणा’, ‘व्यभिचार’ ही फक्त लेबलं झाली. तसं पाहिलं तर बहुदा आपण सारेच निरुपद्रवी पध्दतीनं ‘बाहेरख्याली’ असतो! माझ्या मते हा Extra Carricular विषय असतो. मलाही इतर स्त्रिया आवडतात किंवा माझ्या सखीला इतर पुरुष आवडू शकतात. मला वाटतं हे निसर्गसुलभ आहे, पण त्यात ‘तुलना’ येऊ लागली की गोंधळ होतो, नात्याला फार मोठे तडे जाऊ लागतात. हे तडे बुजवणं फार अवघड आणि जखमा बुजल्या तरी वण राहतातच! या नात्याचं नेहमीच उदात्तीकरणही केलं गेलंय. पावित्र्य, मांगल्य यांची जोड देण्यात आली. प्रेयसी, सखी, सहचारिणी आणि अनंत काळची माता म्हणून त्यात फक्त स्त्रीच्या भूमिकेला गौरवास्पद भासवणारी व्याख्या मिळाली! त्या व्याख्येतील जखडलेपण जाणीवपूर्वक दडवलं गेलं. ह्याच पुरुषी व्यवस्थेनं पक्षपात करून पुरुषाला अन्यायपूर्वक मोकळा ठेवला! पूर्वी या नात्याला लौकिक अर्थानं खूप मान होता, म्हटलं तर दहशत होती. म्हणूनही अनेक विवाह जाचक असले तरी टिकून रहात.

अनेकदा जुलमाचा रामराम म्हणून नाती सहन केली जातात. या व्यवस्थेतील दिलासा, सुरक्षितता महत्त्वाची आणि व्यवहार्य वाटते. पण घुसमट होतच राहते. भांडणं होत राहतात, किरकोळ कारणांवरून देखील! दोघंही एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचं मनात असूनही कौतुक, रसग्रहण करायचं टाळतात किवा विसरून जातात. साधारणतः पंचविशी/तिशीत लग्न होतं. सुरवातीचे स्वर्गीय दिवस, मग मुलं, त्यांचं संगोपन दोघांच्याही आयुष्याला एक भक्कम उद्दिष्ट असतं, दिशा असते आणि त्यात वेळ कापरासारखा उडून जातो. दोघांचीही अनेक ध्येयं, स्वप्नं बाजूला पडतात. पंचावन्न साठीच्या सुमारास जाग येते. मुख्य उद्दिष्ट साध्य झालेलं असतं आणि कदाचित भयानक पोकळी भेडसावू लागते. अशात एकमेकांचं जमत नसेल तर साऱ्याच गोष्टींवर उदासीनतेचं सावट येतं. एकाच घरात Common Shared Services अश्या पध्दतीनं गोष्टी घडत राहतात, पण दोघांच्याही स्वातंत्र्याला तिलांजली मिळते आणि मग नात्यातील दोघांचंही ‘बोन्साय’ होऊ लागतं. अनेकदा हे सारं अटळ म्हणून स्वीकारलं जातं ही मोठी शोकांतिका आहे.

आज काळ बदलला आहे, आधुनिकते बरोबर एक मोकळेपण, क्षमाशीलता  आढळून येते. विवाहाशिवाय एकत्र राहणं, Live-in Relationship आता शिष्टसंमत आहे, किरकोळ कुजबुज होण्यापलीकडे कुणी त्याकडे कुत्सितपणे पहात नाही. पूर्वी घटस्फोट हे जणू पाप होतं, विशेषतः त्यातील स्त्रीला भल्या थोरल्या  दिव्याला सामोरं जावं लागे. लोक वाळीत टाकत किंवा प्रसंगी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करीत. कळत नकळत चारित्र्यावर शंका घेतली जात असे. यात पुरुष नेहमीच ‘बिचारा’ असे. पण आज लग्न ही बेडी न भासता अनेक नाती सामोपचाराच्या मार्गे घटस्फोट घेऊन मोकळी होतात आणि आता हेही आपल्या सवयीचं होतं आहे. एका अर्थानं हे स्वागतार्ह आहे. काही काळ लंगडेपण जाणवेल पण पुन्हा उभारी घेण्याचं स्वातंत्र्य असेल! म्हणूनच मी मैत्रिणीला आणि मित्रालाही मनोमन शुभेच्छा दिल्या.

आदिम काळात समाज व्यवस्था उभी करण्यासाठी, बांधण्यासाठी काही सुजाण, शहाण्या आणि सामर्थ्यवान मंडळींनी समाज रचनेचे काही नियम केले आणि विवाहसंस्था हा त्याचाच एक भाग. गेल्या अनेक सहस्रकात आपली प्रगती झाली आहे असं मानायला काही हरकत नाही. माणूस बऱ्याच अंशी सुसंस्कृत झाला आहे त्यामुळे विवाह हा कायदेशीर करार, बंधन असं न समजता त्याकडे हे एक दीर्घायुषी नातं म्हणून पाहणं शक्य आहे. सुरवातीलाच आकर्षणा पलीकडे जाऊन त्याचा दूरदर्शीपणानं विचार करणं आवश्यक आहे. आज आधुनिक सोयी आणि माहिती तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे. पंचविशीत स्वीकारलेलं हे नातं शेवटपर्यंत असतं म्हणजेच आपल्या आयुष्याच्या जवळ जवळ दोन त्रितीयांश (२/३) काळासाठी असतं. एखाद्या रोपट्याप्रमाणे त्याला खतपाणी घालावं लागतं. कधी नवऱ्यासाठी केलेला गोड शिरा असेल तर कधी संध्याकाळचा गजरा असो! ही त्या नात्यात दोघांनीही करायची Investment असते. आपण कालांतराने हे विसरतो, नातं गृहीत धरू लागतो आणि तिथेच गडबड होते. नात्यात नकळत रुक्षता येऊ लागते. मला दक्षिणेकडील एक प्रथा ठाऊक आहे. आमच्या एका ज्येष्ठ मित्राच्या साठी निमित्त अचानक त्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं. ‘त्याच बायकोशी पुन्हा लग्नं!’ असं म्हणून आम्ही त्याची खूप टिंगल केली! याला षष्ट्यब्दीपूर्ती किंवा त्या विवाहाला ‘आरुबादम कल्याणम्’ असं म्हणतात. त्यामागचा विचार आणि श्रध्दा अशी की साठीला आयुष्यातील एक आवर्त संपतं आणि नव्या आवर्ताचा तो आरंभ असतो. नात्याच्या गणिताचा विचार केला तर आधुनिक काळातही हे तर्कशास्त्र पटण्यासारखं आहे! आधीच्या लग्नातील आणाभाका मागे सोडून पुन्हा नव्या संकल्पाच्या दोघांनीही शपथा घ्यायच्या आणि त्याच नात्याला नवा आयाम द्यायचा! त्यात नूतनीकरणाचा मोठा हृद्य सोहळा आहे. मला वाटतं नात्याच्या निकोप दीर्घायुष्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे!

या नात्याकडे ‘क्विक फिक्स’ किंवा भाविष्यातील भाळाळत्या जखमांच्या भेगांवरील ‘Dr. Fixit’ म्हणून न पाहता, समाधानी दीर्घ आयुष्याचा विमा म्हणून पाहण्याचा सुजाणपणा बाणला पाहिजे. आज जग अतीव स्पर्धात्मक आणि वेगवान झालं आहे आणि म्हणूनच त्यातील नैराश्य, जखमा आणि सल भयानक आहेत. मधुमेह. हृदयविकार यांचं वाढतं प्रमाण याचा दाखला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली अनेक जुन्या गोष्टी मोडीत निघाल्या आहेत पण त्याचबरोबर आपण सर्वज्ञानी नाही ही जाणीव उदयाला येत आहे. ‘करोना’ नावाची सणसणीत कानफटात नुकतीच बसली आहे. ‘योगाभ्यास’ वगैरे पुराण्या गोष्टींकडे आपण नव्या आदरानं पहात आहोत. याच पार्श्वभूमीवर ‘विवाह’ या गोष्टीकडे एक व्रत म्हणून पाहीलं पाहिजे. या नात्यात जुगाराची अनिश्चितता आहे पण ती खूप कमी करता येईल आणि ती एक छोटी संभाव्यता म्हणून स्वीकारून पुढे जाण्याचा शहाणपणा आपल्याला खचितच अंगीकारता येईल अशी आशा बाळगतो!

  • वसंत वसंत लिमये
Standard

चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’

परवाच जुने फोटो चाळता चाळता ‘Creek Jaunt’ या सफरीचे बहारदार फोटो मिळाले. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. शनिवार २८ मार्च, २००९. दुपारचा एक वाजून गेला होता, पायाखाली डिझेल इंजिनची थरथर जाणवत होती. टळटळीत दुपार असूनही उन्हाचा चटका जाणवत नव्हता. आणि याचं कारण एकच, कुंडलिका खाडीवरून पश्चिमेकडून येणारा मस्त वारा! आदल्याच दिवशी गुढीपाडवा होता. रेवदंडा आणि चौल या परिसरातील एक ऐतिहासिक परंपरा म्हणून, दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिडाच्या बोटींची शर्यत असते. आम्ही पंधरा/वीस मंडळी या शर्यतीची मौज मजा पहायला आग्राव येथील आमच्या कोळी मित्राच्या, दीपक मुंबईकर याच्या मच्छिमार बोटीवरून सफरीस निघालो होतो. मला खात्री आहे की या कोकणच्या कानाकोपऱ्यात अश्या अनेक ऐतिहासिक गमती दडलेल्या आहेत!

इतिहासावरून आठवलं, कुंडलिका नदी सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटावरील ताम्हिणी परिसरातील डोंगरवाडीजवळ उगम पावते. सुरुवातीचा अवखळ प्रवाह ‘भिऱ्या’नंतर संथपणे कोलाड, रोहा असा प्रवास करत पश्चिमेकडे जातो. रोह्यानंतर सुमारे आठ किलोमीटर खाली गेल्यावर नदीचे खाडीत रुपांतर होते. हीच खाडी साळाव पुलानंतर थोड्याच अंतरावर अरबी समुद्रास मिळते. खाडीच्या मुखापाशी उत्तर टोकावर रेवदंड्याचा किल्ला तर दक्षिण टोकावर कोर्लई किल्ला राखणदार म्हणून उभे आहेत. रेवदंडा दक्षिणोत्तर पसरलेलं आहे, तर त्याच्या किंचित पूर्वेला गर्द हिरव्या नारळ/पोफळीच्या वाड्यांमधे दडलेले चौल गाव आहे. चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर, ज्याचा चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अश्या विविध नावांनी इतिहासात उल्लेख आढळतो. घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखात देखील चौलचा उल्लेख आढळतो. चौल बंदरात १४७० साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचं नाव – अफनासी निकीतीन. सुमारे दोन वर्षं या परिसरात राहून याने इथल्या जनजीवनाबद्दल एक पुस्तकही लिहिलं. त्याच्या नावाने उभारलेला स्मृतीस्तंभ रेवदंड्याच्या शाळेत आजही आढळतो. चौलचं प्राचीन नाव चंपावती किंवा रेवतीक्षेत्र. सुमारे तीन हजार वर्षांहूनही अधिक जुनं असं हे प्रसिध्द बंदर. पण गमतीची गोष्ट म्हणजे आज याच चौल गावाला कुठेही समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्शही होत नाही! पूर्वी म्हणे शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना व्यापारी गलबतं लागत असंत! हे सारंच बुचकळ्यात टाकणारं होतं.

पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शिडाच्या बोटींची शर्यत पहायला पहिल्याच खेपेस आमच्या सोबत डॉ. विश्वास गोगटे आले होते. हा माणूस ‘फिजिकल केमेस्ट्री’ विषयातील तज्ञ, परंतु त्यांनी अनेक वर्षं डेक्कन कॉलेजला पुरातत्व विभागात तज्ञ म्हणून काम केलेलं. चौल परिसर त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा. त्यांच्या पुढाकारामुळे चौल परिसरात अनेक उत्खनने करण्यात आली. आमच्या सोबत असतांना चौलच्या प्राचीन इतिहासाबद्दल त्यांनी अनेक रंजक कथा सांगितल्या. याच गप्पांमध्ये एक विषय आला तो म्हणजे, ‘मडफ्लॅट्स’!

बुजलेल्या खाडीला ‘मडफ्लॅट्स’ ही भौगोलिक संज्ञा वापरली जाते. याचा सोपा अर्थ असा की एखाद्या खाडीत गाळ साठत जाऊन (Silting) त्यामुळे खाडी बुजते. या बुजलेल्या खाडीच्या पट्ट्याला म्हणतात ‘मडफ्लॅट्स’. या जमिनीतील क्षारांमुळे इथे फारशा वनस्पती उगवत नाही आणि हा भाग बोडका असून सहजपणे नजरेत भरतो. विश्वासरावांनी रेवदंडा आणि चौलच्या दरम्यान असलेले ‘मडफ्लॅट्स’ आम्हाला मुद्दाम दाखवले. हा ‘बुजणे’ प्रकार कदाचित दोन/तीनशे वर्षांपूर्वी घडला असावा. बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं होतं! चौल या प्राचीन बंदराला विशेष महत्व होतं, याचं कारण म्हणजे चौलच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर पसरलेलं रेवदंडा बेट. गुगल मॅप्स किंवा सॅटेलाईट इमेजेस पाहिल्यावर हा प्रकार सहजपणे लक्षात येतो. रेवदंड्याच्या उत्तरेस असलेली बागमळा येथील छोटीशी खाडी किंवा अक्षीजवळील साखरखाडी यामुळे पूर्वीचे रेवदंडा हे बेट पश्चिम किनाऱ्यापासून विलग असावे. या बेटामुळे प्राचीन चौल बंदराला वादळी हवामानापासून सुरक्षितता लाभत असणार आणि म्हणूनच चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील भरभराट पावलेले महत्वाचे बंदर! ही संकल्पना लक्षात घेतल्यावर शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना खचितच गलबतं लागत असणार हे ध्यानात येतं. थोडक्यात ही केवळ आख्यायिका न राहता त्यात सत्याचा अंश आढळून आला. यानंतर गेल्या दशकात माझ्या चौलला अनेक खेपा झाल्या. प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मला गवसला होता.

यानंतर मी एक वेगळीच कहाणी सांगणार आहे! २०१२ साली माझी पहिलीच कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ प्रकाशित झाली आणि गाजली. पाच सहा महिने त्या कौतुकाच्या ढगावर तरंगल्यावर मला पुढले वेध लागू लागले. ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी, ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या’ या मध्यवर्ती घटनेभोवती गुंफलेली आहे. नव्या कादंबरीचा विषय काय असावा हा विचार डोक्यात घोळत होता. सहजच एक वेगळा विचार सापडला, एखादी ऐतिहासिक घटना निवडण्याऐवजी एखादा ‘भूगोल’ डोळ्यासमोर घेऊन त्याचा अभ्यास करावा अशी ती कल्पना. मी ‘भूगोल’ निवडला – आफ्रिकेचा पूर्वकिनारा, मध्यपूर्वेतील आखाती देश, पाकिस्तान आणि भारताचा पश्चिम किनारा, थोडक्यात अरबी समुद्र कवेत घेणारा भूभाग. या भूगोला संदर्भातील तपशील, निगडित घटना आणि व्यक्तिमत्वं यांचा अभ्यास सुरु झाला. हे करत असतांना एक महान व्यक्तिमत्व उसळी मारून वर आलं आणि त्यानी माझा ताबा घेतला. ते व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण!

महाभारतकालीन संदर्भांचा अन्वयार्थ लावताना लक्षात आलं की अंतसमयी श्रीकृष्णाचं वय सुमारे एकशे चौदा असावं! कथा कादंबऱ्यांतून श्रीकृष्णाची महती, जीवित कार्य ठाऊक होतं. एका अर्थानं श्रीकृष्ण म्हणजे भारतीय सारस्वत संस्कृतीच्या संचिताचा विश्वस्त. त्याच्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण घटनांची मालिका आहे, नव्हे त्यातील अनेक घटनांचा तो कर्ता करविता होता. आणखी एक लक्षात आलं ते म्हणजे, अंतसमयी दुर्दैवानं यादवांमध्ये माजलेलं यादवी अराजक आणि चौदा पंधरा मुलं असूनही सुयोग्य वारसदार नसणं! दैदिप्यमान आयुष्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी श्रीकृष्णाची शोकांतिका अंगावर येणारी होती. श्रीकृष्ण म्हटल्यावर अनेक प्रतिमा आपल्या नजरेसमोर येतात, ‘माखनचोर’ अवखळ बाळकृष्ण, गोपिकांमध्ये रमणारा रोमँटिक ‘मुरलीधर’ आणि कुरुक्षेत्रावर हतोत्साही अर्जुनाला गीतोपदेश करणारा ‘तत्वज्ञ’. परंतु पांढऱ्या पापण्या, पांढरे केस, असंख्य सुरकुत्यात दडलेले डोळे, विकलांग जराजर्जर अशी वृद्ध श्रीकृष्णाची प्रतिमा आपल्या अजिबात ओळखीची नाही. या वारसदार नसलेल्या वृद्ध विश्वस्त श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वानं मला झपाटून टाकलं आणि हीच ‘विश्वस्त’ कादंबरीची पायाभूत संकल्पना ठरली.

‘लॉक ग्रिफिन’चा अनुभव पाठीशी असल्यानं नवीन कादंबरीची सुरुवात करतांना मी निर्धास्त नसलो तरी भेदरलेला नव्हतो. माझ्यासाठी कादंबरी हे प्रकरण एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसारखं होतं. न थकता अनेक संदर्भांचा अभ्यास आणि पाठपुरावा करणं, कथानकाचा आरंभ आणि शेवट सुरुवातीसच ठरवणं आणि मग कथानकाचा आकृतिबंध प्लॅन करणं. लौकिक अर्थानं आयआयटी इंजिनीयर असून  देखील इंजिनीयरिंगला रामराम ठोकल्याबद्दल माझ्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. परंतु कादंबरी लेखनासंदर्भात मला इंजिनीयरिंगचा खूप फायदा झाला. कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांचा इतिहास आणि जडणघडण, विविध घटना आणि घटनास्थळं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. या सर्वच विषयांचा सखोल अभ्यास, आकृतिबंधासाठी Excel Sheetचा वापर मी कसोशीनं करतो. कथानकाचा रसरशीतपणा, घटनाक्रमाचा वेग आणि थरार रंगवण्यासाठी या साऱ्याचा मला खूप फायदा झाला/होतो.

‘विश्वस्त’ कादंबरीत द्वारका, चौल आणि शूर्पारक या प्राचीन, समृद्ध आणि प्रसिध्द बंदरांना विशेष महत्व आहे. संशोधन, अभ्यास या निमित्तानं माझ्या गुजरातला सात/आठ वाऱ्या झाल्या, त्यात द्वारकेस मी तीनदा भेट दिली. ‘शूर्पारक’ विषयाचा अभ्यास करतांना असं लक्षात आलं की शूर्पारक म्हणजेच आजचं नालासोपारा! फार पूर्वी ‘मॅफ्को’ मध्ये काम करत असताना प्रदीप हातोडे नावाचा सहकारी वसईहून येत असे अशी आठवण झाली. एव्हाना तो अर्थातच रिटायर झालेला, म्हणूनच त्याचा पत्ता शोधणं जरा जिकिरीचं होतं. जुन्या चार/पाच मित्रांकडे चौकशी केल्यानंतर त्याचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. प्रदीप आणि इतर काही ओळखीच्या मंडळींमुळे मनीष म्हात्रे या तरुणाचा पत्ता गवसला. त्या भेटीत मनीषची छान ओळख, गप्पा झाल्या पण त्याच्या सोबतीनं नालासोपारा परिसरात नीटसं भटकता आलं नाही. मनीष हा खास वसईप्रेमी आणि चिमाजी आप्पांचा भक्त. तो अधूनमधून वृत्तपत्रात लेखनही करत असतो. त्याच्याकडे वसई ते अर्नाळा या भागातील ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे. ‘पुढल्या वेळेस नक्की वेळ काढून येतो!’ असं आश्वासन देऊन मी निघालो, परंतु माझ्या डोक्यात प्राचीन शूर्पारक बंदराचा इतिहास घोळत होता.

त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर म्हणजे २०१५साली नालासोपाऱ्याला जाण्याचा योग आला. आम्ही आदल्या रात्री वसईतील हॉटेलात मुक्काम केला. सकाळी लवकरच मनीषला वाघोली गावातील नाक्यावर भेटायचं ठरलं. माझा सहकारी निर्मल खरे तेव्हा माझ्यासोबत होता. आम्ही वाघोली नाक्यावर जरा लवकरच पोचलो. हातात वेळ होता म्हणून त्या गावातील प्रसिध्द शनिमंदिर पाहून आम्ही पुन्हा नाक्यावर आलो. नाक्यावरचा वडेवाला सकाळचा पहिलाच घाणा बाहेर काढत होता. त्याच्याकडील चवदार बटाटवड्याचा आस्वाद घेत असताना मनीष आला. तो स्कूटरवर तर त्याच्या मागोमाग आम्ही गाडीत अशी आम्ही पुढील सुमारे तीन तास मनसोक्त भटकंती केली. सोपाऱ्यातील बुरुड डोंगराच्या उत्खननातून १८८२ साली सापडलेला बौद्ध स्तूप पाहिला. इथून सम्राट अशोकाची कन्या, संघमित्रा सोपारा (शूर्पारक) बंदरमार्गे श्रीलंकेत बौध्दधर्माचा प्रसार करण्यास श्रीलंकेस गेली असा इतिहास आहे. सुमारे तेवीस शतकांपूर्वीची ही गोष्ट! नंतर निर्मळक्षेत्र येथील शंकराचार्य मंदिर पाहिलं. इथे जगन्नाथपुरीच्या शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांची समाधी आहे. सोपाऱ्यातील चक्रेश्वर तलावाजवळील चक्रेश्वर मंदिर पाहिलं. याच देवळाच्या बाहेर एका पत्र्याच्या शेडखाली ब्रह्मदेवाची पुरुषभर उंचीची सुंदर उपेक्षित मूर्ती आहे. १८व्या शतकात जवळच असलेल्या ‘गास’ गावातील एका तलावात ही मूर्ती सापडली. साऱ्या भारतात ब्रह्मदेवाची मंदिरं विरळाच! असं असूनही ही देखणी मूर्ती आजही वाळीत टाकल्याप्रमाणे चक्रेश्वर मंदिराबाहेर उभी आहे.

या भटकंतीत मनीषनी अनेक कहाण्या सांगितल्या. आम्ही तिथून पुढे गुजरातला जाणार होतो, त्यामुळे आम्हाला घाई होती.  पण केवळ मनीषच्या आग्रहामुळे आम्ही गिरिझ गावातील हिराडोंगर पहायला गेलो. हिराडोंगर ही जेमतेम दोनएकशे फुटांची टेकडी. चिमाजी आप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेस म्हणजे १७३८ साली याच डोंगरावर टेहेळणीसाठी बांधलेला छोटासा ‘वज्रगड’ नावाचा किल्ला होता. आजकाल हा भाग ‘खाजगी मालमत्ता’ असल्याकारणानं किल्ल्याचे अवशेष गायब होत आले आहेत. महाराष्ट्रात ऐतिहासिक स्थळं ‘खाजगी मालमत्ता’ कशा होतात हे एक गौडबंगाल आहे! हिराडोंगरावर एक लोकप्रिय दत्तमंदिर आहे. वसई परिसरातील शिल्पकार सिक्वेरा बंधू यांनी ही दत्ताची अतिशय देखणी लाकडी मूर्ती घडवली अशी याची कहाणी. या मूर्तीचे डोळे अत्यंत जिवंत भासतात. हिराडोंगर हा या भेटीतील शेवटचा टप्पा होता. देवळाबाहेरील उत्तरेकडील दगडी भिंतीवर बसून मी सारा आसमंत न्याहाळत होतो. उत्तरेकडे दिसणाऱ्या वैतरणा नदीचं पात्र पहात असताना माझ्या डोक्यात एक भन्नाट विचार डोकावला!

हिराडोंगरावरून दक्षिणेकडे वसईची खाडी दिसते. पश्चिमेकडे अरबी समुद्र तर वायव्येकडील बेटावर अर्नाळ्याचा किल्ला आणि उत्तरेला दिसणारी वैतरणा नदी. पूर्वेकडे तुंगारेश्वराची डोंगर रांग तर उत्तरेकडे समोरच खाली पसरलेलं, इमारतींच्या जंगलात हरवलेलं सोपारा गाव दिसत होतं. सोपारा गावाला म्हणजेच पूर्वीच्या ‘शूर्पारका’ला कुठेही समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्श होत नाही! मला अचानक चौल आठवलं. मी पुनःपुन्हा सारा आसमंत निरखून पहात होतो. समोरच्या चित्रात मला स्पष्टपणे ‘मडफ्लॅट्स’ दिसत होते. याचाच अर्थ असा की वैतरणेच्या मुखाशी अर्नाळा बेट/किल्ला, मग दक्षिणोत्तर पसरलेले ‘नाळा’, ‘राजोडी’ बेट, त्याच्या पूर्वेला ‘मडफ्लॅट्स’ आणि त्याच्याही पूर्वेकडील भूभागावर सोपरा म्हणजेच ‘शूर्पारक’ असणार! पश्चिमेकडील बेटामुळे वादळी हवामानापासून सुरक्षितता आणि वैतरणेतून किंवा वसईच्या खाडीतून या बंदराला पोचता येत असणार. चौल येथील भौगोलिक रचनेचं हे जणू प्रतिबिंब होतं. गेल्या काही सहस्र वर्षांत समुद्राची पातळी २५/३० फुटांनी वाढली आहे असं वाचल्याचं आठवलं. डोक्यात अनेक विचार, सिध्दांत यांची सरमिसळ झाली होती, पण हळुहळू संगती लागू लागली. एकीकडे मी तुटक वाक्यात, उत्साहाच्या भरात निर्मल आणि मनीषला ते सारं सांगत होतो, तर दुसरीकडे माझं मन ‘युरेका’ म्हणत आनंदानं नाचत होतं.

मी परत आल्यावर माझा अभ्यास सुरूच राहिला. मी अनेक संदर्भ तपासले. सोपाऱ्यातील बौध्द स्तूप, तेथील उत्खनन आणि ‘मडफ्लॅट्स’चे पुसट उल्लेख हाती लागले. द्वारका, शूर्पारक बंदरं आणि युरोप व मध्यपूर्वेशी असलेला प्राचीन व्यापार हे विषय माझ्या ‘विश्वस्त’साठी जिव्हाळ्याचे होते. इतिहास संशोधक आणि लेखक यात फार मोठा फरक आहे. संशोधकांसाठी पुरावे, साधने खूप महत्त्वाची. त्यांना केवळ एक पुरावा असून चालत नाही, तर विविध स्रोतांतून तोच सिध्दांत समोर येत असेल, तरच ते खूप जपून निष्कर्षाकडे सरकू शकतात. अर्थातच याला अनेक वर्षे लागू शकतात. मी लेखक होतो/आहे आणि म्हणूनच कल्पनाविस्तार, कल्पनाविलास हे माझं विशेष जन्मसिध्द स्वातंत्र्य होतं! मला नालासोपाऱ्याला सापडलेला खजिना बहुमोल होता आणि त्याचा ‘विश्वस्त’च्या कथानकात फार मोठा चपखल सहभाग होता. मला गवसलेले पुरावासदृश संदर्भ माझ्या कल्पनाविस्तारासाठी पुरेसे होते. पुरातत्व संशोधन हे शास्त्र आहे आणि त्यांची कठोर शिस्त मला पटते आणि मी त्याचा सन्मानच करतो. संशोधक मंडळी त्यांच्या विषयात थोर असतात, पण अनेकदा अश्या थोर मंडळींचं आपापसात फारसं पटत नाही. मला वाटतं कमीअधिक फरकानं हे साऱ्याच क्षेत्रात आढळतं! पण हीच मंडळी सुजाणपणे एकत्र आली तर क्रांतिकारक नवीन संकल्पना/संशोधन जन्माला येऊ शकेल असं माझं बाळबोध प्रामाणिक मत आहे.

हिराडोंगरावर उभं असतांना अचानक माझ्या डोळ्यासमोरचं चित्र धूसर होऊ लागलं, मोठी शिडाची गलबतं वैतरणेतून शूर्पारक बंदराकडे येत असलेली दिसू लागली!

“विजयकेतू गलबताचा सरखेल, वज्रसेन तशाही परिस्थितीत निर्धाराने शूर्पारक बंदराकडे निघाला होता. त्याने तसे वचन भगवान श्रीकृष्णाला दिले होते!

अनामिक अंतःस्थ वेदनेने करकरणारे दोरखंड आणि गलबताची कचकचणारी निर्जीव लाकडे, एखाद्या मुक्या प्राण्यागत अबोलपणे विव्हळत होती. गलबतावरील नऊ जणांना खवळलेल्या सागराने कधीच गिळंकृत केले होते! गलबत धडपडत शूर्पारक बंदराच्या आडोशाला, दगडी कठड्याला धाड्कन आवाज करत कसेबसे येऊन टेकले. काठावरून फेकल्या गेलेल्या दोरखंडांनी बांधून घेत गलबत सुरक्षित करण्यात आले. थकला–भागलेला वज्रसेन धक्क्यावर उतरून खलाशांना आणि बंदरावरील कामगारांना घोंगावणाऱ्या वाऱ्यातही शोष पडलेल्या कंठाने भसाड्या आवाजात ओरडून वेगवेगळ्या आज्ञा देत होता.”

‘विश्वस्त’ कादंबरीतील एक थरारक प्रसंग आकार घेत होता. इतिहास, भूगोलासारखे नीरस रुक्ष विषय एकत्र आले की ऐतिहासिक भूगोल जिवंत होत तुमच्या समोर येतो! तुमच्यातील चौकस कुतूहलाला आव्हान देतो. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणत तुमच्या प्रतिभेला विविध कल्पनांचे धुमारे फुटू लागतात!

  • वसंत वसंत लिमये
Standard

दोन हिमालय

तसा मी हिमालयाच्या सावलीत अनेकदा वावरलेला माणूस! १९७६ साली हिमालयात गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी प्रथमच गेलो आणि हिमालयाच्या मी प्रेमात पडलो. त्याच सुमारास आणखी एका हिमालयाची ओळख झाली आणि लवकरच त्या ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. अभिनय क्षेत्रातील त्या महान कलाकाराचं, हिमालयाचं दुसरं नाव म्हणजे डॉ. श्रीराम लागू! १७ डिसेंबर २०१९ रोजी ते कालवश झाले. काही ओळखी, मैत्र का घडतं हे मला नेहमीच पडणारं कोडं! ४०/४५ वर्षात डॉक्टरांचा अकृत्रिम स्नेह मला मिळाला हे माझं थोर भाग्य.

आमची उंची साधारणपणे सारखीच, पण त्यांच्या सोबत असतांना, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे सुरवातीस एक दडपण येत असे. पेशानं डॉक्टर पण एका आंतरिक उर्मीनं आयुष्याच्या उत्तरार्धात ते अभिनयाकडे वळले आणि त्यांनी उपजत गुण आणि अथक परिश्रमांच्या सहाय्याने अभिनयाचा एक मानदंड उभा केला. स्वच्छ गोरा वर्ण, सुस्पष्ट वाणी, आवाजाची उत्तम फेक, काळजाचा ठाव घेणारी भेदक घारी नजर आणि थक्क करणारी देहबोली. साहजिकच त्यांच्या सोबत असताना हिमालयाच्या सावलीत असल्याचा भास होत असे.

डॉक्टरांचं वाचन अफाट होतं. विचारांची सुस्पष्टता असलेला कठोर बुध्दीप्रामाण्यवादी, पण तरीही अतिशय संवेदनशील माणूस! त्यांच्याकडे अभिनयातील कमावलेली शिस्त होती, अनेकदा त्यांचे सहकलाकार त्यामुळे वचकून असत. आवाजाच्या रियाजासाठी रोज दोन तास काढणारे डॉक्टर मला आठवतात. उध्वस्त धर्मशाळा, हिमालयाची सावली, नटसम्राट, सामना, सिंहासन, दुभंग, आत्मकथा असं काय काय तरी आठवतं. त्यांचा अभिनय पाहणं ही एक पर्वणी असे. ते मुंबईहून पुण्याला स्थलांतरित झाल्यावर अनेकदा गाठीभेटी होत असत. एवढा मोठा माणूस पण कुठेही गर्व किंवा दंभ याचा लवलेश नसे. कधी अस्वस्थ असतांना मी सहज उठून डॉक्टरांकडे जात असे. ‘ये बाळ्या, ये!’ असं अगत्यपूर्वक स्वागत होत असे. प्रेमळ बापाच्या छायेत असल्याचा भास होत असे. मनातली जळमटं दूर होऊन मी नव्या उत्साहाने बाहेर पडे. त्यांच्या सहवासात मला गंगास्नान घडल्याचा अनुभव येत असे.

. ‘लमाण’ हे त्यांचं आत्मचरित्र वाचत असतांना, काही ओळी उन्मेखून लक्षात राहिल्या. डॉक्टरांनी टांझानियातील ‘किलिमांजारो’ शिखर सर केल्यावर त्या उत्तुंग ठिकाणी त्यांच्या मनातले भाव –

“आणि आत एक आवाज उमटला. निःशब्द गाभार्‍यातल्या घंटानादासारखा स्वच्छ, नितळ, खणखणीत, आत्मविश्वासाने भारलेला.

डिसेंबर १९६८ अखेर मी भारतात परतेन तो व्यावसायिक डॉक्टर आणि हौशी नट म्हणून नव्हे तर व्यावसायिक नट आणि हौशी डॉक्टर म्हणून!” 

गेल्या अनेक वर्षात डॉक्टरांच्या रूपाने ‘नटसम्राट’, हिमालय आणि उत्तुंग व्यक्तिमत्व अशी मनात ठसलेली प्रतीकं मला नतमस्तक करतात. शेवटाकडे त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत गेली. आधी फिरायला, मग नुसतेच बसायला ते ARAIच्या टेकडीवर जात असत, त्यांच्या आवडत्या बाकावर! शांत तेवणारी ज्योत मंद होत आली होती पण माझं मन ते मान्य करायला कचरत होतं. १७ डिसेंबर २०१९ रोजी डॉक्टर गेले. धक्का नसला तरी भयानक पोकळी जाणवत होती. “Dust thou art, and unto dust shalt thou return!” म्हणजेच ‘मातीतून मातीकडे’ असा भावार्थ असलेल्या या बायबल मधील ओळी डोक्यात रेंगाळत होत्या.

डॉक्टरांना अंधश्रध्दा अमान्य होती, तर अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामात ते अग्रेसर होते. मी त्यांच्या अस्थींचा अंश मिळवला. त्यांच्या अस्थी, त्यांचे विचार, मी काहीसा अडखळलो. मला खात्री आहे की त्यांना अंधश्रध्दा अमान्य असली तरी श्रध्देला त्यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नव्हतं. संस्कृतीच्या कालप्रवाहात मागचे पुढच्यांशी जोडले जातात. पूर्वसुरींचे विचार निश्चितच महत्त्वाचे परंतु या शृंखलेत दोन कड्या एकमेकांशी जुळतात आणि यात भावना, श्रद्धा यांचा अतूट ऋणानुबंध असतो. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक वृक्ष त्यांच्या आवडत्या जागी, म्हणजेच ARAI च्या टेकडीवरील बाकाशेजारी लावावा अशी कल्पना मनात आली. पर्यावरण तज्ञ श्री. द. महाजन यांच्या सल्ल्यानं शिरीषाचा वृक्ष लावावा असं ठरलं. त्यांचे नातेवाईक, अनेक चाहत्यांच्या प्रयत्नातून १९ जानेवारी २०२० रोजी ती कल्पना प्रत्यक्षात आली आणि त्यांच्या अस्थींचा एक अंश त्या स्मृतिवृक्षाच्या मुळाशी मातीत मिसळला. अर्थातच भावी पिढ्यांसाठी एका महान कलाकाराचे, डॉक्टरांचे हे एक जिवंत स्मारक ठरेल अशी मला खात्री आहे.

मी, हिमालय आणि डॉ. श्रीराम लागू असं प्रतीकात्मक नातं माझ्या मनात ठामपणे होतं. म्हणूनच अस्थींचा उर्वरित अंश हिमालयात गंगोत्री येथे विसर्जित करावा अशी प्रबळ इच्छा होती. जानेवारी महिन्यात गंगोत्री परिसर पूर्णपणे हिमाच्छादित असतो. अक्षय्य तृतीयेला हिम पूर्णपणे वितळल्यावर, गंगोत्रीसह इतर मंदिरांचे ‘पट खुलतात’ आणि चार धाम यात्रेचा मौसम सुरू होतो. या वर्षी २६ एप्रिलला अक्षय्य तृतीया होती, म्हणून मी प्रवासाची जय्यत तयारी केली. दुर्दैवाने करोनाच्या महासंकटामुळे त्या बेतावर पाणी फिरलं. मग मात्र मी उत्तराखंड पुन्हा कधी ‘खुलं’ होतंय याची वाट पहात होतो!

१०/१२ मोहिमा, ४०/५० ट्रेक या निमित्ताने हिमालयात अनेक वाऱ्या झाल्या. साहजिकच गढवाल/उत्तराखंड या भागात अनेक मित्रमंडळी आहेत. ‘साब, अब आप आ सकते हो!’ असा हर्शिलहून माधवेंद्र रावतचा निरोप आला आणि मी लगेच विमानाची तिकीटं, ऋषिकेशहून भाड्याची गाडी अशी सर्व तयारी तातडीनी केली. एकीकडे डॉक्टरांना आदरांजली आणि दुसरीकडे हिमालयाचं निकट दर्शन होणार यामुळे मी उत्साहात होतो. निघण्यापूर्वी, चारच दिवस अलीकडे दिलीप लागूचा फोन आला, ‘बाळ्या, मी येऊ का तुझ्या बरोबर?’ दिलीप हा डॉक्टरांचा पुतण्या, माझी हरकत असण्याचं काहीच कारण नव्हतं. मी लगेच रुकार दिला. मीही विज्ञानवादी, बुध्दीप्रामाण्यावर विश्वास ठेवणारा त्यामुळेच कुठलीही धार्मिक कारणं मा‍झ्या मनात नव्हती. हिमालय आणि डॉक्टर ही आम्हा दोघांसाठी प्रिय श्रध्दास्थानं! मुंबईहून थेट फ्लाईटने डेहराडून येथे पोचून १० ऑक्टोबरला आम्ही गंगोत्रीकडे मार्गस्थ झालो देखील!

आमच्या चक्रधर महाराजांनी, ‘हमे रास्ता बिलकुल पता है, आप चिंता मत करो!’ असा गुटक्याचा तोबरा भरलेल्या तोंडानं हवाला दिला आणि आमच्या नकळत चुकीच्या रस्त्यानं आम्ही यमुनाकिनारी पोचलो! मागे फिरण्यात आणखी वेळ गेला असता म्हणून मग यमुना दर्शन करत बडकोट मार्गे खूप उशिरा उत्तरकाशीच्या अलीकडे मुक्काम केला. आमच्या वेळापत्रकाची पूर्ण काशी झाली होती! मात्र चिडचिड शांत करणारा गारवा आणि भागीरथीचा अखंड खळाळ रात्री सोबतीला होता. पहाटे लवकरच आम्ही हर्शिलकडे निघालो. उत्तरकाशीत ‘भंडारी’ हॉटेल जागं व्हायचं होतं म्हणून बसस्टँड समोरील टपरीत फॅन बिस्कीट आणि बंद आमलेट असा नाश्ता केला. ऍडव्हान्स कोर्स, अनेक मोहिमा, ‘भंडारी’ आणि बंद आमलेट अश्या अनेक स्मृती जागवत आम्ही मार्गस्थ झालो. वाटेत मनेरीपाशी ‘खेडी’येथे जल विद्युत केंद्रातून बाहेर पडणारा दमदार जल स्त्रोत वाऱ्यासोबत उडणाऱ्या तुषारांनी साऱ्या रस्त्याला अभ्यंग स्नान घडवत होता! हर्शिलमध्ये माधवेंद्र आणि जुना कुक ग्यान यांच्या सोबत चहा घेतला. उगमानंतर भागीरथी प्रथमच एका विस्तृत खोऱ्यातून वाहू लागते. हर्शिलच्या ‘पहाडी राजा विल्सन’ची आठवण झाली. समोर श्रीकंठ पर्वतरांग, टेकडीआड दडलेला आर्मी कँप आणि दूरवर दिसणार्‍या मुखबा गावातील गंगा मंदिर दिसत होतं. हिवाळ्यात गंगोत्रीची ‘गंगा’ मूर्ती माहेरपणाला याच मंदिरात येते आणि अक्षय्य तृतीयेला पुन्हा गंगोत्रीला परत जाते. त्या अद्भुत शीतल वातावरणात ‘करोना’, घरचे व्याप, कामं आणि कटकटी कधीच विरून गेल्या होत्या. सभोवार पसरलेलं देवदाराचं घनदाट जंगल, त्यामागून डोकावणारी स्वर्गीय चमकदार हिमशिखरं, मंदिरातून ऐकू येणारा अस्पष्ट घंटानाद, अंतर्बाह्य सचैल स्नान घडून शुचिर्भूत झाल्यागत वाटत होतं.

लंका भैरवघाटीपाशी खोल दरीतून वाहणाऱ्या जडगंगेवरील पूल लागून गेला. या रस्त्यावरून दिमाखदार श्रीकैलास आणि सुदर्शन या हिमशिखरांचं मनोहारी दर्शन घडतं. यात्रा सुरू होऊनदेखील गंगोत्रीत आश्चर्य वाटण्या जोगी फक्त तुरळक गर्दी होती. मंदिरापाशी उजवीकडील पायऱ्या उतरून आम्ही भागीरथीच्या प्रचंड खळाळ असलेल्या पत्रापाशी पोचलो. मनात असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या. डॉक्टरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे आणि गाढ अकृत्रिम स्नेहामुळे मी निश्चितच समृध्द झालो आहे. सरस्वती लुप्त झाल्या नंतर, उत्तर भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या, सारस्वत संस्कृतीचं, पावित्र्याचं प्रतीक असलेल्या गंगेच्या उगमापाशी आम्ही होतो. डॉक्टरांच्या स्मृतीचा अंश मी त्या खळाळत्या प्रवाहात विसर्जित केला. प्रखर विचारी धवल हिमशिखरा प्रमाणे अचल व्यक्तित्व, प्रेमळ कोमल हात आणि आश्वासक स्वर, डॉक्टरांची स्मृती नेहमीच माझ्या मनात नेहमीच जिवंत राहील. नकळत माझ्या डोळ्यात पाणी होतं, मी ते पुसण्याचा प्रयत्नही केला नाही. आज मी दोन हिमालायांच्या सावलीत केवळ नतमस्तक होतो.

-वसंत वसंत लिमये  

Standard

साहसी उपक्रम धोरण आणि संभ्रम

पावसाळ्याचे दिवस, आमच्या एका डोंगरी मित्राच्या घरी आम्ही सारे जमलो होतो. १६ ऑगस्ट, गुरुवार २०१८. सगळ्यांच्याच मनात एक गोंधळ, चिडचिड आणि अस्वस्थता होती, पण त्याचबरोबर ‘काहीतरी केलंच पाहिजे’ असा उत्साह होता! विषय होता साहसी खेळा संदर्भात जाहीर झालेला शासकीय निर्णय (GR)! २६ जून २०१४ साली पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे पहिला GR आला. या निर्णयाला रिट पिटीशनद्वारे आव्हान देण्यात आलं आणि मुंबई हायकोर्टाने या शासकीय निर्णयाला सप्टेंबर २०१४ मध्ये स्थगिती दिली. शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने अचानक २६ जुलै २०१८ रोजी नवीन GR निर्गमित केला. हे दोन्ही GR सदोष व अव्यवहार्य असल्याने साऱ्यांच्याच मनात गोंधळ, चिडचिड आणि अस्वस्थता होती. गेल्याच आठवड्यात शासनाच्या पर्यटन विभागाने ‘साहसी उपक्रम धोरणा’चा मसुदा जाहीर केला. याबाबत साऱ्याच साहसी क्षेत्रात खळबळ आणि गोंधळ माजल्याचं जाणवतं आहे.

महाराष्ट्रात विविध साहसी उपक्रमांचे आयोजन गेली सुमारे सात दशके चालू आहे. यात कार्यरत असलेल्या विविध संस्था आणि क्लब्ज आपापल्या परीने सुरक्षेची काळजी घेत असत. सुरक्षा विषयक काळजी घेण्याचं भान ज्येष्ठांकडून नवोदितांना, गुरु-शिष्य परंपरेप्रमाणे अनौपचारिक रित्या मिळत असे. साहसी उपक्रमा संदर्भातील साहित्य, फिल्म्स आणि इंटरनेट यामुळे गेल्या २० वर्षात सारेच साहसी उपक्रम अफाट लोकप्रिय झाले. क्लब्ज व्यतिरिक्त व्यावसायिक संस्था आणि व्यक्ती या क्षेत्रात हिरीरीने उतरल्या. दुर्दैवाने सुरक्षेचे भान कमी होऊ लागले आणि अपघातांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. निसर्गाच्या ऱ्हासाचे प्रमाण भयानक रित्या वाढले. (प्लास्टिक, कचरा, बाटल्या इत्यादी.) साहसी क्षेत्रात आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमन करणे आत्यंतिक गरजेचे भासू लागले. अनेक बेजबाबदार व्यक्ती, प्रवृत्ती आणि संस्था या क्षेत्रात बोकाळू लागल्याने प्रामाणिकपणे साहसी उपक्रम राबविणाऱ्या सर्वांवरच याचा ठपका येऊ लागला. आज साहसी क्षेत्रात नियमन असावे याबद्दल कुणाचेच दुमत असू नये. हे नियमन एकट्या दुकट्याने करणे अशक्य आणि म्हणूनच ही जबाबदारी शासनाची आहे.

पहिला GR पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, दुसरा GR शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आणला, आणि आत्ताचा GRचा मसुदा पर्यटन विभागाने प्रसिद्ध केला आहे. सुरक्षा नियमावलीची आणि नियमनाची जबाबदारी शासनाची असल्याचे मान्य केल्यावर, हे काम शासनाच्या कुठल्या विभागाने करावे हा निर्णय सर्वस्वी शासनाचाच असणे स्वाभाविक आहे. नेपाळ, आपले केंद्रीय पर्यटन मंत्रालय, तसेच उत्तराखंड, हिमाचल, केरळ इत्यादी राज्यांच्या पर्यटन विभागाने सुरक्षा नियमनाची जबाबदारी स्वीकारली आहे. सध्याचा मसुदा पर्यटन विभागाने जारी केला म्हणून सारे साहसी उपक्रम म्हणजे ‘पर्यटन’ असा अर्थ लावणे चुकीचे आहे. श्री. संदीप परांजपे यांनी बारकाईने अभ्यास करून सध्याच्या मसुद्यातील ‘साहसी पर्यटन’ असा चुकीचा उल्लेख पान क्रमांकासह शासनाच्या निदर्शनास आणून दिला आहे. विविध साहसी उपक्रम ‘खेळ, क्रीडा’ असण्याबद्दल संदिग्धता आहे. (गिर्यारोहण हा क्रीडा प्रकार आहे किंवा नाही याबद्दल ९०च्या दशकात रंगलेला वाद मला आठवतो. याचा विशेष संबंध क्रीडा खात्यातर्फे मिळणाऱ्या पुरस्कारांशी होता. २०१४ नंतर, आजही हे पुरस्कार क्रीडा खात्यातर्फे दिले जातात आणि पुढेही दिले जाऊ शकतात आणि याचा संबंध नियमनाशी जोडणं गैर आहे.) ‘साहसासाठी साहस’ करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था, म्हणजेच गिर्यारोहण, प्रस्तरारोहण मोहिमा सध्याच्या GRच्या व्याप्तीत/कक्षेत येत नाहीत, आणि अशी गल्लत करणे चुकीचे आहे. हा GR साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्यांसाठीच लागू आहे.

सध्याचा ‘साहसी उपक्रम धोरण’ २६७ पानी मसुदा (मराठी) वाचून, तपासून सूचना/हरकती पाठविण्यासाठी केवळ तीन आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. मसुद्याचा बारीक टाईप आणि २६७ पाने लक्षात घेता हा कालावधी अवास्तव असून तो कमीत कमी एक महिन्याने वाढविणे गरजेचे आहे. या मसुद्या मागील शासनाचा उद्देश आणि प्रयत्न प्रामाणिक असून कौतुकास्पद आहेत. तरीही सध्याचा मसुदा सदोष असल्याचे नमूद करावेसे वाटते. एकंदर मसुदा पाहिल्यास त्याचे दोन भाग पाडता येतील. पहिली ९ पानं नियमन प्रणाली मांडतात तर पुढील २५८ पाने विवक्षित उपक्रमांसाठी सविस्तरपणे सुरक्षा नियमावली विशद करतात. सुरुवातीस आपण नियमन प्रणालीकडे पाहूया.

सध्याच्या साहसी उपक्रम धोरणानुसार २०१८ साली जाहीर झालेला सदोष आणि अव्यवहार्य GR अधिक्रमित (रद्द) करण्यात आला आहे. मसुद्यातील प्रस्तावनेत या विषयाचा २००६ पासूनचा इतिहास मांडण्यात आला आहे. २०१८ च्या GR वर केलेल्या रिट पिटीशनबाबत निकाल देतांना, मुंबई हायकोर्टाने याचिकाकर्ते व MACला हा विषय खूप तांत्रिक बाबींवर आधारित असल्याने एक सविस्तर सादरीकरण शासनास देण्याचा आदेश दिला. १ ऑक्टोबर २०१९ मध्ये MAC तर्फे ६५७ पानांचे सादरीकरण क्रीडा व पर्यटन विभागास सादर करण्यात आले. या सादरीकरणाची सुनावणी अतिरिक्त मुख्य सचिव (क्रीडा) यांच्या अध्यक्षतेखाली प्रधान सचिव (पर्यटन) यांच्या समवेत घेण्यात आली. या सादरीकरणात MAC तर्फे सुरक्षा नियमावली व प्रणाली सविस्तरपणे मांडण्यात आली होती. पर्यटन विभागाने केंद्रीय मंत्रालयाने शिफारस केलेल्या ATOAIची (Adventure Tour Operators of India) आणि MACची सुरक्षा नियमावली शिवाय BIS व ISO मानकांशी मेळ घालून, तसेच इतर तज्ञांच्या सहाय्याने जमीन, हवा, पाणी अश्या माध्यमातील साहसी उपक्रमांसाठी विस्तृत नियमावली तयार केली. यातील प्रपत्र अ आणि इ यातील नियमावली सामायिक स्वरुपाची असून, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांच्या संचालक व वरिष्ठांसाठी या सूचनांचा अधिक उपयोग होईल. इतर तीन प्रपत्रे ब (२) – जमीन (पान ३४ ते १३४), प्रपत्र क – जल (पान १३५ ते १६९), प्रपत्र ड – हवा (पान २०८ ते २६५) ही विवक्षित साहसी उपक्रमांसाठी आहेत. यात पान नं. १७० ते २०७ हा प्रपत्र ब चा भाग ३ आहे आणि आत्ताच्या मसुद्यातील याची जागा चुकली आहे.

नियमन प्रणालीच्या पहिल्या ९ पानातच पान क्र. २ वर कुठल्या घटकांना नोंदणी करणे गरजेचे आहे हे विशद केलेले आहे. नोंदणी दोन टप्प्यात होणार असून पहिला टप्पा म्हणजे तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र आणि दुसरा टप्पा हा अंतिम नोंदणी प्रमाणपत्राचा आहे. नोंदणी बंधनकारक असणाऱ्या आठ घटकांची यादी देण्यात आली आहे. साहसी उपक्रम आयोजित करणारे सर्व घटक यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. निसर्ग सहली, दुर्ग संवर्धन उपक्रम आणि ऐतिहासिक सहली आयोजित करणारे घटक यात समाविष्ट करावे असे वाटते. यात कुठेही गिर्यारोहण, प्रस्तरारोहण मोहिमा तसेच स्पोर्ट्स क्लायंबिंग याचा समावेश नाही! कुणीही व्यक्ती, संस्था साहसी उपक्रमाचे आयोजन करत असेल तर त्यांनी नोंदणी करणे बंधनकारक आहे. यात सशुल्क व विनाशुल्क (वर्गणीद्वारे आयोजित केलेले) उपक्रम अंतर्भूत आहेत. खाजगी ग्रुप अथवा व्यक्ती आपल्या हिमतीवर साहसी उपक्रमांसाठी निसर्गात जाऊ शकतात आणि त्यांना नोंदणी बंधनकारक नाही. अश्या लोकांनी सुरक्षा नियमावलीचा मार्गदर्शक सूचना म्हणून वापर करावा अशी शिफारस आहे. पान ३ वर दिलेल्या तात्पुरत्या नोंदणीसाठी लागणाऱ्या कागदपत्रांच्या यादीतील क्रमांक १ – संस्था/कंपनी नोंदणी प्रमाणपत्र आणि क्रमांक ४ – गुमास्ता परवाना ज्यांना लागू असेल त्यांनीच ती कागदपत्रे जोडावयाची आहेत. हा मुद्दा प्रस्तुत मसुद्यात अधिक स्पष्टपणे मांडणे गरजेचे आहे. सदर अर्ज अधिकृत आणि जबाबदार व्यक्तीनेच करावयाचा आहे. वरील कागदपत्रे विहित नमुन्यातील अर्ज व रु.१०००/- सह ऑनलाईन सादर करावयाचे आहेत. अर्जाचा विहित नमुना सदरच्या मसुद्यात दिलेला नाही. सदर शुल्क अवास्तव व जास्त असल्याची तक्रार असू शकते. 

अंतिम नोंदणी प्रमाणपत्राचे निकष हे धोरण लागू झाल्यापासून ६ महिन्यांनी शासन प्रकाशित करणार असल्याचा मानस आहे, परंतु हे स्पष्टपणे नमूद करणे गरजेचे आहे. तात्पुरते नोंदणीपत्र सध्या कार्यरत असणाऱ्या संस्थांनी अथवा व्यक्तींनी, हे धोरण लागू झाल्यावर ६ महिन्याच्या आत प्राप्त करणे गरजेचे आहे. परंतु या संस्था/व्यक्ती त्यांचे उपक्रम सुरक्षा नियमावलीचे पालन करून चालू ठेवू शकतील. तसेच साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या नवीन संस्था/व्यक्तींना तात्पुरते नोंदणी प्रमाणपत्र मिळविल्या शिवाय उपक्रम सुरु करता येणार नाहीत. सहा महिन्यांनंतर पुढील सहा महिन्याच्या अखेरीपर्यंत सर्वांनाच नोंदणी प्रमाणपत्र मिळविणे बंधनकारक राहील. पान ३ वर सदर नियमात अधिक स्पष्टता हवी. तात्पुरत्या नोंदणी प्रमाणपत्राच्या अर्जासोबत सुरक्षा मार्गदर्शक नियमावलीचे पालन करण्याचे हमीपत्र देणे हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.

या विषया संदर्भात दोन समित्या आणि एका कार्यकक्षाचे गठन करण्यात येणार आहे. यातील राज्यस्तरीय समितीतील १२ पैकी ५, विभागीय समितीत १० पैकी ५ आणि साहसी कक्षातील ८ पैकी ५ सदस्य साहस क्षेत्रातील तज्ञ असणार आहेत, याचाच अर्थ सर्व निर्णयात साहस क्षेत्रातील तज्ञांचा सक्षम सहभाग असेल. हे तज्ञ नामिका सुचीतून घेण्यात येतील आणि ह्या नामिका सुचीसाठी निकष शासनाला जाहीर करावे लागतील.

अंतिम नोंदणीसाठी लागू केलेले शुल्क अवास्तव पध्दतीने जास्त असल्याचे क्षेत्रातील अनेकांचे म्हणणे आहे. तसेच जल व हवा या उपक्रमांसाठी एकच आयोजक विविध ठिकाणी उपक्रम अयोजित करणार असेल तर त्याला तितक्या ठिकाणांसाठी जास्तीचे शुल्क भरावे लागेल, ही अट जाचक आहे. मसुद्यातील विमा संदर्भातील पान ६ वरील तरतूदी अतिशय महत्त्वाच्या असून या क्षेत्रातील सर्वांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वागतार्ह आहेत. पान ७ वरील तपासणी आणि दंडनीय कार्यवाहीतील पात्रता, दंड आणि शिक्षा हे सारेच मुद्दे अति कठोर व जाचक आहेत आणि त्यांचा फेरविचार व्हावा.

सदर मसुद्यातील १० ते २६७ पानांवर साहसी उपक्रमांसाठी सविस्तर नियमावली आणि प्रणाली विस्तृतपणे देण्यात आल्या आहेत. इथे एक महत्त्वाचा मुद्दा मांडावासा वाटतो. सदर नियमावली आणि प्रणाली धोरणाचा भाग न करता स्वतंत्र असावी म्हणजे त्यात वेळोवेळी साहसी क्षेत्राच्या गरजेनुसार तज्ञ्यांच्या मदतीने सुधारणा करणे सुलभ होईल. आत्ताचा मसुदा ISO 21101 सारखी आंतरराष्ट्रीय मानके, BIS आणि ATOAIची नियमावली यावर आधारित आहे. सदर मसुदा अवाढव्य असला तरी त्यात सुसूत्रता, स्पष्टता आहे, तसेच विविध उपक्रमांची अचूक माहिती असून त्यामुळे सर्वांच्या जबाबदाऱ्या स्पष्टपणे अधोरेखित करण्यात आल्या आहेत. साहसी उपक्रम आयोजक, आयोजक संस्थातील संचालक, भाग घेणारे सभासद आणि पालक यांच्यासाठी या सूचना योग्य मार्गदर्शन करू शकतील. पूर्वी हे क्षेत्र मर्यादित होतं, सहभाग घेणार्‍यांची संख्या छोटी होती आणि सुरक्षिततेचं भान होतं. बाहेरून कुणाकडून करण्यात येणाऱ्या नियमनाची आपल्याला सवय नाही. या मसुद्यात अनेक सुधारणा आवश्यक आहेत. या नियमावली आणि प्रणालीत सुधारणा करण्यास वाव आहे आणि त्यासाठी सूचना/हरकती विनाविलंब शासनास कळविणे गरजेचे आहे. त्याचा बोजडपणा, क्लिष्टता कमी करावी लागेल. परंतु आधीच्या दोन्ही GRच्या तुलनेत मांडलेल्या सर्व गोष्टीत खूप तथ्य आहे, गरज आहे सुधारणांची! सुरक्षा नियमावली आणि प्रणाली यावर सविस्तर चर्चा होणे गरजेचे आहे. नियमनाला कोणाचाच विरोध असणार नाही, परंतु ही एक अप्रतिम संधी असून आपण साऱ्यांनीच शासनाच्या विरोधात न जाता शासनाला मदत करण्याची गरज आहे! हा मसुदा तयार करणाऱ्या सर्वांचे पुनश्च अभिनंदन! आपल्या सर्वांचा सहभाग म्हणजे २००६ साली प्राण गमावलेले दोघे आणि त्यांचे पालक यांना न्याय देण्यासारखे आहे. आपलेच क्षेत्र अधिक सुरक्षित आणि सक्षम करणे यासाठी खूप महत्त्वाचे आहे!

  • वसंत वसंत लिमये
Standard

को जागर्ति ?

१७ सप्टेंबर, गुरुवार संध्याकाळ. MACची मिटिंग चालली होती आणि अचानक बातमी आली, ‘अरे, शासनाचे साहसी उपक्रम धोरण जाहीर झाले!’ गेल्या सुमारे सहा वर्षांच्या खडतर वाटचाली नंतर हा खचितच आनंदाचा क्षण होता! माननीय पर्यटन मंत्री आदित्यजी ठाकरे, पर्यटन सचिव आणि पर्यटन संचालनालय यांनी उचललेले हे पाउल साहसी क्षेत्रासाठी निश्चितच अभिनंदनीय आणि उत्साहवर्धक आहे. शासनाचे हे प्रयत्न स्वागतार्ह आहेत.

२००६ साली हिमालयातील ट्रेकवर झालेल्या दोन अपघाती निधनांनंतर त्यांच्या पालकांनी सरकारवर जनहित याचिका दाखल केली. २०१२ साली मुंबई हायकोर्टाने शासनाला साहसी उपक्रमांसाठी सुरक्षा नियमावली तयार करण्याचे आदेश दिले. २०१३ साली या क्षेत्रातील काही अनुभवी तज्ञ Expert Committee म्हणून एकत्र येऊन सुरक्षा नियमावली तयार करण्याचे प्रयत्न सुरु झाले. साहसी क्षेत्राला गेल्या ७० वर्षांचा इतिहास आहे आणि यातील विविध संस्था आपापल्या परीने सुरक्षेची काळजी घेत असत. गेल्या दोन दशकात साहसी क्षेत्र वेगाने लोकप्रिय झालं. अपरिपक्व, अननुभवी लोकांचा भरणा असे उपक्रम राबवू लागला आणि साहजिकच अपघातांची संख्या लक्षणीय स्वरुपात वाढली. अपघात, पर्यावरणाचा ऱ्हास यामुळे नियमनाची आत्यंतिक गरज भासू लागली आणि हे काही एकट्या दुकट्याचे काम नाही. सुरवातीस हे नियमन शासनाच्या माध्यमातून आणि कालांतराने सुशिक्षित साहसी क्षेत्राकडून स्वयं-नियमन अशा पध्दतीने प्रत्यक्षात येऊ शकते ही वस्तुस्थिती आहे.

हे नियमन करण्याची जबाबदारी स्वेच्छेनी नसली तरी सजग पालक आणि कोर्टाच्या निर्णयामुळे शासनाला स्वीकारावी लागली. शासनाकडे या क्षेत्रातील अनुभवाची वानवा होती. Expert Committeeच्या नियमावलीचा आधार घेऊन २०१४ साली एक अपरिपक्व शासकीय धोरण (GR) जाहीर झाले. हे सदोष धोरण अमलात आणणे अव्यवहार्य आणि अन्यायकारक होते. Expert Committeeतील काही सदस्यांनी रिट पिटीशन द्वारे या धोरणाला थेट कोर्टात आव्हान दिले आणि कोर्टाने या धोरणास स्थगिती दिली. ह्याच अनुभवी, तज्ञ मंडळींनी अनौपचारिक रित्या सुरक्षा नियमावलीचे काम सुरु ठेवले. दुर्दैवाने शासनाने काही मोजक्या अनुभवी लोकांचा सल्ला घेऊन घाईने दुसरा शासकीय निर्णय जुलै २०१८ मधे अमलात आणला. हे दोन्ही शासकीय निर्णय क्रीडा विभागातर्फे निर्गमित करण्यात आले होते. पहिल्या निर्णयाच्या वेळेस लोकांच्या सूचना/हरकती मागवण्यात आल्या होत्या, परंतु दुसरा निर्णय असं काही न करता थेट अमलात आणण्यात आला. पूर्वीच्याच सजग आणि अनुभवी तज्ञ मंडळींनी,  हे सारे प्रयत्न खर्चिक असूनही पुन्हा कोर्टात धाव घेतली.

दोन्ही शासकीय निर्णयात केवळ जमिनीवरील उपक्रमांव्यतिरिक्त हवा आणि पाणी या माध्यमातील साहसी उपक्रम अंतर्भूत करण्यात आले होते. साहसी क्षेत्रात विविध संस्थांनी एकत्र येण्याचे पूर्वी झालेले प्रयत्न निष्फळ किंवा एकांगी ठरले. साहसी क्षेत्रातील बहुतेकांचा सुरक्षा व नियमनाला विरोध नव्हता, तर विरोध होता सुस्पष्टता नसलेल्या जाचक शासकीय धोरणाला होता. हे प्रयत्न सुरु होत असतांना साऱ्या साहसी क्षेत्राने एकत्र येण्याची गरज भासू लागली आणि त्यातूनच MACचा (महा अॅडव्हेंचर काउन्सिल) जन्म झाला. ही न नफा तत्वावर उभारलेली Section 8 कंपनी आहे. दुसऱ्या GR संदर्भात मुंबई हाय कोर्टाने विषय खूप तांत्रिक असल्याने याचिकाकर्ते व MACला शासनाला सविस्तर सादरीकरण करण्याचे आदेश दिले व याविषयी याचिकाकर्ते व MACचे सदस्य यांचे म्हणणे ऐकून निर्णय घेणे शासनावर बंधनकारक होते.

याचिकाकर्ते व MAC यांनी विशेष प्रयत्न करून सुमारे ६५० पानांचे सादरीकरण शासनाकडे सादर केले. सुरवातीस क्रीडा खात्याच्या प्रमुख सचिव यांच्याशी पर्यटन सचिवांसह MACची बैठक या वर्षी फेब्रुवारी महिन्यात झाली. याच बैठकीत हा विषय पर्यटन खात्याकडे सुपूर्द करण्यात आला. गेल्या सात/आठ महिन्यात पर्यटन खाते आणि MAC असा संवाद सुरू राहिला. माननीय पर्यटन मंत्री आणि पर्यटन सचिव यांनी या विषयात विशेष रस घेतल्याने कामास गती आली आणि १७ सप्टेंबर रोजी ‘साहसी उपक्रम धोरणाचा’ मसुदा जाहीर झाला. या मसुद्यावर प्रतिक्रिया/हरकती यासाठी ७ नोव्हेंबर पर्यंत वेळ देण्यात आला होता, परंतु १८ सप्टेंबर रोजी एका शुध्दीपत्राद्वारे हीच तारीख आता ७ ऑक्टोबर करण्यात आली आहे.

सदर धोरणाचा मसुदा शासकीय क्लिष्ट भाषेत २६७ पानी असून, अक्षरे अतिशय बारीक आकारात असल्याने, हा संपूर्ण वाचून, समजून त्यावर सूचना/हरकती मांडण्यासाठी १७/१८ दिवसांचा कालावधी अतिशय तोकडा आहे. हा कालावधी कमीत कमी एक महिन्याने वाढवावा म्हणजेच आधीच्या तारखेनुसार ७ नोव्हेंबर पर्यंत देण्यात यावा.

शासकीय धोरणाचे दोन भाग पडता येतील – मुख्य धोरण (९ पाने) आणि पुढील प्रपत्र अ, ब, क, ड आणि इ (पान १० ते २६७). मुख्य धोरणात काही व्याख्या अधिक सुस्पष्ट असणे गरजेचे आहे. दंडात्मक कारवाई आणि शिक्षा याविषयीची मसुद्यातील भाषा खूप कडक असून त्यातील तरतुदी जाचक आहेत. साहसी उपक्रमातील अंगभूत धोके आणि अनिश्चितता लक्षात घेता, जोपर्यंत गुन्हेगारी स्वरूपाचा किंवा हेतू पुरस्सर निष्काळजीपणा सिध्द होत नाही तोपर्यंत आयोजकांवर कुठलीही दंडात्मक कारवाई करण्यात येऊ नये असे वाटते. प्रपत्र अ, ब, क, ड आणि इ, यामधे सुरक्षा नियमावली मांडण्यात आली आहे. परंतु ह्या सर्व प्रपत्रात कुठेच अनुक्रमणिका देण्यात आलेली नाही, यामुळे ही प्रपत्रे दुर्बोध आणि गोंधळाची झाली आहेत. शासनची सुरक्षा नियमावली ATOAI, ISO 21101 आणि BIS या मानकांवर आधारित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तरीही शासन नियमावली आणि ATOAIची नियमावली पाळावी असे उल्लेख द्विरुक्तीचे असून गोंधळात टाकणारे आहेत. एकंदरीत धोरण साहसी क्षेत्राला प्रोत्साहन देऊन वृद्धिंगत करण्यासाठी नसून नियंत्रणाखाली आणण्यासाठी असल्याचे भासते, अशी टीका सर्वदूर ऐकू येत आहे. शासनाचा उद्देश प्रामाणिक असला तरी प्रत्यक्ष धोरणात तो स्पष्टपणे समोर येत नाही.

शासकीय धोरण आता प्रसिध्द झाले आहे आणि या क्षेत्रातील सर्वांना यात सुधारणा सुचविणे, हरकती घेणे ही अप्रतिम संधी आहे. साहसी उपक्रमातील सुरक्षा हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे आणि त्यासाठी केवळ आपापसात चर्चा न करता सूचना/हरकती शासनास कळविणे ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. यासाठी उपलब्ध मुदत वाढवून मिळेल याची खात्री नाही, तरी घाई करणे गरजेचे आहे. विविध संस्था या विषयी सजग असून कार्यरत आहेत, तरी त्या सर्वांनी या वेळेस पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ही संधी दवडल्यास सदरचे धोरणही आधीच्या GR प्रमाणे अव्यवहार्य ठरून आपल्याच क्षेत्राचे नुकसान होऊ शकते! सुरक्षेसाठी नियमन सुरवातीस शासनाच्या माध्यमातून आणि कालांतराने सजग साहसी क्षेत्राकडून स्वयं-नियमन असा प्रवास घडण्यासाठी साहसी क्षेत्रातील सर्वांनीच मरगळ झटकून जागे होणे गरजेचे आहे!

पुनश्च ‘साहसी उपक्रम धोरणा’चे स्वागत आणि मित्रहो लवकर जागे व्हा असे कळकळीचे आवाहन!

  • वसंत वसंत लिमये
Standard

‘बीभत्स’ विवेक

मानवाच्या जन्मापासून त्याला प्रश्न हे पडतच असणार. चांगलं काय, वाईट काय? करू की नको? कुठल्याही कृतीच्या मुळाशी हे बायनरी (Binary), दुहेरी प्रश्न असतात. सुरवातीला या प्रश्नांचा नीट उलगडा झाला नसेल, मग अंतःप्रेरणा (Instinct) त्याला मार्गदर्शन करीत असतील. कालांतराने अनुभवातून तो शिकत गेला असणार. आणि या शहाणपणातून संस्कृतीचा जन्म झाला असावा. एका अर्थानं  संस्कृती हे स्वतःच्या, पूर्वसुरींच्या अनुभवांचं संचित असतं.

प्राण्यांना, पक्ष्यांना एव्हढंच कशाला साध्या कृमी कीटकांना देखील चांगलं/वाईट, हवं/नको हे छान कळतं. ही एक निसर्गदत्त सहजसुलभ प्रवृत्ती आहे. त्यासाठी फारसा विचारही करावा लागत नाही. खादाड लॅब्रॅडोरला नावडता पदार्थ खायला देऊन पहा! भुकेला असला तरी तो त्याला तोंड लावणार नाही. हे सारं उपजतच असतं. हळूहळू माणसाचा विकास होत गेला, तो शहाणा होत गेला. अग्नीचा शोध लागला, भाषा सापडली, शिकारी जंगली माणूस शेती करू लागला. भीती, अनाकलनीय गोष्टींनी देव जन्माला घातला. माणूस समाजशील प्राणी आहे पण त्यासोबत तो विकारवशही आहे. म्हणूनच आचारसंहितेची गरज भासू लागली. आणि म्हणून काही शहाण्या मंडळींनी धर्म संकल्पिला! धर्म रूढ झाला आणि परंपरा, रितीरीवाज आणि रूढी यांचा जन्म झाला.

विचारांच्या आवर्तनात हरवलो असता मी पुन्हा प्रारंभाकडे वळलो. आदिम सहजसुलभ प्रवृत्तींचा शोध घेऊ लागलो. पूर्वसुरींनी अर्थातच यावर सखोल विचार विमर्श केला असणार! सहजसुलभ प्रवृत्तींच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरकांचा शोध घेतला असणार. यामधे आपल्या संवेदना, इंद्रिये आणि बुध्दी यांचा साकल्याने विचार झाला असणार. आपल्या संवेदनांशी दुहेरी, बायनरी (Binary) निर्णय प्रक्रियेचा जवळचा संबंध आहे. यातूनच रुचीचा, रसांचा शोध लागला! त्या रसांचं वर्गीकरण करता नवरसांची मांडणी झाली असेल. हे रस भावभावनांच्या मुळाशी असतात. नवरसांची व्याख्या पाहता ती संपूर्ण आणि सर्वसमावेशक असल्याचं लक्षात येतं. नवरसांचा अभ्यास करत असता मला भुरळ घातली ती ‘बीभत्स’ रसानी!

शृंगार, हास्य, रौद्र, करूण, बीभत्स, भयानक, वीर, अद्भुत आणि शांत असे हे नवरस. बीभत्स रसात किळस, वीट, तिरस्कार, घृणा ह्या भावना दिसतात. तुम्हाला विचित्र वाटलं असेल की या रसात भुरळ घालण्यासारखं काय आहे! चांगलं काय, वाईट काय या मुलभूत प्रश्नाशी या रसाचा खूप जवळचा संबंध आहे! एका अर्थानं ही अभिरुचीची जननी आहे! इतर कुठल्याही रसाचा अतिरेक या रसाशी जवळीक साधतो. या रसाचा उद्भव रेड सिग्नलसारखा आहे. हाच आपल्याला हीण काय, निकृष्ट काय किंवा धोकादायक काय याची जाणीव करून देतो.

आपल्याकडे नवरस असणं ही निसर्गदत्त देणगी आहे. या सर्व रसांचा विविध कालाविष्कारांशी घनिष्ट संबंध आहे. यामुळे आपली अभिरुची संपन्न आणि समृध्द झाली. यातील ‘बीभत्स’ रस अँटेनासारखा सुकाणू म्हणून आपल्याला मिळाला आहे. काही भीषण परिस्थितीत, उदाहरणार्थ – दुर्गंधीयुक्त गटारं साफ करणारे स्वच्छता कामगार, किंवा हॉस्पिटलमधील मॉर्गमधे, शवागारात काम करणारा कर्मचारी बहुतेक वेळा दारूच्या नशेत असतो कारण त्याला ‘त्या’ परिस्थितीत, मृत्यूच्या सहवासात आपलं शहाणपण शाबूत ठेवायचं असतं! म्हणूनच तो आपला ‘बीभत्स’ रसाचा अॅन्टेना बोथट करून टाकतो! आजकाल नितीमत्ता लयाला गेलेल्या, भ्रष्टाचारानं बरबटलेल्या वातावरणात मनात एक आक्रोश उमटतो, अरे आपला सदसद्विवेक कुठे गेला? ही कीड थोड्याफार फरकानं बहुतेकांना लागल्याचं भयप्रद वास्तव समोर येतं. सारंच विस्मयकारक आहे. आपला अँटेनाच हरवला आहे!

आपण उदासीन झालो आहोत, निगरगट्ट आणि कोडगे झालो आहोत. हे जिवंतपणी मृत असल्याचं लक्षण आहे. खऱ्या अर्थानं जिवंत रहायचं असेल तर तो ‘बीभत्स’ रसाचा अँटेना शोधला पाहिजे. मगच सदसद्विवेक सापडण्याची शक्यता आहे, तरच आपली संपन्न, समृध्द अभिरुची जिवंत राहील! आमेन.

  • वसंत वसंत लिमये, १ सप्टेंबर २०२०
Standard

एका नव्या पर्वाची नांदी

सप्टेंबरचा महिना, १९८७ साल असावं. हिमालयातील खडबडीत पहाडी रस्त्यावरून होणारा प्रवास शिक्षेसारखा भासू शकतो, त्यादिवशी मात्र तो मला सत्वपरीक्षेसारखा वाटत होता. उजवीकडे खोल दरीतून खळाळत वाहणारी अल्लड चिनाब, हवेतील मस्त गारवा आणि मधेच घडणारं हिमाच्छादित शिखरांचं दर्शन हाच काय तो दिलासा होता. पोटातील भीती, हुरहूर काही पाठ सोडत नव्हती. सोबतचे सारे हसत खिदळत होते, पण मी मात्र काळजीनं रस्त्यावर नजर ठेवून होतो. वाटेत कीरुच्या अलिकडे जळून कोळसा झालेल्या बसचा सांगाडा दिसला. दूरवर माणसांचा घोळका आणि अस्पष्टपणे घोषणा ऐकू आल्या. माझ्या पोटात खड्डा पडला! त्या दिवशी ‘चक्का जाम’ आंदोलन चालू होतं. नुकत्याच जून मधे निवडणुका झाल्या होत्या आणि त्यासोबत उफाळलेला खूप असंतोष होता. तिथूनच काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराची सुरवात झाली असं म्हणतात.

आम्ही लडाखमधील झांस्कर नदीच्या खोऱ्यात असलेल्या पदुम येथून ट्रेकची सुरवात केली होती. सोबत सहा परदेशी पाहुणे, ग्यान आणि फुन्चुक असे आमचे दोन कूक आणि मी. झोंकुल गोम्पा मार्गे आम्ही खड्या चढाईला लागलो. सहा सात दिवसांचा खडतर ट्रेक आटपून, आम्ही १७,५०० फुटांवरील ‘उमासी ला’ पार केला. ला म्हणजे खिंड! शेवटच्या दिवशी नैऋत्येकडील हिमनदीच्या कडेने, पायाच्या घोट्यांची परीक्षा घेणाऱ्या, थकवणाऱ्या दीर्घ कंटाळवाण्या आठ तासांच्या चालीनंतर गुलाबा किंवा गुलाबगढ येथे चिनाब नदीच्या खोऱ्यात पोचलो. अवघड ट्रेक यशस्वी रित्या पूर्ण केल्याने सारेच धमाल खुशीत होते. का कुणास ठाऊक पण आमची जम्मूहून येणारी बस अजून पोचली नव्हती. संध्याकाळी बातमी कळली की खालच्या मार्गावर ‘चक्का जाम’ आंदोलन सुरु आहे आणि त्यानी हिंसक वळण घेतलं आहे. सोबतच्या परदेशी पाहुण्यांची तीन दिवसांनंतर परतीची फ्लाईट होती. तो STDचा जमाना होता, पण फोन लागेनात. त्यामुळे पुढील काहीच खबर मिळणं दुरापास्त झालं होतं. आम्ही सारेच काळजीत पडलो!

गावात इतर काही वाहन, गाडी मिळेल का याची चौकशी करत मी फिरू लागलो. तेव्हा हिमाचल मधील तांडी ते किश्तवार असा रस्ता चिनाब नदीच्या कडेचा पहाड फोडून तयार करण्याचं काम जोरात सुरु होतं. ‘रारंगढांग’ची आठवण करून देणारा हा रस्ता! मी तिथल्या अधिकाऱ्यांशी बोलून पाहिलं. दुर्दैवानी सारीकडेच निराशा झाली. म्हटलं तर अस्मानी संकट होतं. अश्या कारणामुळे फ्लाईट चुकली, तर ‘आपण काय करणार?’ असं म्हणता आलं असतं. पण सेवाभावी उद्योगात केवळ नाईजास्तव स्वीकारायचा तो पर्याय असतो, अशी हाय प्लेसेसची ख्याती होती! जंग जंग पछाडल्यावर गावात एक अॅम्ब्युलन्स सुस्थितीत असल्याचं कळलं. झालं, मी तिथल्या RMOशी बोललो, विनवण्या केल्या. साम दामाचा प्रयोग केल्यावर कुठे तो तयार झाला. प्लॅन सोपा होता, आमच्यातल्या एका ‘गोऱ्या’ला खोटा खोटा जायबंदी करायचा! प्लॅस्टर, बँडेजेस, टोमॅटो सॉसचे रक्त वगैरे अशी रंगभूषा करून, त्या पेशंटला आम्ही तातडीच्या उपचारासाठी जम्मूला नेत असल्याचं ते नाटक!

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मार्गस्थ झालो. आमच्यातील माईक नावाच्या एका तगड्या गड्याला ‘हात पाय फ्रॅक्चर’ अशी ‘रंगभूषा’ करून सजवला. रस्ता तसा निर्मनुष्य होता. क्वचित दिसणाऱ्या जाळपोळीच्या खुणा धडकी भरवणाऱ्या होत्या. कीरुपाशी मी सगळ्यांना सावध केलं. माईक कण्हत विव्हळू लागला, सारे गंभीर चेहरे करून त्याला धीर देऊ लागले. मी हलक्या आवाजात ‘ओव्हर अॅक्टिंग’ करू नका म्हणून साऱ्यांना तंबी दिली. हातात काठ्या, दंडुके घेतलेल्या घोळक्यापाशी आम्ही गाडी हळू केली. करड्या रंगाचे डगले, भरघोस दाढ्या, धारदार नाकं, पिंगट डोळ्यात संशय आणि द्वेष दिसत होता. नशीब, गाडीतील ‘पेशंट’कडे पाहून त्या नजरा निवळल्या आणि ‘जाने दो’ असा इशारा त्यातल्या एकानं दिला. पडत्या फळाची आज्ञा घेऊन आम्ही तिथून चिंगाट सुटलो! एक मोठं संकट टळलं होतं! पुढच्याच वळणावर गाव दिसेनासं होताच, साऱ्यांनी खळखळून हसत सुटकेचा निश्वास टाकला.

१९८५ ते १९९२ या काळात असे अनेक रोमांचकारक प्रसंग आणि धमाल ट्रेक करण्याचा योग आला. इंग्लंडमधील हाय प्लेसेसचा भारतीय अवतार होता ‘हाय प्लेसेस इंडिया’ आणि हा माझा स्वतंत्र उद्योग होता. ‘हाय प्लेसेस इंडिया’चा पसारा हळूहळू वाढत होता. आम्ही दहा/बारा जणं होतो, माझ्या ठाण्याच्या घरीच नाममात्र ऑफिस होतं. याच काळात ८५ सालातील कोकणकडा चढाई, ८६ साली ‘कामेट’ आणि ८८ साली ‘कांचनजुंगा’ अश्या महात्त्वाकांक्षी मोहिमा झाल्या. ८८ सालीच लहान शाळकरी मुलांसाठी साहस शिबिरे ‘रानफूल’ या संस्थेमार्फत सुरु झाली होती. मृणाल परांजपेची ओळख याच काळातील. तेव्हा ती Researchच्या माध्यमातून Outdoor Educationचा मुलांच्या व्यक्तिमत्वावर होणारा परिणाम यावर संशोधन करत होती. नव्वद सालापर्यंत हाय प्लेसेसचे वर्षात १४/१५ ट्रेक हिमालयात जात असत.

१९८५ साली पहिला ब्रिटीश मंडळींचा ट्रेक आम्ही हिमालयात घेऊन गेलो होतो. त्यानंतर दरवर्षी नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालखंडात मी इंग्लंडला मार्केटिंग मधे मदत करण्यासाठी जात असे. सुरवातीस 15 Spring Hill येथे बॉब आणि मेरीच्या घरीच ऑफिस होतं. तीन वर्षानंतर तेच ऑफिस Globe Works येथील प्रशस्त जागेत स्थलांतरित झालं. दरवर्षी ‘In High Places’ या नावाने, एक दीड तासाचे दृक-श्राव्य सादरीकरण घेऊन आम्ही देशातील प्रमुख २५/२६ शहरांमध्ये ‘रोड शो’ घेऊन फिरत असू. हे पाहायला ७० ते १०० लोक पैसे देऊन येत असत! आपल्या, स्वतःच्या मार्केटिंग साठी क्लायंट कडून पैसे घेणे ही अफलातून कल्पना होती! अर्थात भावी ट्रेकर्सना त्यातून सविस्तर माहिती त्या बदल्यात मिळत असे हे मात्र खरं! हे सादरीकरण तयार करायची जबाबदारी माझी असे. नोव्हेंबर अखेरीस एका रेकॉर्डिंग स्टुडिओमधे मी स्वतःला दोन आठवडे कोंडून घेत असे. आदल्या वर्षीच्या ट्रेकमधील पारदर्शिका, कॉमेंट्री आणि संगीताचा तो एक धमाल मिलाफ असे. ही सादरीकरणे आणि त्यानिमित्त ‘रोड शो’ मार्फत झालेली भटकंती मी पुरेपूर अनुभवली.

१९८६ सालच्या वारीत आणखी एक धमाल घडली. बॉब आणि मॅक्स यांच्याकडे Outdoor Management Development या विषयातील भरपूर अनुभव होता. मी तिथे असतांना, ते दर वर्षी तसे ४/५ उपक्रम मँचेस्टर युनिव्हर्सिटीसाठी करत असत. Outdoor या विषयातील शिक्षण मी स्कॉटलंड येथे घेतलं असल्यानं Insuranceसाठी काही अडचण नव्हती. मग या कार्यक्रमांमध्ये मी सहाय्यक म्हणून सहभागी होऊ लागलो. हे उपक्रम चार दिवसांचे असत. डार्बीशायर मधील Peak District मधल्या ‘बेकवेल’ येथील Rutland Arms या हॉटेलमधे हे कार्यक्रम होत असत. नवीन विषय, नवे तंत्र, मला हा अनुभव घेतांना खूप मजा आली आणि खूप काही शिकायला मिळालं. या उपक्रमात वापरण्यात येणारे Management Games तयार करणं, प्रस्तरारोहण, केव्हिंग आणि Orienteering म्हणजेच दिशावेध/दिशाशोध यासाठी या तंत्राचा वापर! या साऱ्या गोष्टी शिकणं आणि त्यात वाकबगार होणं ही माझ्यासाठी पर्वणी होती. ‘ट्रेझर हंट’ साठी Old Monsal Dale या उपयोगात नसलेल्या जुन्या रेल्वे मार्गावर, विवक्षित ठिकाणी संकेत-खुणा लपवायला पहाटे जाणे ही धमाल असे. पहाटेच्या धूसर उजेडात बर्फाळ जमिनीवर सश्यांच्या विष्ठेच्या लालसर खुणा, घोड्यांसाठी पाणी पिण्यासाठी असलेली दगडी ‘डोण’ आणि क्वचित दिसणारी हरणं आजही माझ्या आठवणीत कोरलेली आहेत!

कॉर्पोरेट क्षेत्रातील संचालक, व्यवस्थापक यांच्यासाठी साहस आणि निसर्ग यांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना, नेतृत्वगुण अश्या व्यवस्थापकीय तंत्रांचा विकास करणे हा विषय दुसऱ्या महायुध्दाच्या काळात पाश्चिमात्य देशात विकसित झाला. माझ्यासारख्या भारतीय पार्श्वभूमी आणि मानसिकता असलेल्या माणसासाठी हे सारंच क्रांतीकारी आणि रोमांचक होतं. माझ्या नकळत ही एका नव्या पर्वाची नांदी होती. भारतात ‘रानफूल’ या संस्थेची जोरदार वाटचाल सुरु होती. तेव्हा भारत पेट्रोलियम या कंपनीतील सुंदर कृष्णमूर्ती या HR मॅनेजरची मुलं ८९ साली आमच्या साहस शिबिराला येऊन गेली होती. त्यानिमित्त त्याच्याशी ओळख आणि नंतर मैत्री झाली. सुंदरला मी परदेशात करत असलेल्या Outdoor Management Development उपक्रमांची माहिती झाली. विषय त्याच्या जिव्हाळ्याचा असल्यानं, आमच्या त्या संदर्भात अनेकदा गप्पा होत असत. एकदा तो अचानक म्हणाला, ‘Vasant, we have read a lot about this! आम्हाला आमच्या मॅनेजर्ससाठी असा कार्यक्रम करायचा आहे. तुझ्याकडे या क्षेत्रातील अनुभव आहे, तू आमच्यासाठी असा कार्यक्रम करणार का?

मित्रहो, एका नव्या पर्वाची सुरुवात झाली होती!

  • वसंत वसंत लिमये
Standard

Beginning of a New Era

This might have been in September of 1987. Journey on the Himalayan rough mountain roads is always gruelling, but especially on that day I found it testing patience. The only respite was to see the skittish Chenab flowing through the deep gorge on the right side, the cool misty breeze and the occasional vista of snow-capped peaks. An unknown fear was making me nervous. Everyone was exultant, but I was watching the road vigilantly. Just before Keeru, I saw a skeleton of a charred bus. A crowd of people could be seen at a distance and I could faintly hear the slogans they were shouting. It left a hollow in my stomach! This gathering was for the ‘Chakka Jam‘ movement on that day. The recent elections in June had created a vast unrest. Guess this was the beginning of violence in the Kashmir Valley.

We had started the trek from Padum in the Zanskar River valley in Ladakh. With me were six foreign guests, along with our two cooks – Gyan and Phunchuk. We traversed a steep ascent as we passed via Zongkul Gompa. After a strenuous trek of six-seven days we crossed the ‘Umasi La’ at a height of 17,500 feet. ‘La’ means a mountain pass. The last day was an ankle-testing walk alongside a glacier on the south-east side. We reached Gulaba or Gulabgarh after an exhaustive walk of eight hours. It is located in the valley of river Chenab. We were in a jubilant mood having successfully completed the difficult trek. We were unaware that the bus that was to arrive from Jummu, to pick us up had not yet arrived. By evening, the news broke that there was a ‘Chakka Jam’ movement that had turned violent. The foreign guests had a return flight three days later. Those were the days of STD calls, but the phone lines were down.So getting any further news or information was out of question and we all got very concerned.

I went to the village to see if arrangement of an alternative vehicle was possible. At that time the construction work of road linking Kishtwar to Tandi in Himachal, was in full swing. The mountain alongside river Chenab was being carved out for the road. This road reminded me of ‘Rarangdhaang’! I talked to the officers on duty there, but in vain. I was saddened, as all the efforts were futile. I could have said that in this force majeure situation, “We can’t do anything now and you will miss your flights”. But going by the High Places work ethics as a service provider this can be only your last resort, when all and every other alternative fails. After a lot of roaming and searching, I came to know of an ambulance in good condition in the village. I went to the RMO. It took a lot of efforts to convince him to do the needful. The plan was a easy one. One of the foreigners will fake injuries. We were to pretend carrying the medical emergency case to Jammu urgently, with all the plaster, bandages, and tomato sauce as blood applied in right places.

Next morning, We were on our way the and Mike, a stout fellow was ready with the make-up of fractured limbs. There was almost no traffic on the road. En route, the aftermath of the violence at few places sent shivers down our spines. I cautioned everyone as we were approaching Keeru. As we approached the mob, Mike pretended crying in agony and others acted to pacify him. “Don’t over-act”, I whispered and warned everyone as the ambulance slowed down. The armed mob in gray overcoats, their long flowing beards, sharp noses and hazel eyes looked at us with mistrust, anger and hatred. Thank god, looking at the patient in the Ambulance they were considerate.  “Jaane Do”– Let them go, one of them ordered and we swiftly moved ahead. A crisis situation had been avoided. After the next bend with the village out of our sight, everyone giggled and gave a sigh of relief.

From 1985 to 1992, I had an opportunity to be on many amazing treks and experience such eventful and thrilling episodes. High Places India’ while my proprietary business, was the counterpart of High Places in England. ‘High Places India’ was slowly but steadily spreading its wings. We had grown to be a team of ten-twelve members. My house in Thane was my namesake office. Until 1990 High Places conducted 14 to 15 treks in Himalay per year. It was during this period, the ambitious expeditions like ‘Kokankada’ in 1985, ‘Kamet’ in 1986 and ‘Kanchenjunga’ in 1988, happened. In 1988, we started conducting Adventure Camps for school children under the banner of ‘Ranphool’. I met Mrunal Paranjape around the same time. She was doing a research project on Impact of Outdoor Education on Personality of Children.

In 1985, we took a British team to the Himalayas. This was our first trek. From then on, every year from November to February, I would go to England to help with marketing. Initially, 15 Spring Hill, Bob and Mary’s residence, used to be our office. Three years later, we shifted it to a larger and plush space at Globe Works. We used to make an hour and half audio-visual presentation called ‘In High Places’, which we used to take across the country in 25 to 26 major cities in UK every year as a ‘Road Show’. Almost 70 to 100 people used to pay to see it. To charge your client to do your marketing was a brilliant idea! Of course, the future trekkers got benefitted with the detailed information in return! It was my responsibility to create this presentation. Every November end I used to lock myself up in the recording studio for two weeks. Taking the transparency slides of previous years treks, adding commentary and music… the fusion was simply fun. Wandering in the wake of this ‘Road Show’ was indeed a satisfying experience.

My trip in the year 1986 was yet another interesting one. Bob and Max had ample experience in Outdoor Management Development. They used to conduct 4/5 such programmes for Manchester University every year. Since I had studied Outdoor Education in Scotland, insurance was not a problem and I joined to assist them on their programmes. Each programme used to be of four days. They were conducted in ‘Bakewell; in the Peak District of Derbyshire at the Rutland Arms Hotel. Learning new training approach, new techniques, was an enriching experience. It was a privilege for me to plan and design the Management Games, Rock Climbing, Caving and Orienteering techniques used on these programmes. Old Monsal Dale was an abandoned rail track. It was fun to get up early and go along this railway track, placing the clues at their designated places. I still distinctly remember the red marks of rabbit droppings on the icy ground in the misty light of the dawn, also the stone troughs for horses and rare sighting of a deer!

Using Outdoors and Adventure as a medium for teaching and enhancing Management techniques like Team-Building and Leadership for Corporate leaders and managers was developed in the West during World War II. For a man like me with an Indian background and mentality, it was all revolutionary and exciting. I wasn’t aware but this was the beginning of a new era. In India, the organization ‘Ranphool’ was in full swing. In 1989, HR Manager – Mr. Sundar Krishnamurthy of Bharat Petroleum Corporation had sent his children for one of our adventure camps. That led to his acquaintance and later friendship. I had shared with Mr. Sundar about the Outdoor Management Development Programmes being conducted in the west. This was a subject close to his heart too.

Once he suddenly said, ‘Vasant, we have read a lot about this! We want to do this programme for our managers. You have all the necessary experience, will you do such a programme for us?”

And Friends, a new era had begun!

  • Vasant Vasant Limaye
Standard

किनारा मला पामराला

Maker:0x4c,Date:2018-2-26,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

Maker:0x4c,Date:2018-2-26,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

परवाच मित्राची आई गेली. वय बरंच, पंच्याऐशीच्या पुढे. ‘सुटल्या बिचाऱ्या’ असंही कुणीतरी वैकुंठात म्हटलेलं कानी पडलं. वैकुंठात एक विचित्र कडवट, आंबूस गोड वास असतो. मी जळणाच्या वखारी समोर एका दगडी भिंतीवर बसलो होतो. एक नऊवारीतल्या वयस्कर बाई, ‘आवं, इथे ‘सावडायचा’ कार्यक्रम कुटं चाललाय?’ म्हणून विचारत आल्या. गर्द उद्यानापलिकडील गर्दी असलेल्या शेडकडे निर्देश करून, ‘तिकडे विचारा’ म्हणून त्यांना वाटेला लावलं. खरखरीत आवाजात ‘मोघे’गुरुजींचे स्पष्ट मंत्रोच्चार ऐकू येत होते. इथलं हिरवंगार उद्यान देखील उदास वाटतं. फोनवर कळलं की नातेवाईक मंडळी पोचायला अजून अर्धा तास तरी लागणार. तिथल्याच चहाच्या स्टॉलवरून एक कागदी कपातला चहा घेतला. नाकातला तो वास आणि जिभेवरील चिकट मिट्ट गोड चव, मला सारंच असह्य झालं होतं. मी पट्कन गाडीत जाऊन बसलो. गाडीच्या काचा बंद करून मी एसी सुरू केला. ड्रायव्हरला म्हणालो, ‘चल, आपण एक चक्कर मारून येऊ!’ मला तिथे थांबणं अशक्य होतं. नदीपाशी पोचल्यावर मी काचा उघडून एक खोल मोकळा श्वास घेतला, तेव्हा कुठे जरा बरं वाटलं. मृत्यूचा तो निकट गंध अस्वस्थ करणारा होता.

IMG_20190921_084248

तसा मी अनेकदा वैकुंठाला आलो आहे. मोठ्या धीरानं अनेकांचं सांत्वन केलं आहे. लहानपणी शाळेत असतांना केवळ कुतूहलापोटी, ‘नी. गो. पंडितराव’ या लाडक्या सरांच्या अंत्ययात्रेबरोबर ठाण्याच्या स्मशानात गेलो होतो. थोड्याच वेळात कुणीतरी वडिलधाऱ्या माणसानी, ‘चला रे पोरांनो, तुम्ही इथे यायचं नसतं!’ असं झापून आम्हाला घरी पिटाळलं होतं. ‘आयुष्याचा शेवट चितेवर होतो’ एवढंच कळण्या इतपत अक्कल होती. एक नक्की की भीती वाटली नव्हती. पुढे गिर्यारोहणात दोन तीनदा जवळच्या सहकाऱ्यांचा मृत्यू पाहण्याची पाळी आली. दुःख होतं, पण तेव्हा त्याची अटळता मी सहजपणे स्वीकारली होती. आता कदाचित वयाचा परिणाम असेल, पण अस्वस्थता होती येवढं मात्र खरं! कधी दुरून तर कधी जवळून आपला आणि मृत्यूचा संबंध येतोच. बहुतेक वेळेस ‘हॅः, माझा काय संबंध?’ अश्या बेफिकीरीने ‘तो’ अप्रिय विषय मी झटकून टाकत असे. त्यादिवशी मात्र माझी अस्वस्थताच मला अस्वस्थ करत होती.

12-a

कदाचित जमा-खर्च मांडायची वेळ आली असावी. दोनच वर्षांपूर्वी खूप जुने मित्र एकत्र भेटले. कित्येक आठवणींना उजाळा मिळाला म्हणून मजा आली. आता मागे वळून पाहतांना, वळणा वळणांचा रस्ता दिसतो. तसं पहिलं तर आजवर चुकत माकत शिकत आलो. आयुष्यात मस्ती खूप केली. लहानपणी आई-वडिलांचा धाक असूनही, त्यांची नजर चुकवून व्रात्यपणा केला. कधी घरून सुटे पैसे ढापून शाळेसमोरच्या भैय्याकडून आईसफ्रूट खाल्लं, तर समोरच्या ‘स्वागत’मधे बसून चोरून बटाटावडा खाल्ला. वडिलांचे ठाण्यात क्लासेस, त्यामुळे त्यांचे विद्यार्थी सर्वदूर पसरलेले. त्यातून आमचे फादर ‘जगमित्र’! कॉलेजला जायला लागल्यानंतर, पुलावरून जाण्याचा कंटाळा म्हणून एका लोकलमधून दुसऱ्या लोकलमध्ये उडी मारून, एक नंबर प्लॅटफॉमला आल्याबद्दल घरी कुणीतरी अर्जंट ‘रिपोर्ट’ दिला होता. मग संध्याकाळी घरी साग्रसंगीत पूजा झाली. एकंदरीत उनाडपणा मनसोक्त केला. आठवीत असतांना वर्गात नंबर घसरत घसरत एकतीसावर पोचला. घरून प्रगतीपुस्तकावर बाबांची सही आणणं भाग होतं. घरी यथासांग ‘कौतुक’ होणार म्हणून मन घट्ट करून बाबांच्या हाती प्रगतीपुस्तक दिलं. काहीच न होता बाबांनी सही केली आणि म्हणाले, ‘बाळकोबा’ आयुष्यात काही बनायचं असेल तर एकतीसातील तीन काढून टाकता आला तर बघा!’ हे सारंच अनपेक्षित होतं आणि म्हणूनच तो प्रसंग मनावर कोरला गेला. पुढील आयुष्यात काहीही करतांना सर्वोत्तमाचा प्रयत्न करायचा यासाठी तो एक महत्त्वाचा धडा होता. अकरावीत पहिला नंबर, आयआयटी प्रवेश परीक्षेत संपूर्ण भारतात एकशे सोळाव्वा क्रमांक अश्या अवघड शिड्या मी लीलया चढत गेलो. सर्वोत्तमाचा ध्यास हे वेड तेव्हा लागलं.

vgl_photo2

A1

रुईया कॉलेजात असतांना, केवळ कुतूहलापोटी पेब किल्ल्यावर (विकटगडावर) हाईकला गेलो आणि डोंगरवाटांनी वेड लावलं. तिथून ‘आयआयटी’त गेल्यावर गिर्यारोहण, हा छंद ते ध्यास असा प्रवास कसा झाला ते कळलंच नाही. आज मागे वळून पाहतांना, ‘इंजिनीयर’ का व्हायचं होतं?’ या प्रश्नाशी मी अडखळतो. खरं सांगायचं तर ती रीत होती, यशस्वी होण्याचा तो एक राजमार्ग होता येवढंच! मेकॅनिकल इंजिनीयरिंग म्हणजे काय हे कळण्याची अक्कल नव्हती, फक्त या ‘ब्रँच’ची चलती आहे हे ठाऊक होतं. होस्टेलमधे समवयस्कांबरोबर राहणं ही चैन होती. तुटपुंजा पॉकेटमनी ही अडचण होती पण कदाचित त्यामुळे बहकलो नाही, भरकटलो नाही. एक अफाट झिंग आणणारं स्वातंत्र्य होतं. एक मस्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वास होता. अभ्यास यथातथाच पण गिर्यारोहण, नाटक हे छंद मनसोक्त जोपासता आले.

A2

 

IMG-20171125-WA0111

आयआयटीतून बाहेर पडल्यावर, पाचसहा वर्षांचा काळ अस्वस्थ करणारा, उत्साही साहसांचा धमाल काळ होता. वर्षात हिमालयातील दोन मोहिमा करायच्या हे ठरलेलं होतं. वडिलांनी तेविसाव्व्या वर्षी, ‘आता तुम्ही तुमचं पहा’ अशी स्वच्छ ताकीद दिली. मी हे माझं भाग्य समजतो. कारण पुढे देखील अचाट, अफाट स्वप्नं पाहतांना आणि त्यांच्यामागे बेभानपणे धावतांना, माझे पाय नेहमीच जमिनीवर राहिले. पाचसहा नोकऱ्या झाल्या. त्याच काळात आम्ही काही ‘डोंगरी’ मंडळी एकत्र आलो आणि शाळकरी लहान मुलांसाठी कान्हेरी, सिंहगड येथे साहस शिबिरं भरवू लागलो. तेव्हा ही संकल्पना नवीन असूनही तुफान प्रतिसाद मिळाला. यातूनच या क्षेत्रातील पुढील शिक्षणासाठी स्कॉटलंडला जाण्याची भन्नाट अशक्यप्राय कल्पना सुचली. १९८२ साल, त्याकाळी लाखभर रुपये खर्च येणार होता. त्याआधी वर्षभर नन्नाचे पाढे ऐकत, ‘फार तर काय नाही म्हणतील!’ हा महत्त्वाचा धडा शिकून, चिकाटी न सोडता मी आउटडोअर एज्युकेशन मधील एक वर्षाचा डिप्लोमा करण्यासाठी एडिंबरो येथे दाखल झालो. डिप्लोमा, मग डोंगराएव्हढं कर्ज फेडण्यासाठी सौदी अरेबियातील नोकरी. त्यानंतर खिशात चार पैशे खुळखुळवत, अंगठा दाखवत ‘हिचहायकिंग’ करत केलेली दोन महिन्याची युरोप सफर. ‘पुढे काय?’, भविष्य हे सारेच विचार तेव्हा दूरस्थ होते. समोर येईल तो अडचणीचा डोंगर आपला, मग कमावलेली कल्पकता आणि सर्व शक्तीनिशी त्याला भिडणं हेच सुचत असे. तो साराच रगेल, कलंदर प्रवास स्वप्नवत होता. मी खूप समृध्द होऊन परत आलो.

05

img_20200528_115627

कोकणकडा, गिर्यारोहण मोहिमा, लहान मुलांसाठी ‘रानफूल’ या माध्यमातून आयोजित होणारी परिसर्ग शिबिरे, यासोबतच ब्रिटीश मित्रांबरोबर ‘हाय प्लेसेस’ या कंपनीत सहभाग अशी सारी धमाल सुरु होती. छायाचित्रणाच्या छंदातून सादर केलेली, ‘तो क्षण, ती जागा आणि मी’ अशी तीन प्रदर्शने झाली.  ‘उद्या कधी उजाडणारच नाही’ अश्या धुंदीत अनेक साहसांना सामोरा जात होतो. पोटापाण्यासाठी पैसे लागतात हे भान होतं आणि स्वार्थ सांभाळण्याची आळशी अक्कलहुशारी होती. भविष्यासाठी बेगमी किंवा हात राखून खर्च करणं कधी जमलंच नाही. तसं काय, काहीही हात राखून करणं हा स्वभावच नव्हता! याच प्रवासात मृणालची सोबत मिळाली आणि अनेक समविचारी साहसी वेडे जिवलग मित्र जमा झाले. ‘आउटडोअर मॅनेजमेंट डेव्हेलपमेंट’ म्हणजेच साहसी उपक्रमांचा एक वाहन म्हणून वापर करून, संघभावना आणि नेतृत्वगुणांच्या विकासासाठी प्रशिक्षण. याचा थोडा अनुभव ब्रिटनमधे गाठीशी बांधता आला होता. १९८९ साली तेच प्रशिक्षण कॉर्पोरेट क्षेत्रासाठी भारतात सुरु करून, एका नवीन क्षेत्राची मुहूर्तमेढ रोवली. काम अव्हानात्मक होतं, पण समाधान आणि आर्थिक स्थैर्य लाभलं. अफाट कष्ट आणि धाडसी निर्णय, यामुळे राजमाची ते गरुडमाची असा गेल्या तीस वर्षांचा रोलरकोस्टर प्रवास झाला आणि यात नशीबाने मृणालसारखी सहधर्मचारिणी मिळाली! रेवतीसारखी गुणी नक्षत्रासारखी मुलगी, नेटका प्रपंच आणि मृणालची सोबत, फारसा विचार न करता मी चक्क गृहस्थाश्रमी झालो होतो! एक गतिमान संतुलन, स्थैर्य सापडलं होतं. अशातच ‘लेखन हा आपला प्रांत नाही’, अशी पंधरा वर्षांपूर्वी सुरवात करून, काही कथा आणि ‘लॉक ग्रिफिन’ आणि ‘विश्वस्त’ अश्या अफाट यशस्वी कादंबऱ्या असा बेफाट लेखन प्रवास मजेत झाला. शांत सागरावर, लपलपणाऱ्या लाटा कापत वेगात निघालेल्या डौलदार जहाजावरील सफरीचा तो अनुभव होता. पायाखाली दमदार, धडधडणाऱ्या इंजिनाची आश्वासक थरथर होती. गालावर जाणवणारा यशस्वीतेचा भर्राट वारा आणि अफाट विस्तीर्ण क्षितिजावर पैलतीराचा मागमूसही नव्हता!

 

 

दहा बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. पहाटे मोटरसायकलवर गरुडमाचीला जातांना मी धडपडलो! डोक्याला खोक आणि कॉलरबोन तुटलेलं. लगेच उपचार झाले. मी एका प्रोग्रॅमसाठी मास्तर म्हणून चाललो होतो. आसपास जीवाभावाचे सहकारी होते आणि मृणालनी लगेच माझा प्रोग्रॅम करण्याची जबाबदारी स्वीकारली. तातडीने विश्रांतीसाठी मला गाडीत घालून पुण्याला पाठवून देण्याची प्रेमळ जबरदस्ती झाली. म्हटलं तर किरकोळ प्रसंग पण माझ्या उधळलेल्या वारूला अचानक नकळत ब्रेक लागला होता. रेवतीनं तातडीनं दुसऱ्या दिवशी मोटरसायकल विकून टाकायला लावली हे अलाहिदा! त्या काळातील अनेक छोटे छोटे प्रसंग आठवतात. क्लायंबिंग वॉलवर लवचिक तरुण मंडळी लीलया बागडतांना पाहणे, साध्या ट्रेकवर ‘झेपेल का?’ म्हणून टेन्शन येणे, सुटलेले पोट दडविण्यासाठी झब्बे आवडू लागणे, नव्यानं सापडलेला मधुमेह वाकुल्या दाखवणे, ‘काका, अंकल’ ही संबोधने राग न येता सवयीची होणे – असं काय काय तरी! शिस्त, व्यायाम वगैरे यांच्याशी फारसं वैर नसलं तरी संबंध जुजबी. एक नक्की की शरीर नावाच्या यंत्राची हेळसांड केली नसली, तरी काळजी घेतलेली नाही हे खरं. ‘पाहू काय होईल ते!’ अशी अव्यक्त मिजास. काय झेपणार नाही याची जाणीव असल्यानं, आचरटपणा टाळण्याचं शहाणपण गेल्या काही वर्षात उन्मेखून राखलं. किनाऱ्यावरील धुक्यात दडलेला पैलतीर नक्कीच जाणवू लागला होता. भीती नाही वाटत, पण मर्यादेचं भान जाणवतं आहे.

054

मला माणसं आवडतात. माझी लोकांशी मैत्रीही सहज होते. माझं कुणाशीही जमतं आणि माझ्यातील कुतूहल मला स्वस्थ बसू देत नाही. मान्यवर, सेलेब्रिटी मंडळी मला जास्त आवडतात असे टोमणे काहीवेळा ऐकू येतात. मला ते आकर्षण आहे, पण त्यात माझा स्वार्थ आहे. एखादा मान्यवर, सेलेब्रिटी असेल तर साहजिकच तो कुठल्या तरी क्षेत्रात पारंगत असतो, त्याचा व्यासंग असतो आणि यामुळे त्या ओळखीतून मला नक्कीच काहीतरी मिळतं. अशी मंडळी माझ्या जवळ का येतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. आणि निश्चितच हा फालतू विनय नाही! माझा मनुष्यसंग्रह अफाट आहे आणि मलाही त्याचं आश्चर्य वाटेल असा आहे. गेल्या कित्येक वर्षातील माझी ती कमाई आहे किंवा वैभव आहे आणि म्हणूनच मी स्वतःला भाग्यवान समजतो!

परवाच एका मित्राच्या टीव्ही सिरीयलचं चित्रीकरण चालू होतं म्हणून वाठारला गेलो होतो. ‘विंचुर्णी’ जवळच आहे, पण सहजच ‘मनोहरकाका’ (अॅडमिरल आवटी) आता नाहीत हा सल मनात उमटला. बाजीराव रोडवरून जातांना डावीकडे श्री. म. माटे पथ लागतो. ‘काय बाळोबा?’ असं विचारत, लुकलुकणारे मधुमामा माट्यांचे मिश्कील घारे डोळे आता नाहीत. करंगळी आणि अनामिकेत धरलेल्या सिगरेटचा खोल झुरका घेऊन, ‘काय कॅप्टन लिमये, नाशकात कधी आलात?’ असं मृदू स्वरात विचारणारे तात्यासाहेब (वि. वा. शिरवाडकर) नाहीत. तर्जनी आणि अंगठा, ट्रंप थाटात दाखवत, ‘वेळ थोडा आहे!’ असं म्हणत एन्ट्री घेणारे दाजीकाका लागू, खर्जातल्या घोगऱ्या आवाजात ‘बाळ्या, काय धमाल आहे!’ म्हणणारा अशोक जैन आठवतो. काळाच्या पडद्याआड गेलेले हे सारेच चटका लावून जातात.

 

माझा पुनर्जन्मावर विश्वास नाही. आहे ते याच जन्मात, ही खूणगाठ घट्ट आहे. मृत्यूचं भय नाही पण तो येणार, हे न कुरकुरता स्वीकारलेलं सत्य! अचानक आला तर काय, या चिंतेनं कपाळावर सदैव ठाण मांडून बसलेल्या आठ्या नाहीत. अजूनही खूप काही करायचं आहे, हा उत्साह आहे. पण सगळं जमलंच पाहिजे हा अट्टाहास नाही. बकेट लिस्टमधे आहे, म्हणून भोज्ज्याला शिवून येणं मान्य नाही. मी अत्यंत आवडीनं ‘गोड’ खाणारा होतो. लहानपणी स्विमिंग पूलमध्ये साखरेचा पाक असावा अशी स्वप्नं पडत. मधुमेह असल्याचा शोध लागल्यावर सुरुवातीस अनिच्छेनं, पण पथ्य पाळायला सुरुवात केली. आता ते सवयीचं झालं आहे. इथून पुढे अशी पथ्यांची बंधनं स्वीकारावी लागणार हे मान्य आहे. पण आयुष्यातील इतर अनेक आनंदांचा गोडवा चाखायची आसक्ती कायम आहे. कलंदर भटकंती आणि साहस हे मला नेहमीच प्रिय होतं. उपदेशाची दांभिकता नाही, पण लेखन हा माझ्यासाठी शोधप्रवास आहे आणि तो आनंद उदंड आहे. काय जमेल याची चिंता न करता, जे जमतंय ते करण्यात वेगळीच मजा आहे. कधीतरी शेवट आहे याचं भान आहे.

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

Maker:0x4c,Date:2018-2-12,Ver:4,Lens:Kan03,Act:Lar01,E-Y

 

The summit is what drives us, but the climb itself is what matters. – Conrad Anker, एक मान्यवर गिर्यारोहक.

शिखरं असंख्य आहेत आणि प्रवास सुरूच राहणार आहे…

IMG-20191014-WA0050

 

  • वसंत वसंत लिमये

 

 

 

 

 

Standard

इतिहासाला स्मृतिभ्रंश झाला आहे!

Kalnirnay_post - Copy

‘८ जून १९२४, जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट सर झाले!’

‘29th May 1953, Hillary of New Zealand and Tenzing reach the top – The Guardian, London.’

 

गोंधळात पाडणारे दोन ठळक मथळे! ज्ञात इतिहासानुसार २९ मे १९५३, शुक्रवार रोजी, जॉन हंट यांनी नेतृत्व केलेल्या ब्रिटीश मोहिमेतील भारतीय शेर्पा तेन्सिंग आणि न्यूझीलंडचे एडमंड हिलरी यांनी जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ म्हणजेच ‘माउंट एव्हरेस्ट’ सर केले. त्यामुळे त्यानंतर एडमंड हिलरी – सर एडमंड हिलरी, तर जॉन हंट – लॉर्ड जॉन हंट झाले. जवाहरलाल नेहरू यांच्या आग्रहामुळे भारतीय शेर्पा तेन्सिंग यांनी ‘सर’की नाकारली. शेर्पा तेन्सिंग यांच्या बहुमानार्थ, त्यांच्याच जन्मस्थळी दार्जीलिंग येथे HMI ही पहिली गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था सुरू झाली आणि शेर्पा तेन्सिंग हे तिचे पहिले ट्रेनिंग डायरेक्टर झाले. मानवी इतिहासातील हे एक सुवर्णाक्षरात लिहिलेलं पान. परंतु गिर्यारोहण इतिहासातील एक अनुत्तरीत प्रश्न, कोडं म्हणजे १९५३ पूर्वी मॅलरी आणि आयर्विन यांनी १९२४ साली एव्हरेस्ट सर केलं होतं का? गेल्या नव्वद वर्षांपेक्षा अधिक काळ साऱ्यांनाच सतावणारा हा प्रश्न! आजही अनुत्तरीत असणाऱ्या या प्रश्नाचं उत्तर ढगात दडलेलं आहे.

1924 group of everest

१९२४ सालातील हे गूढ, रहस्य जाणून घेण्यासाठी आपल्याला गेल्या शतकाच्या सुरुवातीस जावं लागेल. १८५७च्या स्वातंत्र्य समरानंतर भारतावर इंग्लंडच्या राणीची ब्रिटीश राजवट सुरू झाली. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस ब्रिटीश राजवटीला भेडसावणारी गोष्ट म्हणजे उत्तरेकडून किंवा वायव्येकडून येऊ शकणारं रशियाचं आक्रमण. सर्व्हे ऑफ इंडियाची स्थापना १७६७ साली झाली. १८५७च्या सुमारास सर्व्हे ऑफ इंडियाचं भारताचे नकाशे करण्याचं काम नुकतंच संपलं होतं. देहराडूनला सर्व्हे ऑफ इंडियाचं मुख्य कार्यालय होतं आणि याशिवाय देहराडून हा सर्व्हेसाठी विधान बिंदू (Datum) मानण्यात आला होता. हिमालयातील दुर्गम भागातील सर्व्हे अनेक अडचणींमुळे आव्हानकारक असत. ब्रिटीश सर्व्हेअर भारतीय कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सर्वेक्षण करीत असत. सर्व्हेअर राधानाथ सिकंदर याला १८५२ला, जगातील सर्वोच्च शिखर ‘सागरमाथा’ सापडलं. जॉर्ज एव्हरेस्ट या सर्व्हेअर जनरलच्या सन्मानार्थ सर्वोच्च शिखराचं नाव ‘एव्हरेस्ट’ असं ठेवण्यात आलं. या सर्वेक्षणादरम्यान सापडलेल्या द्वितीय क्रमांकाच्या शिखराचं नाव होतं K2, तेही पुढे बदलून त्याचं नामकरण ‘गॉडविन ऑस्टीन’ असं झालं. या सर्वेक्षणातील भारतीय कर्मचाऱ्यांचे अचाट कष्ट आणि प्रयत्न इतिहासात कधीच गौरविले गेले नाहीत. विसाव्या शतकाच्या सुरुवातीस सर्वोच्च शिखर ‘एव्हरेस्ट’ युरोपियन गिर्यारोहकांसाठी फार मोठं आकर्षण ठरलं होतं. भारताच्या उत्तरेपासून ईशान्येपर्यंत पसरलेल्या महाकाय हिमालयाचे कुठलेच नकाशे उपलब्ध नव्हते. Silk Route याने की ‘प्राचीन उत्तरपथ’ अशा व्यापारी मार्गाची ढोबळ माहिती होती. यामुळेच विसाव्व्या शतकाच्या सुरवातीस ब्रिटीश राजवट हिमालयातील मोहिमांना विशेष प्रोत्साहन देत असे, अर्थात त्यामागे त्यांचा राजकीय स्वार्थ होता. सुरुवातीच्या काळातील मोहिमा पहिल्या महायुद्धामुळे थंडावल्या.

George_Mallory_1915

१९२४ सालच्या गूढनाट्यातील दोन मुख्य कलाकार म्हणजे अँड्र्यू आयर्विन आणि जॉर्ज मॅलरी. यातील जॉर्ज मॅलरी हा अनुभवी ज्येष्ठ गिर्यारोहक होता तर २२ वर्षांचा आयर्विन उत्कृष्ट तंत्रज्ञ आणि जिगरी गिर्यारोहक होता. गिर्यारोहण वाङ्मयातील एक सुप्रसिध्द वाक्य म्हणजे ‘Beacause it’s there!’ एकदा मॅलरीला न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारानं विचारलं, ‘तुम्ही शिखर का चढता?’ त्यावर मॅलरीचं उत्तर होतं, ‘कारण ते तिथे आहे!’ अतिशय साधं परंतु अर्थगर्भ असं विधान – त्यात मानवाच्या चौकस कुतूहलाला, विजीगिषु स्वभावाला साद घालणारं आवाहन आहे, आव्हान आहे. चेशायर, इंग्लंड येथील मॉबर्ली या गावी ‘जॉर्ज हर्बर्ट ले मॅलरी’ याचा जन्म १७ जून १८८६ साली झाला. आई वडील दोघंही पाद्री कुटुंबातील होते. जॉर्जचं सुरुवातीचं शिक्षण इंग्लंडच्या दक्षिण किनाऱ्यावरील ईस्टबोर्न येथील ग्लेनगोर्स बोर्डिंग स्कूलमध्ये झालं. नंतर विन्चेस्टर येथे शाळेच्या शेवटच्या वर्षात आयर्विंग या शिक्षकाने जॉर्जला प्रस्तारोहणाची दीक्षा दिली. जॉर्जनी १९०५च्या ऑक्टोबर महिन्यात इतिहास ह्या विषयात उच्च शिक्षण घेण्यासाठी केम्ब्रिजमधील मॅग्डालेन कॉलेजात प्रवेश घेतला. केम्ब्रिजला असतांना जॉर्ज मोठ्या हिरीरीने रोइंग (नौकानयन) करत असे. सहा फूट उंच, ग्रीक अॅथलीटप्रमाणे शरीरयष्टी, स्वप्नात हरवलेले डोळे लाभलेला इंग्लिश चेहेरा, असं जॉर्जचं व्यक्तिमत्त्व होतं. १९१० साली गोडाल्मिंग, सरे येथील चार्टरहाउस स्कूलमध्ये जॉर्ज शिकवत असतांना कवी रॉबर्ट ग्रेव्हज त्याचा विद्यार्थी होता. रॉबर्टला काव्य, साहित्य आणि गिर्यारोहणाची आवड जॉर्जमुळे लागली.

जॉर्जने १९११ साली युरोपातील सर्वोच्च शिखर, ‘माँ ब्लांक’वर यशस्वी चढाई केली. त्याचबरोबर ‘माँ मॉडीट’च्या फ्राँटियर रिजवर तिसरी यशस्वी चढाई केली. एव्हाना जॉर्ज मॅलरी हा एक प्रथितयश गिर्यारोहक म्हणून ओळखला जाऊ लागला होता. १९१३ साली लेक डिस्ट्रीक्टमधील ‘पिलर रॉक’वर कोणाच्याही सहाय्याशिवाय त्यानं चढाई केली. या अवघड चढाईला नंतर ‘मॅलरी’चा रूट म्हणून ओळखण्यात येऊ लागलं. पुढे अनेक वर्ष हा ब्रिटनमधील सर्वात अवघड रूट मानण्यात येत असे. सहकाऱ्यांनी जॉर्जला विचारलं, ‘तू चढाईरुपी शत्रूवर मात केलीस?’ तर जॉर्जचं नम्र उत्तर होतं, ‘नाही, स्वतःवर!’

चार्टरहाउस येथेच जॉर्जची भेट ‘रुथ टर्नर’शी झाली. पाहिलं महायुद्ध सुरू होण्यापूर्वी सहाच दिवस अलीकडे १९१५च्या डिसेंबर महिन्यात जॉर्ज आणि रुथचा विवाह झाला. त्याचवर्षी जॉर्ज मॅलरी रॉयल गॅरिसनच्या तोफखान्यात सेकण्ड लेफ्टनंट म्हणून रुजू झाला. युद्ध समाप्तीनंतर सैन्यातून १९२१ साली जॉर्ज चार्टरहाउसला परतला. त्या वर्षी पहिल्या एव्हरेस्ट मोहिमेत सहभागी होण्यासाठी त्यानं शिक्षकाच्या नोकरीला रामराम ठोकला. १९२१ सालातील माउंट एव्हरेस्ट कमिटीने आयोजित केलेली ती पहिलीच, एव्हरेस्ट शिखराचं सर्वेक्षण करण्यासाठीची मोहीम होती. या मोहिमेने प्रथमच एव्हरेस्ट परिसराचे अचूक नकाशे बनवले. या मोहिमेवर ‘गाय बुलक’ आणि सर्व्हे ऑफ इंडियाचे ‘व्हीलर’ हे जॉर्जचे सहकारी होते. पाश्चिमात्य गिर्यारोहकांनी प्रथमच ल्होत्से शिखराच्या पायथ्याशी पूर्व रोन्ग्बुक हिमनदीच्या माथ्यावर असलेल्या ‘वेस्टर्न कुम’चा शोध लावला. त्या भागातील काही छोटी शिखरं चढण्यातही त्या मोहिमेला यश आलं. या मोहिमेचे सदस्य एव्हरेस्टच्या उत्तर धारेवरील ‘नॉर्थ कोल’ येथे पोचले आणि ईशान्य धारेवरून शिखराला जाण्याचा संभाव्य मार्गदेखील त्यांनी शोधून काढला. या ईशान्य धारेवर दोन महत्त्वाचे अडथळे – ‘फर्स्ट स्टेप’ आणि ‘सेकंड स्टेप’, तेव्हा लक्षात आले. भविष्यात याच दोन ‘स्टेप’नी १९२४ सालातील गूढ रहस्याला आणखीनच गडद केलं!

George_Mallory_en_andere_leden_van_de_Engelse_Mt._Everest_expeditie_-_George_Mallory_and_other_members_of_the_English_Mt._Everest_expedition_(8866555993)

एव्हरेस्टवर दक्षिणेकडून खुंबू हिमनदी मार्गे ‘साउथ कोल’ किंवा उत्तरेकडून पूर्व रोन्ग्बुक हिमनदी मार्गे ‘नॉर्थ कोल’ असे दोन संभाव्य मार्ग होते. सुरवातीस उत्तरेकडील ‘नॉर्थ कोल’ मार्गाला प्राधान्य देण्यात आलं होतं. १९२२ साली ब्रिगेडियर जनरल चार्ल्स ब्रूस यांच्या नेतृत्त्वाखालील मोहिमेबरोबर जॉर्ज पुन्हा एव्हरेस्टला परतला. त्यानं कृत्रिम प्राणवायूशिवाय सॉमरवेल आणि नॉर्टन यांच्या सोबत ईशान्य धारेवर २६,९८० फुटांची विक्रमी उंची गाठली. कृत्रिम प्राणवायूचा उपयोग त्या काळी वादग्रस्त होता. त्याच मोहिमेत जॉर्ज फिंच याने २७,३०० फुटांची उंची गाठली. पण त्यानं चढाईसाठी आणि झोपण्यासाठी कृत्रिम प्राणवायूचा उपयोग केला होता. कृत्रिम प्राणवायूच्या उपयोगामुळे जॉर्ज फिंचला अधिक वेगानं चढाई करता आली होती, ही गोष्ट मॅलरीच्या मनात ठसली होती. जॉर्ज मॅलरीनं पावसाळा तोंडावर असूनही तिसरा शिखर प्रयत्न केला. दुर्दैवानं अॅव्हलांचमध्ये सात शेर्पांचा मृत्यू झाल्यानं तो प्रयत्न सोडावा लागला. या संदर्भात मॅलरीवर टीकाही झाली.

Everest-from-Noth-BC

एव्हरेस्टसारख्या शिखरावरील अति उंचीवरील चढाईत, विरळ हवामान आणि अपुरा प्राणवायू हे मोठे शत्रू असतात. अश्या चढाईसाठी विरळ हवामानाचा सराव करावा लागतो. यालाच Acclimatization म्हणतात. २६,००० फुटापर्यंत या सरावाचा उपयोग होतो, पण त्यानंतर मात्र हा सरावदेखील कामी येत नाही. २६ हजार ते २९ हजार फुटांवरील चढाईस ‘Death Zone’ मधील चढाई म्हणून ओळखतात. कृत्रिम प्राणवायूचा ह्या ‘Death Zone’मध्ये फार मोठा उपयोग होतो. एव्हरेस्टवरील चढाईतील तांत्रिक अडचणींसोबत ‘Death Zone’ हा फार मोठा अडथळा होता.

१९२४ साली जनरल ब्रूस यांच्या नेतृत्त्वाखाली पुनश्च एव्हरेस्ट मोहीम आयोजित करण्यात आली. ३७ वर्षांचा जॉर्ज मॅलरी याही मोहिमेत सदस्य म्हणून सहभागी झाला होता. आदल्याच वर्षी अमेरिकन दौऱ्यावर असतांना आपल्या भाषणात, त्यानी येत्या मोहिमेत एव्हरेस्ट विजय निश्चित असल्याची ग्वाही दिली होती. वय आणि फिटनेस या दृष्टीने जॉर्जचा कदाचित हा शेवटचाच प्रयत्न असणार होता. जॉर्ज आणि ब्रूस यांचा पहिला शिखर प्रयत्न ‘कँप ५’ला सोडून देण्यात आला. त्या पाठोपाठ दुसऱ्या प्रयत्नात, स्वच्छ हवामानात सॉमरवेल आणि नॉर्टन ‘कँप ६’हून निघाले. कृत्रिम प्राणवायूचा उपयोग न करता, त्यांनी २८,१२० फुटांचा नवीन उच्चांक प्रस्थापित केला. जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ४ जून १९२४ रोजी २१,३३० फुटांवरील अग्रिम तळावरून शिखर प्रयत्नासाठी निघाले. नॉर्थ कोलपासूनच त्यांनी कृत्रिम प्राणवायूचा उपयोग सुरू केला होता. पुर्वानुभवानुसार कृत्रिम प्राणवायूचा उपयोग अत्यावश्यक असल्याची जॉर्जची खात्री झाली होती. ‘सँडी’ आयर्विन हा प्राणवायूची नळकांडी हाताळणारा वाकबगार तंत्रज्ञ होता आणि याच कारणामुळे मॅलरीनं त्याला साथीदार म्हणून निवडलं होतं. ६ जूनला ‘कँप ५’ तर ७ जूनला ‘कँप ६’ला ती दोघं पोचली.

george-mallory-search-team

८ जून १९२४चा ऐतिहासिक दिवस उजाडला. हवामान स्वच्छ होतं. पहाटे चारच्या सुमारास जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ‘कँप ६’हून निघाले असावेत. त्याच दिवशी पहाटे ‘कँप ५’हून नोएल ओडेल, मॅलरीच्या शिखर प्रयत्नाची ‘पाठराखण’ करण्यासाठी ‘कँप ६’च्या दिशेने निघाला. ओडेलनं दुपारी एक पर्यंत २६,००० फुटांची उंची गाठली होती. सकाळी दहा वाजल्यानंतर ढगांचं आगमन झालं. थंडगार बोचरे वारे सुरू झाले. संध्याकाळचे पाच वाजत आले. मोठ्या जड अंतःकरणानं नोएल ओडेल खाली येण्यास निघाला. बिघडलेल्या हवामानात, ढगाळ धुरकट अंधारात, ओडेल कसाबसा खुरडत ‘कँप ५’वरील तंबूत शिरला. त्या एका दिवसात ‘कँप ५’ ते २६,००० फूट आणि परत ‘कँप ५’ अशी विक्रमी मजल ओडेलनं मारली होती. जॉर्ज मॅलरी आणि अँड्र्यू आयर्विन ९ जूनच्या संध्याकाळीदेखील परतले नव्हते. ढगाळ हवामान, हिमवृष्टी आणि बेफाट वारे यांचा मारा सुरूच होता. एव्हरेस्ट रुसलं होतं. मॅलरी आणि आयर्विन हे आता कधीच परत येणार नव्हते.

त्याच दिवशी, ८ तारखेच्या दुपारची गोष्ट. एक वाजत आला होता. ढगाळ वातावरण आणि झंझावाती वाऱ्यात शिखराकडे जाणारी ईशान्य धार गायब झाली होती. हाडंही गोठवून टाकणाऱ्या थंडीत, बेफाम वाऱ्यात ईशान्य धारेवर कुडकुडत, ओडेल मॅलरी आणि आयर्विन यांची चातकासारखी वाट पाहत थांबला होता. अचानक ओडेलच्या भिरभिरणाऱ्या नजरेला उसळणाऱ्या ढगातून एक झरोका गवसला. ईशान्य धारेवर खडकाळ ‘स्टेप’ दिसत होती. ‘फर्स्ट स्टेप’ की ‘सेकंड स्टेप’ हे सांगणं कठीण होतं. दोन ठिपक्यांसारख्या आकृती त्याच्या नजरेस पडल्या. अतिशय कष्टपूर्वक हालचाली करत ते दोन्ही ठिपके ‘स्टेप’च्या वर पोचले. श्वास रोखून ओडेल पाहत होता. तेवढ्यात अचानक गवसलेला तो झरोका ढगांनी पुसून टाकला!

north-face-mallory-route1

बेसकॅम्पला, १९२४ सालच्या मोहिमेने मोठ्या दुःखद अंतःकरणाने मॅलरी आणि आयर्विन यांचा मृत्यू स्वीकारला. मॅलरी आणि आयर्विन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ १९ ऑक्टोबर रोजी लंडनच्या सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये मोठी शोकसभा झाली. इंग्लंडचे राजे पंचम जॉर्ज, पंतप्रधान रामसे मॅकडोनाल्ड आणि त्यांचे मंत्रिमंडळ यासह अनेक मान्यवर या सभेस उपस्थित होते. दोन बेपत्ता गिर्यारोहकांसाठी साऱ्या ब्रिटनमध्ये दुखवटा पाळण्यात आला. एका महान साहसी मोहिमेवर पडदा पडला होता.

5

१९३३ साली २६,७६० फुटांवर आयर्विनची आईस अॅक्स सापडली. १९७५ साली एव्हरेस्टवरील चिनी मोहिमेतील ‘वँग हुंगबाव’ या गिर्यारोहकास २६,५७० फुटांवर ‘एका इंग्रज’ गिर्यारोहकाचा मृतदेह सापडला. दुर्दैवानं दुसऱ्याच दिवशी वँग हुंगबाव अॅव्हलांचमध्ये सापडून मरण पावला. चिनी गिर्यारोहण संस्थेने मात्र हे वृत्त विश्वासार्ह नसल्याचं नमूद केलं. १९९९ साली टीव्ही शो Nova आणि BBC यांनी ‘मॅलरी आणि आयर्विन शोधमोहीम’ एरिक सायमनसन यांच्या नेतृत्वाखाली आयोजित केली होती. १ मे रोजी, पूर्वीच्या माहितीनुसार २६,००० फुटांवर शोधाला सुरुवात करताच, काही तासातच कॉनराड अँकर या सदस्यास २६,७६० फुटांवर एका गिर्यारोहकाचा गोठलेला ‘ममी’सारखा मृतदेह सापडला. आयर्विनच्या आईस अॅक्समुळे तो देह आयर्विनचाच असावा अशी सर्व सदस्यांना खात्री होती. मृतदेहासोबत पितळी Altimeter, सांबरशिंगाची मूठ असलेला चामड्याच्या म्यानातील चाकू आणि सुस्थितीतील गॉगल सापडला. अतिशीत हवामानामुळे साऱ्या गोष्टी सुस्थितीत होत्या. रहस्याला एक कलाटणी मिळाली. मृतदेहाच्या अंगावरील कपड्यांवरील लेबले आणि खुणा मात्र दर्शवत होत्या – ‘George Leigh Mallory’. यावरून एक निश्चित झालं होतं की ते मॅलरीचं कलेवर होतं!

पुढील नव्वद वर्षांत, १९२४ सालातील मॅलरी आणि आयर्विनची ईशान्य धारेवरील चढाई, ही घटना एक रोमांचक न उलगडलेलं रहस्य म्हणून साऱ्यांनाच छळत आली आहे. या चढाईचा दुरून का होईना, एकमेव साक्षीदार म्हणजे नोएल ओडेल! त्याच्याच शब्दात सांगायचं झालं तर –

“At 12.50, just after I had emerged from a state of jubilation at finding the first definite fossils on Everest, there was a sudden clearing of the atmosphere, and the entire summit ridge and final peak of Everest were unveiled. My eyes became fixed on one tiny black spot silhouetted on a small snow-crest beneath a rock-step in the ridge; the black spot moved. Another black spot became apparent and moved up the snow to join the other on the crest. The first then approached the great rock-step and shortly emerged at the top; the second did likewise. Then the whole fascinating vision vanished, enveloped in cloud once more.”

ढगातून अचानक सापडलेल्या झरोक्यातून ओडेलच्या सांगण्यानुसार दोन गिर्यारोहक एका ‘स्टेप’च्या खालून वर चढून गेलेले दिसले होते. कुठली ‘स्टेप’ हे सांगणं कठिण आहे. अतिउंचीवरील हवेतील विरळ प्राणवायूमुळे मानवी शरीरावर विविध परिणाम होतात. चढाईच्या वेळेला जाणवणारा थकवा, अपुरा श्वास आणि मेंदूला पुरेसा प्राणवायू न मिळाल्याकारणाने क्वचित होणारा स्मृतीभ्रंश, अशा साऱ्या गोष्टी लक्षात घेऊन ओडेलच्या विधानाचा अनेक गिर्यारोहकांनी आणि तज्ञांनी अभ्यास केला आहे. १९३६ साली सुप्रसिद्ध गिर्यारोहक फ्रँक स्माइथ यांनी एडवर्ड नॉर्टन यांना लिहिलेल्या पत्रात, पहिल्या ‘स्टेप’खाली प्रभावी दुर्बिणीतून पाहत असताना एक काळा ठिपका खडक नसून, मानवी मृत शरीराप्रमाणे आकार  दिसल्याचं नमूद केलं होतं. स्माइथ यांच्या मुलाला हे ‘न पाठवलेलं’ पत्र २०१३ साली सापडलं. प्रसारमाध्यमं अशा माहितीचा गैरवापर करतील या भीतीनं फ्रँक स्माइथ यांनी त्या काळी ही माहिती उघडकीस आणली नाही. मॅलरीचं कलेवर १९९९ साली सापडलं. मॅलरीच्या डोक्यावर समोरच्या बाजूस एक खोल जखम, कमरेभोवती गुंडाळलेला दोर आणि त्यामुळे मोडलेली कंबर अशा गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. मॅलरीचं गिर्यारोहणातील कौशल्य आणि अनुभव, प्राणवायू नळकांडी वापरण्याचं आयर्विनचं तांत्रिक ज्ञान आणि ८ जून १९२४ रोजी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी पाहिलेल्या दृश्याबद्दल ओडेलनं दिलेली जबानी आणि एव्हरेस्टच्या ईशान्य धारेवरील चढाईतील तांत्रिक अडचणी या साऱ्यांचा विचार करता, ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्टवर पोचले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Mount_Everest_North_Ridge

१९९९ साली मॅलरीचं कलेवर सापडल्यानंतर अनेक प्रकारच्या शक्याशक्यता याबद्दल गिर्यारोहण वर्तुळात चर्चांना ऊत आला. ‘शिखर सर करून गिर्यारोहक सुखरूपपणे खाली पोचले तरच ती चढाई पूर्ण यशस्वी मानण्यात यावी’, असं एडमंड हिलरीचं मत; तर अहलुवालिया म्हणतात, ‘छायाचित्राचा पुरावा नसल्यास कुठलीही चढाई ग्राह्य धरू नये.’ कॉनराड अँकर, ख्रिस बॉनिंग्टन, आंग त्सेरिंग असे अनेक मान्यवर गिर्यारोहक मॅलरी आणि आयर्विन एव्हरेस्ट शिखरावर पोचले असतील, ही शक्यता मान्य करतात. जॉर्ज मॅलरीच्या शरीरावर सापडलेल्या गोष्टींमध्ये ‘रुथ’चा, म्हणजेच त्याच्या लाडक्या पत्नीचा फोटो सापडला नाही. जॉर्जनं तो फोटो शिखरावर सोडला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या अंगावर न मोडलेला ‘गॉगल’ सापडला होता. अशा शिखर प्रयत्नात दिवसा ‘गॉगल’ डोळ्यावर असणे अत्यावश्यक असते, नाहीतर Snow Blindness, पूर्ण अंधत्व येऊ शकते. यशस्वी शिखर प्रयत्नानंतर मॅलरीनं ‘गॉगल’ काढून खिशात ठेवला असल्याची शक्यता नाकारता येत नाही. मॅलरीकडे कॅमेरा होता. हा कॅमेरा कधीही सापडल्यास, अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून त्यावरील चित्रं प्रत्यक्षात आणता येतील, अशी Kodak कंपनीनं ग्वाही दिलेली आहे. सापडलेले सर्व परिस्थितीजन्य पुरावे, मान्यवर गिर्यारोहकांची मतं यांच्या आधारे मॅलरी आणि आयर्विन ८ जूनच्या संध्याकाळपर्यंत जगातील सर्वोच्च शिखरावर पोचले असल्याची शक्यता संभवते. या रोमांचक विषयावर जेफ्री आर्चर या लोकप्रिय लेखकानं ‘Paths of Glory’ नावाची बेस्टसेलर लिहिली आहे. हे सारंच गोंधळात पाडणारं रहस्यमय गूढ आहे!

१९५३ साली तेन्सिंग आणि हिलरी यशस्वीपणे एव्हरेस्टवर चढले. त्यानंतर एव्हरेस्टवर अनेक यशस्वी चढाया झाल्या. सुरुवातीच्या काळात कृत्रिम प्राणवायूच्या सहाय्यानं या चढाया करण्यात येत असत. कृत्रिम प्राणवायूशिवाय चढाई करता येणं अशक्य आहे, अशी समजूत होती. १९७८ साली या समजुतीस ऱ्हाइनॉल्ड मेसनर आणि पीटर हेबलर या जोडीनं छेद दिला. ६ मे १९७८ रोजी ती दोघं ‘कॅम्प ३’ला पोचली. कृत्रिम प्राणवायूशिवाय चढाई करण्याच्या त्यांच्या प्रयत्नावर ‘असुरक्षित’ असल्याकारणानं बरीच टीकाही झाली. ती दोघं ८ मे रोजी ‘साउथ कोल’ मार्गे ही चढाई करत होते. बेफाम वारे आणि सतत हुलकावण्या देणारं ढगाळ वातावरण, चढाईतील तांत्रिक अडचणी यावर मात करत, खडतर प्रयत्न आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर मेसनर आणि हेबलर दुपारी १ ते २च्या  दरम्यान यशस्वीपणे शिखरावर पोचले. त्या उंचीवरील प्राणवायूचा अभाव प्रकर्षानं जाणवत होता. दोघंही खूप थकलेले होते. तशा अवस्थेत त्यांनी आपापसातील दोर न वापरण्याचा धाडसी निर्णय घेतला. १ तास ५ मिनिटात हेबलर धडपडत ‘साउथ कोल’ वरील तंबूत परतला. त्यानंतर तब्बल ४० मिनिटांनी मेसनर खुरडत कसाबसा तंबूत शिरला. ‘साउथ समिट’ (२८,७०४ फूट) ते ‘साउथ कोल’ (२५,९३८ फूट) आपण कसे पोचलो, याची कुठलीही आठवण मेसनरला नव्हती. मेंदूला अपुरा प्राणवायू पुरवठा झाल्याचा हा परिणाम होता. हार्ड डिस्क ‘करप्ट’ झाल्यासारखा हा प्रकार होता. याला शास्त्रीय परिभाषेत ‘Partial Amnesia’ म्हणजेच आंशिक स्मृतिभ्रंश म्हणतात.

मी हा लेख लिहित असतांना, माझा सहकारी, मॅलरी आणि आयर्विनच्या १९२४ सालातील उत्तरेकडील मार्गाने चढलेला पहिला मराठी एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण म्हणाला, ‘बाळ्या, काहीही म्हण पण मॅलरीला मानला पाहिजे! त्या काळातील कमी दर्जाची Equipment वापरून, ती दोघं एव्हरेस्टवर ज्या उंचीवर पोचली तो विक्रमच आहे! ते शिखरावर पोचले की नाही, यानी काहीच फरक पडत नाही. मैं तो आजभी उनको सलाम करता हुँ!” मी अंतर्मुख झालो होतो.

Mount_Everest_North_Face

माझ्या मनात ८ जूनची दुपार घोळत होती. मॅलरी आणि आयर्विन, दोघेही अचाट थकलेले असणार. ईशान्य धारेवरील अवघड चढाई, २७,००० फुटांवरील पंचमहाभूतांचं तांडव आजूबाजूला चाललेलं, थकून गेलेलं शरीर – अश्या पर्वतप्राय अडचणींसमोर हार मानून परत फिरण्याचा मोह जबरदस्त असणार. तरुण आयर्विनची जबाबदारी, लाडक्या ‘रुथ’ची आठवण, आपल्या क्षमतेवरील विश्वास, शरीरातील पेशीन् पेशी प्राणवायूसाठी आक्रंदत असणार आणि त्याचबरोबर जगातील सर्वोच्च शिखर केवळ हाकेच्या अंतरावर दिसत असणार. मॅलरीच्या पराक्रमी कविमनात काय भीषण कल्लोळ उसळला असेल, या काल्पनेनंच अंगावर रोमांच उभा राहतो! ती दोघंही हालचाल करत असतांना, प्रयत्न करत असतांना त्यांना मरण आलं असावं हे नक्की. त्यांनी शेवटपर्यंत हातपाय गाळले नव्हते हे उघड आहे. त्या दोघांच्या विजीगिषु वृत्तीला, जिद्दीला सलाम! आज मी नतमस्तक आहे, त्या थोर गिर्यारोहकांना मी श्रद्धांजली वाहतो. मॅलरी आणि आयर्विन ८ जून १९२४ रोजी जगातील सर्वोच्च शिखरावर, एव्हरेस्टवर पोचले होते किंवा नाही यावर चर्चा होत राहील. आणखी पुरावे सापडण्याची शक्यताही जवळजवळ नाही. तेन्सिंग आणि हिलरी यांचं १९५३ सालातील यश तरीही वादातीत राहील. मात्र एव्हरेस्ट संदर्भात मॅलरी आणि आयर्विन यांची नावं साऱ्यांच्याच स्मृतीवर कायमची कोरली गेली आहेत. अश्यावेळी हुरहूर लावणारा विचार मनात रेंगाळतो, वाटतं जणू इतिहासालाच स्मृतिभ्रंश झाला आहे!

 

 

Standard