दोन हिमालय

तसा मी हिमालयाच्या सावलीत अनेकदा वावरलेला माणूस! १९७६ साली हिमालयात गिर्यारोहणाच्या प्रशिक्षणासाठी प्रथमच गेलो आणि हिमालयाच्या मी प्रेमात पडलो. त्याच सुमारास आणखी एका हिमालयाची ओळख झाली आणि लवकरच त्या ओळखीचं गाढ स्नेहात रूपांतर झालं. अभिनय क्षेत्रातील त्या महान कलाकाराचं, हिमालयाचं दुसरं नाव म्हणजे डॉ. श्रीराम लागू! १७ डिसेंबर २०१९ रोजी ते कालवश झाले. काही ओळखी, मैत्र का घडतं हे मला नेहमीच पडणारं कोडं! ४०/४५ वर्षात डॉक्टरांचा अकृत्रिम स्नेह मला मिळाला हे माझं थोर भाग्य.

आमची उंची साधारणपणे सारखीच,पण त्यांच्या सोबत असतांना, त्यांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे सुरवातीस एक दडपण येत असे. पेशानं डॉक्टर पण एका आंतरिक उर्मीनं आयुष्याच्या उत्तरार्धात ते अभिनयाकडे वळले आणि त्यांनी उपजत गुण आणि अथक परिश्रमांच्या सहाय्याने अभिनयाचा एक मानदंड उभा केला. स्वच्छ गोरा वर्ण, सुस्पष्ट वाणी, आवाजाची उत्तम फेक, काळजाचा ठाव घेणारी भेदक घारी नजर आणि थक्क करणारी देहबोली. साहजिकच त्यांच्या सोबत असताना हिमालयाच्या सावलीत असल्याचा भास होत असे.
डॉक्टरांचं वाचन अफाट होतं. विचारांची सुस्पष्टता असलेला कठोर बुध्दीप्रामाण्यवादी, पण तरीही अतिशय संवेदनशील माणूस! त्यांच्याकडे अभिनयातील कमावलेली शिस्त होती, अनेकदा त्यांचे सहकलाकार त्यामुळे वचकून असत. आवाजाच्या रियाजासाठी रोज दोन तास काढणारे डॉक्टर मला आठवतात. उध्वस्त धर्मशाळा,हिमालयाची सावली, नटसम्राट, सामना, सिंहासन, दुभंग, आत्मकथा असं काय काय तरी आठवतं. त्यांचा अभिनय पाहणं ही एक पर्वणी असे.

ते मुंबईहून पुण्याला स्थलांतरित झाल्यावर अनेकदा गाठीभेटी होत असत. एवढा मोठा माणूस पण कुठेही गर्व किंवा दंभ याचा लवलेश नसे. कधी अस्वस्थ असतांना मी सहज उठून डॉक्टरांकडे जात असे. ‘ये बाळ्या, ये!’ असं अगत्यपूर्वक स्वागत होत असे. प्रेमळ बापाच्या छायेत असल्याचा भास होत असे. मनातली जळमटं दूर होऊन मी नव्या उत्साहाने बाहेर पडे. त्यांच्या सहवासात मला गंगास्नान घडल्याचा अनुभव येत असे.
. ‘लमाण’ हे त्यांचं आत्मचरित्र वाचत असतांना, काही ओळी उन्मेखून लक्षात राहिल्या. डॉक्टरांनी टांझानियातील ‘किलिमांजारो’ शिखर सर केल्यावर त्या उत्तुंग ठिकाणी त्यांच्या मनातले भाव –
“आणि आत एक आवाज उमटला. निःशब्द गाभार्‍यातल्या घंटानादासारखा स्वच्छ, नितळ, खणखणीत, आत्मविश्वासाने भारलेला.
डिसेंबर १९६८ अखेर मी भारतात परतेन तो व्यावसायिक डॉक्टर आणि हौशी नट म्हणून नव्हे तर व्यावसायिक नट आणि हौशी डॉक्टर म्हणून!”
गेल्या अनेक वर्षात डॉक्टरांच्या रूपाने ‘नटसम्राट’, हिमालय आणि उत्तुंग व्यक्तिमत्व अशी मनात ठसलेली प्रतीकं मला नतमस्तक करतात. शेवटाकडे त्यांची प्रकृती हळूहळू ढासळत गेली. आधी फिरायला, मग नुसतेच बसायला ते ARAIच्या टेकडीवर जात असत, त्यांच्या आवडत्या बाकावर! शांत तेवणारी ज्योत मंद होत आली होती पण माझं मन ते मान्य करायला कचरत होतं. १७ डिसेंबर २०१९ रोजी डॉक्टर गेले. धक्का नसला तरी भयानक पोकळी जाणवत होती. “Dust thou art, and unto dust shalt thou return!” म्हणजेच ‘मातीतून मातीकडे’ असा भावार्थ असलेल्या या बायबल मधील ओळी डोक्यात रेंगाळत होत्या.


डॉक्टरांना अंधश्रध्दा अमान्य होती, तर अंधश्रध्दा निर्मूलनाच्या कामात ते अग्रेसर होते. मी त्यांच्या अस्थींचा अंश मिळवला. त्यांच्या अस्थी, त्यांचे विचार, मी काहीसा अडखळलो. मला खात्री आहे की त्यांना अंधश्रध्दा अमान्य असली तरी श्रध्देला त्यांचा विरोध असण्याचं काहीच कारण नव्हतं. संस्कृतीच्या कालप्रवाहात मागचे पुढच्यांशी जोडले जातात. पूर्वसुरींचे विचार निश्चितच महत्त्वाचे परंतु या शृंखलेत दोन कड्या एकमेकांशी जुळतात आणि यात भावना, श्रद्धा यांचा अतूट ऋणानुबंध असतो. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ एक वृक्ष त्यांच्या आवडत्या जागी, म्हणजेच ARAI च्या टेकडीवरील बाकाशेजारी लावावा अशी कल्पना मनात आली. पर्यावरण तज्ञ श्री. द. महाजन यांच्या सल्ल्यानं शिरीषाचा वृक्ष लावावा असं ठरलं. त्यांचे नातेवाईक, अनेक चाहत्यांच्या प्रयत्नातून १९ जानेवारी २०२० रोजी ती कल्पना प्रत्यक्षात आली आणि त्यांच्या अस्थींचा एक अंश त्या स्मृतिवृक्षाच्या मुळाशी मातीत मिसळला. अर्थातच भावी पिढ्यांसाठी एका महान कलाकाराचे, डॉक्टरांचे हे एक जिवंत स्मारक ठरेल अशी मला खात्री आहे.

मी, हिमालय आणि डॉ. श्रीराम लागू असं प्रतीकात्मक नातं माझ्या मनात ठामपणे होतं. म्हणूनच अस्थींचा उर्वरित अंश हिमालयात गंगोत्री येथे विसर्जित करावा अशी प्रबळ इच्छा होती. जानेवारी महिन्यात गंगोत्री परिसर पूर्णपणे हिमाच्छादित असतो. अक्षय्य तृतीयेला हिम पूर्णपणे वितळल्यावर, गंगोत्रीसह इतर मंदिरांचे ‘पट खुलतात’ आणि चार धाम यात्रेचा मौसम सुरू होतो. या वर्षी २६ एप्रिलला अक्षय्य तृतीया होती, म्हणून मी प्रवासाची जय्यत तयारी केली. दुर्दैवाने करोनाच्या महासंकटामुळे त्या बेतावर पाणी फिरलं. मग मात्र मी उत्तराखंड पुन्हा कधी ‘खुलं’ होतंय याची वाट पहात होतो!
१०/१२ मोहिमा, ४०/५० ट्रेक या निमित्ताने हिमालयात अनेक वाऱ्या झाल्या. साहजिकच गढवाल/उत्तराखंड या भागात अनेक मित्रमंडळी आहेत. ‘साब, अब आप आ सकते हो!’ असा हर्शिलहून माधवेंद्र रावतचा निरोप आला आणि मी लगेच विमानाची तिकीटं, ऋषिकेशहून भाड्याची गाडी अशी सर्व तयारी तातडीनी केली. एकीकडे डॉक्टरांना आदरांजली आणि दुसरीकडे हिमालयाचं निकट दर्शन होणार यामुळे मी उत्साहात होतो. निघण्यापूर्वी, चारच दिवस अलीकडे दिलीप लागूचा फोन आला, ‘बाळ्या, मी येऊ का तुझ्या बरोबर?’ दिलीप हा डॉक्टरांचा पुतण्या, माझी हरकत असण्याचं काहीच कारण नव्हतं. मी लगेच रुकार दिला. मीही विज्ञानवादी, बुध्दीप्रामाण्यावर विश्वास ठेवणारा त्यामुळेच कुठलीही धार्मिक कारणं मा‍झ्या मनात नव्हती. हिमालय आणि डॉक्टर ही आम्हा दोघांसाठी प्रिय श्रध्दास्थानं! मुंबईहून थेट फ्लाईटने डेहराडून येथे पोचून १० ऑक्टोबरला आम्ही गंगोत्रीकडे मार्गस्थ झालो देखील!

आमच्या चक्रधर महाराजांनी, ‘हमे रास्ता बिलकुल पता है, आप चिंता मत करो!’ असा गुटक्याचा तोबरा भरलेल्या तोंडानं हवाला दिला आणि आमच्या नकळत चुकीच्या रस्त्यानं आम्ही यमुनाकिनारी पोचलो! मागे फिरण्यात आणखी वेळ गेला असता म्हणून मग यमुना दर्शन करत बडकोट मार्गे खूप उशिरा उत्तरकाशीच्या अलीकडे मुक्काम केला. आमच्या वेळापत्रकाची पूर्ण काशी झाली होती! मात्र चिडचिड शांत करणारा गारवा आणि भागीरथीचा अखंड खळाळ रात्री सोबतीला होता. पहाटे लवकरच आम्ही हर्शिलकडे निघालो. उत्तरकाशीत ‘भंडारी’ हॉटेल जागं व्हायचं होतं म्हणून बसस्टँड समोरील टपरीत फॅन बिस्कीट आणि बंद आमलेट असा नाश्ता केला. अॅडव्हान्स कोर्स, अनेक मोहिमा, ‘भंडारी’ आणि बंद आमलेट अश्या अनेक स्मृती जागवत आम्ही मार्गस्थ झालो. वाटेत मनेरीपाशी ‘खेडी’येथे जल विद्युत केंद्रातून बाहेर पडणारा दमदार जल स्त्रोत वाऱ्यासोबत उडणाऱ्या तुषारांनी साऱ्या रस्त्याला अभ्यंग स्नान घडवत होता! हर्शिलमध्ये माधवेंद्र आणि जुना कुक ग्यान यांच्या सोबत चहा घेतला. उगमानंतर भागीरथी प्रथमच एका विस्तृत खोऱ्यातून वाहू लागते. हर्शिलच्या ‘पहाडी राजा विल्सन’ची आठवण झाली.

समोर श्रीकंठ पर्वतरांग, टेकडीआड दडलेला आर्मी कँप आणि दूरवर दिसणार्‍या मुखबा गावातील गंगा मंदिर दिसत होतं. हिवाळ्यात गंगोत्रीची ‘गंगा’ मूर्ती माहेरपणाला याच मंदिरात येते आणि अक्षय्य तृतीयेला पुन्हा गंगोत्रीला परत जाते. त्या अद्भुत शीतल वातावरणात ‘करोना’, घरचे व्याप, कामं आणि कटकटी कधीच विरून गेल्या होत्या. सभोवार पसरलेलं देवदाराचं घनदाट जंगल,त्यामागून डोकावणारी स्वर्गीय चमकदार हिमशिखरं, मंदिरातून ऐकू येणारा अस्पष्ट घंटानाद, अंतर्बाह्य सचैल स्नान घडून शुचिर्भूत झाल्यागत वाटत होतं.
लंका भैरवघाटीपाशी खोल दरीतून वाहणाऱ्या जडगंगेवरील पूल लागून गेला. या रस्त्यावरून दिमाखदार श्रीकैलास आणि सुदर्शन या हिमशिखरांचं मनोहारी दर्शन घडतं. यात्रा सुरू होऊनदेखील गंगोत्रीत आश्चर्य वाटण्या जोगी फक्त तुरळक गर्दी होती. मंदिरापाशी उजवीकडील पायऱ्या उतरून आम्ही भागीरथीच्या प्रचंड खळाळ असलेल्या पत्रापाशी पोचलो. मनात असंख्य आठवणी दाटून आल्या होत्या. डॉक्टरांच्या उत्तुंग व्यक्तिमत्वामुळे आणि गाढ अकृत्रिम स्नेहामुळे मी निश्चितच समृध्द झालो आहे. सरस्वती लुप्त झाल्या नंतर, उत्तर भारताला सुजलाम सुफलाम करणाऱ्या, सारस्वत संस्कृतीचं, पावित्र्याचं प्रतीक असलेल्या गंगेच्या उगमापाशी आम्ही होतो.

डॉक्टरांच्या स्मृतीचा अंश मी त्या खळाळत्या प्रवाहात विसर्जित केला. प्रखर विचारी धवल हिमशिखरा प्रमाणे अचल व्यक्तित्व,प्रेमळ कोमल हात आणि आश्वासक स्वर, डॉक्टरांची स्मृती नेहमीच माझ्या मनात नेहमीच जिवंत राहील. नकळत माझ्या डोळ्यात पाणी होतं, मी ते पुसण्याचा प्रयत्नही केला नाही. आज मी दोन हिमालायांच्या सावलीत केवळ नतमस्तक होतो.


-वसंत वसंत लिमये

Standard

One thought on “दोन हिमालय

  1. आपण डॉ लागूंवर इतके अप्रतिम लिहिलेत की डोळ्याच्या कणा पाणावल्या. महान कलाकार आणि त्यांच्या अस्थींचा एक छोटासा अंश का होईना पण गंगोत्रीत पोहोचला हे वाचून खूप समाधान वाटले.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s