तसा मी ठाण्याचा. ‘कांचनजंगा’ मोहीम आटपल्यावर, म्हणजे १९८८ साली माझं पुण्याला येणं वाढलं. शालेय मुला मुलींसाठी साहस शिबिरांचं आयोजन करणारी ‘रानफूल’ ही संस्था नुकतीच जन्माला आली होती. माझा मित्र मिलिंद याची आई, श्रीमती ज्योतीबाई कीर्तने यांच्या सौजन्यानं पौड रस्त्यावरील गुरुराज सोसायटी, येथे त्यांच्या इमारतीतील आउट हाउस आम्हाला ऑफिस म्हणून लाभलं. तो STD/ISD कॉलचा जमाना, आणि माझ्या लवकरच लक्षात आलं की STD बिलाच्या रकमेत मला पुण्यात फ्लॅट भाड्यानं घेता येईल. झालं, लगेच मी पौड रस्त्यावर किनारा हॉटेलच्या गल्लीत एक फ्लॅट भाड्यानं घेतला देखील. आता मी पुणेकर झालो होतो!

अन्न, वस्त्र, निवारा यापैकी महत्त्वाची गरज अन्नाची आणि त्यासाठी लवकरच मला पौड रस्त्यावरील ‘श्रीमान’चा शोध लागला. खाण्या ‘पिण्या’ची मस्त सोय झाली. काही वर्षांपूर्वी हॉटेल श्रीमान हे रेस्टॉरंट जणू गावाबाहेर होतं आणि म्हणूनच बिल्डर, प्रेमी युगुलं, ऑफिसनंतर जमणारे यांचं हे आवडतं ठिकाण. चवदार खाणं आणि अगत्यशील सेवा यामुळे लवकरच माझा आणि माझ्या डोंगरी मित्रांचा तो आवडता अड्डा झाला. नकळत आमच्या मित्रमंडळीत ‘खानावळ’ हे नाव रूढ झालं! विरळ होत जाणाऱ्या केसांमुळे उंच भासणारं कपाळ, चष्मा आणि नेहमीच जाड मिशांखाली दडलेलं मनमोकळं, मैत्रीपूर्ण हसू. स्थूल शरीरयष्टी, पोटावर येणाऱ्या पँटमध्ये खोचलेला बुशशर्ट अशी व्यक्ती शरीराला शोभणार नाही अश्या चपळतेनं, सर्वांना काय हवं नको याची प्रेमळ दखल घेत हॉटेलभर अखंड फिरत असे. ते होते मालक म्हणजेच ‘राजनशेठ उडाणे!’ साहजिकच ओळख झाली आणि काही कळायच्या आत घट्ट मैत्रीदेखील. नव्या शहरात एक सख्ख्या भावासारखा मित्र मिळाला आणि मी खऱ्या अर्थानं कोथरूडवासीय झालो!

राजन आणि मोहन या भावात राजन मोठा. शेजारीच असलेलं शाकाहारी ‘रत्नप्रभा’ हॉटेल मोहन सांभाळत असे. आमची ओळख वाढत गेली आणि हळूहळू राजनच्या परिवाराची माहिती होत गेली. मला धंदेवाईक पंजाब्यांच्या ‘गोडबोले’पणाचा अनुभव होता, परंतु राजनकडे एक सुसंस्कृत, प्रेमळ गोडवा होता. कडूसच्या अलीकडील राजगुरुनगर जवळील ‘दोंदे’ हे उडाण्यांचं गाव. राजनचे वडील विठ्ठलराव उडाणे तरुणपणी पुण्यात येऊन मंगळवार पेठेत स्थायिक झाले. बारणे वाड्यात त्यांचं छोटंसं बिऱ्हाड होतं. आई, रत्नप्रभा ही वडगाव मावळची. विठ्ठलरावांचं लाडकं नाव होतं ‘नाना’ तर आईंना सारे ‘अक्का’ म्हणत असत. विठ्ठलराव फक्त चौथी पास तर त्याकाळी तळेगावच्या शाळेत फायनल (म्हणजेच सातवी) पास झालेली अक्का. नाना सुरुवातीस पेपर वाटप करत असत, १९६२ सालापासून त्यांची रिक्षा होती. कष्टांची तमा न बाळगता विशेष धडपड करून ‘धंदा, व्यवसाय’ वाढवत नेणे हा नानांचा ध्यास असे. पुढे एकीच्या पाच/सहा रिक्षा झाल्या, मग ७४ साली त्यांनी मंगळवार पेठेत दारूचं दुकान सुरु केलं. ८० साली नानांनी पौड रस्त्यावर आधी एक दुकान बुक केलं. ते कमी पडेल असं वाटल्यामुळे त्यांनी बेधडक शेजारचं दुसरं दुकान घेतलं. व्यावहारिकतेचं भान ठेवून धाडसी स्वप्नं पाहण्याची जिद्द त्यांच्याकडे होती आणि या साऱ्या प्रवासात अक्का त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती.



कालांतरानं मला कळलं की मोहननं जमशेदपूरहून इंजिनियरिंग केलेलं आहे. मंगळवार पेठेतलं बालपण, वडिलांचं दारूचं दुकान असं सारं असूनही राजन आणि मोहन इतके सुसंकृत, सुस्वभावी कसे, हे माझ्या मध्यमवर्गीय मनाला पडलेलं कोडं होतं. अक्का आणि नाना यांच्या आग्रहामुळे, त्याकाळी इंग्रजी माध्यम असलेल्या, सेंट मिराज या मान्यवर शाळेत जाणारी राजन आणि मोहन ही दोनच पेठेतली मुलं होती. ७३/७४ साली राजन आणि मोहन रिक्षा धुवत असत. एका रिक्षाचे पाच पैसे मिळत. या बहाद्दरांनी ते पैसे गोळा करून २६ रुपयांची भाऊबीज ताईला दिली होती. त्याकाळी अक्का पापड करायची, दाणे-चणे याची पाकिटं दुकानाला पुरवायची. अक्कानं या कर्तबगारीवर २०-३० तोळे सोनं जमवलं होतं. कष्ट, सचोटी आणि शिक्षणाचं महत्व हे बाळकडू राजन आणि मोहनला अक्कांकडून मिळालं होतं. राजन ११वीत असतांना ‘प्रशांत ट्रेडर्स’ ही कंट्री लिकर एजन्सी त्यानी संभाळली. तो स्वतः ट्रक घेऊन, फलटणला जाऊन माल भरून घेऊन येत असे. ८३ साली ‘श्रीमान’ सुरु झालं आणि कॉलेजला असतांना श्रीमानची सर्व जबाबदारी राजननी उचलली. हॉटेलची जबाबदारी असल्यानं ८३ साली राजनला क्रिकेटची प्रचंड आवड असून वर्ल्ड कपची मॅच पाहता आली नाही. एवढंच कशाला सुरुवातीच्या काळात रात्रीची उशिरापर्यंतची आवाराआवर संपल्यावर राजन कित्येकदा हॉटेलातील बाकावरच झोपत असे. तोपर्यंत उडाणे कुटुंब मंगळवार पेठ सोडून पौड रस्त्यावरील ईशदान सोसायटीत राहायला आलं होतं. नाना रोज संध्याकाळी चालत, सोबत त्यांचा आवडता कुत्रा ‘गब्बर’ याला घेऊन श्रीमानवर येऊन बसत असत. ‘गब्बर’चा हॉटेलच्या खांबावर लावलेला फोटो माझ्या अजूनही स्मरणात आहे. आजूबाजूचं वातावरण कसंही असलं, सांपत्तिक स्थिती अगदी बेताची असली आणि कुठलाही उद्योग असला तरी प्रामाणिकपणा आणि जिद्द यांच्या बळावर एखादं कुटुंब नेकीनं किती समृद्ध होऊ शकतं आणि सुसंस्कृत राहू शकतं याचं उडाणे परिवार हे एक उत्तम उदाहरण आहे. मी एका मध्यमवर्गीय शिक्षकाच्या घरात वाढलो, त्यासोबत मिळालेल्या आणि सहसा गृहीत धरलेल्या संस्कारांचं महत्त्व उडाणे कुटुंबाकडे पाहिलं की खऱ्या अर्थानं कळतं.



नाना पुण्यात आले तेंव्हा सुरुवातीला त्यांना एका खाणावळीत ‘पाव सॅम्पल’चंच जेवण परवडत असे. पण म्हणूनच कधीतरी ‘खाणावळ’ सुरु करायची असं नानांच्या डोक्यात पक्कं होतं. प्रमोद पुरोहित नावाच्या आर्किटेक्ट मित्राच्या सल्ल्यानं ‘खाणावळी’चं स्वप्न श्रीमानच्या रूपांनं प्रत्यक्षात आलं. श्रीमानच्या उद्घाटन समारंभानंतर सारी मंडळी ‘गौरव’मधे जेवायला गेली होती. राजन आणि मोहन यांनी आयुष्यात पहिल्यांदा पंजाबी पदार्थांचा आस्वाद घेतला. पण कालांतरानं तेच पदार्थ श्रीमानमधे मिळू लागले. नव्या गोष्टी, तंत्रज्ञान आत्मसात करणं हे राजनला सहज जमतं. आत्ताच्या काळात २०१३ च्या बॉम्ब स्फोटानंतर ‘जर्मन बेकरी’ची उध्वस्त जागा विकत घेऊन, ‘जर्मन बेकरी’ हा ब्रँड नावारूपाला आणून आता पाच नवीन उपाहारगृहं अस्तित्वात आली आहेत. या प्रयत्नात राजनच्या सोबत त्याच्या मुलानं, कुणालनं हिरीरीनं पुढाकार घेतला आहे. नाना, अक्का यांच्यापासून सुरु झालेली परंपरा त्यांच्या मुलांच्यातही आलेली पाहून खूप आनंद होतो. ही सारी मुलं मी लहानाची मोठी होतांना पहिली आहेत. चटकन वाकून मोठ्यांना नमस्कार करायला ती आजही लाजत नाहीत. आजकाल आदरभावना असणं हेही विरळाच आणि त्याचा सन्मान राखणं हेही दुर्मिळ! अनेक संकटं आली, तरीही न डगमगता त्यांना तोंड देत प्रगतीपथावर राहण्याचा वसा राजन, मोहन आणि त्यांची मुलं यांनी कसोशीनं पुढे चालवला आहे. २३ मे १९८३ रोजी श्रीमान सुरु झालं. त्याआधी पाचच दिवसांपूर्वी १७ मे रोजी राजनची बहिण सौ. नूतन सुधाकर पाचर्णे ही इंडियन ऑईलची ‘श्री डिस्ट्रीब्युटर्स’ या नावानं भारतातील पहिली महिला वितरक झाली. आजही राजन, मोहन पंढरीच्या वारीला दोन/तीन दिवस तरी जातात आणि वारकर्यांना खाऊ घालतात. राजनच्या कुटुंबाचा हा सारा इतिहास पाहिला की आपण थक्क होतो!


सुरवातीच्या काळात राजनच्या सोबत जिवलग मित्र अरविंद चव्हाण असे तर अभय भोसले यांच्यासारखा थोरल्या भावासारखा मित्र त्याला लाभला. श्रीमानमधील शशी वस्ताद, विजय मेहता, भरत, रवि आणि विजय घडशी अशी भक्कम टीम राजननी उभी केली. ‘चिकन हंडी’सारखा प्रकार सर्वप्रथम पुण्यात राजननी सुरू केला. किचन, बार आणि सर्व्हिस यावर बारीक लक्ष ठेवणारा राजन कधीही कातावलेला, रागावलेला किंवा चिडलेला मला दिसलेला नाही. यशस्वी नेतृत्वाचं हे एक मोठं लक्षण आहे. पूर्वी आठवड्यात दोन-तीनदा आम्ही खाणावळीत हजेरी लावत असू. मला आठवतंय, माझी मुलगी रेवती आणि मिलिदची ऋचा या दोघीही खूप लहान होत्या. आमच्या गप्पा, मेहफिली रंगत असत. या दोघी मोठ्या शहाजोगपणे स्वतंत्र टेबलावर बसून आवडतं बटर चिकन मागवत. थोड्या वेळानं झोप अनावर होऊ लागल्यावर, भरत सारखा प्रेमळ वेटर दोन खुर्च्या जोडून, त्यावर लाल चौकडीच्या टेबलक्लॉथची गादी करून त्यांची झोपायची व्यवस्था करून देत असे. साहजिकच आमच्या मेहफिलीत कुठलाच खंड पडत नसे. खरंच, अतिशय बहारदार काळ होता तो आणि ही सारी ‘राजनकृपा’ होती!

राजन तसा अबोल, पुढे पुढे न करणारा पण लाघवी स्वभावामुळे त्याचा मित्रपरिवार खूप मोठा. ‘श्रीमान’मधे हिंदी फिल्म कलाकार रझा मुराद, मराठी अभिनेता उपेंद्र लिमये, दिग्दर्शक प्रवीण तरडे, तबलावादक पंडित विजय घाटे, एव्हरेस्टवीर सुरेंद्र चव्हाण आणि अनेक कलाकार अशी मंडळी सहज दिसतात. बहुतेक सर्व बिल्डर, अनेक नामांकित डॉक्टर आणि वकील इथे आवर्जून भेट देतात. जुन्या काळी शरद तळवलकर, विक्रम गोखले, निळू फुले, रवींद्र महाजनी, मोहन जोशी असे थोर कलाकार, तर मान्यवर राजकीय नेते बॅरीस्टर गाडगीळ, विजयसिंह मोहिते पाटील, पतंगराव कदम आणि रामकृष्ण मोरे हे देखील ‘श्रीमान’चे चाहते होते. आपण आवडत्या हॉटेलमधे अनेकदा तिथल्या खास खाद्यपदार्थांच्या आस्वादासाठी जातो पण हॉटेल मालकाच्या मैत्रीमुळे येणारा खास चाहतावर्ग ही राजनची खासीयत. अव्हानकारक परिस्थितीतून वर आलेला आणि तरीही ते यश डोक्यात न गेलेला आदर्श उद्योजक म्हणजे राजन! प्रचंड धडपड्या, निगर्वी, हसतमुख आणि आमचा प्रेमळ मित्र राजन उद्या साठीचा उंबरठा पार करतो आहे, त्या निमित्त त्याला उदंड शुभेच्छा! मित्रा, असाच हसतमुख रहा!

- वसंत वसंत लिमये , २४ जून २०२१
खूप छान लेख . व्यक्ती वर्णन ,स्वभाव वर्णन , उद्योग धंदा कसा करावा हे वाचता राहिलो … आणि तुमची लेखणी कधी थांबली हे कळलेच नाही .
राजनसेठ च्या जीवन प्रवासाचे अतिशय सुंदर वर्णन. आम्हाला आमच्या मैत्रीचा किंबहुना मित्राचा अभिमान आहे
सुरेख !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
वाह! 🙏आमच्या राजा काकांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यांचे अभिनंदन करण्या साठी आपोआप हात जोडले जातात.श्री अरविंद चव्हाण यांचे ते खूप घट्ट मित्र आणी आमच्या मनू आणी तनु चे ते आवडते राजा काका आहेत. त्यांच्या बद्दल आणी मीना वाहिनी व सर्व उडणे कुटुंबाचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. राजा काका यांनी कधीच जुन्या माणसांना सोडले नाही. ही माणसं आणी यांची साथ म्हणजे आमच्या साठी गर्व करण्याची गोष्ट आहे. राजा काकांना असेच यश मिळत राहो व त्यांची प्रकृती अशीच उत्तम राहो आणी भारी कामगिरी करतं राहो ही ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🙏
“राजन उडाने”….राजा माणूस ….🙏
👍👍💐💐
राजन साहेबांचं कौतुक करावे तेवढे थोडेच .त्यांचे कष्ट,जिद्द आणि विशेष म्हणजे सर्वांना आपलसं करणारं त्यांच व्यक्तीमत्व वाखाणण्याजोगे आहे ही साठी तुमची इतक्या सहजतेने तुम्ही प्रेमळ लोकांच्या सहवासात पार केलीत. आमच्या सर्वांच्या शुभेच्छांचा वर्षाव असाच कायम आपल्या पाठीशी राहुन आपल्याला दिर्घ आयुष्य लाभो आमच्या सम्पूर्ण शेजवळ परिवारातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Birthday Saheb
Khup chhan prendaye aahe
My best wishes
We are also part of the journey enjoyed one of the best handi & fish fry @ श्रीमान् हॉटेल.Rajan sir has a very good nac off keeping in touch with his clients & friends. Wishing you a best for future