आधुनिक मध्ययुगीन ताश्कंद! (लेख २)

‘तोश्कंद’, ‘तोश’ म्हणजे खडक आणि ‘कंद’ म्हणजे नगर. ताश्कंद म्हटलं की मूर्ती लहान पण कीर्ती महान असणारे लाल बहादूर आठवतात. गोल चेहरा, हसणारी जिवणी आणि चार चौघात सहज मिसळून जाईल अशी अबोल ठेंगणी मूर्ती. अफाट कर्तृत्वाचा हा खडकासारखा चारित्र्यसंपन्न माणूस, अजूनही ताश्कंदवासीयांच्या लख्खपणे स्मरणात आहे!

ताश्कंदमधील आपल्याच वकिलातीतील एका माणसाने मला या सफरीसाठी खूप मदत केली आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे मी ‘रमाडा’ हॉटेलात मुक्काम केला. माझ्या अनेक परदेश वाऱ्या झाल्या असल्या तरी उझ्बेकिस्तान हा असा पहिलाच देश जिथे माझ्या प्रत्यक्ष ओळखीचं कुणीच नव्हतं! आमचे व्याही आणि विहीणबाई प्रचंड भटके, त्यांनीच माझी सुमंत जाधवशी ओळख करून दिली. सुमंतनी सुचवलेला स्थानिक गाईड अकबर माझा सांगाती होता.

इथे येण्यापूर्वी मी जमेल तेवढं वाचन केलं होतं. अचानक दचकवणारी ताश्कंद संदर्भातील समोर आलेली माहिती म्हणजे तिथला ‘सेक्स टुरिझम’! काही नाठाळ मित्रांचं चावटपणे खीः खीः करूनही झालं. रशियन व इतर मध्य आशियातील मुली यात आढळतात असं म्हणे! एका रेस्टॉरंट मधील ‘बेली डान्सर’ वगळता मला हा प्रकार (!) बटबटीतपणे कुठेही आढळला नाही.

मध्यपूर्वेतील सौदी अरेबिया, दुबई आणि ओमान येथे प्रचंड आर्थिक सुबत्ता आहे. मुस्लिम स्थापत्यशास्त्राची छाप असलेल्या आधुनिक इमारती, रुंद, प्रशस्त रस्ते आणि विविध प्रकारच्या अमेरिकन, जपानी आणि कोरियन गाड्यांची अनेक मॉडेल्स तिथे दिसतात. युरोपात खूप हिरवळ, झाडी आणि युरोपियन धाटणीच्या इमारती आढळतात.

उझ्बेकिस्तान हा चारही बाजूंनी जमिनीने वेढलेला देश, नगररचनेसंदर्भात एक गमतीशीर सरमिसळ तुमच्या समोर घेऊन येतो. भलेथोरले रस्ते, इथे काही जुन्या ‘लाडा’ नावाच्या रशियन गाड्या तर Chevrolet कंपनीच्या वेगवेगळ्या गाड्यांचा इथे सुळसुळाट आहे.

तपमानातील प्रचंड फरकामुळे पांढरा हा इथला आवडता सर्वमान्य रंग. चिरचिक नदीच्या विस्तीर्ण खोऱ्यात ताश्कंद हे शहर वसलं आहे. ताश्कंद शहराचे ‘अंखॉर’ कालव्यामुळे वायव्य आणि आग्नेय असे दोन भाग पडले आहेत. वायव्य भागात जुनं शहर तर आग्नेय भागात १९व्या शतकात आलेल्या रशियन ‘झारिस्ट’ राजवटीनंतर नवीन शहराचा विकास होत गेला. जुन्या शहरात शयबानिद राजवटीतील १५व्या – १६व्या शतकातील अनेक स्मारके आढळून येतात.

चोर्सू बाजार, काफाल शशी मशीद आणि जामा मस्जिद अश्या देखण्या इमारतींचा यात समावेश होतो. १९६६ च्या भयानक भूकंपानंतर सुमारे ६० टक्के शहराचा पुनर्विकास करण्यात आला. याच काळात ताश्कंदमधील महत्वाकांक्षी मेट्रोची उभारणी करण्यात आली. साऱ्या शहरभर रशियन धर्तीचे फ्लॅटस् असलेल्या ठोकळेबाज इमारती आढळून येतात. याच रशियन शैलीतील १९७० साली बांधलेलं, अगडबंब, २५४ खोल्यांचं ‘फोर स्टार’ हॉटेल उझ्बेकिस्तान ताश्कंदच्या मध्यवर्ती भागात मोठ्या दिमाखात उभं आहे.

लाल बहादूर शास्त्रींचं वास्तव्य असलेलं ताश्कंद हॉटेल इथून जवळच आहे.

उझ्बेकिस्तानचा ज्ञात इतिहास ७० हजार वर्षांपूर्वी पासूनचा आहे. चीन, भारत यांना युरोपाशी जोडणारा सुप्रसिद्ध ‘सिल्क रूट’ या व्यापारी मार्गाचा इतिहास सुमारे अडीच हजार वर्षांचा आहे.

८व्या – ९व्या शतकात इथे पर्शियन समानिद साम्राज्य होतं. ट्रान्सएशियन संस्कृतीचा हा सुवर्णकाळ समजला जातो. ग्रीक सम्राट अलेक्झांडरनं त्याच्या आक्रमक मोहिमेत ख्रिस्तपूर्व ३२८ मधे हा भाग पादाक्रांत केला होता. याच काळातील एका संरक्षक भिंतीचे अवशेष आजही आपल्या नजरेस पडतात.

तुर्की, अरेबियन, पर्शियन अश्या विविध राजवटी इथे अस्तित्वात होत्या. काही काळ गझनीच्या साम्राज्याने इथे हात पाय पसरले होते. ६व्या शतकात बुद्ध धर्मदेखील इथे पोचला. सिर दर्या आणि आमु दर्या या दोन महत्वाच्या नद्या आणि त्यांच्यापासून काढलेले असंख्य कालवे गेली अडीच हजार वर्षं अस्तित्वात आहेत. १२२१ मधे मंगोलियन चेंगीझ खानाचे आक्रमण झाले आणि त्यात समरकंदचा विध्वंस झाला. चेंगीझ खानाच्या वंशजांची ही ‘चागताई’ राजवट सुमारे १३८० पर्यंत टिकली. इथूनच पुढे ‘अमीर तिमूर’चा समरकंद भागात उदय झाला आणि आजच्या उझबेकिस्तानच्या वैभवशाली इतिहासाची सुरवात झाली.


‘अमीर तिमूर’ म्हणजे आपल्यासाठी आक्रमक क्रूरकर्मा ‘तैमूरलंग’! त्याने दिल्लीपर्यंत रक्तरंजित मुसंडी मारली होती. तिथली ‘अमीर तिमूर’ची लोकमान्यता शिवाजी महाराजांसारखी आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही! माझ्यासाठी हे नवलच होतं! साहित्य, संस्कृती आणि स्थापत्य कला यासाठी ‘तिमूर’नी पर्शिया, अरबस्तान आणि भारत येथून अनेकांना पाचारण करून आश्रय दिला. नवीन समरकंद वसवलं. ‘तिमूर’चा खापर पणतू म्हणजे बाबर, याला तिथे ‘बाबुर’ म्हणून ओळखतात. रशियावरील स्वारीत पराभव झाल्यामुळे ह्या महाशयांनी भारताकडे मोहरा वळवला आणि भारतातील ‘मुघल’ साम्राज्याचा पाया रचला. ताश्कंदमध्ये मध्यवर्ती ठिकाणी याच ‘अमीर तिमूर’चा घोड्यावर स्वार झालेला तीस फुटी पुतळा आहे, तर समरकंदमध्ये २५ फुटी सिंहासनावर बसलेला पुतळा आहे!

‘अमीर तिमूर’च्या कारकि‍र्दीत अनेक सुंदर देखण्या इमारती समरकंद येथे बांधण्यात आल्या. आपल्याकडील ‘मुघल’ इमारतींवर या शैलीचे प्रतिबिंब आढळून येते. ताश्कंद मधेही याच शैलीतील अनेक घुमट आणि मिनार दिसून येतात. विटांच्या बांधकामावर प्रामुख्याने निळ्या चमकदार टाईल्सचा साज चढवलेला दिसतो. प्रमाणबध्द अप्रतिम शैली स्तिमित करणारी आहे.

१८६० सालाच्या सुमारास उझ्बेकिस्तानवर रशियाच्या झारने आक्रमण सुरु केलं. झारनं हद्दपार केलेला राजपुत्र रोमानव्ह उझ्बेकिस्तानात स्थायिक झाला. ताश्कंद शहराच्या मध्यवर्ती भागात रोमानव्हचा देखणा प्रासाद पाहता येतो.

पहिल्या महायुद्धानंतर १९२५ साली उझ्बेकिस्तान हे सोव्हिएत युनियनमधील सहभागी राज्य झालं आणि पुढे १९९१ साली उझ्बेकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित झालं.

ताश्कंदमधे खाण्याच्या अनेक जागा चवदार आहेत. त्यांच्या आहारात ताज्या भाज्यांची सलाड्स, दह्याचे प्रकार आणि भाजलेले मांस प्रमुक्याने असते. अनेकविध, छान शिजलेले कबाब, शाशलिक लज्जतदार असतात. इथले इंटरनॅशनल प्लॉव (पुलाव) सेंटर सुप्रसिध्द आहे. लाकडी रसरसलेल्या भट्टीवर असणाऱ्या राक्षसी कढया कमाल आहेत.

मला अजमेरच्या गरीब नवाज दर्ग्यातील अकबराने भेट दिलेली अवाढव्य कढई आठवली! आणखी एक प्रेक्षणीय स्थळ म्हणजे ‘सिल्क रूट’ जमान्याची आठवण करून देणारा इथला ‘चोर्सू बाझार’.

गोलाकार, भलाथोरला मधला घुमट आणि त्याच्या भोवती फेर धरून असलेले छोटे घुमट अशी या बाजाराची रचना. पुण्यातील मंडईच्या दहापट असणारा हा चोर्सू बाजार थक्क करणारा आहे. मुख्य घुमटाखाली समकेंद्री वर्तुळाकार पद्धतीने स्टॉल्स मांडलेले आहेत. इथे बहुतांश माल संस्कारित स्वरुपात मिळतो, म्हणजेच सलाडसाठी कापलेल्या भाज्या, दही, पनीर आणि चीजचे अनंत प्रकार, मसाल्याचे पदार्थ आणि विविध मांसाचे प्रकार.

घुमटाच्या पहिल्या मजल्यावरील गॅलरीसारख्या ठिकाणी सुक्या मेव्याचा बाजार आहे. मुख्य बाजारात शिरल्यावर ताज्या विविध रंगांची लयलूट नजरेस पडते.

‘मांस’ या विभागात सुरेख पद्धतीनं मांडून ठेवलेले चिकनचे तुकडे, तसेच बीफ, मटण आणि ‘OT गोश्त’ म्हणजेच घोड्याचे मांस असे विविध प्रकार मांडून ठेवलेले दिसतात.

भारतीय नजरेला अवघड वाटणारा हा विभाग तरीही आपल्याला थक्क करतो. उन्मेखून उल्लेख करण्यासारखी गोष्ट म्हणजे येथील अप्रतिम स्वच्छता. गमतीची गोष्ट म्हणजे इथेच नाही तर साऱ्या उझ्बेकिस्तानात मला ‘माशी’ नावाचा प्राणी दिसलाच नाही! सुमारे १५ फुट अंतरावरूनच जिरं, धने आणि अज्वैन यांचा घमघमाट जाणवणारा मसाल्याचा बाजार मोहात पाडतो. वेगवेगळ्या पोत्यांमध्ये मसाल्याच्या पदार्थांच्या राशी मांडलेल्या, मला मंडईबाहेरील अबीर, गुलालाच्या दुकानांची आठवण झाली.

मुख्य घुमटाच्या बाहेर रंगीबेरंगी रसरशीत भाज्यांचा बाजार भरलेला असतो. इथले टोमॅटो जास्त लाल तर काकड्या गर्द हिरव्या रंगानी तुम्हाला खुणावत असतात. अतिशयोक्ती वाटेल पण एक नक्की की इथल्या भाज्या, फळं जास्त रसरशीत आणि ताज्या असतात. उझ्बेकिस्तान हा शेतीप्रधान देश, त्याची भिस्त आहे कापूस, गहू, भाजीपाला आणि फळे यावर. शेतीमाला संदर्भात हा देश स्वयंपूर्ण असून अनेक गोष्टींची निर्यातदेखील करतो. चोर्सू बाझाराचा ताजेपणा, थक्क करणारी नैसर्गिक रंग समृद्धी आणि कलकलटाचा अभाव माझ्या नेहमीच स्मरणात राहील!

पहिल्या दोन दिवसातच माझ्या मनातील विविध जळमटं आणि किल्मिषं कापरासारखी उडून गेली. रस्त्यावरील टपरीवजा स्टॉलवर आग्रहानं ‘सोम्सा’ (सामोसा) खाऊ घालणारा हसरा दाढीवाला अब्दुल, भाषेची अडचण असूनही भरभरून बोलणारा माझा गाईड रहीम, रमाडा हॉटेलमधील हसऱ्या, प्रेमळ मुनाज्योत आणि बार्नो अश्या मॅनेजर्स आणि इतर सर्व ठिकाणी भेटणारे हसरे, बोलके, लालबुंद, गोरे उझ्बेगी चेहरे मी कधीच विसरणार नाही.

मंगोल, पर्शियन आणि कॉकेशियन वंशांची सरमिसळ उझ्बेगी चेहऱ्यात हमखास आढळते. मध्य आशियातील एका समृद्ध मनमोकळ्या देशाची ताश्कंदनं ओळख करून दिली होती. त्या साऱ्या आधुनिक वातावरणात माझी नजर इतिहास शोधत होती.

मध्ययुगीन स्थापत्य शैली आणि ऐतिहासिक इमारतींचे मला वेध लागले होते. चलो चलते है – Next stop, Bukhara!

वसंत वसंत लिमये.

Standard

One thought on “आधुनिक मध्ययुगीन ताश्कंद! (लेख २)

  1. प्रवास वर्णन वाचावं तर तुमचं. व्यक्तिशः कुठेही न जाता जणू तिथे गेल्याची अनुभूती मिळते. सलाम!!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s