एक अद्भुत सफर (लेख १)

सकाळी खिडकीतून बाहेर डोकावलो. प्रसन्न सकाळ, हवेत हलका गारठा. बाहेर पाहिलं तर उगवत्या सूर्याची जाग समोरच्या इमारतीवर सोनेरी प्रकाशात चमकत होती. मला का कुणास ठाऊक इंग्लंडमधील Milton Keynes या शहराची आठवण झाली. Milton Keynes हे पूर्णपणे नव्यानं वसवलेलं शहर, तर १९६६च्या भयानक भूकंपानंतर रशियन राजवटीत जवळ जवळ पुन्हा उभारलेलं ताश्कंद हे शहर. त्या पुनरोत्थानाची आठवण म्हणून शहरात मध्यवर्ती ठिकाणी मुंबईच्या हुतात्मा चौकातील जोडशिल्पाची आठवण करून देणारं Courage Monument म्हणजेच धैर्यशिल्प उभं आहे.

उद्या व्हिसाचं काय होणार ही उरात काळजी घेऊनच मी दिल्लीला निघालो. दुपारीच पोचलो पण अस्वस्थ होतो. दिल्लीचे एजंट थोर असतात. मी माझा व्हिसासाठी अर्ज २२ मार्चला केला होता. सोळा दिवस होऊन गेले तरी ‘आप चिंता मत करो, हो जायेगा!’ हे एजंटचं पालुपद चालूच होतं. माझी चिडचीड आणि अस्वस्थता वाढण्याचं ते मूळ कारण होतं. ‘जर मिळाला नाही तर? हा बागुलबुवा भेडसावत होता. गेल्या दोन महिन्यातील सारे प्रयत्न, खटपटी आणि साधारणतः साठ हजार खर्च, हे सारं पाण्यात जाणार ही भिती अस्वस्थ करत होती. अधिक विचार न करता मी संध्याकाळी पाचपर्यंत चक्क झोप काढली! हे अजूनही जमतं हा नशीबाचा भाग! साडे पाच वाजून गेले तरी काही फोन नव्हता.

शेवटी एकदाचा एजंटचा माणूस गुरमीतसिंग साडे सात वाजता उगवला आणि मी अधाशाप्रमाणे पासपोर्ट उघडून व्हिसा पाहिला, तेव्हा जीव भांड्यात पडला. नंतर कळलं की हा सारा उशीर उझबेकिस्तान वकिलातीमुळे झाला होता! या करोना काळात सारंच अनिश्चित झालं आहे आणि काही काळ तरी याची सवय करून घेण्याशिवाय गत्यंतर नाही.

पहाटे साडे चार वाजताच मी एयरपोर्टकडे निघालो. दिल्लीतही कडक संचारबंदी जाणवत होती. दोन तीन ठिकाणी प्रयत्न करूनही सकाळचा पहिला चहा मिळाला नाही. व्हिसा, RT-PCR टेस्ट रिपोर्ट, पासपोर्ट आणि तिकीट असं संभाळत चेक-इन, इमिग्रेशन आणि सिक्युरिटी चेक असे अडथळे पार करत मी हुश्श करत लाऊंजमध्ये स्थानापन्न झालो. एकीकडे गेल्या काही दिवसातील धडपड आणि अनिश्चितता यामुळे आलेला शीण जाणवत होता तर दुसरीकडे आता मी ताश्कंदला नक्की पोचणार याचा आनंद होता. आजूबाजूची गर्दी, हलक्या आवाजातील संभाषणं आणि कुण्या बाईच्या निर्विकार आवाजातील विमान तळावरील अनाऊन्समेंटस्, हे वितळत जाऊन मन हलकेच भूतकाळात शिरलं. डोळ्यासमोर दोन तीन हजार वर्षांपूर्वीच्या ‘सिल्क रूट’वरील व्यापारी काफिल्यांची चित्रं तरळू लागली.

उंट, घोडे आणि खेचरं यावर लादलेला माल, पायघोळ अंगरखे आणि डोक्यावर मंदिल मिरवणारे जाडजूड व्यापारी आणि अफाट पसरलेल्या पिवळसर, रेताड वाळवंटातील पाचूप्रमाणे तलाव असलेलं ओअॅसिस. संपर्काच्या साधनांचा पूर्ण अभाव, दळणवळणाची प्राचीन साधनं, पराकोटीच्या हवामानातील परस्परविरोधी बदल आणि हालअपेष्टा म्हणजेच त्या काळातील प्रवास असणार. चीन भारत इथून निघणारा माल पामीर, हिमालय अशा पर्वतराजी ओलांडून, अफाट लांबलचक वाळवंटी प्रदेशातील समरकंद, बुखारा असे टप्पे पार करून इस्तंबूलमार्गे युरोपात पोचत असे. परतीच्या प्रवासात युरोपातील माल चीन व भारतात येत असे. अश्या एखाद्या सफरीस दहा बारा महिने सहज लागत असणार. त्या काळातील देवाणघेवाण, परकीय भाषा, अनोळखी संस्कृती आणि रीती रिवाज, विनिमयासाठी लागणारे पैसे आणि घासाघीस या साऱ्या गोष्टींचा केवळ विचार करतांना देखील आज थकायला होतं. सतलज नदीच्या काठावरील बिलासपुर मधील व्यापाराची हुंडी म्हणे तिबेटमधील ल्हासा येथे चालत असे! प्राचीन काळापासून याच व्यापारामुळे खूप महत्वाची सांस्कृतिक देवाणघेवाण झाली असणार. व्यापारी, त्यांचे मुनीम, काफिल्यातील मजूर या साऱ्यांच्याच मनात अश्या सफरीवर निघतांना काय काय येत असेल? अनुभवी लोकांकडून ऐकलेल्या कहाण्या आणि भेडसावणारी वर्णनं, असं असूनही अश्या सफरीवर जाण्यासाठी लागणारी जिगर या लोकांकडे निश्चितच असणार. साध्या ताश्कंदच्या प्रवासासाठी निघताना आजच्या काळातील माझी घालमेल आठवून मला गंमत वाटली, खरं सांगायचं तर थोडीशी लाज देखील वाटली!

मानवाचा इतिहास मोठा रंजक आहे. सुरुवातीस गुहेत वास्तव्य करणारा माणूस शिकार आणि कंदमुळं यावर उदरनिर्वाह करत असे. यानंतर शेतीचा शोध लागला आणि हळूहळू जगात विविध ठिकाणी नागरी संस्कृतीचा विकास होत गेला. अनेकविध धर्मांचा उदय झाला. व्यापारामुळे सांस्कृतिक देवाणघेवाण होत ज्ञानसाधनेचा विकास झाला. त्यानंतर तलवारीच्या बळावर राज्यविस्तार, लुटालूट आणि धर्मप्रसार होत गेला. अनेक राजवटी, हत्याकांडे आणि स्थापत्यकलेचा विकास अश्या गोष्टींची मध्ययुगीन इतिहासात रेलचेल आहे. त्याच काळातील सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेला उजबेकिस्तान हा मध्य आशियातील देश.

तैमुरलंगाच्या रक्तरंजित कहाण्या, प्रामुख्यानं मुसलमान देश आणि १९२५ ते १९९१ सोव्हियत रशियाचा भाग असलेला उजबेकिस्तान येवढी जुजबी माहिती आणि ‘सिल्क रूट’चं आकर्षण असं मनात घेऊन मी ताश्कंदला पोचलो. माझ्या मनातील असंख्य किल्मिषं दूर झाली! धर्माचा कुठलाही अतिरेक आढळला नाही, येवढंच कशाला या साऱ्या प्रवासात कुठेही झोपडी किंवा माश्या औषधाला देखील सापडल्या नाहीत! खेळीमेळीच्या वातावरणात पर्यटकांचं स्वागत करणारे लोक, इतिहासाचा सार्थ अभिमान असूनही नव्या जगाकडे उत्साहानं पाहणारा हा देश. भारतीय म्हणून माझं विशेष स्वागत झालं. इथल्या लहानथोरांना हिंदी संगीत, राज कपूर, ‘शाखरुख खान’ आणि मिथुन चक्रवर्ती यांचं अपार आकर्षण. गेल्या दोन महिन्यातील सारी जळमटं दूर सारून मी एका धमाल अनुभवासाठी सिद्ध होतो.

वसंत वसंत लिमये.

Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s