सुरस आणि चमत्कारिक – (लेख ५)

पामीर पर्वतशृंखलेच्या उत्तरेला ताश्कंद, पश्चिमेकडे समरकंद आणि त्याही पलीकडे बुखारा, ही ‘Afrosiyob’ या वेगवान रेल्वेनी जोडली आहेत. बुखाराहून मी समरकंदला निघालो. तेथे अकबरच्या ओळखीचा सुख्रॉब हा माझा गाईड असणार होता. वडील ताजिक वंशाचे तर आई तातार जमातीतील. एरवी युरोपियन आणि विशेषतः इटालियन पर्यटकांबरोबर काम करणाऱ्या सुख्रॉबचं इंग्रजी अस्खलित होतं. त्यालादेखील हिंदी सिनेमाचं वेड, सीता और गीता, बॉबी आणि बागबान हे याचे आवडते सिनेमे. ‘शाखरुख खान’ आणि अमिताभचा हा चाहता. ही उझ्बेगी मंडळी म्हणजे इकडचे बंगाली असावेत. रोशोगुल्ल्याप्रमाणे सुख्रॉब, अॅफ्रोसियॉब, सोम्सा आणि अल्कोगोल (अल्कोहोल) अश्याच बहुतेक शब्दांना गोलाकार देणं या मंडळींना सहज जमतं. बुखारा, समरकंद प्रवासात सुपरफास्ट गाडीनं एकदा चक्क ‘२०८’ कि.मी. दाखवलं. समरकंदमधे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या ‘झरीना’ हॉटेलमध्ये मी मुक्काम केला. पर्शियन भाषेत झरीनाचा अर्थ काय असेल कुणास ठाऊक, परंतु इथे मात्र झरीना म्हणजे झारचे स्त्रीलिंगी रूप. रेल्वेतून प्रवास करतांना दक्षिणेकडे दूरवर असलेल्या पर्वतरांगांची चाहूल लागली. ही पर्वतरांग म्हणजेच पामीर पर्वतशृंखला. दुसऱ्याच दिवशी दोन दिवसांसाठी ‘रोड ट्रीप’साठी आम्ही पहाटेच नववर्षाचं स्वागत करण्यासाठी निघालो. १३ मार्च म्हणजे गुढीपाडवा, चैत्र प्रतिपदा आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी रमझानचे रोजे सुरु होत होते. यामुळेच बिचाऱ्या सुख्रॉबचा कडकडीत, निर्जळी उपवास होता.

पहाटे निघाल्याकारणानं दक्षिणेकडे जाणाऱ्या M39 वर आम्हाला फारसा ट्रॅफिक लागलाच नाही. अर्ध्या तासातच सुमारे ४० कि.मी. अंतर कापून ‘तख्त कराचा’ नावाच्या (5365 फुट) खिंडीत आम्ही पोचलो. इथून प्रथमच तुरळक हिमाच्छादित शिखरांचं दर्शन झालं. १०˚C तापमानात, हलक्या वाऱ्यामुळेदेखील थंडीचं बोचरेपण जाणवत होतं. वाटेत गाजर मुळ्यासारखी दिसणारी ‘चिकुरे’ वनस्पती विकणारी उझ्बेगी बाई दिसली. त्या चिकुरेंचा रंग तिच्या गालावर चढला होता. सुक्या मेव्याचा छोटेखानी बाजार भरला होता. सुके अंजीर, पिस्ते, बदाम, किशमिश, अक्रोड यांच्यासोबत डांबरांच्या गोळ्याप्रमाणे भासणाऱ्या टोपलीभर पांढऱ्याशुभ्र गोळ्या. याला ‘कुरुट’ म्हणतात. दुधापासून बनवलेल्या चक्क्यामध्ये थोडंसं मीठ आणि साखर घालून, त्याच्या गोळ्या बनवून कडकडीत उन्हात वाळवल्या जातात, यालाच कुरुट म्हणतात. वाळवंटी प्रदेश, दूरच्या सफरी यामुळे सुके, खारवलेले मांस, सुका मेवा आणि कुरुट हा सिल्क रूटवरील अत्यावश्यक शिधा असे. वाटेत गायी, गुरं, शेळ्या मेंढ्या आणि छोटी टुमदार खेडी लागत होती. मातीच्या, उन्हात वाळवलेल्या विटांपासून इथली घरं बांधलेली असतात. माझ्या डोक्यातील ‘खेडं’ या प्रतिमेला धक्का देणारी स्वच्छ, सुंदर ही खेडी होती. या खिंडीतून खाली उतरून, आम्ही किताब गाव मागे टाकताच ‘शाख्रीसब्ज’ नावाचं गाव लागलं. हे अमीर तिमुरचं जन्मगाव!

आदल्या रात्री मी ‘आमु दर्या’ नदीच्या काठी असलेलं ‘टिरमिझ’ आणि ताजिकीस्तानमधील दुशान्बेच्या वाटेवरील ‘बेसुन’ यांच्याकडे जाणाऱ्या रस्त्यांचा अभ्यास करत होतो. पामीर पर्वतशृंखलेचं आकर्षण जास्त असल्यानं मी बेसुनला जाण्याचा निर्णय पक्का केला. वाटेतील शाख्रीसब्ज, ‘कुल किशलाक’ तलाव आणि दरबांद येथील प्राचीन मशीद अश्या ठिकाणांच्या डायरीत अंतरासकट नोंदी करून ठेवल्या. प्रवासात लॅपटॉप, अर्थातच गुगल मॅप उघडणं अवघड होतं. शाख्री सब्ज नंतर गुजर येथे आम्ही डावीकडे वळलो. नंतर मात्र कुल किश्लाक आणि दरबांद यांच्यात माझी काहीतरी गल्लत झाली. माझ्या गाईडला सुख्रॉबसाठी हा साराच प्रकार नवलाईचा होता. तो या मार्गावर फारसा कधी आलाच नव्हता. दरबांदपाशी मातकट, लाल पाणी असलेली ‘थुरकोन दर्या’ नावाची नदी लागली. याच नदीच्या उगमाकडे कुल किशलाक आहे अशी माझी ठाम समजूत! दरबांद गावापाशी तलावाची आम्ही जुजबी चौकशीदेखील केली. याच भागातील डोंगरात ‘थेशिक तोष’ म्हणजेच खडकातील एक गुहा आहे. याच गुहेत १९३० सालाच्या सुमारास मानवाच्या उत्क्रांतीतील Neanderthal वंशाच्या एका लहान मुलीच्या हाडांचा सांगाडा सापडला होता. उझ्बेकिस्तानच्या अतिप्राचीन इतिहासाची ही एक महत्वाची खूण. मी त्या नदीचं ‘Red River’ असं नामकरण केलं. याच नदीच्या काठानं आम्ही कुल किशलाक सरोवराच्या शोधात मार्गक्रमणा करू लागलो. पुढील सुमारे १२ कि.मी.चा प्रवास एका अफलातून दरीतून झाला. बहुतेक ठिकाणी समोरासमोरच्या पहाडी भिंती जेमतेम २०० मी. अंतरावर होत्या. खडकातील विविध थर, अंगावर येणारे कडे आणि खळाळत वाहणारा लाल नदीचा प्रवाह हे सारं थक्कं करणार होतं. मला उन्मेखून लडाख, लाहौल, स्पितीची आठवण होऊन गेली. आजूबाजूच्या पर्वतराजीत लाल खडकाचे, मातीचे तिरके पट्टे दिसून येत होते. नदीच्या उगमाकडे असलेली लाल माती वाहून आणल्यामुळे ही नदी लाल झाली असावी. दरीचा प्रवास संपताच आम्ही एका पठारावर पोचलो. उजवीकडील दरीतून येणाऱ्या लाल नदीने आमच्याशी फारकत घेतली होती. इथेच आम्हाला एक छोटं खेडेगाव लागलं. कुल किशलाक किंवा एखादं सरोवर याची कुणालाच कल्पना नव्हती. आम्ही साफ चुकलो होतो! आल्या रस्त्यानं मुख्य रस्त्याकडे परत येण्यावाचून इलाज नव्हता. त्याच दरीचं उग्रभीषण, रौद्रभयंकर सौंदर्य पुनश्च अनुभवता आलं.

१४ एप्रिलला बेसुनहून पहाटेच निघून आम्ही समरकंदकडे निघालो. घाटरस्ता सुरु होऊन थोडे पुढे येताच दरबांदपाशी दोन रस्ते फुटले. एक निघाला होता टिरमिझ या अफगानिस्ताणच्या सीमेवरील गावाकडे, तर दुसरा समरकंदमार्गे ताश्कंदकडे. सकाळच्या कोवळ्या उन्हात हिरवीगार कुरणं आणि शेळ्या मेंढ्यांचे कळप दिसत होते. वाटेतील एका छोट्या खेड्यापाशी ‘मुल्ला नसरुद्दिन’ भेटला! नाही, गंमत करतोय. गाढवावर बसलेला एक हसरा आनंदी म्हातारा भेटला. ‘फोटो काढू का?’ असं विचारताच आनंदानं तयार झाला आणि मोठ्या आग्रहानं, ‘चला घरी चहा पिऊया!’ म्हणून आम्हाला त्यानं खूप आग्रह केला. मला आता परतीचे वेध लागले होते आणि वेळेत करायच्या RT-PCR टेस्टची टांगती तलवारही होतीच. समरकंदला येताच वाटेतच एका क्लिनिकमधे टेस्ट करून मी झरीना हॉटेलमधे पोचलो. हॉटेल मालकानं मोठ्या आवडीनं, सजावट म्हणून उझ्बेगी ‘उखळा’सकट जुन्या आठवणी जपल्या आहेत.

या सगळ्या धावपळीत समरकंदमधील ‘रेगिस्तान’ हे महत्वाचं लोकप्रिय ठिकाण पाहायचं राहून गेलं होतं. संध्याकाळ होताच, अनेक रंगाच्या रोषणाईने झगमगणारा रेगिस्तान हा भलाथोरला चौक समरकंदच्या मध्यवर्ती ठिकाणी वसला आहे. त्या संध्याकाळी रेगिस्तान चौकात उझ्बेगी संगीताची मेहफिल चालू होती. चौकात डावीकडे उलुघबेग, मध्ये ‘तिलीया कोरी’ म्हणजेच सोन्यानं मढवलेलं नक्षीकाम असलेली, तर उजवीकडे ‘शेर-दोर’ अश्या तीन मान्यवर मदरसा आहेत. प्रत्येक मदरश्यासमोर भव्य महाद्वार आणि डावी उजवीकडे मिनार अशी रचना उझ्बेकिस्तानात सर्वत्र आढळते. या गोपुरासारखे दिसणाऱ्या महाद्वारांना ‘पेश्ताक’ म्हणतात. संध्याकाळच्या गार हवेत मी थक्क होऊन समोरचा नजारा न्याहाळत होतो. कानावर अरबी संगीताशी मिळतंजुळतं संगीत (?) कानावर पडत होतं. यात कधी खंजिरी, घुंगरू अश्या वाद्यांसह उडत्या आनंदी चालीचं संगीत असतं, तर अनेकदा विव्हळणाऱ्या आवाजात विरही आर्त स्वर कानावर पडतात. ८४ साली सौदी अरेबियात असल्यापासून, मला कधीही न उमजलेला हा संगीतप्रकार आहे. रेगिस्तान पाहून सुख्राबबरोबर मी अमीर तिमूरची समाधी पाहायला गेलो. येथील मिनारासोबतचा निळाभोर घुमट, अप्रतिम नक्षीकामानं सजवलेला आहे.

सुख्राबचं लक्ष सारखं घड्याळाकडे जात होतं. साडे आठ वाजून गेले होते. त्यांनी उपास सोडायचा ७.१३ चा मुहूर्त कधीच टळून गेला होता. दिवसभराच्या कडकडीत निर्जळी उपवासानंतर सुख्राबला कडकडून भूक लागली असणार! आम्ही तडक ‘मन्सूर शाशलिक’ नावाच्या स्थानिक हॉटेलात जेवायला गेलो. अप्रतिम सलाड, तीन चार प्रकारचे कबाब आणि त्याबरोबर सढळहस्ते देण्यात येणारा पांचट चहा असं आमचं जेवण! एक नक्की की अतिशय कमी मसाले वापरून बनवलेले कबाब/शाशलिक जिभेवर विरघळतात.

समरकंद हे शहर ख्रिस्तपूर्व ८०० साली वसवलं असावं. इ.स. १२२१ मध्ये चेंगीजखानाचं आक्रमण झालं आणि त्याने सारं समरकंद शहर उध्वस्त केलं. १३३६ साली शाख्रीसब्ज इथे अमीर आणि तेकीना खातून यांच्या पोटी जन्माला आलेला ‘तिमूर’ म्हणजेच पोलादी पुरुष, याने एका भक्कम राजवटीची मुहूर्तमेढ रोवली. खेळतांना किवा कुठल्याश्या किरकोळ लढाईत तिमूरचा उजवा हात आणि उजवा पाय पंगू झाला होता आणि यावरूनच तैमुरलंग हे त्याचं नाव प्रसिध्द झालं. ‘अमीर तिमूर’ त्याच्या घोडेस्वारी आणि युद्धकौशल्यासाठी नावाजला गेला. विविध टोळ्या, आक्रमणं या पार्श्वभूमीवर प्रथमच, अमीर तिमूरनं उझ्बेकीस्तानमध्ये स्थिर सत्ता निर्माण केली. आपल्याला त्याची एक आक्रमक क्रूरकर्मा येव्हढीच ओळख आहे. याचाच खापरपणतू ‘बाबुर’ यानं मुंडक्यांच्या राशी रचत, खैबरखिंडमार्गे भारतात येऊन १५२६ साली मुघल साम्राज्याचा पाया रचला. असं असूनही अमीर तिमूरच्या काळात समरकंदचा सांस्कृतिक विकास झाला. अमीर तिमूरनं नवीन समरकंद वसवलं.

रेगिस्तान जवळच एक विस्तीर्ण चौकात ‘अमीर तिमुर’चा भव्य, सिंहासनावर बसलेला पुतळा आहे. घुमटाकार शिरस्त्राण, जाड भुवया आणि दाढीमिशा असलेला करारी चेहरा, डाव्या हातातील सरळसोट पल्लेदार तलवारीवर उजवा हात स्थिरावलेला. अतिशय अंदाधुंद, रक्तरंजित काळात उझ्बेकीस्तानात स्थैर्य आणणाऱ्या कर्तबगार सेनापतीचा हा पुतळा, मी निरखून पाहत होतो. कला, संस्कृती आणि स्थापत्यशास्त्राला राजाश्रय देणारा राजा, त्या पराक्रमी, करारी योध्द्याच्या चेहऱ्यात हरवून गेला होता. इथे ‘अमीर तिमुर’ला महाराजांप्रमाणे मानतात. त्यानंतर झेराव्शान नदीच्या काठी असलेला ‘अफ्रासियाब कालवा’ आणि त्याकाठी असलेलं उध्वस्त समरकंद, अलेक्झांडरच्या काळी बांधलेल्या संरक्षक भिंतीचे अवशेष आणि शाही दफनभूमी ‘शाही झिंदा’ असं पाहून मी ताश्कंदकडे निघालो.

लहानपणापासून ऐकलेल्या ‘अरेबियन नाईट्स’ मधील सिंदबादच्या गोष्टी, अलिबाबा आणि चाळीस चोर आणि अल्लाउद्दिनचा जादुई दिवा अश्या कहाण्या वाचतांना डोक्यात येणारी विशेषणं म्हणजे ‘सुरस आणि चमत्कारिक’! बालमनाला ते सारंच अद्भुत आणि मनोरंजक वाटे. प्रेमळ माणसं, मुस्लिम कर्मठपणाचा पूर्ण अभाव, चवदार खाणं, ओळखीचं वाटणारं तरीही स्तिमित करणारं अप्रतिम स्थापत्य आणि इमारती, करोनाच्या भयाचा पूर्ण अभाव आणि आल्हाददायक हवामान, सारंच अद्भुत. खडतर ‘सिल्क रूट’च्या प्रतिमा, त्या प्रवाश्यांचं साहस माझ्या मनात रेंगाळत होतं. ‘पुन्हा नक्की यायचं’ असं मनाशी घोकत मी दिल्लीच्या विमानात पाऊल ठेवलं. अश्या तऱ्हेनं ही ‘उझ्बेकिस्तान’ची सुरस आणि चमत्कारिक कहाणी सुफळ संपूर्ण झाली!

वसंत वसंत लिमये

Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s