निसटती नाती

माझी एक डॉक्टर मैत्रीण परवा घरी आली होती. गेले बरेच दिवस ती गायबच होती, ‘म्हटलं, असेल कशात तरी गुंतलेली!’ तिचा नवरा एक प्रथितयश अर्किटेक्ट, तोही मित्रच. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. अचानक ती म्हणाली, ‘अरे, आम्ही दोघांनी सेपरेट व्हायचं ठरवलं आहे!’ मी चाट पडलो! काही क्षण अस्वस्थ शांततेचे गेले. ‘काय सांगतेस काय? असं झालं तरी काय?’ मला कंठ फुटला. मैत्रीण खूप शांत होती. तिनी सविस्तर सारी कहाणी सांगितली. दोघांचं हे दुसरं लग्न, दोघांचीही मुलं मोठी. या दोघांनी प्रेमात पडून, विचारपूर्वक सर्वांच्या संमतीनं लग्न केलं आणि दोघांचेही छान जमलं होतं. त्यामुळेच सारं अनपेक्षित, धक्कादायक होतं! दोघंही शहाणे आणि विचारी असल्यानं, त्यांचं विलग होणंही बहुदा शांतपणे घडलं होतं. मलाच हे सारं स्वीकारणं अवघड जात होतं.

मनुष्य समाजशील प्राणी आहे म्हणून नाती ही असणारच. निसर्ग नियमानुसार वंशवृध्दीसाठी स्त्री पुरुष एकत्र येणार हे स्वाभाविक आहे. समाज व्यवस्था या नात्याकडे एक परंपरा म्हणून पाहते आणि यात प्रजनन हाही संदर्भ होताच. पण यापलीकडे जाऊन नाती असणं ही माणसाची गरज आहे. नाती आणि त्यातूनही स्त्री-पुरुष नाती ही अकल्पनीय रित्या गुंतागुंतीची असतात. परस्परां बद्दल वाटणारं आकर्षण, प्रेम, मग ते मुरल्यावर जुळून येणारं नातं. विवाह ही लौकिक दृष्ट्या त्यावर होणारी शिक्कामोर्तब असते. अनेकदा सुरवातीचं गुलाबी आकर्षण संपलं तरी कालांतराने नाती सवयीची होऊन जातात आणि तरीही टिकून राहतात. ‘मला तुझ्या सोबत छान म्हातारं व्हायचं आहे!’ असं दीर्घायुषी प्रेमळ नातं हे अनेकांचं स्वप्नं एखाद्या बिल्डरच्या दूरस्थ होर्डिंगवरच राहतं! उष्ट्या जिलबीपासून सुरू झालेला प्रवास, समंजसपणे तुझी बिन साखरेची काळी कॉफी आणि माझा मस्त गोड चहा अश्या एकोप्यानं मजेत सुरू राहतो. सुरवातीस सारं काही ‘एकत्र’ करण्याचा हव्यास असतो. ‘हमारे खयाल कितने मिलते है!’ असा तो मयुरपंखी काळ. काही दिवसांनी आवडी बदलतात किंवा त्या भिन्न असल्याचा शोध लागतो! पण परस्परां बद्दल आदर असल्यानं त्याची काहीच अडचण होत नाही. परस्परां बद्दलच्या आदराला कधीतरी नकळत तडा जातो आणि मग तेच आवडतं नातं डोईजड होतं!

स्त्री पुरुष भिन्न आहेत म्हणूनच मजा आहे! दोघंही एकत्र येण्यात निश्चित परस्पर पूरक स्वार्थ असतात. फार पूर्वी प्राचीन आदिमानवाच्या काळी गुहेत रहात असतांना काय होतं कुणास ठाऊक, पण माणूस जसा सुसंस्कृत होऊ लागला तस तसं स्थैर्य त्याला प्रिय होऊ लागलं. स्थैर्याबरोबर दिलासा, सुरक्षितता आली पण त्याच बरोबर नीतीनियम, रीती रिवाज, रूढी, सुस्थापित व्यवस्था, रचना अस्तित्वात आल्या. कुठल्याही रचनेत एक सुसूत्रता असते, अधिकृतता असते. आणि म्हणूनच ते नातं शिष्टसंमत झालं, त्यात शरीरसंबंध असूनही कुठलंही चोरटेपण किंवा अपराधीपण नव्हतं. परंतु रचनेमुळे त्यात एक सामान्यत्व आलं, साऱ्यांना एकाच समान नियम! पण यात वैयक्तिक उत्कृष्टतेचा ध्यास बाजूला पडला, वगळला गेला. जोडीतील एक असामान्य असेल तर दुसर्‍याला शेपूट बनून अनुनय करण्या वाचून पर्याय उरला नाही. तसंच काही वेळेस या व्यवस्थांचा अतिरेक झाला किंवा त्या विकृत झाल्या. स्त्री पुरुषातील समानता लयास गेली आणि पुरुषप्रधान संस्कृती, बालविवाह, सती अश्या अनिष्ट प्रथा रूढ झाल्या.

हे नातं बिनसायला अनेक कारणं असू शकतात. सासू सासरे, दोन्ही घरची मंडळी आणि या दोघांना ते सारे कसे स्वीकारतात यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पूर्वी लक्षात न आलेल्या एकमेकातील त्रुटी, स्वभावातील कंगोरे. काही काळानंतर त्यात एक अपरिहार्य शिळेपण येऊ लागतं. नातं स्वीकारलं की ती एक पॅकेज डील आहे याचा विसर पडतो. दोघंही एकमेकांच्या प्रगतीला हातभार लावतात, परस्परांना प्रोत्साहन देतात. नकळत कधीकधी दोघात स्पर्धा सुरू होते. एकाच व्यवसायिक क्षेत्रातील ही स्पर्धा असू शकते. ‘अभिमान’ आठवतोय? परंतु क्षेत्र एक नसलं तरी स्पर्धा असू शकते. अशी स्पर्धा असूनही, आणि इतर कितीही कौतुक करत असले तरी नात्यातील त्या ‘दुसऱ्या’कडून खरंखुरं कौतुक हवं असतं. ते मिळालं नाही की चिडचिड होते. संवेदनशीलता, सृजनशीलता यांचा संगम होण्याऐवजी समांतर प्रवाह वाहू लागतात. एकमेकांचे मित्र परिवार, आवडी निवडी हेही कारण असू शकतं. ह्या नात्यात दोघंही खूप पझेसिव्ह असतात आणि त्यात कुठलंही तिसरं माणूस शिरलं की भूकंप होऊ शकतो. ‘प्रतारणा’, ‘व्यभिचार’ ही फक्त लेबलं झाली. तसं पाहिलं तर बहुदा आपण सारेच निरुपद्रवी पध्दतीनं ‘बाहेरख्याली’ असतो! माझ्या मते हा Extra Carricular विषय असतो. मलाही इतर स्त्रिया आवडतात किंवा माझ्या सखीला इतर पुरुष आवडू शकतात. मला वाटतं हे निसर्गसुलभ आहे, पण त्यात ‘तुलना’ येऊ लागली की गोंधळ होतो, नात्याला फार मोठे तडे जाऊ लागतात. हे तडे बुजवणं फार अवघड आणि जखमा बुजल्या तरी वण राहतातच! या नात्याचं नेहमीच उदात्तीकरणही केलं गेलंय. पावित्र्य, मांगल्य यांची जोड देण्यात आली. प्रेयसी, सखी, सहचारिणी आणि अनंत काळची माता म्हणून त्यात फक्त स्त्रीच्या भूमिकेला गौरवास्पद भासवणारी व्याख्या मिळाली! त्या व्याख्येतील जखडलेपण जाणीवपूर्वक दडवलं गेलं. ह्याच पुरुषी व्यवस्थेनं पक्षपात करून पुरुषाला अन्यायपूर्वक मोकळा ठेवला! पूर्वी या नात्याला लौकिक अर्थानं खूप मान होता, म्हटलं तर दहशत होती. म्हणूनही अनेक विवाह जाचक असले तरी टिकून रहात.

अनेकदा जुलमाचा रामराम म्हणून नाती सहन केली जातात. या व्यवस्थेतील दिलासा, सुरक्षितता महत्त्वाची आणि व्यवहार्य वाटते. पण घुसमट होतच राहते. भांडणं होत राहतात, किरकोळ कारणांवरून देखील! दोघंही एकमेकांच्या चांगल्या गोष्टींचं मनात असूनही कौतुक, रसग्रहण करायचं टाळतात किवा विसरून जातात. साधारणतः पंचविशी/तिशीत लग्न होतं. सुरवातीचे स्वर्गीय दिवस, मग मुलं, त्यांचं संगोपन दोघांच्याही आयुष्याला एक भक्कम उद्दिष्ट असतं, दिशा असते आणि त्यात वेळ कापरासारखा उडून जातो. दोघांचीही अनेक ध्येयं, स्वप्नं बाजूला पडतात. पंचावन्न साठीच्या सुमारास जाग येते. मुख्य उद्दिष्ट साध्य झालेलं असतं आणि कदाचित भयानक पोकळी भेडसावू लागते. अशात एकमेकांचं जमत नसेल तर साऱ्याच गोष्टींवर उदासीनतेचं सावट येतं. एकाच घरात Common Shared Services अश्या पध्दतीनं गोष्टी घडत राहतात, पण दोघांच्याही स्वातंत्र्याला तिलांजली मिळते आणि मग नात्यातील दोघांचंही ‘बोन्साय’ होऊ लागतं. अनेकदा हे सारं अटळ म्हणून स्वीकारलं जातं ही मोठी शोकांतिका आहे.

आज काळ बदलला आहे, आधुनिकते बरोबर एक मोकळेपण, क्षमाशीलता  आढळून येते. विवाहाशिवाय एकत्र राहणं, Live-in Relationship आता शिष्टसंमत आहे, किरकोळ कुजबुज होण्यापलीकडे कुणी त्याकडे कुत्सितपणे पहात नाही. पूर्वी घटस्फोट हे जणू पाप होतं, विशेषतः त्यातील स्त्रीला भल्या थोरल्या  दिव्याला सामोरं जावं लागे. लोक वाळीत टाकत किंवा प्रसंगी गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करीत. कळत नकळत चारित्र्यावर शंका घेतली जात असे. यात पुरुष नेहमीच ‘बिचारा’ असे. पण आज लग्न ही बेडी न भासता अनेक नाती सामोपचाराच्या मार्गे घटस्फोट घेऊन मोकळी होतात आणि आता हेही आपल्या सवयीचं होतं आहे. एका अर्थानं हे स्वागतार्ह आहे. काही काळ लंगडेपण जाणवेल पण पुन्हा उभारी घेण्याचं स्वातंत्र्य असेल! म्हणूनच मी मैत्रिणीला आणि मित्रालाही मनोमन शुभेच्छा दिल्या.

आदिम काळात समाज व्यवस्था उभी करण्यासाठी, बांधण्यासाठी काही सुजाण, शहाण्या आणि सामर्थ्यवान मंडळींनी समाज रचनेचे काही नियम केले आणि विवाहसंस्था हा त्याचाच एक भाग. गेल्या अनेक सहस्रकात आपली प्रगती झाली आहे असं मानायला काही हरकत नाही. माणूस बऱ्याच अंशी सुसंस्कृत झाला आहे त्यामुळे विवाह हा कायदेशीर करार, बंधन असं न समजता त्याकडे हे एक दीर्घायुषी नातं म्हणून पाहणं शक्य आहे. सुरवातीलाच आकर्षणा पलीकडे जाऊन त्याचा दूरदर्शीपणानं विचार करणं आवश्यक आहे. आज आधुनिक सोयी आणि माहिती तंत्रज्ञानामुळे हे सहज शक्य आहे. पंचविशीत स्वीकारलेलं हे नातं शेवटपर्यंत असतं म्हणजेच आपल्या आयुष्याच्या जवळ जवळ दोन त्रितीयांश (२/३) काळासाठी असतं. एखाद्या रोपट्याप्रमाणे त्याला खतपाणी घालावं लागतं. कधी नवऱ्यासाठी केलेला गोड शिरा असेल तर कधी संध्याकाळचा गजरा असो! ही त्या नात्यात दोघांनीही करायची Investment असते. आपण कालांतराने हे विसरतो, नातं गृहीत धरू लागतो आणि तिथेच गडबड होते. नात्यात नकळत रुक्षता येऊ लागते. मला दक्षिणेकडील एक प्रथा ठाऊक आहे. आमच्या एका ज्येष्ठ मित्राच्या साठी निमित्त अचानक त्याच्या लग्नाचं आमंत्रण मिळालं. ‘त्याच बायकोशी पुन्हा लग्नं!’ असं म्हणून आम्ही त्याची खूप टिंगल केली! याला षष्ट्यब्दीपूर्ती किंवा त्या विवाहाला ‘आरुबादम कल्याणम्’ असं म्हणतात. त्यामागचा विचार आणि श्रध्दा अशी की साठीला आयुष्यातील एक आवर्त संपतं आणि नव्या आवर्ताचा तो आरंभ असतो. नात्याच्या गणिताचा विचार केला तर आधुनिक काळातही हे तर्कशास्त्र पटण्यासारखं आहे! आधीच्या लग्नातील आणाभाका मागे सोडून पुन्हा नव्या संकल्पाच्या दोघांनीही शपथा घ्यायच्या आणि त्याच नात्याला नवा आयाम द्यायचा! त्यात नूतनीकरणाचा मोठा हृद्य सोहळा आहे. मला वाटतं नात्याच्या निकोप दीर्घायुष्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे!

या नात्याकडे ‘क्विक फिक्स’ किंवा भाविष्यातील भाळाळत्या जखमांच्या भेगांवरील ‘Dr. Fixit’ म्हणून न पाहता, समाधानी दीर्घ आयुष्याचा विमा म्हणून पाहण्याचा सुजाणपणा बाणला पाहिजे. आज जग अतीव स्पर्धात्मक आणि वेगवान झालं आहे आणि म्हणूनच त्यातील नैराश्य, जखमा आणि सल भयानक आहेत. मधुमेह. हृदयविकार यांचं वाढतं प्रमाण याचा दाखला आहे. आधुनिकतेच्या नावाखाली अनेक जुन्या गोष्टी मोडीत निघाल्या आहेत पण त्याचबरोबर आपण सर्वज्ञानी नाही ही जाणीव उदयाला येत आहे. ‘करोना’ नावाची सणसणीत कानफटात नुकतीच बसली आहे. ‘योगाभ्यास’ वगैरे पुराण्या गोष्टींकडे आपण नव्या आदरानं पहात आहोत. याच पार्श्वभूमीवर ‘विवाह’ या गोष्टीकडे एक व्रत म्हणून पाहीलं पाहिजे. या नात्यात जुगाराची अनिश्चितता आहे पण ती खूप कमी करता येईल आणि ती एक छोटी संभाव्यता म्हणून स्वीकारून पुढे जाण्याचा शहाणपणा आपल्याला खचितच अंगीकारता येईल अशी आशा बाळगतो!

  • वसंत वसंत लिमये
Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s