चौल, शूर्पारक आणि ‘मडफ्लॅट्स’

परवाच जुने फोटो चाळता चाळता ‘Creek Jaunt’ या सफरीचे बहारदार फोटो मिळाले. जुन्या स्मृतींना उजाळा मिळाला. शनिवार २८ मार्च, २००९. दुपारचा एक वाजून गेला होता, पायाखाली डिझेल इंजिनची थरथर जाणवत होती. टळटळीत दुपार असूनही उन्हाचा चटका जाणवत नव्हता. आणि याचं कारण एकच, कुंडलिका खाडीवरून पश्चिमेकडून येणारा मस्त वारा! आदल्याच दिवशी गुढीपाडवा होता. रेवदंडा आणि चौल या परिसरातील एक ऐतिहासिक परंपरा म्हणून, दरवर्षी गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी शिडाच्या बोटींची शर्यत असते. आम्ही पंधरा/वीस मंडळी या शर्यतीची मौज मजा पहायला आग्राव येथील आमच्या कोळी मित्राच्या, दीपक मुंबईकर याच्या मच्छिमार बोटीवरून सफरीस निघालो होतो. मला खात्री आहे की या कोकणच्या कानाकोपऱ्यात अश्या अनेक ऐतिहासिक गमती दडलेल्या आहेत!

इतिहासावरून आठवलं, कुंडलिका नदी सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटावरील ताम्हिणी परिसरातील डोंगरवाडीजवळ उगम पावते. सुरुवातीचा अवखळ प्रवाह ‘भिऱ्या’नंतर संथपणे कोलाड, रोहा असा प्रवास करत पश्चिमेकडे जातो. रोह्यानंतर सुमारे आठ किलोमीटर खाली गेल्यावर नदीचे खाडीत रुपांतर होते. हीच खाडी साळाव पुलानंतर थोड्याच अंतरावर अरबी समुद्रास मिळते. खाडीच्या मुखापाशी उत्तर टोकावर रेवदंड्याचा किल्ला तर दक्षिण टोकावर कोर्लई किल्ला राखणदार म्हणून उभे आहेत. रेवदंडा दक्षिणोत्तर पसरलेलं आहे, तर त्याच्या किंचित पूर्वेला गर्द हिरव्या नारळ/पोफळीच्या वाड्यांमधे दडलेले चौल गाव आहे. चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील अतिप्राचीन बंदर, ज्याचा चिम्युला, टिम्युला, साइभोर, चेऊल अश्या विविध नावांनी इतिहासात उल्लेख आढळतो. घारापुरीच्या लेण्यातील शिलालेखात देखील चौलचा उल्लेख आढळतो. चौल बंदरात १४७० साली आलेल्या रशियन दर्यावर्दीचं नाव – अफनासी निकीतीन. सुमारे दोन वर्षं या परिसरात राहून याने इथल्या जनजीवनाबद्दल एक पुस्तकही लिहिलं. त्याच्या नावाने उभारलेला स्मृतीस्तंभ रेवदंड्याच्या शाळेत आजही आढळतो. चौलचं प्राचीन नाव चंपावती किंवा रेवतीक्षेत्र. सुमारे तीन हजार वर्षांहूनही अधिक जुनं असं हे प्रसिध्द बंदर. पण गमतीची गोष्ट म्हणजे आज याच चौल गावाला कुठेही समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्शही होत नाही! पूर्वी म्हणे शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना व्यापारी गलबतं लागत असंत! हे सारंच बुचकळ्यात टाकणारं होतं.

पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी होणाऱ्या शिडाच्या बोटींची शर्यत पहायला पहिल्याच खेपेस आमच्या सोबत डॉ. विश्वास गोगटे आले होते. हा माणूस ‘फिजिकल केमेस्ट्री’ विषयातील तज्ञ, परंतु त्यांनी अनेक वर्षं डेक्कन कॉलेजला पुरातत्व विभागात तज्ञ म्हणून काम केलेलं. चौल परिसर त्यांच्या विशेष जिव्हाळ्याचा. त्यांच्या पुढाकारामुळे चौल परिसरात अनेक उत्खनने करण्यात आली. आमच्या सोबत असतांना चौलच्या प्राचीन इतिहासाबद्दल त्यांनी अनेक रंजक कथा सांगितल्या. याच गप्पांमध्ये एक विषय आला तो म्हणजे, ‘मडफ्लॅट्स’!

बुजलेल्या खाडीला ‘मडफ्लॅट्स’ ही भौगोलिक संज्ञा वापरली जाते. याचा सोपा अर्थ असा की एखाद्या खाडीत गाळ साठत जाऊन (Silting) त्यामुळे खाडी बुजते. या बुजलेल्या खाडीच्या पट्ट्याला म्हणतात ‘मडफ्लॅट्स’. या जमिनीतील क्षारांमुळे इथे फारशा वनस्पती उगवत नाही आणि हा भाग बोडका असून सहजपणे नजरेत भरतो. विश्वासरावांनी रेवदंडा आणि चौलच्या दरम्यान असलेले ‘मडफ्लॅट्स’ आम्हाला मुद्दाम दाखवले. हा ‘बुजणे’ प्रकार कदाचित दोन/तीनशे वर्षांपूर्वी घडला असावा. बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं होतं! चौल या प्राचीन बंदराला विशेष महत्व होतं, याचं कारण म्हणजे चौलच्या पश्चिमेस दक्षिणोत्तर पसरलेलं रेवदंडा बेट. गुगल मॅप्स किंवा सॅटेलाईट इमेजेस पाहिल्यावर हा प्रकार सहजपणे लक्षात येतो. रेवदंड्याच्या उत्तरेस असलेली बागमळा येथील छोटीशी खाडी किंवा अक्षीजवळील साखरखाडी यामुळे पूर्वीचे रेवदंडा हे बेट पश्चिम किनाऱ्यापासून विलग असावे. या बेटामुळे प्राचीन चौल बंदराला वादळी हवामानापासून सुरक्षितता लाभत असणार आणि म्हणूनच चौल हे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील भरभराट पावलेले महत्वाचे बंदर! ही संकल्पना लक्षात घेतल्यावर शितळादेवी मंदिराच्या पायऱ्यांना खचितच गलबतं लागत असणार हे ध्यानात येतं. थोडक्यात ही केवळ आख्यायिका न राहता त्यात सत्याचा अंश आढळून आला. यानंतर गेल्या दशकात माझ्या चौलला अनेक खेपा झाल्या. प्राचीन इतिहासाकडे पाहण्याचा एक वेगळाच दृष्टीकोन मला गवसला होता.

यानंतर मी एक वेगळीच कहाणी सांगणार आहे! २०१२ साली माझी पहिलीच कादंबरी ‘लॉक ग्रिफिन’ प्रकाशित झाली आणि गाजली. पाच सहा महिने त्या कौतुकाच्या ढगावर तरंगल्यावर मला पुढले वेध लागू लागले. ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी, ‘माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या’ या मध्यवर्ती घटनेभोवती गुंफलेली आहे. नव्या कादंबरीचा विषय काय असावा हा विचार डोक्यात घोळत होता. सहजच एक वेगळा विचार सापडला, एखादी ऐतिहासिक घटना निवडण्याऐवजी एखादा ‘भूगोल’ डोळ्यासमोर घेऊन त्याचा अभ्यास करावा अशी ती कल्पना. मी ‘भूगोल’ निवडला – आफ्रिकेचा पूर्वकिनारा, मध्यपूर्वेतील आखाती देश, पाकिस्तान आणि भारताचा पश्चिम किनारा, थोडक्यात अरबी समुद्र कवेत घेणारा भूभाग. या भूगोला संदर्भातील तपशील, निगडित घटना आणि व्यक्तिमत्वं यांचा अभ्यास सुरु झाला. हे करत असतांना एक महान व्यक्तिमत्व उसळी मारून वर आलं आणि त्यानी माझा ताबा घेतला. ते व्यक्तिमत्व म्हणजे भगवान श्रीकृष्ण!

महाभारतकालीन संदर्भांचा अन्वयार्थ लावताना लक्षात आलं की अंतसमयी श्रीकृष्णाचं वय सुमारे एकशे चौदा असावं! कथा कादंबऱ्यांतून श्रीकृष्णाची महती, जीवित कार्य ठाऊक होतं. एका अर्थानं श्रीकृष्ण म्हणजे भारतीय सारस्वत संस्कृतीच्या संचिताचा विश्वस्त. त्याच्या आयुष्यात अनेक महत्वपूर्ण घटनांची मालिका आहे, नव्हे त्यातील अनेक घटनांचा तो कर्ता करविता होता. आणखी एक लक्षात आलं ते म्हणजे, अंतसमयी दुर्दैवानं यादवांमध्ये माजलेलं यादवी अराजक आणि चौदा पंधरा मुलं असूनही सुयोग्य वारसदार नसणं! दैदिप्यमान आयुष्याच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारी श्रीकृष्णाची शोकांतिका अंगावर येणारी होती. श्रीकृष्ण म्हटल्यावर अनेक प्रतिमा आपल्या नजरेसमोर येतात, ‘माखनचोर’ अवखळ बाळकृष्ण, गोपिकांमध्ये रमणारा रोमँटिक ‘मुरलीधर’ आणि कुरुक्षेत्रावर हतोत्साही अर्जुनाला गीतोपदेश करणारा ‘तत्वज्ञ’. परंतु पांढऱ्या पापण्या, पांढरे केस, असंख्य सुरकुत्यात दडलेले डोळे, विकलांग जराजर्जर अशी वृद्ध श्रीकृष्णाची प्रतिमा आपल्या अजिबात ओळखीची नाही. या वारसदार नसलेल्या वृद्ध विश्वस्त श्रीकृष्णाच्या व्यक्तिमत्वानं मला झपाटून टाकलं आणि हीच ‘विश्वस्त’ कादंबरीची पायाभूत संकल्पना ठरली.

‘लॉक ग्रिफिन’चा अनुभव पाठीशी असल्यानं नवीन कादंबरीची सुरुवात करतांना मी निर्धास्त नसलो तरी भेदरलेला नव्हतो. माझ्यासाठी कादंबरी हे प्रकरण एखाद्या मोठ्या प्रोजेक्टसारखं होतं. न थकता अनेक संदर्भांचा अभ्यास आणि पाठपुरावा करणं, कथानकाचा आरंभ आणि शेवट सुरुवातीसच ठरवणं आणि मग कथानकाचा आकृतिबंध प्लॅन करणं. लौकिक अर्थानं आयआयटी इंजिनीयर असून  देखील इंजिनीयरिंगला रामराम ठोकल्याबद्दल माझ्यावर अनेकदा टीकाही झाली आहे. परंतु कादंबरी लेखनासंदर्भात मला इंजिनीयरिंगचा खूप फायदा झाला. कादंबरीतील व्यक्तिरेखा, त्यांचा इतिहास आणि जडणघडण, विविध घटना आणि घटनास्थळं हे माझ्यासाठी खूप महत्वाचं असतं. या सर्वच विषयांचा सखोल अभ्यास, आकृतिबंधासाठी Excel Sheetचा वापर मी कसोशीनं करतो. कथानकाचा रसरशीतपणा, घटनाक्रमाचा वेग आणि थरार रंगवण्यासाठी या साऱ्याचा मला खूप फायदा झाला/होतो.

‘विश्वस्त’ कादंबरीत द्वारका, चौल आणि शूर्पारक या प्राचीन, समृद्ध आणि प्रसिध्द बंदरांना विशेष महत्व आहे. संशोधन, अभ्यास या निमित्तानं माझ्या गुजरातला सात/आठ वाऱ्या झाल्या, त्यात द्वारकेस मी तीनदा भेट दिली. ‘शूर्पारक’ विषयाचा अभ्यास करतांना असं लक्षात आलं की शूर्पारक म्हणजेच आजचं नालासोपारा! फार पूर्वी ‘मॅफ्को’ मध्ये काम करत असताना प्रदीप हातोडे नावाचा सहकारी वसईहून येत असे अशी आठवण झाली. एव्हाना तो अर्थातच रिटायर झालेला, म्हणूनच त्याचा पत्ता शोधणं जरा जिकिरीचं होतं. जुन्या चार/पाच मित्रांकडे चौकशी केल्यानंतर त्याचा पत्ता आणि फोन नंबर सापडला. प्रदीप आणि इतर काही ओळखीच्या मंडळींमुळे मनीष म्हात्रे या तरुणाचा पत्ता गवसला. त्या भेटीत मनीषची छान ओळख, गप्पा झाल्या पण त्याच्या सोबतीनं नालासोपारा परिसरात नीटसं भटकता आलं नाही. मनीष हा खास वसईप्रेमी आणि चिमाजी आप्पांचा भक्त. तो अधूनमधून वृत्तपत्रात लेखनही करत असतो. त्याच्याकडे वसई ते अर्नाळा या भागातील ऐतिहासिक माहितीचा खजिना आहे. ‘पुढल्या वेळेस नक्की वेळ काढून येतो!’ असं आश्वासन देऊन मी निघालो, परंतु माझ्या डोक्यात प्राचीन शूर्पारक बंदराचा इतिहास घोळत होता.

त्यानंतर सुमारे वर्षभरानंतर म्हणजे २०१५साली नालासोपाऱ्याला जाण्याचा योग आला. आम्ही आदल्या रात्री वसईतील हॉटेलात मुक्काम केला. सकाळी लवकरच मनीषला वाघोली गावातील नाक्यावर भेटायचं ठरलं. माझा सहकारी निर्मल खरे तेव्हा माझ्यासोबत होता. आम्ही वाघोली नाक्यावर जरा लवकरच पोचलो. हातात वेळ होता म्हणून त्या गावातील प्रसिध्द शनिमंदिर पाहून आम्ही पुन्हा नाक्यावर आलो. नाक्यावरचा वडेवाला सकाळचा पहिलाच घाणा बाहेर काढत होता. त्याच्याकडील चवदार बटाटवड्याचा आस्वाद घेत असताना मनीष आला. तो स्कूटरवर तर त्याच्या मागोमाग आम्ही गाडीत अशी आम्ही पुढील सुमारे तीन तास मनसोक्त भटकंती केली. सोपाऱ्यातील बुरुड डोंगराच्या उत्खननातून १८८२ साली सापडलेला बौद्ध स्तूप पाहिला. इथून सम्राट अशोकाची कन्या, संघमित्रा सोपारा (शूर्पारक) बंदरमार्गे श्रीलंकेत बौध्दधर्माचा प्रसार करण्यास श्रीलंकेस गेली असा इतिहास आहे. सुमारे तेवीस शतकांपूर्वीची ही गोष्ट! नंतर निर्मळक्षेत्र येथील शंकराचार्य मंदिर पाहिलं. इथे जगन्नाथपुरीच्या शंकराचार्य विद्यारण्यस्वामी यांची समाधी आहे. सोपाऱ्यातील चक्रेश्वर तलावाजवळील चक्रेश्वर मंदिर पाहिलं. याच देवळाच्या बाहेर एका पत्र्याच्या शेडखाली ब्रह्मदेवाची पुरुषभर उंचीची सुंदर उपेक्षित मूर्ती आहे. १८व्या शतकात जवळच असलेल्या ‘गास’ गावातील एका तलावात ही मूर्ती सापडली. साऱ्या भारतात ब्रह्मदेवाची मंदिरं विरळाच! असं असूनही ही देखणी मूर्ती आजही वाळीत टाकल्याप्रमाणे चक्रेश्वर मंदिराबाहेर उभी आहे.

या भटकंतीत मनीषनी अनेक कहाण्या सांगितल्या. आम्ही तिथून पुढे गुजरातला जाणार होतो, त्यामुळे आम्हाला घाई होती.  पण केवळ मनीषच्या आग्रहामुळे आम्ही गिरिझ गावातील हिराडोंगर पहायला गेलो. हिराडोंगर ही जेमतेम दोनएकशे फुटांची टेकडी. चिमाजी आप्पांच्या वसई स्वारीच्या वेळेस म्हणजे १७३८ साली याच डोंगरावर टेहेळणीसाठी बांधलेला छोटासा ‘वज्रगड’ नावाचा किल्ला होता. आजकाल हा भाग ‘खाजगी मालमत्ता’ असल्याकारणानं किल्ल्याचे अवशेष गायब होत आले आहेत. महाराष्ट्रात ऐतिहासिक स्थळं ‘खाजगी मालमत्ता’ कशा होतात हे एक गौडबंगाल आहे! हिराडोंगरावर एक लोकप्रिय दत्तमंदिर आहे. वसई परिसरातील शिल्पकार सिक्वेरा बंधू यांनी ही दत्ताची अतिशय देखणी लाकडी मूर्ती घडवली अशी याची कहाणी. या मूर्तीचे डोळे अत्यंत जिवंत भासतात. हिराडोंगर हा या भेटीतील शेवटचा टप्पा होता. देवळाबाहेरील उत्तरेकडील दगडी भिंतीवर बसून मी सारा आसमंत न्याहाळत होतो. उत्तरेकडे दिसणाऱ्या वैतरणा नदीचं पात्र पहात असताना माझ्या डोक्यात एक भन्नाट विचार डोकावला!

हिराडोंगरावरून दक्षिणेकडे वसईची खाडी दिसते. पश्चिमेकडे अरबी समुद्र तर वायव्येकडील बेटावर अर्नाळ्याचा किल्ला आणि उत्तरेला दिसणारी वैतरणा नदी. पूर्वेकडे तुंगारेश्वराची डोंगर रांग तर उत्तरेकडे समोरच खाली पसरलेलं, इमारतींच्या जंगलात हरवलेलं सोपारा गाव दिसत होतं. सोपारा गावाला म्हणजेच पूर्वीच्या ‘शूर्पारका’ला कुठेही समुद्री खाऱ्या पाण्याचा स्पर्श होत नाही! मला अचानक चौल आठवलं. मी पुनःपुन्हा सारा आसमंत निरखून पहात होतो. समोरच्या चित्रात मला स्पष्टपणे ‘मडफ्लॅट्स’ दिसत होते. याचाच अर्थ असा की वैतरणेच्या मुखाशी अर्नाळा बेट/किल्ला, मग दक्षिणोत्तर पसरलेले ‘नाळा’, ‘राजोडी’ बेट, त्याच्या पूर्वेला ‘मडफ्लॅट्स’ आणि त्याच्याही पूर्वेकडील भूभागावर सोपरा म्हणजेच ‘शूर्पारक’ असणार! पश्चिमेकडील बेटामुळे वादळी हवामानापासून सुरक्षितता आणि वैतरणेतून किंवा वसईच्या खाडीतून या बंदराला पोचता येत असणार. चौल येथील भौगोलिक रचनेचं हे जणू प्रतिबिंब होतं. गेल्या काही सहस्र वर्षांत समुद्राची पातळी २५/३० फुटांनी वाढली आहे असं वाचल्याचं आठवलं. डोक्यात अनेक विचार, सिध्दांत यांची सरमिसळ झाली होती, पण हळुहळू संगती लागू लागली. एकीकडे मी तुटक वाक्यात, उत्साहाच्या भरात निर्मल आणि मनीषला ते सारं सांगत होतो, तर दुसरीकडे माझं मन ‘युरेका’ म्हणत आनंदानं नाचत होतं.

मी परत आल्यावर माझा अभ्यास सुरूच राहिला. मी अनेक संदर्भ तपासले. सोपाऱ्यातील बौध्द स्तूप, तेथील उत्खनन आणि ‘मडफ्लॅट्स’चे पुसट उल्लेख हाती लागले. द्वारका, शूर्पारक बंदरं आणि युरोप व मध्यपूर्वेशी असलेला प्राचीन व्यापार हे विषय माझ्या ‘विश्वस्त’साठी जिव्हाळ्याचे होते. इतिहास संशोधक आणि लेखक यात फार मोठा फरक आहे. संशोधकांसाठी पुरावे, साधने खूप महत्त्वाची. त्यांना केवळ एक पुरावा असून चालत नाही, तर विविध स्रोतांतून तोच सिध्दांत समोर येत असेल, तरच ते खूप जपून निष्कर्षाकडे सरकू शकतात. अर्थातच याला अनेक वर्षे लागू शकतात. मी लेखक होतो/आहे आणि म्हणूनच कल्पनाविस्तार, कल्पनाविलास हे माझं विशेष जन्मसिध्द स्वातंत्र्य होतं! मला नालासोपाऱ्याला सापडलेला खजिना बहुमोल होता आणि त्याचा ‘विश्वस्त’च्या कथानकात फार मोठा चपखल सहभाग होता. मला गवसलेले पुरावासदृश संदर्भ माझ्या कल्पनाविस्तारासाठी पुरेसे होते. पुरातत्व संशोधन हे शास्त्र आहे आणि त्यांची कठोर शिस्त मला पटते आणि मी त्याचा सन्मानच करतो. संशोधक मंडळी त्यांच्या विषयात थोर असतात, पण अनेकदा अश्या थोर मंडळींचं आपापसात फारसं पटत नाही. मला वाटतं कमीअधिक फरकानं हे साऱ्याच क्षेत्रात आढळतं! पण हीच मंडळी सुजाणपणे एकत्र आली तर क्रांतिकारक नवीन संकल्पना/संशोधन जन्माला येऊ शकेल असं माझं बाळबोध प्रामाणिक मत आहे.

हिराडोंगरावर उभं असतांना अचानक माझ्या डोळ्यासमोरचं चित्र धूसर होऊ लागलं, मोठी शिडाची गलबतं वैतरणेतून शूर्पारक बंदराकडे येत असलेली दिसू लागली!

“विजयकेतू गलबताचा सरखेल, वज्रसेन तशाही परिस्थितीत निर्धाराने शूर्पारक बंदराकडे निघाला होता. त्याने तसे वचन भगवान श्रीकृष्णाला दिले होते!

अनामिक अंतःस्थ वेदनेने करकरणारे दोरखंड आणि गलबताची कचकचणारी निर्जीव लाकडे, एखाद्या मुक्या प्राण्यागत अबोलपणे विव्हळत होती. गलबतावरील नऊ जणांना खवळलेल्या सागराने कधीच गिळंकृत केले होते! गलबत धडपडत शूर्पारक बंदराच्या आडोशाला, दगडी कठड्याला धाड्कन आवाज करत कसेबसे येऊन टेकले. काठावरून फेकल्या गेलेल्या दोरखंडांनी बांधून घेत गलबत सुरक्षित करण्यात आले. थकला–भागलेला वज्रसेन धक्क्यावर उतरून खलाशांना आणि बंदरावरील कामगारांना घोंगावणाऱ्या वाऱ्यातही शोष पडलेल्या कंठाने भसाड्या आवाजात ओरडून वेगवेगळ्या आज्ञा देत होता.”

‘विश्वस्त’ कादंबरीतील एक थरारक प्रसंग आकार घेत होता. इतिहास, भूगोलासारखे नीरस रुक्ष विषय एकत्र आले की ऐतिहासिक भूगोल जिवंत होत तुमच्या समोर येतो! तुमच्यातील चौकस कुतूहलाला आव्हान देतो. ‘अहम् ब्रह्मास्मि’ म्हणत तुमच्या प्रतिभेला विविध कल्पनांचे धुमारे फुटू लागतात!

  • वसंत वसंत लिमये
Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s