‘हाय प्लेसेस’ – एक स्वप्न

काल ध्यानीमनी नसता, जुन्नरहून जितूचा फोन आला. ‘बाळ्या, प्रेमची मेल वाचलीस का? अरे, हाय प्लेसेसच्या धमाल आठवणी तू लिहून काढ की!’ मी ‘पाहतो’, असं अडखळत उत्तर दिलं आणि माझं मन भूतकाळात गेलं. १९८५ सालापासूनच्या अनेक आठवणींचा महापूर लोटला. ८५ सालचा जुलै महिना असावा. मला सौदी अरेबियामधे कामाला लागून जवळजवळ वर्ष होत आलं होतं. ८२-८३ या कालावधीत Outdoor Education या विषयातील एक वर्षाचा अभ्यासक्रम मी स्कॉटलंड येथे जाऊन पूर्ण केला होता आणि त्यावेळी भीती वाटावी असं लाखभराचं कर्ज उरावर होतं. कर्जाच्या बेड्या माझ्या स्वातंत्र्याला जखडून ठेवत होत्या आणि ते माझ्यासाठी फार अस्वस्थ करणारं होतं. त्याकाळी आखाती देशात जाऊन काम करणं असा एकच मार्ग दिसत होता. उनाडक्या करत पूर्ण केलेली B. Tech. डिग्री अश्या वेळेस फार कामी आली. आधी प्लॅनिंग इंजिनीयर मग प्रोजेक्ट मॅनेजर अश्या जबाबदाऱ्या पेलत मी मोठ्या कष्टानं सौदी अरेबियासारख्या वाळवंटी देशात मनोभावे पाट्या टाकल्या. कर्ज फिटून थोडीफार शिल्लक गाठीशी जमा होताच, मी नोकरी सोडण्याचा विचार केला.

तसं पाहिलं तर माझं काँट्रॅक्ट होतं दोन वर्षाचं. पण माझी गरज संपली होती आणि मला लागले होते स्वातंत्र्याचे वेध! सौदी अरेबियासारख्या देशात तुम्ही इंजिनीयर असूनही तुमची अवस्था एखाद्या गुलामासारखी असते! माझा पासपोर्ट होता कंपनीच्या ताब्यात. एका ‘पोर्टा केबिन’च्या खुराड्यात आम्ही पाचजणं रहात होतो. मी ‘डोंगरी भटक्या’ त्यामुळे मला स्वयंपाक बरा जमत असे. साहजिकच आमच्या ‘पोर्टा केबिन’मधे मला विशेष मान होता. सभोवार पसरलेली रेताड सपाटी, भयानक शुष्क वारे, ५२ डिग्री भीषण तापमान, भाजून काढणाऱ्या झळा आणि अखंड होणारी तलखी. साध्या हालचालींवर बंधनं, जुलमी नियम आणि भयानक शिक्षा. सिग्नल तोडल्यास हजार रियाल दंड, उचलेगिरी, चोरी केल्यास हात तोडणे, दारू पिऊन सापडल्यास हाताची नखे काढणे (उपटून!) अश्या काही वानगीदाखल शिक्षा. शुक्रवारी नमाजाच्या वेळी रस्त्यावर फिरतांना सापडल्यास तुम्हाला जबरदस्तीने मशिदीत नेत असत, शिक्षा पाहण्यासाठी! व्यभिचार केल्याबद्दल एका मुलीला अर्धवट जमिनीत गाडून जमावाने दगडा धोंड्यांनी ठेचून मारणे ही अभद्र शिक्षा मी दुरून पहिली आहे. आजही अंगावर शहरा येतो आणि या साऱ्या आजच्या अरेबियन नाईट्स मधील कुरस आणि चमत्कारिक कहाण्या आहेत. गरज ही शोधाची जननी आहे असं म्हणतात, त्यानुसार सुपर मार्केटमध्ये मिळणारा द्राक्ष्यांचा ज्यूस आणि ‘यीस्ट’ असं वापरून वाईन बनवण्याचा आम्ही ‘श्री गणेशा’ केला. मग लवकरच त्यात वाकबगारही झालो. तेव्हढाच एक ‘तरल’ विरंगुळा.

सौदी सोडण्याचा विचार पक्का होताच मी पासपोर्ट परत कसा मिळवायचा याची चौकशी सुरु केली. तिथून बाहेर पडण्यासाठी Exit Visa लागायचा! आमचे एक जनरल मॅनेजर या कल्पनेच्या पूर्ण विरोधात. त्यांचं म्हणणं होतं की ‘अरे, चांगलं दोन वर्षाचं काँट्रॅक्ट आहे ते पूर्ण कर, कापलेले पैसे आणि बोनस पदरात पडेल, तुझ्या भल्यासाठीच सांगतो आहे!’ नंतर मला कळलं की त्यांच्या मुलीसाठी ते माझ्यावर लाईन मारत होते! माझं कर्जही फिटलं होतं आणि मस्त कुठेतरी भटकून मग भारतात परतावं अशी कल्पना डोक्यात आली. सौदीत तिकीटं महाग असल्यानं मी काही इंग्रज मित्रांच्या मदतीनं लंडनहून माझी तिकीटं काढून आणवली. मुख्य अडचण होती Exit Visa आणि पासपोर्ट ताब्यात घेण्याची. मग मी माझं गोड बोलण्याचं आणि थापा मारण्याचं कौशल्य पणाला लावलं. माझे बॉस आणि अरबी मालक यांची खात्री पटवून दिली की मी जॉब न सोडता, केवळ सुटीसाठी दोन आठवड्यांसाठी युरोपात जाऊन येणार आहे. अहो आश्चर्यम्, त्यांना ते खरं वाटून त्यांनी Exit Visa आणि पासपोर्ट माझ्या हातात दिला! माझ्यासारखा गरीब, बापुडवाणा भारतीय पंचवीस/तीस हजार सोडून कुठे जाणार, यावर त्यांचा गाढ विश्वास. स्वातंत्र्यासाठी माझ्या दृष्टीनं ती फारच किरकोळ किंमत होती! त्या दिवशी गुरुवार होता, आणि माझं लंडनचं तिकीट होतं पुढल्या गुरुवारचं. तातडीनं तिकीट बदलून मी त्याच गुरुवारचं करून घेतलं. शॉपिंग लिस्ट तयार होती, मित्रही माझ्या पलायनाच्या, सुटकेच्या प्रयत्नात आनंदानं सहभागी झाले. त्याच संध्याकाळच्या फ्लाईटनं मी लंडन गाठलं. पिंजरा तोडके पंछी उड गया था!

माझ्या डोक्यात युरोपात ‘हिचहायकिंग’ करत भटकायला जायचा बेत शिजत होता. युकेमधे पोचल्यावर लंडनमध्ये अनिल आणि कुंदा नेने, बर्मिंगहॅममधे रामभाऊ करंदीकर, एडिंबरामधे नेव्ह मास्तर असे भोज्जे होतेच, पण त्या व्यतिरिक्त मी शेफिल्ड येथे मेरीला भेटायला गेलो. मेरी लँकास्टर म्हणजे पूर्वाश्रमीची मेरी मॅकेंझी. हिची आणि माझी ओळख झाली ८३ साली नॉर्थ वेल्समधे. माझा कोर्स सुरु असतांना इस्टरच्या सुटीत मी आणि माझा कोर्समेट मार्टिन, रॉक क्लायंबिंगसाठी ख्लानबेरिस येथे गेलो होतो. तेव्हा मेरी जवळच बॉब लँकास्टरसोबत एका कॅराव्हानमध्ये रहात होती. मेरीने माझाच कोर्स दोन वर्षांपूर्वी केला होता. तेव्हा मेरीही क्लायंबिंगसाठी आमच्या सोबत आली होती. एकंदरीत त्या आठवड्यात धमाल आली होती. जो ब्राउन, डॉन व्हिलन्स या थोर गिर्यारोहकांची ही कर्मभूमी. माझी खऱ्या अर्थानं ‘ब्रिटीश रॉक क्लायंबिंग’शी खास ओळख झाली होती. त्याच आठवड्यात मॅक्स हॉलिडे आणि रॉजर गूक या त्यांच्या मित्रांशी ओळख झाली. त्यानंतर ८५ साली मेरी आणि बॉब लग्न करून शेफिल्ड येथे राहू लागले होते. दोन दिवस मी त्यांचा पाहुणचार घेतला. मॅक्स आणि रॉजर यांचीही गाठ पडली. माझ्या युरोप सफरी बद्दल त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं. मला कसं झेपेल अशी त्यांना काळजी होती. मी युरोपातून परततांना पुन्हा ‘युके’ला जाऊन भारतात परतणार होतो. निघतांना बॉब मला म्हणाला, ‘When you come back, then we want to talk to you!’ मी होकार भरून निघालो खरा, पण एक कुतूहलाचं प्रश्नचिन्ह माझ्या मेंदूला गुदगुल्या करत होतं!

माझी सहा/सात आठवड्यांची युरोपातील ‘हिचहायकिंग’ सफर बहारदार झाली. परतीच्या वाटेत मी पुनश्च शेफिल्डला बॉब आणि मेरीकडे जाणार होतो. लंडनहून निघण्यापूर्वी मी तसा फोनही केला. Spring Hill, Crookes, Sheffield, S10 1ET, या मेरीच्या घरी पोचलो तर तिथे मॅक्स आणि रॉजर आधीच हजर होते. मला जरा आश्चर्यच वाटलं. चहाचे मग घेऊन आम्ही दिवाणखान्यात स्थिरावलो आणि बॉबनी पुढाकार घेऊन सांगायला सुरवात केली. कल्पना होती नवीन उद्योग सुरु करण्याबद्दल! ब्रिटीश ग्रुप घेऊन ट्रेकिंगसाठी हिमालयात नेणे असा उद्योग. या प्रकाराला Adventure Tourism असं म्हणतात. माझ्याकडे हिमालयातील गिर्यारोहणाचा भक्कम अनुभव होता, आणि मी एक वर्ष स्कॉटलंडमधे काढल्याने पाश्चिमात्य आवडीनिवडी, राहणीमान हे मला चांगल्या रितीने परिचयाचं होतं. ‘जॉईन होतोस का?’ असं मला विचारण्यात आलं. सारे एकत्र येण्याचं कोडं मला आत्ता उलगडलं. नवं शिक्षण, त्यासाठी घेतलेलं आणि फेडलेलं कर्ज असा माझ्या आयुष्यातील एक आध्याय संपला होता. तेव्हा तरी भविष्य धूसर होतं. अचानक एक रोमांचक संधी समोर आली होती. मेरी आणि इतर मला उद्योगाचे तपशील ऐकवत होते, पण ते ऐकतांना तेव्हा मला कितपत कळत होते कुणास ठाऊक. हिमालयात भटकंती, नोकरी न करता स्वतःचा स्वतंत्र उद्योग आणि माझे सर्व छंद जोपासण्यासाठी जोडीला फावला वेळही मिळणार होता! मी तर कल्पनाविलासाच्या ढगावर तरंगत होतो. आमची दिवसभर मिटींग चालली. त्याच वर्षी सप्टेंबर महिन्यात पहिला प्रायोगिक ट्रेक नेण्याचं ठरलं. आमची गाडी ‘नावा’वर येऊन थबकली. कंपनीसाठी अनेक नावं समोर येत होती. High Adventure, Treks Unlimited, Adventure Galore अशी काय काय तरी. माझ्या आयुष्यातील एक नवं साहस, एक रोमांचक पर्व सुरु होत होतं. शेवटी सर्वानुमते नाव ठरलं – ‘High Places’!

Standard

15 thoughts on “‘हाय प्लेसेस’ – एक स्वप्न

 1. Makarand Joshi says:

  वा … रम्य आठवणींचा सुरम्य आढावा .
  चालणाऱ्याला रस्ता मिळतोच यावर विश्र्वास दृढ करणारा प्रवास .

 2. Prakash Pitkar says:

  Beautiful expression … eagerly waiting for next part … Limaye Sir वा वा खूप सुंदर लिहिलंय … पुढचं वाचायची प्रचंड उत्कंठा आहे 

 3. Satish Paralikar says:

  Vasant Sir… नेहमीप्रमाणेच आपले लिखाण हे प्रत्यक्ष अनुभुति देणारे आहे…पुस्तक व पुढील सदर दोन्हीची वाट पहात आहे…..!!👍🙏

 4. Sanjay Gurjar says:

  खुप ओघवत्या शैलीत लिहिलेले आहे सर. मजा आली वाचताना.🙏

 5. Dilip Pandharinath Zunjarrao. says:

  अत्यंत योग्य निर्णय क्षमता ,पर्यायाने त्याचा भविष्यात झालेला फायदा. .

 6. Vishram (Sanju) & Shubhangi Kulkarn, Pune says:

  अप्रतिम लिखाण ! डोळ्यासमोर देखावा उभा राहिला. Eagarly waiting for your next write up.

 7. एकूण कथेची सुरुवात – शेवट माहीत असले तरी मधले नव-नवे तपशील वाचतांना मजा आली !शिवाय ‘पुढे काय’ ही उत्सुकता वाढवण्याचं कसाब आहेच!

 8. वाचण्यास सुरवात केली आणि अरे हे काय संपले पण …. सर पुढे लिहा वाट पाहतो आहे .
  मी वाचत गेलो वाहत गेलो … खूप छान .. आणि हो काही ठिकाणी तर खूप हसलो ..पाट्या पण टाकतात मनोभावे .. वाःह क्या बात है … लई भारी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s