मी लंडनला असतांना, ‘बाळ्या, बातमी खरी आहे का?’ असा फोन आला आणि डॉक्टर श्रीराम लागू गेल्याची बातमी कळली. गेल्या वर्षी डॉक्टर ‘तन्वीर’ पुरस्कार कार्यक्रमाला व्हीलचेयरवर आले होते, पण या वर्षी ते येऊ शकले नाहीत. डॉक्टर खूप थकत चालले होते, जोडीला स्मृतिभ्रंशही होता. एका अर्थानं ती वाईट बातमी अपेक्षित होती पण तट्कन काहीतरी तुटल्यासारखं झालं. मी फेसबुकवर श्रद्धांजली वाहिली पण पुढील साऱ्या प्रवासात, फावल्या वेळी डॉक्टरांच्या स्मृती चाळवल्या जात. गेली सुमारे पंचेचाळीस वर्षं एका थोर माणसाचा अकृत्रिम स्नेह मला लाभला होता हे माझं भाग्य. डॉक्टरांना विसरणं अशक्य आहे!
परत आल्यावर दीपाला भेटायला गेलो. असं भेटणं खूप अवघड असतं! आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या, विषय अर्थातच डॉक्टरांचा. डॉक्टरांचं सारं जगणंच अचाट विचारपूर्वक शिस्तीचं होतं. डॉक्टरांच्या प्रत्येक कृतीमागे सखोल विचार जाणवत असे. मग तो अभिनय असो किंवा नेहमीचं साधं जगणं असो! म्हातारपण तसं अवघडच, ते स्वीकारतांना भल्याभल्यांची त्रेधा उडते. नसलेल्या चिंतांची ओझी, कपाळावर मावणार नाही असं आठ्यांचं जाळं आणि लहान मुलागत असंबध्द वागणं म्हणजे म्हातारपण अशी अनेकांची अवस्था होते. पण डॉक्टरांनी तेही खूप छान स्वीकारलं होतं. गेली सुमारे वीस वर्षं ARAI च्या टेकडीवर फिरायला जाण्याचा त्यांचा परिपाठ होता. आधी फिरायला, सोबत दीपा, सरिता पद्की किंवा इतर कुणी असे. फिरणं जमेनासं झाल्यावर वेळप्रसंगी फक्त बबन ड्रायव्हरला सोबत घेऊन ते टेकडीवर जात असत. तिथला एक बाक त्यांच्या आवडीचा. तिथे बसलेले डॉक्टर ही अनेकांच्या परिचयाची आठवण! त्यांचं खाणंपिणं मोजकं, नियमित वाचन, मालिनीताई किंवा कुमारांचं गाणं ऐकणं अश्या साऱ्या गोष्टी, त्याचा बडिवार न माजवता ते शिस्तीनं अखेरपर्यंत करत होते. म्हतारपणालाही त्यांनी शिस्त लावली होती. या साऱ्यात दिपाची साथ खूप मोलाची. एक शांत तेवणारी ज्योत निवांतपणे मालवणे असा तो प्रवास!
दीपाशी गप्पा मारतांना सहजच एक कल्पना सुचली, डॉक्टरांच्या स्मरणार्थ एक झाड लावावं, कुठे हा प्रश्न उपस्थित व्हायच्या आधीच उत्तर सुचलं होतं – ARAI च्या टेकडीवर, त्यांच्या आवडत्या बाकाशेजारी! दीपाला ही कल्पना खूप आवडली. हे प्रत्यक्षात आणायचं, तर सामाजिक क्षेत्रातील कुणीतरी पुढाकार घेतला तर अनेक गोष्टी सुकर होतील हे लक्षात आलं. साहजिकच कोथरूड परिसरातील प्रा. मेधाताई कुलकर्णी यांचं नाव समोर आलं आणि त्यादेखील या उपक्रमात उत्साहानी सामील झाल्या. दीपा, गौरी लागू आणि बिंबा लागू-कानिटकर इत्यादी लागू परिवार, निर्मल खरे, राजीव जतकर अशी मंडळी उत्साहानी कामाला लागली. गौरीनं डॉक्टरांच्या नाटकातील निवडक वाक्ये काढली, तर निर्मलनी कलात्मक रित्या ते सारं बॅनर स्वरुपात सजवलं. ILS च्या प्राचार्य श्री. वैजयंती जोशी यांनी ‘त्या’ बाकाशेजारी झाड लावायला संमती दिली. प्रा. श्री. द. म्हणजेच बापू महाजनांनी ‘शिरीष’ वृक्ष सुचविला. वनविभागाचे श्री दीपक पवार आणि त्यांचे सहकारी अधिकारी यांनी चांगलं झाड मिळवून दिल आणि मोठ्या आस्थेनं ठरलेली जागा साफ करून दिली. ARAI चे श्री. उचगावकर यांनी घरचंच कार्य असल्याप्रमाणे त्यांच्या कर्मचाऱ्यांसह पुढाकार घेतला. कार्यक्रम ठरला १९ तारखेच्या रविवारी सकाळी ७.३० वाजता!
रविवारची पहाट उजाडली. पहाटेच्या धुक्यावर मालिनीताई राजुकरांचे ‘बसंत मुखरी’ रागातील स्वर तरंगत होते. बाकाशेजारी घेतलेल्या खड्ड्यात ‘शिरीषा’चं झाड उभं होतं, त्याभोवती चंद्राकार पध्दतीनं सात बॅनर मांडले होते. नटसम्राट, उध्वस्त धर्मशाळा, कन्यादान, सूर्य पाहिलेला माणूस, मित्र, सामना आणि हिमालयाची सावली अश्या क्रमानं बॅनर उभे होते. प्रत्येक बॅनरवरील डॉक्टरांच्या प्रभावी भावमुद्रा त्या परिसराला एक वेगळीच शोभा आणत होत्या. सकाळी फिरायला येणारे आणि कार्यक्रमासाठी मुद्दाम थंडी असूनही आलेले दोन एकशे अशी मंडळी जमा झाली. सतीश आळेकर, डॉ. मोहन आगाशे, सुनील बर्वे, प्रा. श्री. द. महाजन, विभावरी देशपांडे, सुनीती जैन, नंदा पैठणकर, माधुरी सहस्रबुध्दे, वनविभागाच्या श्रीलक्ष्मी, डॉ. प्रभा गोखले, मनीष साबडे आणि शुभांगी दामले इत्यादी मान्यवर उपस्थित होते. बिंबाने प्रास्ताविक करून शिरवाडकरांची ‘गाभारा’ कविता सादर केली. नंतर गौरी लागूनी सूत्रसंचालन हाती घेतलं. गजानन परांजपे यांनी ‘खुर्च्या’ ही कविता, तर चंद्रकांत काळे यांनी डॉक्टरांच्या ‘लमाण’ या आत्मचरित्रातील उतारे आणि रंगा गोडबोले यांनी ‘नट’ ही कविता सादर केली. तिन्ही कविता तात्यांच्या होत्या हा एक हृद्य योगायोग! प्रा. मेधाताई यांनी सर्व मान्यवरांचं स्वागत केलं आणि कोथरुडमधील नव्या नाट्यगृहाला डॉक्टरांचं नाव द्यावं अशी स्तुत्य कल्पना मांडली. त्यांच्याच हस्ते बाकामागील ‘स्मृती फलका’चं अनावरण करण्यात आलं. झाडाच्या मुळाशी डॉक्टरांच्या अस्थी ठेवून दीपा आणि बिंबाने माती टाकून वृक्षारोपणाची सुरवात केली. यानंतर सर्व मान्यवर आणि इतरांनी झाडाला माती आणि फुलं वाहून श्रद्धांजली व्यक्त केली.
कार्यक्रमाच्या तयाऱ्या चालू असतांना अनेक फिरायला येणारे आणि स्थानिक कुतूहलानं भेटत होते. डॉक्टर त्या बाकावर बसलेले असतांना त्यांच्याशी बोलायला जायला अनेकांना भीती वाटत असे. एक भीतीमिश्रित आदर वाटे. एकदा एक धिटुकली मुलगी त्यांना येऊन म्हणाली, ‘आजोबा, सगळे तुम्हाला का घाबरतात?’ डॉक्टर म्हणाले, ‘अगं वेडे, मी काय वाघोबा आहे?’ असं म्हणताच धिटुकली म्हणाली, ‘मग तुमच्याबरोबर सेल्फी काढू?’ आणि डॉक्टर देखील हसतहसत तयार झाले. तेव्हापासून अनेकांची भीड चेपली. त्या बाकावर बसलेला हा वयस्कर, प्रेमळ नटसम्राट लोकांच्या लख्खपणे स्मरणात आहे. डॉक्टर खूप उंच नव्हते पण त्यांच्या आसपास असतांना हिमालयाच्या सावलीत असल्याचा भास होत असे. एक कलंदर तरीही शिस्तबध्द आयुष्य जगलेला हा माणूस थोर होताच. सुरवातीस भीती वाटे, पण ओळख झाल्यावर त्यांच्यातील प्रेमळ मार्दव जाणवत असे. त्यांची विचारपूर्वक तावून सुलाखून निघालेली मतं वेळप्रसंगी कठोर असत पण ते कधी ती दुसऱ्यावर लादत नसत. त्यांच्या जवळ असतांना एखाद्या अथांग, धीरगंभीर शांत सरोवराच्या काठी असल्यासारखं वाटून मी अंतर्मुख होत असे. महाकवी कालिदासानं ‘शाकुंतल’ नाटकात शिरीषाच्या मृदू सुवासिक फुलांचं मोठं कौतुक केलं आहे. नटसम्राट डॉक्टरांचा अभिनय आणि त्याहीपलिकडे त्यांचातल्या बुध्दीप्रामाण्यवादी तरीही मृदू कविमनाच्या माणसाच्या स्मृती हा टेकडीवरील ‘शिरीष’ वृक्ष अनेक वर्षं जाग्या ठेवेल अशी खात्री आहे. हीच डॉक्टरांना आदरांजली!
- वसंत वसंत लिमये
अतिशय स्तुत्य उपक्रम राबविला गेला,त्याबद्दल आपले खूप खूप आभार.