अस्खलित उर्दूमध्ये खर्जातील आवाज साऱ्या रंगमंदिराला भारून टाकत होता. यशवंतराव नाट्यगृहात ‘तन्वीर पुरस्कार’ प्राप्त झाल्यावर नसीरुद्दीन शाह यांचे भाषण चालू होते. मागे तन्वीरचा हसरा चेहरा झळकत होता. माझ्या मनात अनेक स्मृतींनी गर्दी केली. डॉ. श्रीराम लागू आणि दीपा यांचा परिचय खूप जुना, म्हणजे १९७५ साला पासूनचा. तेव्हा मी ‘आयआयटी’त होतो. मी नाटकात किरकोळ लुडबुड केली होती, पण डॉक्टरांबद्दलचं, त्यांच्या अभिनयाबद्दल जबरदस्त आकर्षण होतं. पण ते केवळ निमित्त होतं, लागू परिवाराशी स्नेहबंध तयार होण्याचं. मग कालांतरानं तन्वीर आमच्या साहस शिबिरात दाखल झाला. पुढे ८७ साली हिमालयात ट्रेकवर आला. मला आजही गढवाल मधील भिलंगना नदीकाठचा कँप आठवतो. संध्याकाळी कँपफायरच्या वेळेस तन्वीरनं एक अभिनयाची झलक दाखवली होती. दुर्दैवाने पुढे झालेला तन्वीरचा अपघाती मृत्यू हा लागू परिवारासाठी भयानक आघात होता. तन्वीरच्या स्मृती प्रीत्यर्थ पंधरा वर्षांपूर्वी लागूंच्या ‘रूपवेध’ या संस्थेतर्फे, उत्कृष्ठ रंगकर्मीसाठी देण्यात येणाऱ्या ‘तन्वीर’ पुरस्काराची सुरवात झाली. आजवर अनेक मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. या वर्षी तन्वीरच्या जन्मदिनी, ९ डिसेंबर रोजी या पुरस्काराने नसीरुद्दीन शाह यांना सन्मानित करण्यात आलं. त्या बरोबरच गेली ३० वर्षं, प्रायोगिक रंगभूमीसाठी भरीव कार्य करणाऱ्या ‘महाराष्ट्र कल्चरल सेंटर’लाही पुरस्कर देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.
गेली चार दशकं सिनेमा, नाटक या क्षेत्रात कसदार अभिनयानं आपली ठसठशीत मुद्रा उमटवणारे नसीरुद्दीन शाह, हा एक चमत्कार आहे! तसं म्हटलं तर सामान्य चेहरा, धिप्पाड पंजाबी गोरं गोमटं रूप नाही की या मायावी दुनियेत कुणी गॉडफादर नाही. असं असूनही चिकाटी, अथक परिश्रम, प्रशिक्षण आणि अफाट वाचन याच्या पायावर एका जबरदस्त आंतरिक ताकदीवर या माणसानं आपल्या अभिनयाचा हिमालय उभा केला. अचानक जीपच्या दिव्यांचा प्रकाश डोळ्यावर पडताच, नसीरचा धडपडत ओरडणारा ‘अर्धसत्य’ मधील निलंबित पोलीस अधिकारी लोबो आजही स्मृतीपटलावर कोरलेला आहे! ‘वेटिंग फॉर गोदो’, ‘द लेसन’, मंडी, ‘सरफरोश’, द फादर’ अश्या अनेक संस्मरणीय भूमिका अत्यंत ताकदीनं उभ्या करणारा हा कलाकार. कुठेतरी वाचलं होतं की सुरवातीच्या काळात, श्वास कमी पडतो म्हणून तोकडी वाक्य घेण्याची एक नवी शैली त्यानं आत्मसात केली होती.
१९८१ साली मी नुकताच आयआयटीतून बाहेर पडलो होतो. एका छोटुश्या रोलसाठी मला वीणा चावला दिग्दर्शित ‘Oedipus’ या नाटकात काम करण्याची संधी मिळाली होती. प्रमुख भूमिकेत अर्थातच नसीरुद्दीन शाह होता. नाटकाचं पहिलंच वाचन खारमधील वीणाच्या घरी होतं. यासोबत टॉम आल्टर, ओम पुरी, दीपा लागू असे दिग्गज होते. वाचन सुरु झालं. इडिपसच्या डोळ्यांच्या खाचा झाल्यावर योकास्ता त्याला भेटायला येते असा प्रसंग. इडिपस तिच्याकडे पाठ करून ‘Away, Away, Away!’ एव्हडे तीनच शब्द उच्चारतो. पहिलंच वाचन, कुठलाही मेकअप, नेपथ्य नाही, पण तरीही त्या भारदस्त, खर्जातील आवाजातील व्याकुळ वेदना मला आजही अस्वस्थ करते. वाचिक अभिनयाचं ते एक अप्रतिम उदाहरण होतं. तेव्हाच कधीतरी नसीरच्या घरी जाण्याचा योग आला. नसीर मेरठचा, त्याची पांढऱ्या वेशातील आई आजही आठवते. दुर्दैवानं नोकरीपायी माझी त्या नाटकात काम करण्याची संधी हुकली याची रुखरुख आजही आहे!
अनेक वर्षांनंतर माटुंगा कल्चरल सेंटरमधे नसीरला पुन्हा भेटण्याचा योग आला. माझ्या बाबांनी अनुवादित केलेल्या ‘नटसम्राट’च्या ‘The Last Scene’ या अनेक प्रयत्नांती प्रकाशित होणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होता. पुस्तकाचं प्रकाशन नसीरच्या हस्ते होणार होतं. त्या काळीही नसीर एक खूप मोठा अभिनेता होता, पण कुठलेही आढेवेढे न घेता तो कार्यक्रमाला आला. डॉ. श्रीराम लागू यांच्याबद्दलचा त्याला वाटणारा आदर स्पष्टपणे जाणवत होता. परवा पुरस्कार सोहोळ्यानंतर पार्टीत भेटण्याचा योग आला. अभिनयाची अनेक शिखरं गाठलेल्या या माणसाची पावलं आजही जमिनीवर आहेत. ओळख सांगितल्यावर जाणवणारा स्नेह उल्लेखनीय होता. जबरदस्त इच्छाशक्तीच्या जोरावर आणि अफाट व्यासंगाने एक सामान्य माणूसही असामान्य अभिनेता होऊ शकतो याचं नसीर हे उत्तम उदाहरण आहे. आज त्या चेहऱ्यामागे एक वलय आहे, पण तरीही त्या सध्या चेहऱ्यासोबत, ते छोटेसे तपकिरी काळे डोळे लक्षात राहतात. सारा रंगावकाश भारून टाकणारा तो आवाज आणि प्रेमळ, तरीही काळजाचा ठाव घेणारी ती नजर विसरणं अशक्य! भविष्यात नसीरच्या अभिनयाची आणखी शिखरं अनुभवण्याचे अनेक योग येवोत अश्या स्वार्थी शुभेच्छा! स्वतःच्याच भाग्याचा हेवा करण्यासाठी हे आणखी एक कारण!