गांगलांचा आणि माझा परिचय १९८६ साली झाला. अशोक जैन आणि सुनीती यांची माझी दिल्लीपासून ओळख होती. मग श्रीकांत लागू म्हणजेच दाजीकाका, कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांचा परिचय झाला. तेव्हा आमची ‘रानफूल’ संस्था जोरात होती आणि कांचनजंगा मोहिमेचे वारे वाहू लागलेले. माझी याच काळात ‘ग्रंथाली’शी जवळीक वाढली. कांचनजंगा मोहिमेसाठी पहिली आर्थिक मदत ‘ग्रंथाली’तर्फे कुमार केतकर आणि दिनकर गांगल यांनी कमलनयन बजाज सभागृहात, पहिल्या वहिल्या पत्रकार परिषदेत जाहीर केली. माझं गिर्यारोहण, रानफूल मार्फत शालेय मुलांसाठी होणारं काम आणि थोडसं नाटकवेड या साऱ्याचं कौतुक गांगलांच्या डोळ्यात दिसे. ते तसे मितभाषी. त्यामुळे खूप बोलणं नाही पण स्नेहाचा धागा तयार झाला होता.
माझं ‘धुंद स्वच्छंद’, हे स्तंभलेखन ९० ते ९२ या काळात ‘महानगर’मधे चालू होतं, अधेमधे गांगलांची शाबासकी मिळत असे. ९४ साली अचानक गांगलांनी विचारलं, ‘बाळ्या, ‘धुंद स्वच्छंद’ मधील लेखांचं पुस्तक करायचं का?’ ‘म्हणजे मला काय करायला लागेल?’ माझा अनभिज्ञ प्रश्न. ‘काही नाही, तू फक्त प्रस्तावना लिही, बाकी मी पाहतो!’ माझं पहिलं पुस्तक होणार होतं! मी हवेत तरंगत होतो. त्याच तरल अवस्थेत, साधारण एका लेखा इतकी प्रस्तावना मी मनोभावे लिहली आणि गांगलांना दाखवली. एरवी सौम्य असणाऱ्या या माणसाकडून, ‘बाळ्या, प्रस्तावना फारशी खास जमली नाही आहे!’ त्यांची अशी कठोर प्रतिक्रिया हा माझ्यासाठी गुगली होता. माझी स्वतःवरच चिडचिड झाली. त्याच तिरीमिरीत घरी येऊन, मी एकटाकी नवी प्रस्तावना लिहिली. चांगली पाच लेखांयेवढी लांबलचक झाली. लगेच दुसऱ्या दिवशी मी ती गांगलांकडे घेऊन गेलो. त्यांनी शांतपणे ती वाचली आणि म्हणाले, ‘अरे हेच तर हवं होतं!’ त्यांच्या डोळ्यात एक मिश्कील भाव होता. मला आजही ती प्रस्तावना खूप आवडते. समोरच्याला सहजपणे लिहिता करण्याची हातोटी, अफाट गुणग्राहकता आणि रसिकता त्यांच्याकडे आहे.
माझं नशीब थोर म्हणून त्याच वर्षी ‘वाचकदिना’ला विजय तेंडुलकरांच्या हस्ते ‘धुंद स्वच्छंद’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं. त्यानंतर अधून मधून गाठीभेटी, गप्पा यातून गांगलांचा स्नेह वृद्धिंगत होत गेला. २००४ नंतर ते अनेकदा ‘गरुडमाची’ला आले. डॉ. श्रीराम लागू, दाजीकाका लागू, अशोक जैन, सुनीती, रामदास भटकळ, कुमार केतकर, विद्या बाळ, रविराज गंधे अश्या अनेकांबरोबर ते येत राहिले. पत्रकार, लेखक, संपादक आणि ‘ग्रंथाली’चे संस्थापक सदस्य आणि आता ‘थिंक मराठी’ अशी त्यांची प्रदीर्घ कारकीर्द, पण त्यांच्या वागण्यात याचा बडेजाव कधीच आढळला नाही. आसपास घडणाऱ्या साऱ्या गोष्टींबद्दल त्यांच्याकडे एक सहजसुलभ कुतूहल असतं आणि त्याचा ते अन्वयार्थ लावत असतात. ही प्रक्रिया पाहणं, हा निखळ आनंद मी अनेकदा अनुभवला आहे. त्यांच्याकडे इतका समृध्द अनुभव असूनही कुठल्याही नव्या गोष्टीकडे पाहतांना पूर्वग्रहातून येणाऱ्या मतांचं किल्मिष नसतं. हा त्यांचा मोठेपणा आहे आणि त्यामुळेच त्यांच्याशी बोलतांना कधीच कंटाळा येत नाही. आपल्याला नेहमीच काहीतरी नवीन गवसतं.
२००७ साली मी एका वेड्या साहसी स्वप्नाच्या मागे लागलो. कल्पना होती ‘राजीव गांधी हत्या’ ही घटना केंद्रभागी ठेवून कादंबरी लिहिणे! कल्पना, अभ्यास आणि मग प्रत्यक्ष लेखन या सर्व टप्प्यांवर गांगलांचं प्रोत्साहन होतं. हा माझा पहिलाच प्रयत्न असल्यानं साहजिकच साशंकता होती, पोटात भीती होती. त्या संपूर्ण प्रयत्नात गांगलांचा फार मोठा आधार माझ्या पाठीशी होता. माझ्यासारख्या नवशिक्या लेखकाची कादंबरी संपादन करण्याची जबाबदारी गांगलांनी मोठ्या प्रेमानं स्वीकारली आणि ‘ग्रंथाली’नं सहजपणे कादंबरी प्रकाशित करायचं ठरवलं. त्या सर्व काळात मला नेहमीच त्यांच्या संयमाचं कौतुक वाटत असे. कादंबरी चांगली भलीमोठी असणार होती, पण न कंटाळता त्यांनी अगणित वेळा काळजीपूर्वक वाचून वारंवार सूचना दिल्या. शुद्धलेखन, व्याकरण यापलीकडे जाऊन ते मजकूर, शैली यासंदर्भात सुधारणा सुचवीत. लेखकाचा उत्साह, धाडसी कल्पना आणि ‘आपलंच बाळ’ म्हणून लेखनाबद्दलची आत्मीयता यामुळे लेखकाला ‘संपादक’ एखाद्या दुष्ट, मारकुट्या मास्तरासारखा भासू शकतो. पण गांगलांच्या संपादनात कुठलीही आक्रमकता किंवा अट्टाहास नसे. ‘शेवटी ही तुझी कादंबरी आहे, त्यामुळे तुझा निर्णय फायनल!’ असं म्हणून ते दिलासा देत असत. एक नक्की की गांगलांच्या अनुभवी संपादनामुळे ‘लॉक ग्रिफिन’ ही कादंबरी उत्तम रितीने वठली आणि माझ्यासारख्या नवोदित लेखकाच्या पहिल्याच कादंबरीचं उदंड कौतुक झालं. पुढील कादंबरीसाठी मी नवीन प्रकाशक शोधायचं ठरवलं होतं. नव्या कादंबरीची कल्पनाही भन्नाट होती आणि सुरुवातीपासूनच, प्रकाशक मिळण्यापूर्वीच गांगलांनी संपादनाचं काम अंगावर घेतलं. १७ प्रकरणं झाल्यावर ‘राजहंस’ प्रकाशनानं कादंबरी प्रकाशित करण्याचं मान्य केलं. गांगलांच्या जोडीनं संजय भास्कर जोशी हे आणखी एक संपादक म्हणून लाभले. गांगल ‘मुली’कडचे तर संजय भास्कर ‘मुला’कडचे असं मी गमतीनं म्हणत असे. संजय भास्करनं Macro तर गांगलांनी Micro बघायचं असं ठरलं. ‘विश्वस्त’ या कादंबरीसाठी दोन संपादक असूनही कुठलीही धडपड, कुचंबणा न होता, माझं लेखन अधिक समृध्द होण्यासाठी मोलाची मदतच झाली. यात गांगलांचा अनुभव आणि समंजस प्रेमळ सहभाग माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. एकदा ते म्हणाले, ‘बाळ्या, अनेक लेखकांना खूप लेखन केल्यानंतर, कालांतरानं एखादा अफलातून, भारी विषय सापडतो. तू नशीबवान आहेस की असा विषय तुला दुसऱ्याच कादंबरीसाठी मिळाला!’ माझ्या उत्साहाला हे विशेष खतपाणी होतं, प्रोत्साहन होतं. अतिशय गुंतागुंतीचं कथानक असूनही ‘विश्वस्त’ खुलत जाण्यात आणि तरीही एकंदरीत आकृतीबंध आणि बाज याचं भान न सुटण्यामध्ये गांगलांचं प्रेमळ योगदान मला लाभलं हे माझं भाग्य!
उंच, शिडशिडीत देहयष्टी, करडे केस, उभट चेहरा, उंच भालप्रदेश आणि विचारात पडले की त्यावर उमटणाऱ्या पुसट आठ्या. मिशीखाली कधीही मनमोकळं हसू उमटेल अशी जिवणी, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचे चौकस, गर्द पिंगट स्नेहार्द डोळे! उदंड व्यासंग, अनुभव असूनही, समोरच्यावर दडपण न आणता आपलंसं करण्याच्या स्वभावामुळे त्यांचा मनुष्यसंग्रह अफाट! मृदू स्वभाव, ऋजुता, निर्व्याज कौतुक, निरामय दृष्टीकोन अशी अनेक पुस्तकी विशेषणं त्यांच्या वागण्यातून जिवंत होऊन आपल्याला भिडतात. हे सारं असूनही ते त्यांच्या विचारांशी, मतांशी आणि भुमिकेशी प्रामाणिक आणि चिवटपणे ठाम असतात. त्यांच्या भुमिकेमागे विचार, तर्कशुध्दता आणि व्यासंग असतो. त्याचबरोबर नकारात्मकतेचे कुठलेही किल्मिष नसल्याने त्यांचं अनेकांशी सहजपणे जमतं. कालच त्यांचा ८० व्वा वर्धापनदिन होता. प्रभादेवीला ‘ग्रंथाली’ परिवारातर्फे एक स्नेहमेळावा झाला. अमेरिकेहून मुद्दाम यानिमित्त आलेली त्यांची मुलगी दीपाली, सौ. अनुराधाबाई, इतर कुटुंबीय, याशिवाय जमलेला शंभराहूनही अधिक मित्रपरिवार यासह हा सोहळा खूपच रंगला. हास्यविनोदात रंगलेल्या मेहफिलीत जाणवणारं गंगालांवरील प्रेम, आदर उत्साहवर्धक होतं. या वयातही त्यांच्याकडे हेवा वाटावा असा उत्साह आणि चैतन्य आहे. मला त्यांच्यात दडलेलं चौकस तरीही खट्याळ, हसरं मूल फार आवडतं! त्यांचा स्नेह असाच राहो ही प्रबळ इच्छा आणि या निमित्तानं त्यांना उदंड आयुरारोग्यासाठी अनेकोत्तम शुभेच्छा!
वसंत वसंत लिमये
वा, फारच सुंदर वसंतराव !
सुरेख…