परवा मी एकांना भेटण्यासाठी कारवारला जायला सकाळी पहाटेच पुण्याहून निघालो. दुपारी जेवणासाठी कोल्हापुरात आमच्या सुधांशू नाईक या ‘खमंग’ मित्राकडे थांबलो. मस्त गप्पा झाल्या. खूप दूरच पल्ला गाठायचा असल्यानं, दुपारी एक वाजताच आम्ही पुढे निघालो. पुण्याहून निघतांना आभाळ गच्च भरून आलेलं. अधेमधे सरी येऊन जात होत्या. मी अमितला म्हटलं देखील, ‘च्यायला पाउस काही पाठ सोडत नाही!’ कारणही तसंच होतं. २५ ऑगस्टच्या सुमारास मी नुकताच पुरानंतर काही मदत स्वरूपाचं काही समान घेऊन कोल्हापूरला जाऊन आलो होतो. तेव्हाच्या भीषण स्मृती अजूनही मनात रेंगाळत होत्या. साताऱ्यानंतर मात्र उघडीप मिळू लागली. खिडकी उघडून गाणी गुणगुणत चेहऱ्यावर येणारा मस्त वारा घेत होतो. धारवाडच्या आसपास आम्ही हायवे सोडून दांडेलीकडे जाणारा रस्ता घेतला. वाटलं होतं त्यापेक्षा रस्ते खूपच सुस्थितीत होते. दांडेली गाठता गाठता संध्याकाळ होत आली, एक चहा मारून आम्ही पुन्हा मार्गस्थ झालो. अनशी घाटमार्गे पुढचा सर्व प्रवास जंगलातून असल्यानं घाई करणं गरजेचं होतं. रात्री नऊपर्यंत आम्ही कारवार गाठलं.
एव्हाना आम्ही चांगलेच थकलो होतो, अंगं आंबून गेली होती. काली नदीवरील पुलापाशी उत्तरेच्या टोकाकडे असलेल्या ‘स्टर्लिंग रिझॉर्ट’मधे ‘हुश्श’ करत मुक्काम ठोकला. दांडेलीहून निघाल्यापासून गच्च जंगल लागलं होतं, आशा होती काही प्राणी, गवे दिसतील पण आमची निराशाच झाली. बहुतेक सर्व पाट्या कानडी जिलब्यांनी भरलेल्या. तरीही एक उन्मेखून जाणवलेली गोष्ट म्हणजे आजही बेळगावी, धारवाड, दांडेली या साऱ्या भागात पदोपदी दिसणारं शिवाजी महाराजांचं अस्तित्व. दुकानांची नावं, छोटे मोठे महाराजांचे पुतळे आणि चक्क मराठी बोलणारी माणसं! माझ्या माहितीनुसार महाराज एकदाच कारवारला आले होते, आणि तरीही आजदेखील त्यांचा प्रभाव लोकांच्या मनात अभिमानानी असलेला पाहून मन उचंबळून आलं. साऱ्या प्रवासात, संध्याकाळी झिरपत येणाऱ्या काळोखात आम्हाला काली नदीचं नखसुध्दा दिसलं नव्हतं. हॉटेलच्या गॅलरीत येऊन पाहिलं तर तोंड उत्तर दिशेला, म्हणजे त्यादिवशी कालीचं दर्शन अशक्यच. ‘उद्या पाहू’ असं म्हणत थकलेलं शरीर निद्रादेवीच्या कधी आधीन झालं ते कळलंच नाही.
सकाळी उठल्यावर मी सर्वप्रथम कारवार बंदर पाहण्यासाठी निघालो. काली नदीच्या विस्तृत पत्रावरील पूल देखणा आहे. पश्चिमेला उत्तर-दक्षिण दंतुर किनारा आणि मशरूमप्रमाणे समुद्रात उगवलेली गच्च हिरव्या झाडीनं नटलेली बेटं आणि डाव्या कोपऱ्यात दक्षिणेकडे दिसणारं रंगीबेरंगी बंदर. पूल पार केल्यावर उजवीकडे गोल्फ कोर्स, मासळी बाजार दिसून गेला. नारळी पोफळीच्या, बागा, टुमदार कौलारू घरं आणि सुखी समाधानी जीवनाच्या खुणा जागोजागी दिसत होत्या. बंदराला लागून कोळ्यांची वस्ती आणि इथेही शिवाजी महाराजांची जाग होती, शेवटी मी न राहवून एका म्हतारबाला विचारलं. त्यानी चक्क मराठीत बोलायला सुरवात केली. ‘अहो, आम्ही मराठीच! आमची मुलं मराठीच लिहायला वाचायला शिकली. पण गेल्या पंधरा/वीस वर्षात शाळातून कन्नड असल्यानं नातवंडं मात्र फक्त मराठीत बोलू शकतात.’ त्याच्या आवाजात एक खिन्नता होती. भौगोलिक दृष्ट्या घाटावर धारवाड पर्यंत तर खाली काली नदीच्या उत्तरेकडे मराठी परंपरा आजही जीव धरून आहे. कारवार हे पूर्वीपासून महत्त्व असलेलं बंदर, मच्छीमार बोटींनी खचाखच भरलेलं. इथे ब्रिटीश खुणा अजूनही दिसतात. आमच्या स्नेह्यांच्या घरी मोरी माश्याचं भुजणं, तळलेला बांगडा आणि सुरमईचं कालवण असं मस्त जेवण झालं. मासळीचा ताजेपणा अजूनही जिभेवर रेंगाळतो आहे!
परतीच्या मार्गावर पुन्हा अनशी घाटानं आम्ही धारवाडला निघालो. कुंभारवाडा मागे टाकताच, जॉयडापाशी प्रचंड सुपा जलाशय दिसला. कालीनदीवरील या धरणाची भिंत १०१ मीटर उंचीची असून, सुमारे हजार चौरस किमी क्षेत्रावरील पावसाचं पाणी अडवणारा हा अफाट जलाशय. पूर्णपणे जंगलांनी वेढलेला हा जलाशय अतिशय स्वच्छ आहे. लवकरच ‘होर्नबिल रिव्हर लॉज’पाशी काली नदीनं दर्शन दिलं. पावसामुळे पाणी गढूळ असलं तरी एरवी ही नदी अतिशय स्वच्छ असते अशी आमचा राफ्टिंग करणारा मित्र रविकुमार याने ग्वाही दिली. हा साराच परिसर पक्षीनिरीक्षकांसाठी स्वर्ग आहे. भारतीय तसेच परदेशी पर्यटकांना याची पडणारी भुरळ वाढत चालली आहे. कर्नाटक सरकार जागरूक असल्याने हा परिसर सुरक्षित राहील अशी आशा वाटते.
रात्री वाटेत मुक्काम करणं गरजेचं होतं. मी धारवाडला कधी राहिलो नसल्यानं, मित्राच्या सल्ल्यानुसार आम्ही धारवाडमधील ‘हॉटेल धारवाड’ शोधत निघालो. हे जुनं हॉटेल बंद पडल्यानं, आम्ही समोरच्याच ‘कर्नाटक भवना’त मुक्काम केला. काही दिवसांपूर्वीच गिरीश कार्नाड यांच्या निधनानंतर मी त्यांची मुलाखत पहिली होती. गिरीश कार्नाड धारवाडचे आणि त्यामुळेच ते खूप प्रेमानं बोललेले आठवत होतं. संध्याकाळ झाली असूनही वॉचमनला लाडीगोडी लाऊन मी रात्रीच ‘कर्नाटक कोलेज’ पाहून घेतलं, बाहेरूनच सादन केरी रस्त्यावरील, थोर कवी बेंद्रे यांचं घर पाहिलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सुभाष रोडवरील ‘मनोहर ग्रंथ माला’चं कार्यालय पाहिलं, इथेच गिरीश कार्नाड यांच्या लेखनाची सुरवात ‘ययाती’ या नाटकानं झाली. नंतर सोमेश्वर देवालय जिथे कार्नाड लहानपणी पोहायला शिकले. अशी ठिकाणं पाहतांना, अश्या थोर माणसांच्या आठवणींना उजाळा देतांना खूप धन्य झाल्यासारखं वाटतं!
धारवाड सोडून बेळगावी मार्गे परततांना, वाट वाकडी करून खिद्रापूर येथील कोपेश्वर मंदिराला भेट दिली. नुकत्याच येऊन गेलेल्या पुरात मंदिरात बारा फूट पाणी चढलं होतं. सुदैवानं काही अपाय झाला नाही हे पाहून हायसं वाटलं. इथेच आमचे खास मित्र, ‘बर्वे सरकार’ही भेटले. एकंदरीत खुशीच्या मार्गाने मजल दरमजल करत माझी कारवार यात्रा सुफळ संपूर्ण झाली!