अवघे धरू सुपंथ!

wfdsa

MAC – हे काय आहे? हे कशाला? यातून मला काय मिळणार?

गेल्या महिन्याभरात हे प्रश्न विविध सोशल मिडीयावर उपस्थित होतांना दिसत आहेत. साहजिकच लोकांच्या मनात एक संदेह आहे, संभ्रम आहे. ‘MAC’ (Maha Adventure Council) ही ना नफा तत्वावर स्थापन झालेली, कंपनी रजिस्ट्रारकडे Section 8 खाली नोंदणी झालेली कंपनी आहे. महाराष्ट्रातील (जमीन, जल आणि वायू) साहसी क्रीडाप्रकारांसाठी असणारी मार्गदर्शक संस्था असणार आहे. स्थापनेपासून सोबत असलेले सदस्य तज्ञ, अनुभवी असले तरी ही सुरुवात आहे आणि जसजसे या सर्वच क्षेत्रातील अनुभवी, तज्ञ आणि निसर्गप्रेमी MACचे सदस्य होतील तसतशी या प्रयत्नांना बळकटी येणार आहे. २०१४ व २०१८ मधील शासकीय निर्णय यासाठी निमित्त ठरले आहेत. साहसी क्रीडाप्रकारांतील सर्वांनी एकत्र येऊन सुरक्षिततेसाठी मार्गदर्शक प्रणाली ठरविणे, अंमलबजावणीसाठी शासनाला साह्य करणे तसेच पर्यावरणावर होणारे अत्याचार रोखण्यासाठी प्रयत्नशील असणे अशी MAC ची भूमिका आहे.

DSC06579

हे कशाला? स्वातंत्र्यप्राप्तीनंतर ५०च्या दशकात गिरिभ्रमणाला खऱ्या अर्थाने सुरवात झाली. विविध क्लब स्थापन झाले आणि गिरीभ्रमणासोबत प्रस्तरारोहण (Rock Climbing), गिर्यारोहण अश्या गोष्टींना चालना मिळाली. या विषयावरील आंतरराष्ट्रीय साहित्य, हिमालयातील तीन गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था, मुंबईत चांदेकर, ओवळेकर आणि माळी सर, तर पुण्यात बापूकाका पटवर्धन अशी जाणती मंडळी, यांनी या क्षेत्राच्या नमनासाठी महत्त्वाचे योगदान दिले.  यासोबत गो. नी. दाण्डेकर, हरीश कापडिया, आनंद पाळंदे, प्र. के. घाणेकर असे आपल्याकडील भटके लिहिते झाले आणि हे वेड चांगल्या अर्थाने लोकप्रिय होऊ लागले. पुढील चार दशकात डोंगरवाटांकडे वळणाऱ्यांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली. याच काळात हिमालयन क्लब, गिरीविहार, गिरीप्रेमी अश्या अनेक संस्थांनी सह्याद्री आणि हिमालयात कसदार, अभिमानास्पद चढाया केल्या. याच काळात खडा पार्सी, ड्युक्स नोज, कोकणकडा ह्या सह्याद्रीत तर कांचनजंगा, एव्हरेस्ट अश्या हिमालयातील महत्त्वाकांक्षी मोहिमा झाल्या. क्लब संस्कृतीत सुरक्षिततेचं भान, प्रशिक्षण आणि एक गुरुशिष्य परंपरा अस्तित्वात आली होती. निसर्गप्रेमी, इतिहासप्रेमी एव्हाना डोंगरवाटांकडे आकृष्ट झाले होते. त्यांनी एक आवश्यक पर्यावरण संवर्धनाचं, गडकोट संवर्धनाचं भान या क्षेत्रात आणलं. वाढत्या संख्येबरोबर या क्षेत्रात व्यावसायिकतेचा प्रवेश झाला.

DSC02316-001

कुठल्याही क्षेत्रात संख्यात्मक वाढ झाली की त्यात व्यावसायिकतेचा सहभाग होणं स्वाभाविक आहे. या क्षेत्रातील सुरुवातीच्या व्यावसायिक संस्था पाहिल्या, तर त्यांची गंगोत्री जुने जाणते क्लब हीच आहे असे लक्षात येईल. साहजिकच सुरक्षिततेचं आणि पर्यावरणाचं बाळकडू त्यांच्याकडे होतं. कुठलाही अपघात किंवा बेजबाबदारपणा अश्या संस्थांना व्यावसायिक दृष्टीकोनातून परवडण्यासारखा नाही. एखादा क्लब किंवा व्यावसायिक संस्था अशा दोघांनाही एखादा गट निसर्गात घेऊन जात असतांना सुरक्षिततेचं आणि पर्यावरणाचं भान राखणं अत्यावश्यक आहे. याच सुमारास महाराष्ट्रात नद्यांवरील राफ्टिंग, स्कुबा डायव्हिंग तसेच पॅराग्लायडिंग अश्या साहसी क्रीडा प्रकारांची सुरुवात झाली. दुर्दैवानं नवीन शतकाच्या सुरवातीस गुगल, WhatsApp, सोशल मिडिया या इंटरनेट तंत्रज्ञानावर आधारित माहितीच्या विस्फोटाने जनमानसावर गारुड केलं! यामुळे काही अनिष्ट प्रवृत्तींचा साहसी क्रीडाप्रकारात चंचुप्रवेश झाला. बाजारूपणा, नफेखोरी आणि चंगळवाद यांचा प्रवेश अश्या उपक्रमात होऊ लागला. सोशल मिडियावरील चमकदार, आकर्षक ब्लॉग्ज, पोस्ट्स यामुळे सारेचजण निसर्गात जाण्यासाठी साहसी क्रीडाप्रकारांकडे आकर्षित होऊ लागले. गडकिल्ल्यांच्या अगदी पायथ्याशी पोचणाऱ्या नव्या दळणवळणाच्या सोयी, वाढलेली क्रयशक्ती यामुळे ‘जाणारे’ आणि ‘नेणारे’ यांच्या संख्येत भरमसाट वाढ झाली. ट्रेकर आणि पर्यटक यात गल्लत होऊ लागली. कळसुबाई, हरिहर आणि कलावंतीण येथील बेसुमार  रांगा, देवकुंड आणि इतर धबधबे येथील बेफाम गर्दी असे प्रकार वारंवार घडू लागले. सेल्फी, नशापान आणि अनभिज्ञता यामुळे अपघात वाढले आणि अश्या ठिकाणांचं पावित्र्य, शांतता आणि रमणीयता यावर अनन्वित अत्याचार होऊ लागले.

२००६ साली हिमालयातील गिरिभ्रमणास गेलेल्या दोघांच्या अपमृत्यूमुळे त्यांच्या पालकांनी २०१२ साली दाखल केलेल्या जनहित याचिकेमुळे साहसी क्रीडाप्रकारातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. या जनहित याचिकेचे पर्यवसान २०१४ साली आलेल्या शासकीय निर्णयात झाले. तसं पाहिलं तर हे अपघात जमिनीवरील साहसी क्रीडाप्रकारात घडले होते, परंतु सुरक्षा विषयक नियमावली आणि मार्गदर्शक तत्त्वे मांडणाऱ्या शासकीय निर्णयाने जमीन, जल आणि वायू या सर्वच क्रीडाप्रकारांना शासकीय निर्णयांद्वारे हात घातला. एकीकडे हे महत्त्वाकांक्षी असलं तरी स्वागतार्ह आहे. दुर्दैवाने पुरेसा अभ्यास न करता, विविध संज्ञांच्या व्याख्या, व्याप्ती आणि अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया यावर सखोल विचार न करता, काहीश्या घाईने हा शासकीय निर्णय अस्तित्वात आला असावा. या क्षेत्रातील काही अनुभवी आणि तज्ञ व्यक्तींनी एकत्र येऊन या शासकीय निर्णयाविरोधात Writ Petition दाखल केले आणि सन्माननीय कोर्टाने या निर्णयास स्थगिती दिली. याच सुमारास एकोणीस तज्ञ सदस्यांची समिती ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’साठी गठित करण्यात आली. या समितीने या विषयात ATOAI, IMF, MOT, British Mountaineering Council  अश्या विविध आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थांच्या ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’चा अभ्यास करून तसेच महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीचा विचार करून ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची पहिली प्राथमिक आवृत्ती तयार केली. ही आवृत्ती २०१४ साली शासनाला व कोर्टाला सादर केली. हे सारेच काम खूप व्यापक असून त्यात अभ्यासाद्वारे जोड देण्याची गरज असल्याने या समितीचे प्रयत्न चालूच राहिले. २०१८ साली शासनाने दुसरा निर्णय जाहीर केला. यावर कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नाही अथवा सूचना मागविण्यात आल्या नव्हत्या. दुर्दैवाने हा दुसरा निर्णयही किरकोळ बदल वगळता पूर्वीप्रमाणेच अपुरा आणि त्रुटीपूर्ण आहे. या निर्णयासही Writ Petition द्वारे आक्षेप घेण्यात आला असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याच सुमारास केवळ विरोध करण्यापलीकडे काही विधायक पाउले उचलणे गरजेचे वाटू लागले आणि MAC या कल्पनेचा जन्म झाला. तज्ञ समितीने ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची तिसरी आवृत्ती तयार केली आहे आणि लवकरच ती MAC च्या संकेतस्थळावर चर्चा/सूचनांसाठी उपलब्ध असेल.

17

MACची भूमिका शासनाला विरोध करण्याची नसून, विरोध आहे तो अव्यवहार्य शासकीय निर्णयाला! महाराष्ट्रातील साहसी क्रीडाप्रकारांची स्थिती लक्षात घेता सुरक्षितता व पर्यावरणावरील अत्याचार हे दोन्ही विषय चिंताजनक आहे. यासाठी या सर्व क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्यांनी सुजाणपणे वागणं गरजेचं आहे आणि यासाठी ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची गरज आहे. यासंदर्भातील काळजीपूर्वक नियमन गरजेचं आहे आणि हे केवळ शासनाला शक्य आहे. या सर्व साहसी क्रीडाप्रकारातील अनुभवी व तज्ञ मंडळींनी एकत्र येऊन ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची मांडणी करणे आवश्यक आहे. यात शासनाचा सहभाग असणे देखील गरजेचा आहे. सध्याच्या शासकीय निर्णयाला स्थगिती मिळावी आणि प्रायोगिक तत्त्वावर नवीन सुधारित ‘नियमावली व मार्गदर्शक तत्त्वां’ची अंमलबजावणी करण्यात यावी असा MACचा प्राथमिक प्रयत्न आहे. यासाठी MAC सर्वतोपरी शासनास सहकार्य करण्यास तयार आहे. यामुळेच सर्व साहसी क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्या संस्था आणि व्यक्ती यांनी MACच्या माध्यमातून एकत्र येण्याची गरज आहे. वैयक्तिक गैरसमज दूर सारून MAC अंतर्गत विविध मतभेदांवर चर्चा आणि विधायक काम करण्याची आत्यंतिक गरज आहे.

महाराष्ट्रात गिरीप्रेमींना एकत्र आणण्याचे प्रयत्न यापूर्वीही झालेले आहेत. दुर्दैवाने हे प्रयत्न निष्फळ ठरले. तरी यावेळेस समंजसपणे एकत्र येण्याची गरज आहे. या सर्व प्रयत्नात MACचा कुठलाही स्वार्थ नाही. सर्व साहसी क्रीडाप्रकार क्षेत्रावर नियंत्रण अथवा सत्ता गाजवणे असाही उद्देश नाही. MACचे कार्य मार्गदर्शक स्वरूपाचे असणार आहे. आपल्या क्षेत्रातील विविध घडामोडी, बदल, नवीन तंत्रे/साधनसामुग्री यांची अद्ययावत माहिती सर्वांना उपलब्ध करून देणे, तसेच रिसर्च करणे, दस्तऐवजीकरण (Documentation) करणे, प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम ठरविणे आणि विविध गोष्टींचे मानकीकरण (Standardisation) करणे असेही MACचे कार्य असणार आहे. शासन आणि साहसी क्रीडाप्रकारात भाग घेणाऱ्या संस्था व व्यक्ती यांच्यातील समन्वय साधणारा MAC हा महत्त्वाचा दुवा ठरू शकेल. एकीकडे सध्याच्या बोकाळलेल्या अनिर्बंध अनिष्ट प्रवृत्ती तर दुसरीकडे आततायीपणाने आणण्यात येणाऱ्या ‘बंदी’सदृश्य कारवाया यामध्ये डोळसपणे समतोल साधणे गरजेचे आहे.

DSC0226500-001

आता ‘यातून मला काय मिळणार?’ या प्रश्नाकडे वळूया. या प्रश्नाकडे बघत असतांना मला जॉन एफ् केनडी यांचं गाजलेलं वचन आठवतं – ‘Ask not what your country can do for you, ask what you can do for your country!’ आपण सारेच निसर्गात, विविध साहसी क्रीडाप्रकारातील उपक्रमांसाठी जातो ते एका निखळ आनंदासाठी. आज या साऱ्याच क्षेत्राची लोकप्रियता अफाट वाढली आहे आणि या क्षेत्राचं भवितव्य निकोप आणि संतुलित ठेवण्यासाठी MAC ही एका अर्थानं चळवळ आहे. MAC ही नुकतीच जन्माला आलेली संस्था असून ती नुकतीच रांगायला लागली आहे! MAC कडे उपलब्ध असलेले मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद अतिशय तोकडी आहे. आपल्या सदस्यत्व शुल्कातून आर्थिक गरजा अंशतः पूर्ण होऊ शकतात. MACचे एकंदर प्रस्तावित प्रयत्न आणि कार्यक्रमांचा विचार करता मनुष्यबळाची निकडीची गरज आहे. यात विविध साहसी क्रीडाप्रकारातील तज्ञ व अनुभवी मंडळी आपल्या सहभागाने MAC च्या प्रयत्नांना बळकटी आणू शकतात. आपण सदस्य झाल्यास MAC चे सर्व उपक्रम, संबंधित माहिती आपल्याला मिळत राहील. तसेच आपल्या सहभागातून MAC च्या कार्याला दिशाही देता येईल. सद्य परिस्थितीचा विचार करता आपण सगळ्यांनीच प्रेमाने व उत्साहाने या प्रयत्नात सहभागी होणे गरजेचे आहे. मित्रहो, यामुळे लवकरात लवकर MACचे सदस्य व्हा असे आवाहन! मला विश्वास आहे की आपल्या क्षेत्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी एकमेका साह्य करून आपण सारेच खात्रीने – ‘अवघे धरू सुपंथ!’

  • वसंत वसंत लिमये

18

 

Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s