दीपस्तंभ हरपला

दीपस्तंभ हरपला

Title foto

रविवार, 4 नोव्हेंबर. सकाळी दहाचा सुमार, रविवारमुळे वाटेत ट्रॅफिकही तुरळक होता. मी पुण्याहून मुंबईकडे निघालो होतो. गाडी पूर्व मुक्त मार्गावरून सुसाट पळत होती. डावीकडे ठाण्याच्या खाडीवर लहान मोठ्या गलबतांचे काळसर आकार दिसत होते. समोर दूरवर लायन गेटजवळील याऱ्यांच्या गर्दीतून, इंग्रजी ‘सी’ आकाराची माझगाव डॉकची ओव्हरहेड क्रेन डोकं वर काढत होती. एक चुकार सीगल चीत्कारत अगदी जवळून उडत गेला. माझं लक्ष हातातील सेलफोनवर फेसबुक पाहण्यात गुंतलं होतं. अचानक ‘अॅडमिरल आवटी गेले!’ अशी अक्षरं डोळ्यावर आघात करून गेली. मी सुन्न झालो होतो, क्षणार्धात आजूबाजूचा आसमंत वितळत धूसर झाला. ‘सर, हॉटेलकडे जायचं ना?’ ड्रायव्हरच्या शब्दांनी मी भानावर आलो. आम्ही बॅलार्ड इस्टेटच्या सिग्नलला पोचलो होतो. समोरच उजव्या कोपऱ्यावर काळपट तपकिरी रंगाच्या दगडी इमारतीवरील ‘मुख्यालय महाराष्ट्र नौसेना क्षेत्र’ अशी पाटी नजरेत ठसली. याच ठिकाणी १९८२ सालच्या ऑगस्ट महिन्यात मी अॅडमिरल एम. पी. आवटी यांना भेटलो होतो. थक्क करणाऱ्या योगायोगाचा विचार करत मन भूतकाळात गेलं.

८२ च्या ऑगस्ट महिन्यात, स्कॉटलंडमधे जाऊन Outdoor Education या विषयातील प्रशिक्षण घेण्यासाठी धडपडणारा मी एक गरजू विद्यार्थी होतो. हा विषय आपल्याकडे नवीन, तो समजून घेऊन मदत करणारे विरळाच. कुणीतरी अॅडमिरल आवटींना भेट असं सुचवलं. येवढ्या मोठया व्यक्तीला भेटायला जातांना मी जरा दबूनच गेलो होतो. तेव्हा ते Western Naval Commandचे प्रमुख होते. सकाळी लवकरच उठून ठाण्याहून मी माझ्या ऑफिसला जायच्या आधीच तिथे पोचलो. नेव्हीचा रुबाब, ‘अॅडमिरल कट’ नावाच्या कापडाचा पांढरा करकरीत गणवेष, उच्च पदाचा दरारा आणि दणदणीत आवाज. तेव्हाही पांढऱ्या हाफ पँटची गंमत वाटली होती. अॅडमिरल साहेब स्वतः उठून स्वागतासाठी पुढे आले आणि म्हणाले,
“Young man, let us have Break-fast!”

त्यांच्या त्या पहिल्या शब्दांनीच माझ्या मनावरील दडपण दूर झालं. त्यांच्या प्रेमळ संभाषणात एक दिलासा होता, एक आपलसं करणारा ओलावा होता. नाश्ता करतांना त्यांनी लक्षपूर्वक माझ्या कोर्सची माहिती जाणून घेतली. आजूबाजूस घुटमळणाऱ्या अधिकाऱ्याला लगेच त्यांनी डिक्टेशन द्यायला सुरवात केली. ‘माय डियर सुमन…’ अशी त्या पत्राची सुरवात होती. ‘सुमंत मुळगावकर’, टेल्कोचे अध्यक्ष यांना ते पत्र लिहित होते. ‘आपल्या सारख्यांनी अश्या साहसी तरुणाला मदत केली पाहिजे’ अश्या अर्थाचं ते पत्र होतं. त्या खालची लफ्फेदार सही मला अजूनही आठवते. पुढल्याच आठवड्यात मला पहिला ‘टाटा’ यांचा चेक मिळाला होता.

ते स्वतः खऱ्या अर्थानं दर्यावर्दी होते आणि साहसाचं त्यांना अफाट प्रेम होतं. त्या दिवशी मला एक प्रेमाचा धागा गवसला होता. त्यानंतरच्या माझ्या प्रवासात अधून मधून त्यांची गाठ पडत राहिली. त्या अतूट धाग्यातील प्रेम आणि आधार नेहमीच आश्वासक होता. १९८८ साली आमच्या महत्त्वाकांक्षी ‘गिरीविहार कांचनजंगा ८८’ या मोहिमेच्या आर्थिक सल्लागार समितीवर ते होते. साहसामुळे माणसाचं सशक्त, निकोप व्यक्तिमत्व घडतं अशी त्यांची ठाम धारणा होती. शालेय मुलांसाठी ‘साहस शिक्षण’ देणाऱ्या आमच्या ‘रानफूल’ या संस्थेच्या कामाबद्दल त्यांना विशेष जिव्हाळा होता. पुढे ते माझ्या High Places या संस्थेचे मानद सल्लागार झाले आणि हितचिंतक तर ते नेहमीच होते.

स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांच्या वडिलांची इच्छा यांनी डॉक्टर बनावं अशी होती. ते सहज म्हणून ब्रिटीश नौदल परीक्षेला बसले, प्रथम क्रमांकाने पास झाले आणि लंडन येथे शिकायला गेले. १९४५ साली ते ‘रॉयल इंडियन नेव्ही’त रुजू झाले. प्रशिक्षण संपेपर्यंत भारत स्वतंत्र झाला होता. ते ‘सिग्नल संपर्क’ या क्षेत्रातील विशेषज्ञ होते. त्यांनी ‘रणजीत’, ‘बेतवा’, ‘तीर’ आणि ‘मैसूर’ अशा युध्दनौकांवर काम केलं. डिसेंबर १९७१ मधे ‘INS कामोर्ता’चे ते कप्तान होते आणि बांगलादेश मुक्तिसंग्रामात त्यांनी विशेष कामगिरी बजावली. त्यांच्या नेतृत्वाचा आणि कामगिरीचा गौरव ‘वीर चक्र’ सन्मानाने करण्यात आला. १९७६-७७ या काळात ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’, खडकवासला या संस्थेचे ते प्रमुख संचालक होते. अनेक युद्धे, अनेक लढाया यांना यशस्वी तोंड देत त्यांचा प्रवास निवृत्त होतांना भारताच्या पश्चिमी नौदल प्रमुख या पदापर्यंत पोहोचला होता. ही व्यक्ती म्हणजे स्वतंत्र भारताच्या आरमाराचा एक चालता बोलता इतिहास होता.

DSC_0434

२०१३ साली विजयदुर्ग येथे झालेल्या तिसऱ्या दुर्गसाहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनीच भूषविले होतं. पक्षी निरीक्षण आणि निसर्ग संवर्धन या विषयातही त्यांना विशेष रस होता. १९८२ साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी ‘मॅरीटाईम हिस्टरी सोसायटी’ या संस्थेची स्थापना केली. पुढे ‘इकॉलॉजीकल सोसायटी’चे ते अध्यक्ष झाले. २७ सप्टेंबर २०१४ रोजी High Placesच्या २५व्या वर्धापन दिनी काही अनिवार्य कारणामुळे ते येऊ शकले नाहीत. पण त्यांच्या संदेशात एक वाक्य होतं – ‘I am now 88 and must try and make it to your establishment Garudmaachi before the opportunity is lost forever.’ हे वाक्य चटका लावून गेलं. पुढच्याच महिन्यात मृणाल आणि मी विंचुर्णीस त्यांना आग्रहाचं निमंत्रण देण्यासाठी जाऊन थडकलो. अॅडमिरल साहेबांनी आढेवेढे न घेता आमंत्रणाचा स्वीकार केला. ११ डिसेंबर, सोनियाचा दिवस उजाडला. पहाटे विंचुर्णीहून निघून अॅडमिरलसाहेब आमच्या पुण्यातील ‘वाड्या’सारख्या घरी पोचले.

DSC_0444

त्याआधी काही दिवसांपूर्वीच ‘कमांडर दिलीप दोंदे’ नावाच्या महान साहसी माणसाशी मनोहरकाकांच्याच घरी माझी ओळख झाली. २००८ साली या बहाद्दरांनं ‘सागर परिक्रमा’ या मोहिमेत ‘म्हादेई’ या शिडाच्या बोटीनं, एकट्यानं पृथ्वीप्रदक्षिणा केली. ‘म्हादेई’ – ही गोव्यातील दर्यावर्दी लोकांची देवी. गोव्यात बांधलेल्या या खास बोटीचं, आपल्या लाडक्या कन्येचं बारसं अॅडमिरल साहेबांनीच केलं होतं. हे साहस करणाऱ्या पहिल्याच भारतीय वीरानं ‘The First Indian’ असं या सफरीवरील पुस्तक नुकतंच प्रसिद्ध केलं. दोंदेंच्या स्वाक्षरीची प्रत मला मिळाली होती. या मोहिमेचे प्रमुख पुरस्कर्ते आणि भक्कम पाठीराखे अॅडमिरल साहेब होते. ११ तारखेच्या सकाळी पुण्यातल्या घरी मी ते पुस्तक मनोहरकाकांच्या समोर सादर केलं आणि त्यांनीही त्यावर काही संदेश लिहावा म्हणून गळ घातली. अॅडमिरल साहेबांनी त्यांच्या लफ्फेदार हस्ताक्षरात संदेश लिहिला.

DSC_0473

तारीख टाकतांना अचानक त्यांचा हात अडखळला. ते थबकले आणि म्हणाले, “आज १२ तारीख आहे ना?”
“नाही आज ११ तारीख आहे.” मी तत्परतेनं उद्गारलो.
“अरेरे! १२ असायला हवी होती! १२ डिसेंबर म्हणजे ‘म्हादेई’चा सहाव्वा वाढदिवस!” – अॅडमिरल.
“मग त्यात काय झालं, उद्याच तर १२ तारीख आहे. द्या टाकून १२ तारीख, त्यात काय मोठंसं?” माझ्यातला व्यवहारचतुर पट्कन बोलून गेला.
अॅडमिरल साहेब क्षणात गंभीर झाले. ठामपणे म्हणाले, “नाही! १२ तारीख उद्याच टाकता येईल!”
“ठीक आहे सर, मी पुस्तक गरूडमाचीला सोबत घेऊन येतो!” काहीसा ओशाळून मी पट्कन म्हणालो.
दुसऱ्या दिवशी गरूडमाचीत, १२ तारखेच्या सकाळी मी पुस्तक पुढे करताच, अॅडमिरल साहेबांच्या प्रसन्न झोकदार शैलीत अक्षरं उमटली – ‘12th Dec 2014, MHADEI’s Sixth Birthday’. छोटीशीच गोष्ट, पण चारित्र्यसंपन्नता, प्रामाणिकपणा, सचोटी असे सारे शब्द जिवंत होऊन, साडेसहा फूटी ताठ व्यक्तिमत्वाच्या रूपात आमच्या समोर उभे होते.

आदल्या दिवशी घराच्या देखणेपणाबद्दल मृणालचं भरभरून कौतुक आणि नाश्ता करून आम्ही गरूडमाचीस रवाना झालो. वाटेत ते NDAचे प्रमुख असतांना घडलेल्या अनेक घटना आणि मुळशी परिसरातील त्यांच्या आठवणींना उजाळा मिळाला. १९५६ सालच्या सुमारास तेव्हाचे NDAचे प्रमुख मेज. जनरल हबीबुल्ला यांना घेऊन त्यांनी मुळशी तलावावर ‘सेलिंग’ केलं होतं. अॅडमिरलसाहेबांची अस्खलित ‘साहेबी’ इंग्रजी वाणी आणि त्यांचे किस्से ही एक न्यारीच मेजवानी होती. मुळशी तलावाच्या काठाने ते उदंड पाणी न्याहाळतांना आवटी साहेबांना सागराची आठवण होणं स्वाभाविक होतं. अथांग, अफाट सागर हा व्यक्तित्व विकासाचा कसा गुरू आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं. मुळशी सारखे अनेक विस्तीर्ण जलाशय महाराष्ट्रात आहेत आणि त्यावर ‘सेलिंग’चे प्रशिक्षण सहज देता येईल असं त्यांचं स्वप्न होतं.

गरूडमाचीला पोचल्यावर, थोडयाच काळात मनोहरकाकांनी High Places मधील सहकारी, वॉचमन, माळी, चहा आणणारा पोरगा, साऱ्यांचीच प्रेमानं विचारपूस करून साऱ्यांना आपलंसं करून घेतलं. त्यांचा साधेपणा, वागण्यातील आदब आणि लाघव सारंच स्तिमित करणारं होतं. माणूस खूप मोठा असला की कुठलाही बडेजाव न आणता साधेपणाचं वागणं त्याच्या महानतेची प्रचीती देतं. दोन दिवसांच्या वास्तव्यात गरूडमाचीचा फेरफटका मारतांना खूप गप्पा झाल्या, खूप खूप ऐकायला मिळालं. विषय अनेक होते. सचोटी, प्रामाणिकपणा, चारित्र्यसंपन्नता असे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनेक पैलू उलगडत होते. या वयातही उंच सखल परिसरात फिरतांना जाणवणारा त्यांचा उत्साह आणि चैतन्य तरुणांनाही लाजवणारा होता. गरुडमाचीला असतांना मृणालनं निवडलेली कांचन आणि आंबा अशी दोन झाडं मनोहरकाकांनी तिथे मोठया मायेनं लावली. आंब्याला फळ कधी येईल अशी विचारणा देखील केली. ‘३/४ वर्षांत’ असं सांगताच ते म्हणाले,
“या आंब्याचं नाव ‘मनोहारी’ आंबा! आणि पहिलं फळ खायला मी नक्की येणार!” आम्ही सारेच धन्य झालो. अंगावर काटा आणणारे ते शब्द होते.

DSC_0485

माझे वडीलही एक्क्याणव वर्षांचे असतांना गेले. मनोहरकाकांसारख्या पितृतुल्य व्यक्तिमत्वाचा सहवास, प्रेम आणि जिव्हाळा मिळाला हे माझं भाग्य. गाडी मरीन ड्राईव्हला पोचली. समोर अथांग दर्या उसळत होता. डोक्यात अनेक आठवणींची गर्दी उसळली होती. मला प्रेमानं ‘कॅप्टन लिमये’ म्हणणारा आवाज आता हरवला होता. Aristocrat या शब्दाचा अर्थ काय असं विचारल्यास, विचारही न करता माझं उत्तर असेल – ‘अॅडमिरल आवटी’. काहीश्या झुकलेल्या पापण्यांखालून डोकावणारी भेदक पण प्रेमळ नजर समोरच्या लाटांमध्ये विरघळून जात होती. पांढरे केस, पांढऱ्याशुभ्र रुबाबदार रेखीव दाढीमिशा, दणदणीत आवाजातील खणखणीत अस्खलित वाणी, शुभ्र सिंहाप्रमाणे भासणारा तो साडे सहा फुटी दीपस्तंभ हळुहळू धूसर दिसत होता. नकळत डबडबलेल्या माझ्या डोळ्यांना आता सारंच धूसर दिसत होतं. मी डोळे पुसले. दीपस्तंभ आता खरोखरच हरपला होता!

DSC_0469

Standard

One thought on “दीपस्तंभ हरपला

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s