‘सर तुम्ही लवकर बरे व्हा!’
परवा उत्कर्ष मंदिर येथील ‘साद हिमालया’ची हा कार्यक्रम अप्रतिम झाला. प्रचंड गर्दी आणि साहजिकच कार्यक्रमानंतर मला गर्दीचा विळखा पडला. कुणी काही विचारत होतं, कुणी ‘विश्वस्त’ कादंबरीवर स्वाक्षरी मागत होतं. खरं तर मी त्या कौतुकात तरंगत होतो. गर्दी ओसरू लागली आणि माझी शाळेतली मैत्रीण आणि त्यादिवशीची सूत्रधार शिरीष अत्रे मला म्हणाली, ‘बाळ्या, सर इकडे वाट पाहताहेत!’. कार्यक्रमाच्या सुरवातीसच ‘आपटे सर आलेत’, असं पराग लिमयांनी सांगितलं तेव्हा मी हरखून गेलो होतो. आपटे सरांसारखी आदरणीय, वयोवृध्द व्यक्ती स्वतः कार्यक्रमाला हजर आहे ही गोष्टच आनंददायी होती. मग कार्यक्रमाच्या गडबडीत मी ते विसरून गेलो. शिरीषच्या शब्दांनी भानावर येऊन मी पुढे सरकलो, आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली! काठी घेऊन बसलेले, श्वास कमी पडत असल्याप्रमाणे तोंडानं श्वास घेत, कमरेला पट्टा आणि हातापायांवर सूज आणि तांबूस चट्टे, खूप श्रांत अवस्थेतील मोहन आपटे सर समोर बसलेले. चेहऱ्यावर ओळखीचे प्रेमळ भाव, पण तरीही सर काहीतरी आठवायचा प्रयत्न करत होते.
मला ‘विश्वस्त’ कादंबरीतील एक संदर्भ आठवला.
“अन्या, अनेक विद्वानांनी महाभारतातील खगोलशास्त्रीय उल्लेखांच्या सहाय्यानं भारतीय युद्धाचा काळ निश्चित करण्याचा प्रयत्न केलाय. तू, प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी यांचा पत्ता काढशील?” जोअॅननं विचारलं.
जोऍनला डेक्कन कॉलेजात प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी यांचा संदर्भ सापडला होता. मुंबईतील भारतीय विद्याभवनातील संस्कृत विभागाचे निवृत्त प्रमुख प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी यांचा प्राचीन खगोलशास्त्राचा विशेष अभ्यास होता. प्राध्यापक मंत्रवादी यांच्या नावावर अनेक लेख आणि अडतीस पुस्तकं आहेत. आर्यभट आणि भास्कराचार्य यांचं खगोलशास्त्रीय लेखन, वराहमिहिर या संबंधी प्राध्यापक मंत्रवादी यांचा विशेष अभ्यास होता. अनिरुध्दनं दादरला राहणाऱ्या वयस्कर प्राध्यापक मंत्रवादी यांचा पत्ता शोधून काढला. जएफकेच्या खाक्यानुसार, तो त्यांना भेटूनही आला. प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी यांनी मोठ्या मोकळ्या मनानं जोअॅनच्या संशोधनात विशेष रस घेतला व तिच्यासाठी विविध संदर्भ उपलब्ध करून दिले. कै. र. वि. वैद्य यांनी त्यासाठी महाभारतातील गुरु आणि शनी यांच्या स्थानांचा उल्लेख केला आहे.
प्रा. मंत्रवादी म्हणाले, “या संदर्भात तुमच्यासाठी भीष्मपर्वाच्या तिसऱ्या अध्यायातील तिसरा श्लोक महत्त्वाचा आहे –
संवत्सरस्थायिनौ च ग्रहौ प्रज्वलितौ उभौ I
विशाखायाः समीपस्थौ बृहस्पति शनैश्चरौ II”
२०१४ साल असावं, मी ‘विश्वस्त’ कादंबरीसाठी खगोलशास्त्रावर आधारित महाभारतकालीन संदर्भ शोधत होतो. तेव्हा मला प्राध्यापक मोहन आपटे यांचा संदर्भ मिळाला. माझा पार्ल्यातील मित्र उदय पटवर्धन याच्या मदतीनं मी आपटे सरांची गाठ घेतली. पंचाहत्तरी ओलांडलेल्या या माणसाचा उत्साह वाखणण्यासारखा होता. अतिशय प्रेमानं त्यांनी सारं ऐकून घेतलं. काही संदर्भ सुचविले. गुरु शनी युती संदर्भातील एक दोन पानी, मोत्यासारख्या सुंदर हस्ताक्षरातील टिपण त्यांनी माझ्या हाती ठेवलं. माझ्यासाठी तर तो खजिनाच होता. त्यांच्या नव्या पुस्तकातील हस्तलिखित प्रतीतील ती दोन पानं होती! थोर विद्वान असूनही अतिशय विनम्र. त्याकाळी हे महाराज मोठ्या उत्साहानं आर्यभट, भास्कराचार्य आणि खगोलशास्त्र या विषयांवर महाराष्ट्रभर एसटीच्या लाल डब्यानं व्याख्यानं देत दौरे काढत असत. भारतभर त्यांचा संचार होता. एखाद्या विषयाला वाहून घेतलेलं ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणजे आपटे सर! हे सारं पाहून स्वतःची लाज वाटली होती. सरांची खणखणीत तब्बेत आणि उत्साह संसर्गजन्य होता येव्हढं मात्र खरं.
पुढे लिहायला सुरवात झाल्यावर कादंबरीत एक पात्र मी जन्माला घातलं. त्याचं नाव होतं – प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी. पार्ल्याऐवजी दादर, पदार्थ विज्ञान विभागाऐवजी संस्कृत एवढेच बदल, बाकी प्रा. मोहन आपटे म्हणजेच प्राध्यापक गोविंदराव मंत्रवादी! परवा सरांना पाहून धक्काच बसला. सरांना त्यांच्यावर आधारित एक व्यक्तिरेखा आहे हे ऐकून आश्चर्य वाटलं. प्रेमानी जवळ बसवून ते माझी विचारपूस करत होते. संपूर्ण कार्यक्रम त्यांनी पहिला आणि मला शाबासकीही दिली. त्यांच्याकडे पाहून माझ्या पोटात काहीतरी तुटत होतं. काय झालं, विचारल्यावर म्हणाले ‘अरे, अचानक माझी पाठ गचकली!’ सर आता ऐंशी वर्षांचे आहेत. माझ्या डोळ्यासमोर तेच उत्साही सर तरळत होते. खरंच काही निसर्गाच्या लीला अनाकालनीयपणे निष्ठुर असतात. मी सरांना आदरपूर्वक माझी कादंबरी भेट दिली आणि चटकन त्यांच्या पाया पडलो. असे पाय मिळणं हे मी माझं भाग्य समजतो. माझे डोळे पाणावले होते. उत्कर्ष मंदिरातून बाहेर पडून मी गाडीत जाऊन बसलो. गाडीनं वेग घेतला. मला सारंच धूसर दिसत होतं. डोक्यात एकच विचार घोळत होता, ‘सर तुम्ही लवकर बरे व्हा!’
- वसंत वसंत लिमये
सुरेख लेख !
माझ्याही सरांच्या दोन आठवणी आहेत. सुमारे २५ वर्षांपूर्वी पश्चिम उपनगरातील एका शाळेत, तेव्हा नवीन असलेल्या कॉम्पुटर संबंधी भाषण द्यायला मला बोलावलं होतं. मीही उत्साहाने ‘वासरात लंगडी गाय शहाणी’ ही म्हण आठवून होकार दिला. पण तिथे गेल्यावर माझ्या नंतर आपटे सर बोलणार आहेत, हे कळल्यावर पोटात गोळा आला. सरांनी माझ्या भाषणानंतर प्रतिक्रिया दिली नाही !
तत्पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकीत, विनय सहस्रबुद्धे ह्यांनी आग्रह केल्याने (!) मी उभा राहिलो, व तोच आयुष्यातील पडण्याचा एकमेव अनुभव! सगळ्या पॅनेल मधून आपटे सर एकटेच निवडून आले, ते खरं म्हणजे त्यांच्या स्वत:च्या अफाट कर्तृत्वावर, लोकप्रियतेवर. पण आम्ही मोहिमेतील एका भिडूने जरी शिखर सर केले, तरी मोहीम फत्ते म्हटलं जातं, त्याप्रमाणे पाठ थोपटून घेतली !
धन्यवाद!
जनसेवा समितीतल्या आणि सरांविषयी आदर असणाऱ्या प्रत्येकाच्या मनात अशाच भावना आहेत आणि त्या तुम्ही नेमक्या शब्दात मांडल्या आहेत. खूप छान.
धन्यवाद!