सहावा स्तंभ

‘सोशल मिडिया’ हा प्रकारच आपल्याकडे नवीन आहे. सुमारे बारा वर्षांपूर्वी मी या प्रकाराकडे आकर्षित झालो, आणि तेव्हा महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे माझ्या कादंबरीसाठी चाललेला माझा अभ्यास! मी तसा आळशी असल्यानं गरजे पुरतंच तंत्रज्ञान वापरण्याकडे माझा कल. इंटरनेट या मायाजालावरील फेसबुक या मोहजालात मी कसा अडकलो ते कळलंच नाही. एक नक्की की माझी मुलगी रेवती आणि जावईबापू यांनी हे सारं कसं वापरावं याचं मला शिक्षण दिलं. आजकाल सकाळी एक तास आणि संध्याकाळी अर्धा तास असा वेळ मी फेसबुक आणि इंटरनेट यासाठी देतो आणि तेही आपलं सामान्यज्ञान अद्ययावत राहावं यासाठी. पण हे सारं कसं वापरावं याबाबतीतील माझं शिक्षण चालूच आहे.

Evolution of Communication

काल डॉ. गौरव प्रधान या ‘सोशल मिडिया’ या विषयातील तज्ञाचं व्याख्यान ऐकण्याचा योग आला आणि माझ्या डोक्यातील अनेक जळमटं दूर होऊ लागली. ऐंशीच्या दशकात इंटरनेटचा जन्म झाला. ‘वर्डप्रेस’ २००३, ‘फेसबुक’ २००४, ‘ट्विटर’ २००६ आणि व्हॉट्स अॅप’ २००९  मधे अस्तित्वात आलं. गेल्या दशकात ‘सोशल मिडिया’ आपल्याकडे लोकप्रिय झालं आणि आज ते सर्रास वापरलं जातं. १७८० मधे भारतात ‘छापील माध्यमा’ची सुरवात ‘हिकी’ज बेंगॉल गॅझेट’मुळे झाली.  जगभरातील घटना, राजकीय घडामोडी, नवनवीन शोध आणि बातम्या यासाठी सुरवातीस आपण ‘छापील’ माध्यमांवर अवलंबून होतो, साठच्या दशकात दूरदर्शननं आघाडी घेतली. वाचण्यापेक्षा दृश्य माध्यम जास्त प्रभावी ठरलं.

Tweet

आजकाल आपण ‘सोशल मिडिया’ मधे ‘स्मार्ट फोन’, ‘मेसेंजर’, ‘व्हॉटस् अॅप’, ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्रॅम’ आणि ‘ट्विटर’ या साऱ्याचाच समावेश करतो. यातील ‘स्मार्ट फोन’, ‘मेसेंजर’, ‘व्हॉटस् अॅप’ हे आपण दुसऱ्याशी संवाद साधण्यासाठी वापरतो. बाकी ‘फेसबुक’, ‘इन्स्टाग्रॅम’ आणि ‘ट्विटर’ आपल्याला सोशल मिडियावर एक ‘व्यक्तिमत्व’, ‘ओळख’ बहाल करतं आणि इतर त्याच्याशी संवाद साधतात. यासोबत काही प्रमाणात ‘लिंक्ड इन’, ‘फेसबुक पेज’, ‘पिंटरेस्ट’ अशी इतरही साधनं आहेत. ‘लिंक्ड इन’ हे प्रामुख्याने आपल्या उद्योगधंद्या निमित्त संपर्काचं साधन आहे. या माध्यमांमुळे आपल्याबद्दल समाजमनात एक स्वतंत्र आकलन (Perception) तयार होतं. हे सर्व घडत असतांना आपल्या व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जाईल किंवा जातो अशी एक सर्वसाधारण भीती आपल्या मनात असते. हे बऱ्याच प्रमाणात खरं असलं तरी त्याबद्दल अनेक गैरसमजही आहेत. आज इंटरनेटच्या जमान्यात आपली खाजगी माहिती सुरक्षित नाही! आपल्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या कल्पना अज्ञानामुळे बाळबोध आहेत. आपली खाजगी माहिती पूर्णपणे सुरक्षित ठेवायची असल्यास सारं काही सोडून आपल्याला हिमालयात कंदमुळं खाऊन रहाण्याव्यतिरिक्त पर्याय उरणार नाही. ही अतिशयोक्ती नाही! असं असलं तरीही आपण असुरक्षित आहोत या भीतीचा बाऊ करूनही चालणार नाही.

माणूस हा समाजशील प्राणी आहे आणि या मुलभूत सिद्धांतानुसार आपण इतरांशी आणि एका अर्थानं समाजाशी संबंध ठेवणं स्वाभाविक आणि सहजसुलभ आहे. आणि यासाठीच ‘सोशल मिडिया’ नीटपणानं समजून घेणं गरजेचं आहे. मला लोकांशी संपर्क ठेवायला आवडतं पण मला मर्यादित मित्र आहेत. आपल्या कल्पना, संकल्पना आणि विचार लोकांपर्यंत पोचावे असं जरूर वाटतं आणि म्हणूनच मी फेसबुक वापरू लागलो. ‘सोशल मिडिया’मधे ‘फेसबुक’ आणि ‘ट्विटर’ जास्त महत्त्वाचं. ‘ट्विटर’मुळे संक्षिप्त स्वरुपात आपले विचार, मतं लोकांसमोर येतात आणि संवादावर मर्यादा येतात. एकाचा (त्याचे विचार आणि मतं) अनेकांशी अंकांशी संपर्क होऊ शकतो. ‘ट्विट’ आणि अनुयायी असं हा संबंध असतो. ‘फेसबुक’वर आपण आपले विचार, मतं आणि अनुभवविश्व घेऊन लोकांसमोर जातो आणि अनेकांशी आपला थेट संवाद होऊ शकतो. ‘फेसबुक’वर खूप ओळखीची झालेली व्यक्ती प्रत्यक्ष भेटल्यावर अनेकदा गंमत आणि आश्चर्य वाटतं.

‘फेसबुक’ अथवा ‘ट्विटर’वर आपली विश्वासार्हता खूप महत्त्वाची आणि म्हणूनच आपण आपली प्रतिमा, व्यक्तिमत्व आपण कसं मांडतो याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं. प्रथम आपला DP (Display Picture) यानेकी फोटो. यात चेहरा नीटपणे आणि चांगल्या स्वरुपात दिसावा. देवाच्या तसबिरी, नट-नट्यांचे फोटो किंवा गर्दीत हरवलेले आपण म्हणजे हा DP नव्हे. आपल्याबद्दलचं मत यावरून बनतं. आपण चिकणे किंवा ‘मॉडेल’प्रमाणे दिसणं अपेक्षित नाही, पण आपण उत्शृंखल नाही किंवा आपण काही दडवत नाही हे लोकांसमोर येणं महत्त्वाचं. (मुली, स्त्रिया आपला फोटो वापरायला घाबरतात, ही वस्तुस्थिती आहे!) दुसरं म्हणजे आपलं Banner किंवा कव्हर यावरून पाहणाऱ्याला आपली आवड, ध्यास आणि आपलं प्रेयस काय हे कळलं पाहिजे किंवा त्याची झलक पाहता आली पाहिजे. मग हे एखादं वचन, आपल्या छंदा संदर्भातील चित्र किंवा एखादी जुनी आठवण असू शकते. यात आपली सर्जनशीलता दिसून येते. आपण DP किंवा Banner/Cover हे बदलत जाऊ शकतो. शेवटचं पण महत्त्वाचं म्हणजे आपला Profile/ओळख. ही आपली पार्श्वभूमी, शिक्षण, कतृत्व या संदर्भात थोडक्यात माहिती देणारी असावी. हे सारं आपली विश्वासार्हता वाढविण्यासाठी मदत करतं आणि काहीसा कंटाळा आला तरी ते नीटपणानं करणं गरजेचं आहे.

DP_Collage

‘फेसबुक’ अथवा ‘ट्विटर’वर आपली उपस्थिती किती प्रमाणात असावी हा पूर्णपणे वैयक्तिक निर्णय आहे पण त्यात नियमितता असावी. स्वतःबद्दल अवश्य लिहावं पण ते माफक असावं. नियमितता राखण्यासाठी बातम्या, ब्लॉग्स हेही टाकावेत. कॉपी-पेस्ट करतांना मूळ स्रोताचा उल्लेख आवश्यक! आपली पोस्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी सकाळी १०.०० ते दुपारी 1.०० पर्यंत किंवा संध्याकाळी ७.०० ते १०.०० या वेळात करावी आणि सुमारे आठ तासांनंतर पुन्हा पोस्ट करावी. शनिवार रविवारी सकाळी १०.०० ते ११.०० या वेळात अनेकजण आपली पोस्ट पाहतात. क्वचित आपल्या पोस्टवर उध्दट, अश्लाघ्य प्रतिक्रिया आल्यास उत्तर न देता त्या व्यक्तीस ब्लॉक करावे (कितीही राग आला तरी!). पोस्ट तयार करतांना Buffer.com आणि Jumpcut या Appsचा छान उपयोग करून घेता येईल.

वरील संदर्भात डॉ. गौरव प्रधान यांचं व्याख्यान खूपच उद्बोधक होतं. या विषयावरील त्यांच्या एका लेखात ते ‘सोशल मिडिया’ला लोकशाहीचा पाचवा स्तंभ म्हणतात.

(Link: http://drgauravpradhan.blogspot.com/2016/01/normal-0-false-false-false-en-in-ja-x.html)

विधिमंडळ (जे आज अकार्यक्षम झालं आहे.), कार्यकारी नोकरशाही (जी आज काही ताकदवान, भ्रष्टाचारी मूठभर लोकांच्या हातात गेली आहे.), कायदेसंस्था (जी आज कालबाह्य, आंधळी आणि भ्रष्टाचारानं बरबटलेली आहे.) आणि प्रसारमाध्यमे (जी आज विकत गेलेली आहेत आणि TRPच्या मागे लागून लोकांसमोर मासळीबाजार मांडत आहेत.) हे लोकशाहीचे चार स्तंभ. यातील प्रसारमाध्यमांची जागा ‘सोशल मिडिया’ पाचवा स्तंभ म्हणून घेत आहे. मराठीत काही ज्येष्ठ पत्रकारांच्या मते लोकशाहीला दगा देणारी वृत्ती म्हणजे पंचमस्तंभ अशी धारणा आहे. या शक्तींनी देशाचा मिडिया ताब्यात घेतला असून न्यायव्यवस्था, पोलीस, गुप्तचर यंत्रणा आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे असंही ते म्हणतात. पंचमस्तंभ ही संकल्पना आधीपासून अस्तित्वात असल्याने, ‘सोशल मिडिया’ला आपण सहावा स्तंभ म्हणूया. ‘सोशल मिडिया’ची सोपी व्याख्या म्हणजे ‘अनेक स्वस्त आणि सर्वांना सहजपणे उपलब्ध असणाऱ्या इलेक्ट्रॉनिक साधनांचा वापर करून माहिती मिळवणे अथवा प्रसिद्ध करणे, समान विषयात सहकार्य करणे आणि परस्परसंबंध प्रस्थापित करणे’.

दृश्य मध्यम प्रभावी असल्याने, छापील प्रसारमाध्यमांची जागा टीव्ही चॅनेल्सनी बळकावली, तर आज ‘सोशल मिडिया’ने ‘मिडिया कंटेंट’ निर्माण करणाऱ्यांचा देश अशी आपली ओळख तयार केली आहे. डिसेंबर २०१५ मधे भारतात ४१ कोटी लोक इंटरनेटचा वापर करत होते. यातील ७०% ‘सोशल मिडिया’चा वापर करणारे तर त्यातील ८०% म्हणजेच २३ कोटी लोक मोबाईलवर ‘सोशल मिडिया’चा वापर करणारे होते. २०१९ पर्यंत हीच संख्या ८० कोटीवर जाईल असा अंदाज आहे. ‘सोशल मिडिया’ आज आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग झालेला आहे. ‘सोशल मिडिया’च्या सहज उपलब्धतेमुळे लोक आपले विचार, मतं उघडपणे मांडू शकतात. छापील माध्यमांचं आयुष्य काही तासांपुरतं असतं तर एका अर्थानं ‘सोशल मिडिया’ला कधीच मरण नाही. पुराणकालात आपलं ज्ञान लिहून ठेवण्याची सोय नसल्यानं भविष्यकाळात ते वाचण्यासाठी उपलब्ध नव्हतं. ती माहिती, ते ज्ञान केवळ मौखिक परंपरेने पुढील पिढ्यांना उपलब्ध होत गेलं. ती माहिती, ज्ञान याचा उगम ठाऊक नसल्यानं त्याला अपौरुषेय म्हणत असावेत. आज ‘सोशल मिडिया’ आणि इंटरनेटमुळे माहिती आणि ज्ञान अजरामर होऊन एका वेगळ्या अर्थानं अपौरुषेय झालेलं आहे.

foto

गेल्या काही वर्षात ‘सोशल मिडिया’वरील नेटवर्क्स विविधप्रकारे वाढली आहेत. जगभरातील संपर्क सहजसुलभ झाला आहे आणि एखादी बातमी पसरणे याचा वेग आणि त्याची व्याप्ती यात अफाट वाढ झाली आहे. सकाळच्या वर्तमानपत्रातली बातमी मला काल रात्रीच कळलेली असते. ‘सोशल मिडिया’मुळे प्रस्थापित प्रसारमाध्यमांना अधिक जबाबदारीनं वागावं लागतं आहे. कुठलीही खोटी बातमी, लेखातील दुषित ग्रह किंवा कुठल्याही गोष्टीची खोटी भलामण या साऱ्याला काही मिनिटातच ‘सोशल मिडिया’ सुरुंग लावतं. साहजिकच प्रस्थापित प्रसारमाध्यमांनी ‘सोशल मिडिया’शी उघड-उघड युद्ध पुकारलं आहे.  ‘सोशल मिडिया’ हळुहळू बहरतं आहे. प्रधानांचे ३० लाख, भाऊ तोर्सेकरांचे ५ लाख, प्रवीण बर्दापूरकर, कौस्तुभ केळकर, सायली राजाध्यक्ष अशा अनेकांचे काही लाखात अनुयायी आहेत. हे आकडे टीव्ही चॅनेल्सलाही मागे टाकणारे आहेत. पूर्वी शब्दवैभव आणि भाषासामर्थ्य यामुळे शि. म. परांजपे, लोकमान्य टिळक, अत्रे, बाळासाहेब ठाकरे असे संपादक आणि अनेक पत्रकार लोकप्रिय होते. तेच तेव्हाचे सर्वांसाठी माहिती आणि ज्ञानाचे स्रोत होते. एका अर्थानं सामाजमानसाचे शिल्पकार होते. आज ‘सोशल मिडिया’मुळे प्रत्यक्ष अनुभव, फोटो आणि आजवर अज्ञात असलेले स्रोत आपल्या आवाक्यात आले आहेत. सच्च्या पत्रकारितेला आजही महत्त्व आहे परंतु त्यासोबत ‘सोशल मिडिया’मुळे आपलं मत, जाणीव  अधिक सखोल आणि सशक्त असू शकते. ‘सोशल मिडिया’वर एखादी व्यक्ती त्याच्या विश्वासार्हतेमुळे, सचोटीमुळे अफाट लोकप्रिय होऊ शकते, पण हीच लोकप्रियता डोक्यात जाऊ शकते आणि या धोक्याचं भान राखलं पाहिजे. अंधानुकरण करून चालणार नाही!

Pillars

थोडक्यात आजच्या काळात ‘सोशल मिडिया’ हा पोरखेळ अथवा फॅड नसून एक प्रभावी माध्यम आणि साधन आहे. ते स्वीकारतांना आपली विश्वासार्हता, सचोटी आणि सकारात्मक भूमिका अबाधित राखणं महत्त्वाचं आहे. सनसनाटीपूर्ण, खळबळजनक माहितीच्या आधारे मिळणाऱ्या झटपट प्रसिद्धीच्या मोहात न पडण्याचा विवेक बाळगणं गरजेचं आहे. ‘सोशल मिडिया’ हे एक हत्यार आहे आणि त्याचा चारित्र्य हननासाठी, दिशाभूल करण्यासाठीही वापर केला जाऊ शकतो हे विसरून चालणार नाही. ‘सोशल मिडिया’वर अनुयायी बनत असतांना विश्वासार्हता, सचोटी हेच निकष इतरांनाही लागू करणं विसरता कामा नये. प्रस्थापित प्रसारमाध्यमं लयाला जातील किंवा नाही हे काळच ठरवेल! आजच्या स्पर्धात्मक, अस्थिर आणि बनवाबनवीच्या दिशाभूल करणाऱ्या काळात ‘सोशल मिडिया’चा सहावा स्तंभ अधिकाधिक सशक्त आणि सक्षम होत जाणार हे मात्र नक्की!

  • –  वसंत वसंत लिमये 
Standard

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s